Quick Reads

‘पिग’: जॉन विकचा अँटीथीसिस

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

ढोबळमानाने सांगायचे झाल्यास दुःखाकडे पाहण्याचे, शोक व्यक्त करण्याचे दोन प्रकार असू शकतात. पहिला, काहीसा स्वाभाविक प्रकार म्हणजे अधिक आक्रमक तऱ्हेचा. ज्यात सगळी ऊर्जा, सगळा राग हा बाह्य जगतावर व्यक्त केला जातो. ‘जॉन विक’ (२०१४) किंवा ‘नोबडी’ (२०२१) या चित्रपटांतील नायक शोक व्यक्त करीत असताना हा मार्ग पत्करतात. त्यातून सूडपटांच्या चाहत्यांना समाधान मिळवून देणारा हिंसेचा आविष्कार पाहायला मिळतो. मात्र, शोक व्यक्त करण्याचा दुसरा प्रकार हा आत्मक्रोध तसेच आत्मशोधाचा असतो. नायकाचा राग हा बाहेरच्या जगावर असला तरी तो उघडपणे व्यक्त होणारा नसतो. त्यात आत्मक्लेशाचा भाग अधिक असतो. ‘पिग’मधील नायक हा दुसऱ्या प्रकारात मोडणारा आहे. 

वरवर पाहता ‘जॉन विक’ आणि ‘पिग’मध्ये बरीच साम्यं आहेत. ‘जॉन विक’मधील कुत्र्याचे पिल्लू किंवा ‘पिग’मधील डुक्कर म्हणजे इथल्या नाट्यमय घटनांच्या साखळीची सुरुवात करणारे कॅटॅलीस्ट (उत्प्रेरक) आहेत. दोन्ही ठिकाणी नायक त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर आत्ममग्न बनतात नि जवळपास अज्ञातवासात जातात. इथल्या नायकांचा बाहेरच्या जगाशी संबंध येतो तो पाळीव प्राण्यांचा अनुक्रमे मृत्यू आणि चोरी झाल्याने. या दोन्ही नायकांचा एक गडद छटा असलेला भूतकाळ आहे. त्यांना तो भूतकाळ विसरायचा आहे, हे काहीसे स्वाभाविक आहे. मात्र, त्या भूतकाळापासून दूर जाणे खचितच सोपे नाही. त्यांची नावं नुसती पुटपुटली तरी अनेक ठिकाणचे दरवाजे तात्काळ उघडतात. मात्र, आपला प्रिय प्राणी आपल्यापासून हिरावल्यानंतर इथले नायक ज्या पद्धतीने वागतात ते मार्ग पूर्णतः वेगळे आहेत. 

 

वरवर पाहता ‘जॉन विक’ आणि ‘पिग’मध्ये बरीच साम्यं आहेत. ‘जॉन विक’मधील कुत्र्याचे पिल्लू किंवा ‘पिग’मधील डुक्कर म्हणजे इथल्या नाट्यमय घटनांच्या साखळीची सुरुवात करणारे कॅटॅलीस्ट (उत्प्रेरक) आहेत.

 

रॉबिन फ्लेड (निकलस केज) हा एकेकाळचा आचारी सध्या जगापासून संपर्क तोडून पोर्टलंडजवळच्या जंगलात राहतो. त्याच्या डुक्कराच्या मदतीने तो ट्रफल (एक प्रकारचे खाद्य, भूमिगत आळंबे) शोधून त्याचा व्यापार करीत असतो. अज्ञातवासात राहणाऱ्या फ्लेडचा मृत्यू झाला असावा, असेही त्याच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांना वाटत असते. तो ज्याच्याशी व्यापार करतो तो आमीर (ॲलेक्स वुल्फ) सोडता त्याचा आणि जगाचा संबंध शून्य. अशात चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याच्या प्राणप्रिय डुक्कराच्या चोरीची घटना घडते आणि त्याच्या शोधाची सुरुवात होते. घडत असलेल्या घटनांनंतर सदर पात्राचा भावनिक, मानसिक विस्फोट होणे काहीसे स्वाभाविक असते. त्यामुळे रॉबिन फ्लेड एकदा पोर्टलंडमध्ये आल्यानंतर, आणि विशेषतः त्याच्या गडद छटा असलेल्या भूतकाळाची कल्पना आल्यानंतर फ्लेड हे पात्र कधी एकदा आक्रमक पवित्रा घेते, असे वाटू लागते. मात्र, इथूनच चित्रपट आपल्या अपेक्षा उलथवून टाकण्यास सुरुवात करतो. कारण, जॉन विक किंवा ‘नोबडी’मधील हच मॅन्सेलसारख्या पात्रांसोबत असलेले वरवरचे साम्य वगळता रॉबिन फ्लेड आणि त्याचा पुढचा प्रवास हा खरेतर याआधी विविध चित्रपटांमध्ये दिसलेल्या पात्रांच्या अगदी उलट आहे. मनात साचून असलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी हिंसक मार्ग पत्करणे तसे सोपे असते. रॉबिन फ्लेडचा प्रवास मात्र काहीसा अस्तित्त्ववादी तऱ्हेचा आहे. 

