Quick Reads

‘झोंबिवली’:एक चांगला मराठी झॉम्बीपट

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

‘झोंबिवली’ या चित्रपटाबाबत बोलण्यापूर्वी या चित्रपटाचा प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. हा चित्रपट नुसता भयपट नाही, तर ‘विनोदी भयपट’ या उपप्रकारात मोडणारा आहे. मराठीमध्ये मुळात भयपटांची संख्या कमी आहे, त्यामुळे साहजिकपणे हा उपप्रकार आपल्याकडे फारसा हाताळला गेलेला नाही. महेश कोठारे दिग्दर्शित ‘पछाडलेला’ (२००४) हा चित्रपट हे त्यातल्या त्यात सहजपणे आठवणारे एक उदाहरण, ज्यात भूत या परिचित संकल्पनेचा वापर करीत भय आणि विनोद यांचे मिश्रण समोर आणले होते. ‘झोंबिवली’ हा याहून वेगळा आहे, कारण तो भुताखेतांच्या पारंपरिक संकल्पनांचा वापर करीत नाही, तर चित्रपटाचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे ‘झॉम्बी’ या संकल्पनेचा वापर करतो. ‘झॉम्बी’ म्हणजे काय, तर मृत्यूनंतरही कायिक पातळीवर सजीव राहणारे आणि मानवी रक्त तसेच मांसाची प्रबळ भूक असलेले जीव. आता जगभरात अनेकानेक झॉम्बीपट आणि मालिका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ‘झोंबिवली’ने ही संकल्पना जगाकडून एका अर्थी उसनी घेतलेली आहे, असे म्हणता येईल. (मात्र, या मुलभूत संकल्पनेचे मराठीकरण करणे चित्रपटकर्त्यांना पुरेपूर जमलेले आहे. ते कसे, हे पुढे येईलच). मुख्य म्हणजे या चित्रपटाने जगभरातील चित्रपटांकडून प्रेरणा घेणे आणि त्याचे विनोदी असणे, हा इथल्या योजनेचा भाग आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

 

जगभरात अनेकानेक झॉम्बीपट आणि मालिका निर्माण झालेल्या आहेत. ‘झोंबिवली’ने ही संकल्पना जगाकडून एका अर्थी उसनी घेतलेली आहे.

 

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ची मध्यवर्ती संकल्पना अशी की, मुंबईत डोंबिवलीमध्ये मानवनिर्मित कारणांमुळे झॉम्बी अस्तित्त्वात आले आहेत. आणि या झॉम्बींचा सामना करण्याचे काम काही तरुणांना करावे लागणार आहे. एकीकडे आहे जनता नगर या वस्तीमध्ये राहणारा आणि लोक ज्याकडे नेता म्हणून पाहतात असा विश्वास (ललित प्रभाकर). तर, दुसरीकडे आहे सीमा (वैदेही परशुरामी) आणि सुधीर (अमेय वाघ) जोशी हे नुकतेच पुण्यातून डोंबिवलीमध्ये राहायला आलेले जोडपे. जोशी दांपत्य जनता नगरच्या शेजारीच असलेल्या एका उच्चभ्रू टॉवरमध्ये राहतात. त्यांच्यातील आर्थिक, सामाजिक फरक ठळकपणे दिसणारा आहे. हा फरक कमी नाही की काय, म्हणून या दोन्हींमध्ये एक प्रत्यक्ष भिंतही आहे! वरवर पाहत असताना या दोन वेगवेगळ्या जगांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या सर्वस्वी भिन्न आहेत, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र दोन्ही ठिकाणच्या रहिवाश्यांना भेडसावत असलेल्या समस्या सारख्याच आहेत. ज्यात पाण्याची समस्या हा एक मोठा प्रश्न या दोन्ही वस्त्यांमध्ये आढळतो. आता झॉम्बींचा उद्रेक झाल्याने झॉम्बींचे करायचे काय, या समस्येची भर यात पडलेली आहे आणि विश्वास, समीर आणि सीमा यांना काही इतर सहाय्यक व्यक्तिरेखांच्या सोबतीने या संकटाचा सामना करायचा आहे. 

