Quick Reads

फोर्ड व्हर्सेस फरारी: पीपल, हाय ऑन कार्स. कार्स, हाय ऑन गॅस

स्पॉटलाईट सदर

Credit : Chernin Films

(हलके स्पॉयलर्स) 

डिस्नी-पिक्सारच्या ‘कार्स’ (२००६) या अॅनिमेटेड चित्रपटात लायटनिंग मकक्वीन रेसमध्ये उतरण्यापूर्वी नेहमी एक वाक्य पुनःपुन्हा पुटपुटतो, ते म्हणजे : “स्पीड. आय अॅम स्पीड”. मात्र, रेस ही स्पीडबाबत नसते, कधीच नव्हती हे लक्षात येण्यासाठी मात्र त्याला ‘रेडिएटर स्प्रिंग’मध्ये अडकावं लागतं, नि डॉक हडसन या एकेकाळच्या प्रसिद्ध रेसिंग कारकडून धडे घ्यावे लागतात. 

‘फोर्ड व्हर्सेस फरारी’मध्ये आयकोका ही फोर्ड मोटर्सकडून आलेली व्यक्ती शेल्बी या रेसरला विचारतो, “‘ल् मान्’मधील रेस जिंकण्यासाठी कशाची गरज लागेल?” शेल्बी म्हणतो, “अशी एक गोष्ट जी पैशाने विकत घेता येत नाही.” आयकोका म्हणतो, “मनी कॅन बाय स्पीड.” शेल्बी मोठ्या सहजतेने उत्तरतो, “इट्स नॉट अबाऊट स्पीड.” चित्रपट बदलतात, पण मुळाशी असलेल्या भावना त्याच राहतात. रेस ही गतीबाबत कधीच नव्हती. ती असते ती ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या कौशल्याबाबत. त्याला तो चालवत असलेल्या वाहनाबाबत, तो ज्या रेसिंग ट्रकवर ती चालवतोय त्या ट्रकबाबत असलेल्या माहितीबाबत. 

‘फोर्ड व्हर्सेस फरारी’ हा चित्रपट म्हणजे बरंच काही आहे. नाव सुचवतं त्याप्रमाणे फोर्ड आणि फरारी या दोन कंपन्यांमध्ये कार रेसिंगवरून एकेकाळी सुरु झालेल्या आर्थिक, व्यावसायिक गणितं नि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं कथानक इथे केंद्रस्थानी आहे. मात्र त्यासोबत प्रत्यक्ष वाहन निर्मितीची प्रक्रिया, रेसिंगची गणितं, स्टीअरिंग व्हीलच्या मागे असलेल्या माणसाचं महत्त्व, रेसिंगचं रोमँटिसाइजेशन असं बरंच काही आहे. 

१९६३ मध्ये ली आयकोका (जॉन बर्नथाल) या फोर्ड मोटार कंपनीमधील एका कार्यकारी अधिकार्याने हेन्री फोर्ड दुसरा (ट्रेसी लेट्स) यास फोर्ड मोटारींचा घटता खप वाढवण्यासाठी फरारी ही तोट्यात सुरु असलेली, मात्र उत्तम रेस कार बनवणारी कंपनी विकत घेऊन कार रेसिंगच्या विश्वात उतरण्याचा सल्ला दिला. मात्र, एन्झो फरारीने (रेमो जिरोन) फोर्ड ऐवजी फियाटशी सौदा केला. साहजिकच फोर्ड दुखावला गेला, नि ‘ल् मान्’ या प्रतिष्ठेच्या रेसमध्ये जिंकेल अशा मोटारी निर्माण करण्याचे आदेश त्याने दिले. आयकोका यासाठी कॅरल शेल्बी (मट डेमन) या तेव्हाच्या प्रसिद्ध उत्पादक नि पूर्वाश्रमीच्या ‘ल् मान्’ जिंकणाऱ्या रेसरची नियुक्ती करतो. शेल्बीच्या मते हे काम करू शकेलशी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे केन माइल्स (क्रिस्टियन बेल). 

आता या मुलभूत कथानकात अनेक इतर उपकथानकं नि संकल्पना दडलेल्या आहेत. फोर्ड आणि तिथला कार्यकारी मंडळाचा ताफा म्हणजे व्यावसायिक गणितं, प्रसिद्धीची कामं पाहणारा, अधिकाधिक गाड्यांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करणारा आहे. सर्वेसर्वा हेन्री फोर्ड दुसरा, कंपनीचा वरिष्ठ उपाध्यक्ष लिओ बीब (जॉश लुकास) हे केवळ आर्थिक यश आणि फरारीप्रती असलेल्या इर्ष्येपोटी या नवीन कारच्या निर्मितीत उतरलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष निर्मितीच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करणं, प्रसिद्धीकडे लक्ष पुरवणं नि बाजारात फोर्डचं असलेलं नाव अबाधित राखण्याच्या दृष्टीने त्यांचा कल असतो. साहजिकच हे सगळं शेल्बी आणि माइल्सच्या निर्मितीप्रक्रियेला आणि कार चालवण्याला एक कलात्मक कामगिरी मानणाऱ्या संवेदनांच्या उलट असतं. 

