Quick Reads

पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर: उत्कटतेची सिनेमॅटिक अभिव्यक्ती

स्पॉटलाईट सदर

Credit : MUBI

मायनर स्पॉयलर्स

अँटोनियो विवाल्डीच्या ‘फोर सीझन्स’ या व्हायोलिन कॉन्सर्टमधील सांगीतिक तुकडे हे सर्वश्रुत आहेत. विवाल्डीने यामध्ये निसर्गातील आवाज सांगीतिक तुकड्यांमध्ये सादर करत चारही ऋतूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संगीताची निर्मिती केलेली आहे. यातील प्रत्येक सांगीतिक तुकडा सादर करताना त्याला सबंध विस्तृत कथनांची जोड दिलेली आहे. ज्याचा परिणाम असा की, यातील प्रत्येक अरेंजमेंट त्या त्या ऋतूमध्ये घडणाऱ्या घडामोडींचं कथन करते. हे सांगीतिक तुकडे मुळातच नैसर्गिक आवाजांचं मूर्तिमंत चित्र उभे करणारे आणि सजीव भासणारे आहेत. प्रत्येक कॉन्सर्टोचा भाग असलेल्या प्रत्येकी तीन मुव्हमेंट्सची स्वतःची अशी गती आहे. त्यांमध्ये एक उपजत तीव्रता आहे, उत्कट भावना निर्माण करण्याचं एक विलक्षण प्रभावीपण आहे. 

‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ या फ्रेंच चित्रपटामधील दोन महत्त्वाच्या दृश्यांत विवाल्डीच्या याच अरेंजमेंटमधील ‘समर’ भागातील एका तुकड्याचा वापर केला जातो. ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’मध्येही नेमकी विवाल्डीच्या संगीताचीच गुणवैशिष्ट्यं आहेत. ‘फोर सीझन्स’ जर उत्कटता आणि मूर्तिमंत सौंदर्याचा सांगीतिक नमुना असेल, तर ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ म्हणजे अशाच उत्कटतेचं सिनेमॅटिक समतुल्य मानता येईल. 

‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’मधील कथानक हे अठराव्या शतकाच्या शेवटाकडे घडणारं आहे. मरियान (नूइमी मेरलॉं) ही तरुणी एक चित्रकार आहे. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा मरियान एका वर्गात शिकवत असते, आणि वर्गात चित्रकलेची शिकवण म्हणून तिच्या विद्यार्थिनी तिचं चित्र काढत असतात. चित्रपटाचे ओपनिंग क्रेडिट्स येतात तेही पांढऱ्या कॅनव्हासने व्यापल्या जाणाऱ्या पडद्यावर ब्रशचे फटकारे मारले जात असताना. तिच्या एका विद्यार्थिनीने समोर काढून ठेवलेल्या एका चित्राकडे मरियानचं लक्ष जातं. हे चित्र मरियानने पूर्वी कधीतरी रेखाटलेलं असतं. या चित्राचं नाव म्हणजेच ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’, जिथून चित्रपटाला त्याचं नाव प्राप्त होतं. जिथून सविस्तर फ्लॅशबॅकची सुरुवात होऊन मूळ कथानक उलगडू लागते. 

 

 

काहीएक काळापूर्वी मरियानला इलूइज (अॅडेल इलेन) या तरुणीचं चित्र काढण्यासाठी कार्यान्वित केलं गेलेलं होतं. इलूइजच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याने तिच्या होणाऱ्या पतीला दाखवण्यासाठी म्हणून तिच्या चित्राची गरज असते. मात्र, इलूइजला लग्न करायचं नसल्याने ती कुणाकडूनही चित्र रेखाटून घेण्याच्या विरोधात असते. तिने तर मरियानच्या आधी तिचं चित्र रेखाटायला आलेल्या चित्रकारापुढे बसण्यासही नकार दिलेला. त्यामुळे मरियानने इलूइजला ती चित्रकार आहे हे कळू द्यायचं नाही आणि तिच्याशी मैत्री करून, तिच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरत तिच्या नकळत चित्र काढायचं अशी इलूइजच्या आईची कल्पना असते. साहजिकच चित्रपटाचं मध्यवर्ती कथानक हे तिचं चित्र काढणं, आणि मरियान-इलूइजमधील नातं यांभोवती फिरतं. 

हे करत असताना लेखिका-दिग्दर्शिका सेलिन शायमा ही पूर्वाधिष्ठित संकेतांना बाजूला सारते. ‘फेमिनिस्ट थियरी’मध्ये ज्याला ‘मेल गेझ’ म्हणतात त्या - स्त्रियांकडे पुरुषी नजरेतून पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या अगदी विरुद्ध असा या दिग्दर्शिकेचा दृष्टिकोन आहे. त्यामुळेच क्लेअर मॅथॉन ही इथली छायाचित्रकार आणि दिग्दर्शिका शायमा या जेव्हा कथात्म आणि दृश्य पातळीवर चित्रपटाची मांडणी करतात तेव्हा ती ‘फिमेल गेझ’ प्रकारात मोडणारी ठरते. मरियान इलूइजचं चित्र काढण्यासाठी म्हणून तिचं निरीक्षण करत असताना एक स्त्रीच स्त्रीकडे पाहते आहे, हे हेतूपुरस्सरपणे अधोरेखित केलं जातं. ही दृश्यं कुठल्याही अंगाने पुरुष प्रेक्षकाच्या दृष्टीला सुखावण्यासाठी म्हणून चित्रित केली जात नाहीत. 

हे घडतं कसं, तर मरियानला इलूइजचं चित्र काढताना सर्वस्वी तिच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ती इलूइजसोबत फिरत असताना कायम तिला, तिच्या चेहऱ्याला न्याहाळत असते. सुरुवातीला इलूइजला हे न्याहाळलं जाणं विचित्र वाटत असलं तरी ती त्याकडे फारसं लक्ष देत नाही. ज्यात समलिंगी आकर्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. मरियान जेव्हा तिचं चित्र पूर्ण करते, तेव्हा ती न राहवून तिचा खरा उद्देश सांगून इलूइजला तिने काढलेलं चित्र दाखवते. इलूइज मात्र त्यावर टीका करत या चित्रात तिच्या खऱ्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा लवलेशही नसल्याचं सांगते. हे सहन न झाल्यानं आणि काही अंशी पटल्यामुळे मरियान हे चित्र नष्ट करून टाकते. आश्चर्याची बाब म्हणजे इलूइज मरियानने तिचं चित्र काढावं म्हणून व्यवस्थितपणे बसण्यास होकार देते. 

इथली दोन्ही पात्रं आणि दिग्दर्शिका चित्रकला या कलाप्रकाराकडे कशा प्रकारे पाहते याचा विचार करणं गरजेचं आहे. चित्र रेखाटणं हा एक उत्स्फूर्त, चैतन्यशील आणि उत्कट वैयक्तिक अनुभव आहे हे या पात्रांच्या आणि दिग्दर्शिकेच्या दृष्टिकोनातून स्पष्ट होतं. त्यामुळेच इलूइज तिचं सख्य नसलेल्या चित्रकारांकडून चित्र काढून घेण्यास नकार देत असते. मरियानबाबत मात्र हे सख्य आणि एकमेकांप्रती सुप्त आकर्षण निर्माण झालेलं असल्याने तिच्याकडून रेखाटलं जाणं इलूइजला पसंत असतं. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रसंगी मरियान तिचं चित्र रेखाटत असताना त्यांच्यात त्या त्या वेळी जी संभाषणं घडतात ती महत्त्वाची ठरतात. एके ठिकाणी त्या दोघी एकमेकींच्या सवयींचं वर्णन करतात. एकमेकांना समजून घेत असताना या सूक्ष्म हालचालीदेखील किती महत्त्वाच्या ठरतात आणि त्या सदर व्यक्तीला कशा रीतीने डिफाइन करतात हे दिसतं. शिवाय, चित्रकलेत सूक्ष्म निरीक्षणांना असलेलं महत्त्व अधोरेखित होतं ते वेगळं. 