रॉबिन फ्लेड हा मितभाषी असला तरी समोरच्या व्यक्तीला योग्य प्रकारे प्रत्युत्तर कसे द्यावे, हे तो चांगलेच जाणतो. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्याची नि युरीडीस हॉटेलच्या आचाऱ्याची, डेरेक फिनवेची भेट. त्याचा एकेकाळचा सहाय्यक असलेल्या या आचाऱ्याला रॉबिन नामोहरम करतो. पाककलेत निपुण असण्याकडे लक्ष न देता ग्राहकांना खुश करण्यात नि समीक्षकांची स्तुती मिळवण्यावर लक्ष केंद्रित करून फिनवे यशस्वी झाला आहे. मात्र, यश मिळाल्याने समाधान मिळतेच असे नाही. त्यामुळेच शेफ फिनवेला आपल्या कोणेएकेकाळच्या स्वप्नावर पाणी सोडून मिळवलेले यश हे कुचकामी असल्याचे सांगत रॉबिन फ्लेड त्याच्या वर्मी घाव घालतो. 

 

आपल्या पसंतीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणे सोडून उथळ प्रशंसेच्या आहारी गेल्याने निर्माण होणारी असमाधानाची भावना या सर्व पात्रांना सतत दुखावत असते.

 

रॉबिनची मदत करणारा आमीर हा वयाने आणि अनुभवाने त्याच्याहून लहान आहे. तो आपल्या वडिलांच्या छायेखाली आणि त्यांच्या अवाढव्य प्रतिमेच्या दडपणाखाली व्यवसाय करतो. आई-वडिलांमधील संघर्ष पाहत मोठ्या झालेल्या आमीरच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यात त्याच्या कठोर वडिलांचा मोठा वाटा असतो. आता आई इस्पितळात असताना आमीरच्या जवळचं असं कुणीच राहिलेलं नसल्याने त्याच्यातील असुरक्षिततेची भावना अधिकच वाढीस लागली आहे. अगदी चित्रपटाच्या कथानकात आणि मांडणीत देखील सुरुवातीला त्याला काडीमात्र किंमत मिळते. मात्र, हळूहळू रॉबिन आणि आमीरमध्ये एक प्रकारचा बंध निर्माण होऊ लागतो. जो त्यांच्या एरवीच्या व्यावसायिक भागीदारीहून निराळा असतो. आमीर असेल किंवा शेफ फिनवे असेल किंवा खुद्द रॉबिन फ्लेड असेल, इथल्या बहुतांशी पात्रांमध्ये खदखदणारी जखम असल्याचे दिसते. आपल्या पसंतीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणे सोडून उथळ प्रशंसेच्या आहारी गेल्याने निर्माण होणारी असमाधानाची भावना किंवा वैयक्तिक वेदनेच्या गर्तेत अडकल्याने हाती येणारी निराशा या सर्व पात्रांना सतत दुखावत असते. डुक्कराच्या चोरीमुळे सुरु झालेल्या घटनाक्रमात एकेक करीत या सर्वांच्या मनातील वेदनेच्या भावनांना मोकळी वाट करून दिली जाते. अगदी इथला खलनायकदेखील पारंपरिक तऱ्हेचा नाही. त्याच्या जीवनातही दुःखाची किनार आहे. त्यामुळे मायकल सार्नोस्की दिग्दर्शित ‘पिग’ या चित्रपटाला एखाद्या कॅथार्सिसचे म्हणजेच भावनांच्या विरेचनाचे स्वरूप प्राप्त होते. इथला नायक असलेल्या रॉबिन फ्लेडचे दुःख हे वरवर पाहता डुक्कराबाबत दिसत असले तरी त्या दुःखाला त्याच्या पत्नीच्या विरहाच्या वेदनेची किनारदेखील आहे. 

 

 

चित्रपट रसिकांनी ‘मॅन्डी’सारख्या (२०१८) सूडपटांमध्ये निकलस केजला त्याच्या हिंसक अवतारात पाहिलेलं आहे. त्यामुळे या पारंपरिक सूडपटांहून वेगळा मार्ग अवलंबणाऱ्या या चित्रपटात केजला त्याच्या काही उत्कृष्ट भूमिकांमध्ये मोडणारी कामगिरी करताना पाहणे नक्कीच सुखद आहे. नीएम लीसनच्या ‘टेकन’सारखे (२००८) चित्रपट किंवा ‘जॉन विक’पासून ते ‘नोबडी’पर्यंतच्या नेहमीच्या सूडपटांहून वेगळा असणारा ‘पिग’ हा अनेक अर्थी जॉन विकचा अँटीथीसिस आहे. दिग्दर्शक मायकल सार्नोस्कीचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आवर्जून पाहावेसे आहे.