Quick Reads

‘लुडो’: बसूचा अ-वास्तववाद आणि सिनेमाची जादू

स्पॉटलाईट सदर

Credit : Netflix

लेखक-दिग्दर्शक अनुराग बसूच्या चित्रपटांची यादी पाहिल्यास त्यात सरळ दोन तऱ्हेचे चित्रपट दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे ‘मर्डर’ (२००४) आणि ‘गँगस्टर’ (२००६) यांसारख्या थ्रिलर, रोमँटिक थ्रिलर प्रकारातील स्टुडिओ आणि निर्मात्यांसाठी बनवलेले चित्रपट; तर दुसरा प्रकार म्हणजे ‘लाईफ इन अ मेट्रो’नंतरच्या (२००७) चित्रपटांचा. यातील दुसऱ्या प्रकारातील चित्रपट हे बसूने त्याच्या स्वतःच्या संवेदना आणि अभिरुचीनुसार बनवलेले असतात. हे चित्रपट वास्तवापासून कोसो दूर असतात आणि नानाविध चित्रपट-मालिकांकडून प्रेरणा घेताना दिसतात. (या प्रेरणा कधी नुसत्या प्रेरणा असतात, तर कधी थेट चोरी म्हणाव्याशा असतात.) त्यांचं एक अंतर्गत तर्कशास्त्र असतं, ज्यात खरंतर तर्काचा अभावच अधिक असतो. विचित्र पात्रांचं तितकंच विचित्र आयुष्य समोर मांडणारं कथानक, त्याला मिळणारी सांगीतिक जोड यात असते. ‘लुडो’ म्हणजे असंच तिरसट तर्क आणि अप्रतिम दृक्-श्राव्य रचना यांचं मिश्रण आहे. 

‘लुडो’ हा ‘हायपरलिंक सिनेमा’ या चित्रपट प्रकारात मोडतो. या प्रकारात वेगवेगळ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारी वेगवेगळी कथानकं समांतरपणे उलगडत जातात आणि चित्रपट जसजसा पुढे सरकतो तशी एकत्र येतात. क्वेंटिन टॅरेंटिनो, अलेहान्द्रो गोन्झालेझ इनारितु, पॉल थॉमस अँडरसन, इत्यादी दिग्दर्शकांचे चित्रपट या प्रकारच्या चित्रपटांची गाजलेली उदाहरणं आहेत. भारतात या प्रकारच्या कलाकृतींची रित्विक घटकच्या चित्रपटापासून ते अलीकडच्या काळातील ‘मुंबई मेरी जान’ (२००८), ‘सुपर डिलक्स’पर्यंत (२०१९) बरीचशी उदाहरणं आहेत. ‘लुडो’ ‘हायपरलिंक सिनेमा’सोबत डार्क कॉमेडी शैलीत उलगडत जाणारा आहे. त्यामुळे त्यातील घटनाक्रम हा कोएन ब्रदर्स आणि गाय रिचीच्या चित्रपटांच्या धर्तीवर घडतो. ज्यात नियतीचा खेळ, मृत्यू, हिंसाचार या गंभीर मुद्द्यांसह अतार्किक आणि विलक्षण मानाव्याशा घटनांना महत्त्व प्राप्त होतं. 

चित्रपट सुरु होतो तो पृथ्वीवर जन्म-मृत्यू आणि नियतीविषयी बोलणाऱ्या यमराज आणि चित्रगुप्त यांच्यामधील संभाषणातून. हे दोघे लुडो खेळत असताना चित्रपटातील पात्रांविषयी बोलू लागतात. सत्तू (पंकज त्रिपाठी) हा कुख्यात गुंड आणि त्याच्या गँगपासून सगळ्या प्रकरणाला सुरुवात होते. येनकेनप्रकारे एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या निरनिराळ्या पात्रांच्या संचाच्या माध्यमातून चित्रपटात लुडोच्या पटाचं अनुकरण करणारी चार उपकथानकं समांतरपणे चालतात. सत्तू या सर्वांमधील समान बिंदू ठरतो. बिट्टू (अभिषेक बच्चन) हा त्याचा पूर्वश्रमीचा हस्तक काही काळापूर्वी त्याच्या गँगमधून बाहेर पडला. मात्र, त्याच्या हक्काच्या माणसाचं असं बाजूला जाणं त्याला न पटल्याने त्याने बिट्टूला पोलिसांच्या हवाली केलं. बिट्टू जेलमध्ये गेल्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगी त्यापासून दूर गेले. अशात तो आपल्या कुटुंबाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. आकाश (आदित्य रॉय-कपूर) आणि श्रुती (सान्या मल्होत्रा) हे एकेकाळी नात्यात होते. आता तिचं लग्न ठरलेलं असताना त्यांनी एकत्र येण्याचं कारण म्हणजे इंटरनेटवर फिरत असलेली त्यांची सेक्स-टेप. एकीकडे त्यांचा भूतकाळ उलगडत असताना ते वर्तमानात त्यांच्या सेक्स टेपचा उगम शोधत आहेत. आलोक (राजकुमार गुप्ता) हा एकतर्फी प्रियकर त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या पिंकीच्या (फातिमा सना-शेख) लग्नानंतरही ती म्हणेल त्या गोष्टीत तिची मदत करतोय. ज्यात प्रामुख्याने सत्तूच्या कामगिरीमुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडलेल्या पिंकीच्या पतीला सोडवण्याचे चक्रम उपाय करणारा स्वप्नाळू आलोक दिसतो. तर, राहुल (रोहित सराफ) आणि शीजा (पर्ल मानेय) हे दोघेही सत्तूमुळे एकत्र येतात. बिट्टूच्या प्रकरणातील पालकत्वाची भावना, इतर तीनही प्रकरणांतील प्रेमभावना चित्रपटाला पुढे नेणारी आहे. 