मरियान आणि इलूइजमध्ये प्रेम आणि आकर्षण या संकल्पनेभोवती फिरणारी जी संभाषणं होतात त्यापैकी एकात ऑर्फियस आणि युरीडिस या ग्रीक प्राचीन आख्यायिकेचाही समावेश होतो. प्रियकराप्रती अगदी समर्पित आणि एका अर्थी घातक अशा प्रेमाची ही आख्यायिका आणि - ‘ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे/इक आग का दरिया है और डूब के जाना है’ - हा जिगर मुरादाबादी यांच्या गझलेतील शेर यांत विशेष फरक नाही. 

इथे प्रेम आणि प्रेम या संकल्पनेची शारीरिकता यासारख्या मुद्द्यांचा विचार केला जातो. ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’मध्ये समलिंगी आकर्षण आणि इंटिमसीचं अस्तित्त्व असलं तरी त्यात हिंस्रपणा नाही. नग्नता असली तरी दीर्घ लैंगिक दृश्यं आणि कामुकता नाही. (जे ‘ब्ल्यू इज द वॉर्मेस्ट कलर’सारख्या समलिंगी प्रेमसंबंध असलेल्या चित्रपटांमध्ये आहे.) इथली इंटिमसी आणि उत्कटता ही अगदी शांत, स्तब्ध, स्थितप्रज्ञ (स्टॅटिक) आणि तरल आहे. ही उत्कटता प्रकट होते ती दोन्ही पात्रं एकमेकांकडे ज्या प्रकारे पाहतात त्यातून. मेरलॉं आणि इलेन या अभिनेत्रींच्या परफॉर्मन्समधून आणि डोळ्यांच्या, चेहऱ्याच्या हालचालींतून. ज्यात पुन्हा एकदा, दिग्दर्शिका शायमा आणि छायाचित्रकार मॅथॉन चित्रपटाची दृश्य शैली आणि मांडणी इथल्या विषयाच्या म्हणजेच चित्रकलेच्या जवळ जाणारी कशी करतात हे दिसतं. इथे कॅमेऱ्याच्या वेगवान हालचाली अगदीच अपवादात्मकपणे दिसतात. त्याऐवजी मुख्यतः स्थिर, दीर्घ दृश्यं दिसत राहतात. 

 

 

एका दृश्यात मरियान इलूइजला विवाल्डीच्या ‘फोर सीझन्स’मधील तुकडा वाजवून दाखवत असताना तो कोणत्या संदर्भात निर्मिला गेला हेही सांगते. हा तुकडा त्यांच्यातील नात्यातील उत्कट भावाचं प्रदर्शन करतो. ती या तुकड्याचं वर्णन ‘नॉट मेरी, बट लाइव्हली’ असं करते. हेच वर्णन सदर चित्रपटालाही लागू पडतं. हाच तुकडा चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात वापरला जातो तो वेगळ्या संदर्भात. इलूइज ऑपेरा हाऊसमध्ये बसलेली असताना तिच्यासमोर मरियानने वाजवलेला हा तुकडा परफॉर्म केला जात असतो. पहिल्यांदा हा सांगीतिक तुकडा ऐकत असताना इलूइज त्यामागील कथन आणि संदर्भांविषयी अनभिज्ञ असते. यावेळी मात्र विवाल्डीने हे संगीत कसं निर्माण केलं याच्या संदर्भासोबतच मरियानने तो वाजवल्याचा त्याहून कैकपटीने वैयक्तिक आणि उत्कट असा संदर्भ आणि अनुभव तिच्यापाशी असतो. ती हे संगीत ऐकत असताना तिला अशा रीतीने टिपलं जातं की, तिच्या मनात उचंबळून येत असलेल्या भावना त्या दृश्यात पुरेपूररीत्या प्रकट होतात. 

‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’च्या निमित्ताने दिग्दर्शिका सेलिन शायमा एक तीव्र मानवी इच्छांचं एक प्रचंड प्रभावी रूप पडद्यावर आणते. जर कुठल्याही कलाकृतीकडून मनात कल्लोळ माजवून जाणारा गूढ आणि तीव्र असा भावनिक अनुभव घ्यायचा असेल तर ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ पाहणं गरजेचं आहे. 

सदर चित्रपट सध्या मर्यादित कालावधीसाठी ‘मुबी’ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.