Quick Reads

‘सेव्हरन्स’: कॉर्पोरेट जगातील ‘फ्री विल’चा उहापोह

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

भांडवलशाही किंवा कॉर्पोरेट जगाचे समर्थन करीत असताना असे म्हटले जाते की, काहीही असले तरी या व्यवस्थेत प्रत्येकाकडे ‘निवडीचे स्वातंत्र्य’ असते. ‘सेव्हरन्स’ या मालिकेत ‘निवडीचे स्वातंत्र्य’ आणि ‘फ्री विल’ या संकल्पनांचा मुळापासूनच विचार केला जातो आणि त्यातून एक डिस्टोपियन जग समोर उभे केले जाते. 

‘सेव्हरन्स’ काही मुलभूत साय-फाय संकल्पना वापरत आपल्या कथानकाचा डोलारा त्यावर उभा करते. असे असले तरी एकदा या मुलभूत संकल्पनांच्या पुढे सरकले की, ही मालिका विज्ञान किंवा तंत्रज्ञानाबाबत नसून मानवाबाबत, मानवी भावभावना आणि मूल्यांबाबत आहे, हे लक्षात येते. 

 

‘सेव्हरन्स’ काही मुलभूत साय-फाय संकल्पना वापरत आपल्या कथानकाचा डोलारा त्यावर उभा करते.

 

आपण ‘वर्क/लाइफ बॅलन्स’ ही संज्ञा यापूर्वी ऐकली असेल. लोकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा साधायचा, या समस्येवर उपाय म्हणून ‘सेव्हरन्स’मधील ‘लुमन इंडस्ट्रीज’ ही बलाढ्य कंपनी एक अभिनव प्रयोग राबवत आहे. ‘लुमन’ काय करते, तर कर्मचाऱ्यांच्या आठवणींची विभागणी करत एकाच व्यक्तीमध्ये दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे निर्माण केली जातात – एक मूळ व्यक्ती आणि दुसरी ‘लुमन’मधील कर्मचारी. हीच प्रक्रिया सेव्हरन्स म्हणून ओळखली जाते, ज्यात आठवणींचे दोन काप केले जाऊन दोन व्यक्तिमत्त्वे तयार होतात. एक छोटीशी चिप माणसाच्या मेंदूमध्ये इम्प्लॅन्ट केल्यानंतर या दोन व्यक्तिमत्त्वांचा (इथे पात्र हा शब्द मुद्दाम टाळला आहे) एकमेकांशी संबंध उरत नाही. आपण ‘लुमन’मध्ये कामावर जातोय, यापलीकडे काहीच माहिती कंपनीबाहेरच्या मूळ व्यक्तीस नसते आणि बाहेरच्या जगात आपले वैयक्तिक आयुष्य आहे, याखेरीज काहीच कल्पना आतल्या व्यक्तिमत्त्वास नसते. कामाच्या जागी तयार होणाऱ्या आठवणी वेगळ्या, वैयक्तिक जीवन वेगळे आणि दोन्हीकडील ताणतणावही वेगवेगळे. 

 

 

सेव्हर्ड कर्मचारी काम करीत असलेल्या मजल्यावररील मार्क (ॲडम स्कॉट), डिलन (झॅक चेरी) आणि अर्विंग (जॉन टर्टुरो) यांच्या विभागात हेली (ब्रिट लोअर) ही नवी सदस्या आल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ होऊ लागते. वरवर पाहता कर्मचाऱ्याला कामातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला असला तरी अशा मागण्या क्वचितच पूर्ण होत असल्याचे हेलीला कळते. ‘लुमन’मधून बाहेर पडण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही हाती निराशा आल्यानंतर बाहेरच्या जगात आपण कसे असू, या कुतूहलापासून सुरु झालेल्या प्रकरणाला लवकरच क्रांतीचे स्वरूप प्राप्त होते. मालिकेची सुरूवात तसेच पुढील जवळपास सारा भाग हा लुमनमधील कामगारांच्या दृष्टिकोनातून दिसतो. त्यामुळे प्रेक्षक सुरूवातीपासूनच व्यावसायिक जीवनातील व्यक्तिमत्त्वांची बाजू समजून घेत असतात. ‘बाहेरुन आत’ पाहण्याऐवजी ‘आतून बाहेर’ पाहण्याचा मार्ग मालिकाकर्ते निवडतात. 

