Quick Reads

‘डार्लिंग्स’: सिम्पथी फॉर लेडी वेन्जिअन्स

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

‘डार्लिंग्स’ हा चित्रपट घरगुती हिंसाचाराच्या संकल्पनेभोवती फिरतो. हमज़ा (विजय वर्मा) आणि बदरू (आलिया भट) यांनी प्रेमविवाह केलेला आहे. मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या या मुस्लिम जोडप्याच्या नात्यात वरवर प्रेमाच्या खुणा आढळत असल्या तरी अतिमद्यपान करणाऱ्या हमज़ाचे वर्तन दारू प्यायल्यानंतर हिंसक जनावरात परिवर्तित होते. हमज़ाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत एक दिवस तो नक्की बदलेल या आशेवर बदरू जगत असते (खरेतर तग धरुन जिवंत असते). रोजच्या हिंसाचाराला कंटाळून हमज़ाला धडा शिकवायला हवा, या आपल्या आईच्या (शेफाली शाह) सल्ल्यानुसार बदरू खरोखर हमज़ाला धडा शिकवायला घेते आणि ‘डार्लिंग्स’मधील घडामोडी समोर दिसू लागतात. ‘डार्लिंग्स’चे स्वरूप ब्लॅक-कॉमेडीचे असल्याने गंभीर आशय-विषय, मात्र गमतीशीर सादरीकरण असे रंजक मिश्रण पाहायला मिळते. 

‘डार्लिंग्स’मधील आशय-विषय आणि सादरीकरण यांचे परस्परविरोधी मिश्रण, कलादिग्दर्शन आणि संगीत या गोष्टी ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’सारख्या (२०२०) चित्रपटाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. दोन्हीकडे पुरुषी अत्याचार आणि स्त्रियांच्या प्रत्युत्तराच्या कथा अतिशयोक्तीपूर्ण विनोदाच्या साथीने पहायला मिळतात. ज्यातून चित्रपटात उपस्थित केलेले मुद्दे सबळ असले तरी त्यावरील उपाय हे आहे तसे स्वीकारणे अपेक्षित नाही, हे लक्षात घ्यायला हवे. 

 

प्रेमाच्या आवरणाखाली दडलेली हिंसा: अर्थात् अ हिस्टरी ऑफ व्हायलन्स 

‘डार्लिंग्स’ का समयोचित आहे, या प्रश्नाचे उत्तर हिंदी (तसेच भारतीय) चित्रपटांच्या इतिहासात व काही अंशी वर्तमानातही दडलेले आहे. चित्रपटीय इतिहासाचा विचार करता, आपण गेली कित्येक दशके घरगुती हिंसाचारामध्ये प्रेमाचे भग्नावशेष शोधत मोडकळीला आलेले नातेसंबंध जोडण्याच्या भारतीय संस्कृतीचे पालन केलेले आहे. आपली चूक सुधारण्याची संधी दिल्यास शोषणकर्ता पुरुष सुधारेल — या गोंडस गृहितकाचा आधार घेत अनेक पुरुषांना सुधारण्याची संधी दिलेली आहे. एवढे करूनही असा पुरुष न सुधारल्यास त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी कोर्टाने किंवा इतर पुरुषांनी घेतलेली आहे. असे करण्याच्या प्रक्रियेमध्ये बलात्कारी पुरुषांचे त्यांचे बळी ठरलेल्या स्त्रियांसोबत लग्न लावण्याचे पराक्रम पाहिलेले आहेत. सांगायचा मुद्दा हा की, भारतीय चित्रपटांमध्ये पुरुषी हिंसेचा एक भलामोठा इतिहास दडलेला आहे. जो एका विस्तृत अर्थाने भारतीय समाजाचे अर्कचित्र आहे. 

 

 

चित्रपटासोबतच प्रत्यक्ष आयुष्यातही हिंसेचे समर्थन करण्याचा प्रकार आपण काही काळापूर्वी ‘कबीर सिंग’ (२०१९) आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या निमित्ताने पाहिला आहे१. किंवा मुस्लिम पात्रांभोवती फिरणाऱ्या ‘गली बॉय’मध्ये (२०१८) आईवरील हिंसेला प्रत्युत्तर देण्याकरिता मुलाला पुढाकार घ्यावा लागतो, हेही पाहिले आहे. अशी इतरही अनेक उदाहरणे देता येऊ शकतील, पण त्यातून स्वयंसिद्ध मुद्दाच पुन्हा अधोरेखित होईल. हिंदी चित्रपटांतील घरगुती हिंसेच्या चित्रणाचा हा विवादास्पद इतिहास पाहता ‘डार्लिंग्स’मधील स्वतःवरील अत्याचाराला स्वतःच प्रत्युत्तर देऊ पाहणाऱ्या स्त्रियांचे दर्शन समयोचित ठरते. 

नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकल पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या बदरूच्या आईचा, शमशुचा पतीही हिंसक प्रवृत्तीचा होता, हे चित्रपटात वारंवार सूचित केले जाते. तिने त्याचा प्रतिकार करीत (तिच्या दृष्टीने) योग्य ती पाऊले उचलल्याचेही सूचित केलेले आहे. त्यामुळे या दोघी तसेच त्यांच्यासारख्या इतर स्त्रियांच्या आयुष्यात पिढ्यानपिढ्या डोकावणाऱ्या हिंसेचे रूप लक्षात येऊ शकते. तसेच, बदरू आणि हमज़ामधील नात्याकडे पाहता ‘शोषणकर्ता कधी ना कधी बदलेल’ या आशावादातील पोकळता अधोरेखित केली जाते. वारंवार सूचना देऊन आणि तशा संधी देऊनही हमज़ामध्ये काही बदल घडत नाही. उलट त्याच्याकडून होणाऱ्या हिंसेच्या स्वरूपात क्रमिक बदल घडतात. ज्यातून हिंसा ही परिस्थितीवर आधारलेली नसून शोषणकर्त्याच्या नसानसांत व स्वभावात भिनलेली असते, याकडे लक्ष वेधले जाते. ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांमध्ये याच्या अगदी उलट गोष्ट असल्याचे भासवले होते. ‘डार्लिंग्स’मध्ये मात्र स्त्री-केंद्री दृष्टिकोनातून पाहत असतानाच ‘कबीर सिंग’मधील या मुद्दयातील फोलपणा दर्शवला जातो. हे सारे शोषणकर्त्याऐवजी शोषणाचा, अत्याचाराचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या नजरेतून मांडले जात असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. 

 

 

स्त्रीवाद, भगिनीत्व आणि इतर गोष्टी 

‘डार्लिंग्स’मध्ये बदरूचे शेजारी हे हमज़ाच्या हिंसक प्रवृत्तीकडे कानाडोळा करत असल्याचे वारंवार दिसते. ‘घरगुती मामला’ म्हणत अशा गोष्टींमध्ये न पडत एका अर्थी पुरुषी अत्याचाराला समर्थन देण्याच्या सामाजिक प्रवृत्तीचे दर्शन यात होते, असे म्हटल्यास त्यात काही वावगे नाही. अगदी पोलिसही ‘स्त्रिया अत्याचार सहन करत असल्याने त्यांच्यावर अत्याचार होतो’, असे म्हणत इथल्या शोषणकर्त्याचाच ‘हिंसा हे प्रेमाचेच स्वरूप आहे’ हा मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतात. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर बदरूच्या परिस्थितीबाबत केवळ सहानुभूती आणि सहसंवेदनाच दाखवत नाही, तर तिच्या लढ्यात तिच्या पाठीशी उभी राहते ती तिची आई शमशु. स्त्रीवादातील सिस्टरहूड अर्थात् भगिनीत्वाचे हे भारतीय रूप मानता येईल. ज्यात शमशु बदरुला नैतिकतेचे उपदेश न करता प्रत्येकवेळी तिचे समर्थन करते. एरवी अत्याचार सहन करा किंवा नवऱ्याला सोडू नका, इत्यादी पातिव्रत्याच्या पोकळगप्पा करणाऱ्या स्त्रियांपेक्षा (वाचा: आयांपेक्षा) अगदी विरुद्ध अशी ही आदर्श आई! 

‘डार्लिंग्स’मधील योग्य मुद्द्यांचा ‘शोषणाच्या बळीने अत्याचाऱ्याच्या भूमिकेत जाऊन बदला घ्यायला हवा’, असा अतिशय चुकीचा अर्थ लावण्याचा धोका संभवतो. मात्र, बदरूच्या पात्राचा आंतरिक लढा, आपण स्वतः शोषणकर्त्याच्या भूमिकेत जात नाही आहोत ना, हा तिला पडणारा प्रश्न - 

या गोष्टींकडे पाहिल्यास चित्रपटकर्त्यांना असे काही सुचवायचे नाही, हे स्पष्ट होते. त्यासाठीच चित्रपटाच्या शेवटी काय घडते व ते कुणाच्या हातून घडते या गोष्टी आणि त्यामागील विचारप्रक्रियेचा बारकाईने विचार करायला हवा. जेणेकरून काही चुकीचा अर्थ लावला जाणार नाही. इथल्या घडामोडींचा शब्दशः अर्थ लावणे चित्रपटावर अन्यायकारक ठरेल, इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. 

याखेरीज चित्रपटाच्या शेवटचे मोन्ताज हे आनंददायी जीवनाकरिता स्त्रियांनी हिंसक पुरुषांच्या तावडीतून सुटणे किती गरजेचे आहे, याचे द्योतक आहे. आणि ‘डार्लिंग्स’मध्ये चित्रित केलेला लढा हा या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी अत्यावश्यक आहे. 

 

याबाबत आणखी पहा/वाचा: 

१. “Kabir Singh | Sandeep Reddy Vanga Interview | FC Postmortem | Anupama Chopra | Spoilers Ahead - YouTube.” Accessed August 18, 2022.