‘झोंबिवली’मध्ये काही महत्त्वाच्या झॉम्बीपटांपासून प्रेरित असलेल्या काही संकल्पना व दृश्ये आढळतात. या संकल्पनांचे आणि दृश्यांचे स्वरूप हे मानवंदनेचे (ओमाज) अधिक आहे. बहुतांशी झॉम्बीपट ज्या विश्वात घडतात, त्या विश्वात इतर सिनेमे किंवा झॉम्बींचा समावेश असलेल्या इतर कलाकृती अस्तित्त्वात नसतात. ‘झोंबिवली’मध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. कारण, खुद्द सुधीर हे पात्र इतरांना झॉम्बी म्हणजे काय हे समजावून सांगत असताना अमेरिकन चित्रपटांचा संदर्भ देताना दिसते. त्यामुळे लेखक-दिग्दर्शक या पात्राकरवी आम्हीही झॉम्बीपट पाहिलेले आहेत, हे मान्य करतात. परिणामी सुधीरची पांढरा शर्ट आणि टाय ही वेशभूषा किंवा इतर काही प्रसंगांचा समावेश याकडे ‘शॉन ऑफ द डेड’ (२००४) या एडगर राईटच्या सिनेमाला दिलेली मानवंदना म्हणून पाहता येते. याखेरीज इतरही काही घटक आहेत, जे आणखी काही कलाकृतींची आठवण करून देतात. ज्यात जॉर्ज आर. रोमेरोचे अनेक झॉम्बीपट, ‘द वॉकिंग डेड’ (२०१०-२०२२) ही मालिका, ‘ट्रेन टू बुसान’ (२०१६) हा कोरियन चित्रपट अशा कलाकृतींचा समावेश होतो. तुम्ही जितके चित्रपट पाहिले असतील, तितके संदर्भ तुम्हाला लक्षात येतील. (अगदी ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील ‘ॲव्हेंजर्स’पैकी एक असलेल्या थॉरचाही संदर्भ सापडू शकेल!)

मात्र काही मुद्द्यांबाबत ‘झोंबिवली’च्या चित्रपटकर्त्यांना डिफेन्ड करणे मला आवश्यक वाटते. उदा. चित्रपटातील सीमाचे गरोदरपण. जगाचा विनाश या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या कलाकृतींमध्ये अनेकदा जन्म ते मृत्यू असे वर्तुळ पूर्ण करणे गरजेचे असते. अशावेळी एखादे लहान मूल दाखवणे किंवा एखादे पात्र गरोदर दाखवणे हा एक उत्तम पर्याय असतो. मात्र, पटकथेत हा घटक वापरणे ही काही कुणाची मक्तेदारी नाही! कारण, आधी उल्लेख केलेल्या कलाकृतींपैकी ‘द वॉकिंग डेड’ मालिका, ‘ट्रेन टू बुसान’ हा चित्रपट, ‘कार्गो’ (२०१७) हा ऑस्ट्रेलियन चित्रपट, इत्यादी अनेक ठिकाणी ही संकल्पना वापरलेली आहे. आणि सर्वच लोक काहीएक गोष्टी/मुद्दे एकमेकांपासून उसण्या घेत असल्याने केवळ ‘झोंबिवली’ला वेगळे नियम लावून चित्रपटकर्त्यांनी चतुराईने वापरलेल्या पॉप-कल्चरमधील संदर्भांना चोरी मानायचे कारण मला तरी दिसत नाही. 

 

 

झॉम्बींभोवती फिरणाऱ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये झॉम्बी कशा पद्धतीने वागतात, त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात यामागे विशिष्ट असा तार्किक दृष्टिकोन असतो. एव्हाना झॉम्बी कसे असतात, याचे काही ठरावीक संकेत तयार झालेले असले, तरीही त्या-त्या कलाकृतीमधील जगात काही वेगळे नियम व संकेत अस्तित्त्वात असू शकतात. परिणामी ‘झोंबिवली’मध्ये बहुतांशी वेळा जगभरात इतरत्र वापरलेले संकेत पाळले असले तरी या जीवांची निर्मिती कशी झाली, त्यांचा सामना कसा करायचा किंवा त्यांचा नायनाट करायचा झाल्यास काय करायचे, यामध्ये काही महत्त्वाचे बदल करीत त्यामागे इथल्या मध्यवर्ती संकल्पनांशी सुसंगत अशी कारणे दिली आहेत. (रहस्यभंग करण्याचा हेतू नसल्याने त्याकरिता चित्रपट पाहावा, असे मी सुचवीन.) उदा. वर्गसंघर्ष, पाण्याचा प्रश्न, समाजात दिसत असलेला नैतिक मूल्यांचा ऱ्हास, मानवनिर्मित आपत्तीतील कारणांमध्ये माणसाच्या लोभाचा असलेला समावेश — या त्या संकल्पना. 

चित्रपटातील पाण्याचा प्रश्न हा तसा अगदी स्थानिक स्वरूपाचा असला तरी त्याची तीव्रता कुणाच्याही लक्षात येईल अशी आहे. चित्रपटाची पोस्टर्स, गाणी यांमध्ये इथल्या मध्यवर्ती संकल्पना आणि पात्रांसंबंधित बऱ्याचशी बाबी उत्तमरीत्या समाविष्ट केल्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ठळकपणे दिसणारे पाण्याचे टँकर्स, सीमाच्या हातातील पाण्याचा नळ, न्यूज चॅनलची ॲंकर असलेल्या पात्राने (जानकी पाठक) हातातील माईक आणि मोलकरणीच्या (तृप्ती खामकर) पात्राने झाडू उगारून घेतलेला आक्रमक पवित्रा — अशा काही गंभीर, तर काही मजेशीर गोष्टी इथे दिसतात. 

 

 

चित्रपटात डोंबिवलीमध्ये ज्याचे मोठे प्रस्थ आहे असा मुसळे (विजय निकम) हा उद्योजक स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या हक्काचे पाणी त्याच्या कारखान्यात वळते करताना दिसतो. त्याचा लोभ, त्याची हिंसक प्रवृत्ती आणि आत्मप्रौढी वागण्यामुळे जनता नगर आणि विश्वास विरुद्ध डोंबिवलीतील उच्चभ्रू लोक, हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. (त्याला जातीचे कंगोरेदेखील असले तरी ते चित्रपटाच्या कथानकात तितकेसे तीव्र नाहीत.) मुसळे जनता नगर या नावाला बदनाम करून त्यांचे नेतृत्त्व करीत असलेल्या विश्वासचे खलनायकीकरण करीत आहे. त्याने चालवलेला हा अपप्रचार उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांच्या सहज पचनी पडणारा आहे. सुधीर, सीमा किंवा त्यांच्यासोबत असलेले टॉवरमधील काही रहिवासी यांपैकी अनेक लोक या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. जनता नगरमधील विश्वास, जोशी दांपत्याच्या घरातील मोलकरीण हे जनता नगरमधील लोक आणि टॉवरमधील रहिवासी यांनी एकत्र काम करण्याची वेळ येते, तेव्हा बरेच नाट्यमय प्रसंग घडताना दिसतात. शिवाय, जेव्हा त्यांना झॉम्बी आणि झॉम्बींहून अधिक हिंसक व क्रूर अशा मुसळेचा एकत्र संघर्ष करावा लागतो, तेव्हा त्यांच्यातील अंतर कमी होत जाऊन ऐक्याची भावना बळावते. समान शत्रूचा सामना करीत असताना दोन भिन्न गटांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होणे, या अगदी मुलभूत संकल्पनेचा हा वापर अगदीच जमून आलेला आहे. 

