India

संभाजी भिडे यांचे वक्तव्य व माध्यमांचं प्रसारण शासन आदेशाचा भंग करणारे, कारवाईची मागणी

संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत

Credit : इंडी जर्नल

सांगली: कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यात अधिनियम सहा मध्ये शासकीय विभागाच्या व्यतिरिक्त कोरोना बाबतीत कुठलीही माहीती प्रसारित करू नये, तसेच त्यासंदर्भात कुठलीही अफवा पसरवू नये असा आदेश आहे. तरीही. गाईच्या तुपाचा आणि मूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल, असं मत शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी सोमवारी वृत्तवाहिन्यांसमोर व्यक्त केले. वृत्तवाहिन्यांनीही अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या वक्तव्याला संपादित न करता प्रसारित केले.

शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे या माणसाने गोमुत्र आणि गोतुप खाल्याने कोरोना पूर्णपणे बरा होतो असे म्हणून लोकांना तसे करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या वक्त्यव्याची माध्यमांनी एक बातमी द्यावी किंवा बातमीतून एखादा उपाय सांगावा अश्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवले आहे. याचवेळी, इस्लामपुरातील कोरोनाबाधित रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्या अन्वये बंदिस्त करा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

बातम्यांवर विश्वास ठेऊन जर लोकांनी गोमुत्र पीले आणि त्यांच्या तब्येतीचे काही बरे वाईट करून घेतलेच तर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा या बातम्या दाखवणाऱ्या वाहीन्या, त्यांचे संपादक, त्यांचे अँकर यांच्यावरही सहआरोपी म्हणूनही गुन्हे दाखल होऊ शकतील का, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जात आहे. वृत्तवाहिन्यांवर काय दाखवावं अथवा काय दाखवण्यात येऊ नये याचे निकष आहेत. गाईडलाईन्स आहेत. ज्या सरकारद्वारे आणि वृत्तवाहिन्यांसाठी असलेल्या नोडल एजंसी द्वारे ठरवल्या जातात. केंद्रीय माहीती सुचना प्रसारण मंत्रालय, प्रेस काऊंसिल सारख्या संस्था ही मार्गदर्शक तत्वे तयार करतात. त्यावर प्रसारित होणाऱ्या गोष्टीस मुख्य संपादक जबाबदार असतात.

 

शासन आदेश नेमका काय आहे?

महाराष्ट्र शासनाने १६ मार्च रोजी काढलेल्या 'महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२०' च्या नियम क्रमांक ६ नुसार,

'कोणत्याही व्यक्तीस / संस्था / संघटनांना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा, पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेमार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.'

 

खरंच गोमूत्र, गोतूप फायदेशीर आहे का?

'गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर ३ ते ४ तासानं तूप नाकात फिरवलं, गोमूत्र दिलं तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,' असंही भिडे यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक अजब सल्ले दिले जात आहेत. त्यापैकी गोमूत्र पिणे हा एक आहे. गोमूत्राच्या तथाकथित अँटी-बॅक्टेरियल गुणांविषयी याआधीही संशोधन करण्यात आलं आहे. पण, दिल्लीतल्या Indian Virological Society (IVS) चे डॉ. शैलेंद्र सक्सेना यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "आतापर्यंत असा एकही मेडिकल पुरावा सापडलेला नाही ज्यामध्ये गोमूत्रात अँटी-व्हायरलचे गुण आहेत. तसंच गाईच्या शेणाचंही आहे. त्याचा वापर केला तर ते अंगलटही येऊ शकतं. कारण, कुणास ठाऊक त्यामध्ये कोरोनाव्हायरस असूही शकतो."

 

जागतिक आरोग्य संघटना काय सांगते?

पण जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि अमेरिकेतल्या सेंटर फॉर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्या मते अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरच वापरावं असं म्हटलं आहे. तर, लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या मते घरात तयार केलेला हँड सॅनिटायझर वापरू नये, कारण, त्यामध्ये सगळ्यात जास्त अल्कोहोल असणाऱ्या व्होडकाचा जरी वापर केला तरी त्यात केवळ ४०% अल्कोहोल असते.

 

 

कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्यांवर कारवाई, मग भिडेंवर का नाही?

अमुक सामान कोरोनापासून तुम्हाला वाचवेल असा दावा करत काहीजण व्यवसाय करत असल्याचंही दिसून आलं आहे. उदाहरणार्थ, १५ हजार रुपयात 'अँटी-कोरोना व्हायरस गाद्या' घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरातही मुंबईतल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात आली होती. त्यावर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. Arihant Matress ही कंपनी अशा गाद्या विकत होती. या अशा अफवांवर कारवाई होत असेल, तर भिडेंसारख्या बेजवाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर, तसेच वृत्तवाहिन्यांवरही कारवाई का होऊ नये, असे नागरिक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत.