Quick Reads

‘हृदयम’: परिचित संकल्पनांचे कल्पक व प्रभावी सादरीकरण

स्पॉटलाईट सदर

Credit : Shubham Patil

दोन व्यक्तींना जोडणाऱ्या, त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण करणाऱ्या बाबींचा विचार करायचा झाल्यास संगीताखालोखाल खाद्यपदार्थांचा क्रमांक लागेल. अरुणच्या आयुष्यात दर्शना येते, त्यामध्ये लोकप्रिय चित्रपटसंगीताचा मोठा वाटा असतो. पुढे जाऊन अरुणचा नित्याशी संबंध येतो, तेव्हा संगीताची जागा खाद्यपदार्थांनी घेतलेली असते. जागा बदलते, अरुणच्या समोर असलेली व्यक्ती बदलते, अगदी दोन व्यक्तींना जोडणारे दुवेदेखील बदलतात. एक गोष्ट स्थिर असते, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीप्रती वाटणारे आकर्षण व उत्कटता. 

विनीत श्रीनिवासन दिग्दर्शित ‘हृदयम’ या चित्रपटाची संकल्पना आणि पात्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा फारच साधासोपा आहे. एक पुरुष आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया, त्यांचे नातेसंबंध आणि त्यातील चढ-उतारांमुळे या पुरुषाच्या जीवनात, जगाकडे (तसेच स्वतःकडे) पाहण्याच्या दृष्टिकोनात घडणारे बदल – या इथल्या काही महत्त्वाच्या संकल्पना होत. प्रेम, मैत्री, पालकत्व तसेच पुरुषाच्या जीवनातील एकूणच नातेसंबंध असे जन्म-मृत्यूच्या दरम्यानचे महत्त्वाचे टप्पे दिसणारे चित्रपट आपल्यासाठी नवीन नाहीत. तरीही उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘प्रेमम’ (२०१५) या मल्याळम चित्रपटाचे उदाहरण देता येऊ शकेल. (‘हृदयम’देखील मल्याळम भाषेतील चित्रपट आहे.)

 

काही समान संकल्पना सोडता ‘हृदयम’ हा ‘प्रेमम’पेक्षा वेगळा ठरणारा, तसेच बऱ्याच अंशी ‘प्रेमम’च्या पुढे जाणारा आहे.

 

‘प्रेमम’प्रमाणेच ‘हृदयम’ ही एका पुरुषाभोवती फिरणारी कथा आहे, ज्यात मध्यवर्ती पुरुष व्यक्तिरेखेचा जीवनानुभव हा केंद्रस्थानी येतो. ज्यात कॉलेजमधील आयुष्य, त्या टप्प्यातील प्रेम नि नात्यातील तणाव, कॉलेजमधील भागात येणाऱ्या व्यक्तिरेखांशी निर्माण होणारे मैत्रीपूर्ण संबंध व इतर घडामोडी चित्रपटाचा पूर्वार्ध व्यापतात. तर चित्रपटाच्या उत्तरार्धात व्यावसायिक आयुष्य, त्यानुषंगाने जीवनात येणारे नवीन लोक, पुन्हा प्रेमात पडणे आणि आधीच्या चुकांमधून शिकून नातेसंबंध व जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीने बदल आत्मसात करणे असा भाग येतो. मात्र, काही समान संकल्पना सोडता ‘हृदयम’ हा ‘प्रेमम’पेक्षा वेगळा ठरणारा, तसेच बऱ्याच अंशी ‘प्रेमम’च्या पुढे जाणारा आहे. (तो कसा, हे पुढे येईलच.)

अरुण (प्रणव मोहनलाल) हा चेन्नईतील एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थीदशेत असल्यापासून ते त्याच्या लग्नानंतरच्या काही वर्षापर्यंतचा साधारणतः एक दशकाचा कालावधी या चित्रपटात दिसतो, ज्यात पटकथेची रचना अशी आहे की, एकसंध कथानकाऐवजी मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर अधिक भर आहे. अरुणच्या आयुष्यात येणाऱ्या दर्शना (दर्शना राजेंद्रन) आणि नित्या (कल्याणी प्रियदर्शन) या दोन स्त्री पात्रांच्या अनुषंगाने येणारी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशी ठळक विभागणी तर इथे आहेच, पण त्यासोबत या दोन्ही भागांमध्ये जे काही घडते, त्याची मांडणी एपिसोडिक प्रकारची आहे. परिणामी अशा मांडणीसोबत येणारा विखंडितपणा हा चित्रपटकर्त्यांच्या योजनेचा भाग आहे. उदाहरणार्थ, प्रेमातील अपयश, नात्यातील तणावानंतरची अस्वस्थता व निराशा, त्यातून जगाप्रती व स्वतःप्रती वाटणारा राग अशा अनेक गोष्टी येतात, ज्यामध्ये शैली व आशयाच्या स्तरावर चित्रपट साखरेहून गोड प्रेमकथेपासून दूर जातो. हा भाग काही अंशी अरुणच्या पात्राला ‘अर्जुन रेड्डी/कबीर सिंग’सारख्या पात्रांच्या टप्प्यात घेऊन जातो. मात्र, अरुणची कृत्यं ज्या पद्धतीने मांडली जातात, त्यात अरुणला वीरतेच्या दृष्टिकोनातून चितारले जात नाही. उलट त्याचा नैतिक, भावनिक, मानसिक स्तरावर होत असलेला ऱ्हास दिसतो. हा भाग चित्रपटातील शैली व आशयातील बदलांचे समर्पक उदाहरण आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, असे ठळक बदल किंवा एपिसोडिक रचनेमुळे येणारा विखंडितपणा अस्तित्त्वात असूनही चित्रपटाची रचना समर्पक वाटते, हे इथल्या मांडणीचे यश.

 

via GIPHY

 

चित्रपटाच्या पूर्वार्धात कॉलेजमध्ये होणारी रॅगिंग, मैत्री नि हेवेदावे यांना महत्त्व आहे. खरेतर या संकल्पनांमुळेच अरुण आणि दर्शना जवळ येऊन त्यांच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होत जातात. असे असले तरी या नात्याचे स्वरूप आकर्षण व आवडीचे अधिक असल्याने या नात्यात समस्या निर्माण होतात. ज्याचे मूळ पुरुषी प्रवृत्तीमध्ये आहे. ‘हृदयम’ हा ‘प्रेमम’च्या पुढे जातो असे वर म्हटले आहे, त्यातील एक कारण चित्रपटरचनेच्या स्तरावरील कल्पकता व चतुराई, हे आहे. तर दुसरे कारण म्हणजे नातेसंबंधांचे चित्रण. दर्शना व नित्या या दोन प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा आणि माया ही तुलनेने कमी महत्त्वाची व्यक्तिरेखा — अरुणचे त्याच्या आयुष्यातील या तिन्ही व्यक्तींशी निर्माण होणारे नातेसंबंध हे आकर्षणाच्या बिंदूपासून, काहीशा अतिसुलभ पद्धतीने सुरु होतात. मात्र, लवकरच मुलभूत आकर्षणाच्या पुढे आल्यानंतर नात्याला प्राप्त होणारे अधिक क्लिष्ट कंगोरे, प्रेमातील मत्सर, नातेसंबंधांतील नैतिक-अनैतिकता व व्यभिचार, नैतिकतेच्या संकल्पनेकडे सोयीस्कररीत्या पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन, इत्यादी मुद्द्यांना स्पर्श केला जातो. स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे हे जटिल स्वरूप मोठ्या सहजतेने समोर मांडल्याने ‘हृदयम’ हा ‘प्रेमम’च्या ढोबळ स्वरूपाच्या पुढे जातो. चित्रपटातील स्त्री पात्रे ही अरुणपेक्षा कमी महत्त्वाची आहेत, हे स्पष्ट असले तरी ही पात्रे एकमितीय भासत नाहीत.

पूर्वार्धात अँटनी (अस्वत लाल) व सेल्वा (कलेश रामानंद), तर उत्तरार्धात जिमी (अजू वर्गीस) हे मित्र अरुणच्या सुखदुःखात, त्याच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर त्याच्यासोबत असतात. अरुण हा अशा व्यक्तींपैकी आहे ज्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर भेटलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात. त्यामुळे असे अनेक प्रसंग येतात ज्यांत अशी पात्रं समोरासमोर आल्याने भूतकाळ व वर्तमानकाळ यांमध्ये किती घनिष्ठ संबंध आहे, हे दिसते. व्यक्ती, जागा, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींमुळे अरुणचा भूतकाळ व वर्तमानकाळ जोडला जातो.