‘झोंबिवली’मध्ये ‘विंचू चावला’ या संत एकनाथ महाराजांच्या भारूडाचा केलेला वापर फारच इंटरेस्टिंग आहे. ज्यात मूळ भारुडातील काही भाग जसाच्या तसा वापरला आहे, तर काही भाग नव्याने लिहिला आहे (गीतलेखन: वैभव देशमुख). मुळात चित्रपटाचा आकृतिबंध एखाद्या रोमांचक, उत्कंठावर्धक साहसासारखा आहे. ज्यात हे भारूड चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वारंवार ऐकू येत राहते. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हा संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण संगीतकारांपैकी एक आहे. त्याचे संगीत आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाचा आणि विशेषतः इथल्या थराराचा प्रभाव कैकपटींनी वाढवते. (नोट: ‘अंगात आलंया’ हे एकच गाणं रोहन-रोहनचे आहे, इतर गाणी ए. व्ही. प्रफुल्लचंद्रची आहेत.) 

यास्मिन रॉजर्सची रंगभूषा, केशभूषा आणि प्रॉस्थेटिक्स अगदीच प्रभावी आणि परिपूर्ण आहेत. अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन, इ. झॉम्बीपटांमध्ये ज्या पद्धतीचे काम पाहायची सवय झाली आहे, अगदी त्याच दर्जाची कामगिरी इथे केलेली आहे. शिवाय, चित्रपटातील भय आणि थराराच्या अनुभवात भर घालत एकूण चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यात झॉम्बी म्हणून काम केलेल्या असंख्य निनावी कलाकारांचा, तसेच त्यांचा अभिनय आणि शारीरिक हालचाली यासाठी वेगळ्या कार्यशाळा घेणाऱ्या टीमचा मोठा वाटा आहे. 

 

‘झोंबिवली’मध्ये ‘विंचू चावला’ या संत एकनाथ महाराजांच्या भारूडाचा केलेला वापर फारच इंटरेस्टिंग आहे.

 

चित्रपटाचा शेवट समस्येचे अतिसुलभीकरण करणारा असला तरी तो इथल्या मध्यवर्ती संकल्पनांशी सुसंगत वाटतो. मात्र, चित्रपट सर्वार्थाने परिपूर्ण आहे, असा याचा अर्थ नाही. काही प्रसंग, काही मुद्दे खटकतात, कारण ते समस्येची उकल अतिशय सोप्या रीतीने झाल्याने एकाएकी संपतात. चित्रपटात नाट्याचा अभाव असल्याने चित्रपटकर्ते निष्कारण तणाव वाढवू पाहत आहेत, असे अशा प्रसंगी वाटते. तसेच काही जागा अशा आहेत की, योगायोग जरा जास्तच प्रमाणात घडत असल्याचे दिसते. परिणामी चित्रपटात पात्रांच्या जीवाला काहीच धोका नाही की काय, असेही वाटू लागते. हे काही दोष सोडल्यास भय आणि विनोदाचे प्रभावी मिश्रण असलेला ‘झोंबिवली’ अतिशय रंजक चित्रपट आहे. 

मुख्य म्हणजे, झॉम्बी या अभारतीय संकल्पनेचे भारतीयीकरण मराठीकरण करण्यात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, पटकथाकार महेश अय्यर, सिद्धेश पुरकर, साईनाथ गणुवाड व योगेश विनायक जोशी यांना यश आले आहे. राज अँड डीके या चित्रपटकर्त्या द्वयीला ‘गो गोवा गॉन’ (२०१३) या झॉम्बीपटामध्ये असे काही साध्य झाले नव्हते. त्यामुळे ‘झोंबिवली’च्या रूपात एक चांगला मराठी झॉम्बीपट पाहणे प्रचंड समाधानकारक आहे! 

(बहुतांशी वेळा चित्रपटकर्ते जीवघेण्या हिंसेपासून दूर राहत असले तरी एन्ड-क्रेडिट्सच्या आधी एक हिंसक, तरीही फारच मजेशीर दृश्य दिसते. ते ठळकपणे लक्षात राहणारे आहे.) 

 

(Zombivli Review, Marathi Film, Marathi Movie, Amey Wagh, Marathi Review, Zombie Movie, Horror, Marathi Zombie Movie.)