 

 

चित्रपटाच्या प्रकारामुळे गुन्हे, हिंसाचार आणि व्यभिचार यांना सगळ्या चित्रात महत्त्व आहे. वरवर पाहता समांतरपणे चालणारी कथानकं, त्यात वेळोवेळी दिसणारे फ्लॅशबॅक यामुळे चित्रपट अचूकपणे संरचित वाटत असला तरी प्रत्यक्षात तसं नाही. बसूच्या ‘जग्गा जासूस’मध्ये सगळं काही समोर मांडण्यासाठी तिथल्या स्त्री-पात्राने केलेल्या कथनाचा वापर केला होता. इथे यमराज-चित्रगुप्त यांच्यातील संभाषण अशा कथनाची जागा घेतं. मात्र, हे कथन चित्रपटातील संकल्पना, चित्रपटकर्ता मांडू पाहत असलेला विचारांचं थेट प्रदर्शन मांडणारं आहे. चित्रपटात घडतंय ते प्रेक्षक समजून घेईल हे गृहीत धरण्याऐवजी शब्दांतून सारं पुढे ठेवणारं आहे. सगळं काही या दोन पात्रांच्या निमित्ताने सांगण्याचा अतिरेक सगळ्या गोष्टींचं सोयीस्कर सुलभीकरण करणारा आहे. चार ते पाच उपकथानकं आणि त्यानिमित्ताने घडणारा गोंधळ हा विस्कळीत आणि योजनाशून्य अधिक आहे. ज्यात राज आणि डीकेच्या ‘शोर इन द सिटी’ (२०१०) किंवा श्रीराम राघवनच्या ‘अंधाधून’सारख्या (२०१८) नियंत्रित अनागोंदीचा (किंवा तशा आभासाचा) ठळक अभाव आहे. 

मांडणीतील गोंधळ अस्तित्त्वात्त असूनही ‘लुडो’ रंजक आणि प्रभावी का ठरतो, तर इथल्या पात्रांमधील परस्परसंबंधांमुळे आणि बसूच्या सदोष, तरीही उत्कट अशा सिनेमॅटिक अभिव्यक्तीमुळे. ज्यात इथल्या उत्तम अभिनेत्यांच्या संचाची साथही महत्त्वाची आहे. लेखन-दिग्दर्शनासोबत छायाचित्रण देखील करणाऱ्या बसूच्या कामावर त्याचा नेहमीचा छायाचित्रकार असलेल्या रवी वर्मनच्या शैलीचा मोठा (आणि चांगला अर्थाने असलेला) प्रभाव आहे. ‘तमाशा’ (२०१५) नि ‘जग्गा जासूस’च्या धर्तीवरील रंगसंगती इथल्या लुडोच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या बरोबर जाणारी आहे. अनुराग बसूच्या इतर कुठल्याही चित्रपटात आहे तसं इथेही संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथले अनेकविध क्षण त्यातल्या संगीताशिवाय प्रत्यक्षात आहेत तितके प्रभावी होणं काहीसं अवघडच. 

 

 

बसूच्या ‘बर्फी!’ आणि ‘जग्गा जासूस’प्रमाणे ‘लुडो’मधील दोषांकडे डोळ्यांत तेल घालून पाहणं टाळणं गरजेचं आहे. आलोक पिंकी त्याच्यावर प्रेम करणार नाही हे माहित असूनही तिची मदत करण्याबाबत म्हणतो तसं, ‘रिश्तों में लॉजिक नहीं होता, सिर्फ मॅजिक होता है’. हे वाक्य कितीही चीजी आणि कॉर्नी वाटत असलं तरी त्यात सत्याचा अंश आहे, हे नाकारता येणार नाही. बसूचे सिनेमे आणि ते प्रेक्षकाला जी अनुभूती देतात तीदेखील तर्कापेक्षा सिनेमाच्या जादूवर भर देणारी अधिक आहे. त्यामुळे मांडणी आणि रचनेच्या स्तरावर ‘लुडो’ कमी पडतो का, तर नक्कीच पडतो. पण, त्याचा प्रभाव हा या तांत्रिक स्तरावरील कामगिरीपुरता मर्यादित नाही. तो वास्तवाच्या चौकटीपासून दूर असलेल्या, रंजक आणि नेत्रदीपक प्रसंग आणि एकूणच दृक्-श्राव्य अनुभूतीवर अवलंबून असणारा आहे. बसूच्या कामात ठळकपणे जाणवणारा इतर कलाकृतींचा प्रभाव पाहता कळतं की तो काहीएक विचार घेऊन, या मध्यामावरील प्रेमातून चित्रपट तयार करतो. अशात एकदा त्याच्या चित्रपटातील अंतर्गत तर्काच्या स्वाधीन झालं की तो एक चित्तवेधक अनुभव प्राप्त करून देतो. ‘लुडो’देखील याला अपवाद नाही.