Europe

रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेनंतर स्पेनमधील पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमधील धुमश्चक्री सुरूच

स्पॅनिश रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेला आठवडा उलटल्यानंतरही स्पेनमधील आंदोलनाची लाट ओसरलेली नाही.

Credit : Billboard

स्पॅनिश रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेला आठवडा उलटल्यानंतरही स्पेनमधील आंदोलनाची लाट ओसरलेली नाही. १६ फेब्रुवारी रोजी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करत हिंसेला चेतावणी देणारी गाणी म्हटल्याबद्दल रॅपर पाब्लो हेझलला पोलीसांनी अटक केली होती. तेव्हापासून या अटकेविरोधात स्पेनमधील तरूणाई रस्त्यावर उतरली असून हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं पोलीस बळाचा वापर करणं सुरूच ठेवलं आहे. स्पेनमधील कॅटलोनिया प्रांतात पोलीसांनी आंदोलन दडपण्यासाठी रबर बुलेट्सचा वापर केल्यानं अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. 

पाब्लो हेझल यानं बंदी घालण्यात आलेल्या ॲन्टी फॅसिस्ट कम्युनिस्ट ग्रापो या सशस्त्र गटाला आपल्या गाण्यांमधून आणि ट्वीटरवरूनही उघड समर्थन दिलं होतं‌. यासोबतंच स्पेनमधील राजघराण्यावर भ्रष्टाचार आरोप करत त्याने पोलीसांच्या दडपशाहीचा उघड विरोध केला होता. "हेझल यांचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणारं आहे. आपल्या गाण्यांमधून पाब्लो हेझल हिंसेला चालना देण्याचा प्रयत्न करत असून त्यांना तात्काळ अटक करावी," असे निर्देश न्यायालयानं दिले होते. 

 

 

ॲन्टी फॅसिस्ट गटांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यांचं उघड समर्थन करून हेझल यांनी दहशतवादाचा पुरस्काल केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या या रॅपरची करण्यात आलेली अटक ज्या सत्ताधारी सरकारकडून करण्यात आलीये त्या आघाडी सरकारमध्ये पोडेमोस हा डावा पक्षही भागीदार आहे. पोडेमोस पक्षानं पाब्लो हेझलच्या अटकेला आपला तात्विक विरोध दर्शवला असला तरी ह पक्षसुद्धा अटक करणाऱ्या आघाडी सरकारचा भाग असल्यानं पोडेमोसच्या दुटप्पीपणावरही बोट ठेवण्यात आलंय. स्पेनमधील फासीवादी उजव्या विचारसरणीच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रतिकार म्हणून पाब्लोच्या अटकेनंतर सुरू झालेलं हे आंदोलन आकार घेत आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं पाब्लो हेझलच्या ॲन्टी फॅसिस्ट विचारसरणीचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणाऱ्या डाव्या पक्षाची गरज स्पेनला असल्याचं अधोरेखित झालंय. 

कोव्हीडचं संंकट, बेरोजगारी, महागाई आणि सरकारच्या हुकुमशाहीला वैतागलेल्या स्पेनमधील तरूणाईची नाराजीनं पाब्लो हेझलच्या अटकेच्या निमित्तानं उग्र रूप धारण केलं आहे. या आंदोलनाला हिंसक अराजक गटानं निर्माण केलेला उपद्रव म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न सरकार करत असून कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय सुरू असलेलं हे आंदोलन आठ दिवस उलटल्यानंतरही वरचेवर तीव्रच होतं चाललं आहे.