शेल्बी आणि माइल्समध्ये आपापसात कितीही मतभेद असले तरी एकमेकांशिवाय दोघांचं पान हलत नसतं. शेल्बी सगळं बोलणं सांभाळणार, तर माइल्स निर्मिती प्रक्रिया, बनवत असलेल्या कारच्या मॉडेलमधील उणीवा सुधारण्याकडे लक्ष देणार अशी कामगिरी ठरलेली असते. कारण, मुळातच माइल्सचं कार्सवर अतोनात प्रेम असतं. माइल्स नि त्याची पत्नी, मॉली (काईत्रिओना बाफ) यांच्यातील नात्यातही या कारप्रेमाचं असलेलं महत्त्व मोजक्या दृश्यांमध्ये प्रतिबिंबित होतं. भिकार गाड्या बनवणाऱ्या गल्लाभरू फोर्डवर त्याचा राग असतो. जे अनेक प्रसंगांमध्ये स्पष्ट दिसतं. फरारीला हरवणारी गाडी फोर्ड बनवू शकेल, किंबहुना शेल्बी म्हणेल ते मान्य करत तशी गाडी त्याला बनवू देईल यावर त्याचा काडीमात्र विश्वास नसतो. हे का घडतं याचं उत्तर तसं स्पष्ट आहे. फोर्डची व्यावसायिक गणितं आणि या जोडीचं कलात्मक स्वातंत्र्य या सर्वस्वी भिन्न गोष्टी असतात. परिणामी चित्रपटाचा बराचसा भाग या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लढाईत व्यतीत होतो. 

मात्र, आधी उल्लेख केल्याप्रमाणे ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीचं कौशल्य इथे महत्त्वाचं आहे. वाहन निर्मितीमध्ये लागणारं कसब इथे महत्त्वाचं आहे. एका दृश्यात माइल्स त्याच्या मुलाला, पीटरला त्याच्या दृष्टीने असलेली ‘परफेक्ट लॅप’ची व्याख्या सांगतो. पुढे जाऊन तो उद्गारतो, अनेकांना नेमका तो परफेक्ट लॅप लक्षातच येत नाही. माइल्सबाबत बाब अशी की त्याच्याकडून, त्याच्या नजरेतून असे परफेक्ट लॅप्स सहसा चुकत नाहीत. 

कथन करताना कॅरल शेल्बी म्हणतो, “There’s a point at 7,000 RPMs where everything fades. The machine becomes weightless. It disappears. All that’s left, a body moving through space, and time. At 7,000 RPM, that’s where you meet it. That’s where it waits for you.” हे वाक्य म्हणजे सदर चित्रपटाचा कथात्म सर्वोच्चबिंदू, तर समोर येणाऱ्या दृश्यांमधून या वाक्याची अनुभूती प्रेक्षकाला करून देणं हा इथल्या चित्रपट निर्मितीचा सर्वोच्चबिंदू म्हणता येईल. कारण, चित्रपटात असे क्षण येतात जेव्हा सदर पात्र म्हणतं त्याप्रमाणे अमुक इतक्या रोटेशनल स्पीडला पोचल्यावर खरोखर त्या पात्रांना, आणि ती पाहणाऱ्या आपल्यालाही सगळ्या जगाचं भान विसरायला होतं. 

चित्रपटाच्या शेवटाकडे असाच एक परफेक्ट लॅप, नि शेल्बी म्हणतो तशी अनुभूती देणारा, मराठीत ब्रम्हानंदी टाळी म्हणूयात हवं तर, तसा क्षण येतो. फेडन पापामिकलचा कॅमेरा, जेम्स मॅनगोल्डची दिग्दर्शकीय नजर जणू चित्रपटभर केवळ याच क्षणाची वाट पाहत होती. हा क्षण येताच, समोर दिसत असणाऱ्या दृश्यचौकटी जराशा रेंगाळू लागतात. कारचा स्पीड कमालीचा वाढलेला असताना त्यांचा स्पीड मात्र कमी झाल्याचं जाणवतं. कॅमेरा बेलच्या चेहऱ्याभोवती रेंगाळतो, तो ही अनुभूती घेत असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. नंतर जे काही घडतं त्याला महत्त्व नाही, तो क्षण महत्त्वाचा. 

फोर्ड, त्यातील कार्यकारी अधिकारी नाही म्हटलं तरी नकारात्मक भूमिकांत दिसतात. (‘मार्व्हल’मधील कार्यकारी अधिकारी आणि त्यांचा प्रत्यक्ष चित्रपट निर्मितीमधील हस्तक्षेप यावर आधारित एक चित्रपट बनायला हरकत नाही.) फोर्डच्या नेमकं उलट, फरारीकडे मात्र आपण एका आदरयुक्त नजरेनं पाहतो. तोट्यात असूनही आपली तत्त्वं पाळत बाजारू भूमिका न घेणारं कुणीतरी या भूमिकेत फरारी कुटुंब दिसतं. त्यामुळेच शेवटी जे काही घडतं, त्यानंतर केन माइल्स आणि एन्झो फरारी जेव्हा एकमेकांकडे पाहतात, तेव्हा त्यात एकमेकांप्रती, एकमेकांच्या कौशल्याप्रती असलेला आदर असतो. 

चित्रपट निर्मितीच्या स्तरावर ‘फोर्ड व्हर्सेस फरारी’ हा सहजासहजी यावर्षीच्या काही उत्तम चित्रपटांच्या रांगेत जाऊन बसतो. महत्त्वाचं म्हणजे तो आवर्जून मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा एक सुंदर चित्रपट आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक मॅनगोल्डही ‘वॉक द लाइन’, ‘लोगन’सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असल्याने त्याचा चित्रपट म्हणूनही अनुभवावासा आहे.