जीवनातील घटनांचे वर्तुळाकार स्वरूप व विलक्षण योगायोग यांना इथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदाहरणार्थ, अरुण आणि नित्या यांच्या भेटीचे मूळ अरुणच्या जिमीशी आकस्मिकपणे झालेल्या भेटीमध्ये आहे. अर्थात्, अशा जर-तरमध्ये अडकणे हा ना चित्रपटाचा उद्देश आहे, ना या लेखाचा. मात्र, अनपेक्षित योगायोग व आयुष्याचे वर्तुळाकार स्वरूप या बाबी चित्रपटात आशय व मांडणी अशा दोन्ही स्तरांवर ठळकपणे चितारल्या जातात. याकरिता रेल्वेचा केलेला वापर हा शाब्दिक व सांकेतिक अशा दोन्ही स्वरुपाचा आहे. रेल्वे केरळ (अरुणचे मूळ राज्य) व चेन्नई (अरुणच्या कॉलेजजीवनातील त्याचे वास्तव्य असलेले शहर) या भिन्न जागांना तर जोडतेच, पण सोबत अरुणचा भूतकाळ व वर्तमान यांनाही जोडते. रेल्वे इथे वारंवार दिसणारे रुपक आहे, ज्यातून अरुणसोबत प्रेक्षकांच्या मनातील नॉस्टॅल्जियाची भावना सतत जागृत होत राहते/केली जाते.

 

 

पूर्वार्धानंतर अरुण आत्मशोधाच्या मार्गावर गेल्याचे व त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल घडल्याचे दिसते. या बदलांपैकी त्याने स्वयंपाक करु लागण्याची कृती ही फारच रोचक आहे. कारण, स्वयंपाक करण्याची कृती ही थेरप्युटिक असल्याचा अनुभव/मत हे एव्हाना सर्वश्रुत आहे. शिवाय, लेखाच्या सुरूवातीला उल्लेख केल्याप्रमाणे खाद्यपदार्थ हे अरुण व नित्याच्या नात्यात फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यात जवळीक व दुतर्फी आकर्षण निर्माण होणे, अरुणच्या भूतकाळाशी नित्याचा संबंध येतो त्यातही जेवणाचा समावेश असणे, नात्यात असताना व लग्नानंतर अरुणने स्वयंपाक करणे त्यावरील नित्याच्या प्रतिक्रिया या सर्व बाबी अरुणचा आक्रमक स्वभाव व अस्वस्थतेत घडलेल्या सकारात्मक बदलांचे द्योतक आहेत.

चित्रपटाची लांबी तीन तास असूनही प्रत्यक्षात ती तितकी असल्याचे जाणवत नाही याचे कारण चित्रपटाची मांडणी, त्यातून निर्माण होत असलेली चित्रपट वेगाने पुढे सरकत असल्याची भावना यांसोबत हेशम अब्दुल वहाबचे संगीत हेदेखील आहे. दर्शनाशी अरुणचा संबंध येतो त्याचे कारण असते ए. आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कन्नालने’ हे गीत. या गाण्याचा संदर्भ देत जर लेखक-दिग्दर्शक विनीत श्रीनिवासन रहमानला मानवंदना देत असेल, तर हेच काम हेशम अब्दुल वहाब त्याच्या संगीताच्या माध्यमातून करतो. कारण चित्रपटातील वैविध्यपूर्ण गाणी ही रहमानच्या संगीताची आठवण जागृत करतात. (असे करत असताना मूळ ‘कन्नालने’ची गायिका असलेल्या के. एस. चित्राकडून ‘हृदयम’मधील काही गाणी गाऊन घेतली आहेत.)

चित्रपटात जीवनातील नैराश्य नि दुःख, मृत्यू यांसारख्या इतर गडद संकल्पना येतात. दुःखाची व हतबलतेची अनुभूती देऊन प्रेक्षकाला अस्वस्थ करणाऱ्या काही जागा चित्रपटात आहेत. नातेसंबंध व मानवी आयुष्यातील गुंतागुंतीचे चित्रण असूनही ‘हृदयम’ हा एकूणच दिलासदायक अनुभव देणारा चित्रपट आहे. ‘रॅटटुई’ (२००७) या चित्रपटात शेफ गुस्टो म्हणतो, “Good food is like music you can taste, color you can smell. There is excellence all around you. You need only be aware to stop and savor it.”

शेफ गुस्टोचे हे वाक्य चांगल्या चित्रपटांनादेखील लागू पडते. चांगले चित्रपट हे गुस्टो म्हणतो तसा जादुई अनुभव देऊ शकतात. फक्त अशा चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी आवश्यक असणारा वेळ काढण्याची गरज असते.

(‘हृदयम’ हा चित्रपट डिस्नी+हॉटस्टारवर उपलब्ध आहे.)