याखेरीज भांडवलशाही कॉर्पोरेट जगतातील शोषक व्यवस्थेतून ओथंबणारा कंटाळा ‘सेव्हरन्स’मध्ये पदोपदी आढळतो. ज्यात मालिकेतील विशिष्ट अशा दृश्य-रचनेचा मोठा वाटा आहे. ज्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची विभागणी करताना मालिकेतील दृश्यरचना व रंगसंगती, वास्तुकला, पात्रांचे पोशाख, इत्यादी गोष्टी प्रकर्षाने बदलतात. ‘सेव्हरन्स’मधील कर्मचाऱ्यांचे जग हे एकसुरी पद्धतीचे आहे. पांढरा, राखाडी, काळा, निळा नि हिरवा अशा काही मर्यादित रंगांचे वर्चस्व असलेले वऱ्हांडे आणि कार्यालयीन जागा दृश्यस्तरावर फारच सुंदर, तरीही ऊबगवाण्या वाटतात. तर, लुमन बाहेरचे जग तसे रंगीबेरंगी आणि अधिक मोकळे वाटणारे आहे. लुमन इंडस्ट्रीजच्या इमारतीमध्ये एकही खिडकी नाही, हेदेखील इथल्या कामगारांना मिळणाऱ्या अमानवी वागणुकीचे द्योतक! त्यामुळे लुमनमधील कर्मचाऱ्यांचे गूढ आणि ऊबगवाणे, जवळपास नैराश्यपूर्ण आयुष्य, लुमन इंडस्ट्रीजकडून दिली जाणारी अमानवी वागणूक, कामाच्या जागी अडकलेल्या व्यक्तिमत्त्वांना कामाच्या जागेमधून बाहेर पडता न येणे यामुळे प्रेक्षकांचाही या लढ्यास मूक पाठिंबा असतो. 

डॅन एरिक्मनने निर्माण केलेल्या व अभिनेता-दिग्दर्शक बेन स्टिलरने (बहुतांशी भाग) दिग्दर्शित केलेल्या ‘सेव्हरन्स’वर अनेकविध चित्रपटमालिकांचे, त्यांतील दृश्यशैलीचे प्रभाव आहेत. लेखक-दिग्दर्शक चार्ली कॉफमन (विशेषतः ‘इटर्नल सनशाइन ऑफ अ स्पॉटलेस माइंड’, ‘बीइंग जॉन माल्कोविच’), दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक (‘२००१: अ स्पेस ऑडिसी’, ‘द शाइनिंग’), ‘द मॅट्रिक्स’ चित्रत्रयी, ‘ऑफिस स्पेस’ (१९९९), ‘कम्पायलन्स’ (२०१२), इत्यादी अनेक कलाकृतींचे संदर्भ आढळतात. 

थिओडोर शपिरोचे पार्श्वसंगीत आणि ऑलिव्हर लॅटाने निर्माण केलेले ओपनिंग क्रेडिट्स हे मालिकेतील आशय-विषयाला फारच चपखल बसतात. शपिरोचे संगीत इथल्या दृश्यांना पूरक ठरते, अनेकदा त्यांचा प्रभाव द्विगुणित करते, तसेच स्वतःचे वेगळेपण जपते. 

 

‘सेव्हरन्स’मध्ये हाताळलेल्या संकल्पना केवळ कामगारांचे आयुष्य, मानवाधिकारासंबंधित मुद्दे यांपुरत्याच मर्यादित नाहीत.

 

‘सेव्हरन्स’मध्ये हाताळलेल्या संकल्पना केवळ कामगारांचे आयुष्य, मानवाधिकारासंबंधित मुद्दे यांपुरत्याच मर्यादित नाहीत. यात अनेक नैतिक, सामाजिक, मानसिक व वैचारिक संकल्पनांचा उहापोह घेतलेला आहे. तंत्रज्ञानाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे शोषण करीत त्यांचे मुलभूत हक्क नाकारणाऱ्या लुमनमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि संस्थापक हे सायकोपाथ म्हणून समोर येतात, ते यामुळेच. लुमनला एखाद्या ‘कल्ट’चे, धर्माचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. एक उच्चपदस्थ अधिकारी घरात लुमनच्या संस्थापकाची पूजाअर्चा करताना दिसते. त्यातून ‘कल्ट’च्या मानसशास्त्राला स्पर्श केला जातो. 

 

 

शिवाय, इथल्या पात्रांच्या मनातील कोलाहलाला अस्तित्त्ववादाचीही जोड आहे. आपण नक्की काय करतोय, या जगातील आपले स्थान काय, याविषयीचे प्रश्न; आपला मेंदू, विचार आणि आठवणी दुभंगलेल्या असताना पडणारा ‘मी कोण’ हा प्रश्न असे अनेक मुद्दे अस्तित्त्ववादी तसेच वैचारिक स्वरूपाचे भासतात. याचेच एक्स्टेन्शन असलेल – माणसाची ओळख (आयडेन्टिटी) म्हणजे नक्की काय आणि त्यात आठवणींचे महत्त्व किती, हा प्रश्नही इथे आहेच. 

‘सेव्हरन्स’ ही प्रोसेस कामाच्या जगाच्या बाहेरही वापरली जावी, यासाठी लुमन प्रयत्नशील असल्याचे मालिकेत दिसते. त्यासाठी अमेरिकेतील राजकारण्यांना घेण्याची तयारीही दिसते. त्यामुळे तर इथले जग खऱ्या अर्थाने डिस्टोपियन वाटू लागते. या डिस्टोपियामध्ये भरडले कोण जाणार असतात, तर सामान्य लोक आणि त्यांच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वातील एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिमत्त्वे! आणि कॉर्पोरेट जगतातील क्रूरपणाची उदाहरणे म्हणून लुमनमध्ये अड़कलेली पात्रे आपल्यासमोर असतातच! 

(‘सेव्हरन्स’ ही मालिका ॲपल टीव्हीवर उपलब्ध आहे.) 

#Severance #AppleTV #AdamScott #ZackCherry #Streaming #Series #ToWatch