Quick Reads
उच्च मूल्य, कमी उत्पादन: कोकणातील शेतीचे वास्तव, विरोधाभास आणि पुढील दिशा
हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि अस्थिर बाजारपेठ यांच्या छायेत कोकणातील शेती उभी आहे.
चारुहास दळी । जागतिक पातळीवर शेती आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. हवामान बदल (Climate Change) ही संकल्पना आता केवळ शास्त्रीय चर्चेपुरती मर्यादित राहिलेली नसून, तिचे थेट परिणाम जगभरातील शेतीवर स्पष्टपणे दिसून येत आहेत. वाढते तापमान, अनियमित पावसाळा, दीर्घकालीन दुष्काळ, अचानक येणारे अतिवृष्टीचे दिवस, चक्रीवादळे, तसेच कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव – हे सगळे घटक आज जागतिक कृषी व्यवस्थेला हादरवत आहेत.
या जागतिक बदलांचा प्रभाव कोकणासारख्या संवेदनशील भौगोलिक भागावर अधिक तीव्रतेने जाणवतो आहे. कोकणातील शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. आंबा आणि काजू यांसारखी नगदी पिके ही या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जातात. मात्र हवामानातील अनिश्चितता, मानवनिर्मित कारणांमुळे होणारे पर्यावरणीय बदल, जमिनीचा होत चाललेला ऱ्हास, तसेच वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळे स्थानिक कृषी उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहेत. याचबरोबर शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खतं, कीटकनाशके, मजुरी, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि देखभाल यांचा खर्च प्रचंड वाढलेला असताना उत्पादनात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. परिणामी, उत्पादकतेचे प्रमाण कमी होत असून शेतकऱ्याचा नफा नगण्य किंवा अनेकदा तोट्यात जात आहे.
या परिस्थितीला केवळ हवामान बदलच जबाबदार आहे असे नाही. बाजारातील अस्थिर दर, योग्य साठवणूक आणि प्रक्रिया सुविधांचा अभाव, तंत्रज्ञानाची मर्यादित पोहोच, धोरणात्मक अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि बदलत्या सामाजिक-आर्थिक वास्तवामुळे शेती अधिक असुरक्षित बनत चालली आहे. जर हीच प्रवृत्ती अशीच पुढे सुरू राहिली, तर कोकणातील शेतीसमोर उभे राहणारे आव्हान अधिक गुंतागुंतीचे होणार आहे. मात्र ही परिस्थिती पूर्णतः निराशाजनक आहे असेही नाही. योग्य दिशेने विचार, नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास कोकणातील शेतीला नवसंजीवनी देण्याची संधी आजही उपलब्ध आहे.
या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काही ठोस आणि व्यवहार्य दृष्टीकोन आजही उपलब्ध आहेत. स्थानिक कृषी संशोधन आणि विद्यापीठांना बळकटी देणे, भक्कम आणि परिस्थितीनुरूप धोरणे, एकात्मिक कृषी–बागायती–वनशेती पद्धतीचा स्वीकार, शेतीवर आधारित उत्पादनांची पारदर्शक पुरवठा साखळी उभारणे, सामूहिक व समुदाय शेतीला चालना देणे, तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या उपायांमुळे कोकणातील शेती अधिक शाश्वत आणि सक्षम होऊ शकते. या सर्व बाबींचा सविस्तर विचार पुढील भागांत केला जाईल.
हवामान, भूआकार आणि कोकणातील शेती
कोकण प्रदेश हा भौगोलिक, हवामानिक आणि कृषी दृष्टीने अत्यंत वेगळा व संवेदनशील पट्टा आहे. जास्त पर्जन्यमान, उताराची जमीन, लाल-जांभ्या मातीचा प्राबल्य, तसेच लहान व तुकड्यात विभागलेली शेती ही कोकणातील शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कोकण प्रदेश हा देशातील सर्वाधिक पावसाळी भागांपैकी एक मानला जातो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान साधारणतः ३,००० ते ४,००० मि.मी. दरम्यान असून काही भागांत ते याहूनही अधिक असते. याच्या तुलनेत भारताची राष्ट्रीय सरासरी पर्जन्यमान सुमारे १,१०० मि.मी. इतकी आहे. म्हणजेच कोकणात राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास तीनपट पाऊस पडतो. हा भरघोस पाऊस बागायती शेतीसाठी अनुकूल वाटत असला, तरी त्याची अनियमितता, अतिवृष्टी आणि कमी कालावधीत होणारा पर्जन्य अनेकदा शेतीसाठी अडचणी निर्माण करतो. कोकणातील शेती व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे मान्सून. पेरणीपासून बागायती पिकांच्या मोहोर, फळधारणा आणि उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्पा मान्सूनच्या वेळेवर आणि स्वरूपावर अवलंबून असतो. मान्सून उशिरा येणे, मध्येच खंड पडणे किंवा अवकाळी पावसाचे प्रमाण वाढणे - या प्रत्येक घटकाचा थेट आणि गंभीर परिणाम शेती उत्पादनावर होतो. विशेषतः आंब्यासारख्या संवेदनशील पिकांसाठी पावसाची वेळ आणि आर्द्रता निर्णायक ठरते. त्यामुळे कोकणात मान्सून हा केवळ ऋतू नसून, तो संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
कोकणचा भूप्रदेश प्रामुख्याने उताराचा, डोंगराळ आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे.
कोकणचा भूप्रदेश प्रामुख्याने उताराचा, डोंगराळ आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी पसरलेल्या या प्रदेशात सपाट, मोठ्या आकाराच्या शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण मर्यादित आहे. बहुतेक शेती लहान तुकड्यांत विभागलेली असून जमिनीची धूप, पाण्याचा जलद निचरा आणि मातीची मर्यादित खोली ही कायमची आव्हाने आहेत. या भौगोलिक रचनेमुळे यांत्रिकीकरण, पाणी साठवणूक आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे कोकणात तुलनेने कठीण ठरते.
कोकणातील कृषी व्यवस्था भात व नाचणीसारख्या अन्नधान्य पिकांसोबत आंबा, काजू आणि नारळ या बागायती पिकांवर आधारित आहे. मात्र ही शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्याने हवामानातील थोडासाही बदल थेट उत्पादनावर परिणाम करतो. त्यामुळे कोकणातील शेती ही इतर प्रदेशांपेक्षा अधिक जोखमीची, पण योग्य व्यवस्थापन केल्यास उच्च मूल्य निर्माण करण्याची क्षमता असलेली ठरते.
आकड्यांचा खेळ
महाराष्ट्रातील कोकण प्रदेश हा एक विशिष्ट कृषी-हवामानिक पट्टा असून येथील शेती उत्पादन प्रामुख्याने बागायती पिकांवर अवलंबून आहे. हापूस आंबा, काजू आणि नारळ ही प्रमुख नगदी पिके असून भात व नाचणी (रागी) ही अन्नधान्य पिके त्याला पूरक आहेत. सध्या कोकणात सुमारे १.५ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड असून सरासरी उत्पादकता २.५ ते ३.१२ टन प्रति हेक्टर इतकी आहे, जी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे; तरीही आंबा पिकाची एकूण घटक उत्पादकता (TFP) दरवर्षी सुमारे २.९३% ने वाढत आहे. काजू लागवडीतही सकारात्मक वाढ दिसून येत असून सरासरी उत्पादन सुमारे १,१२७ किलो प्रति हेक्टर आणि उत्पादकता वाढ दर १.४७% प्रतिवर्ष आहे. शहरीकरणामुळे भाताखालील क्षेत्र घटत असले, तरी तांत्रिक सुधारणांमुळे भात उत्पादकतेत दरवर्षी सुमारे ०.७०% वाढ झाली आहे, तर नाचणीचे सरासरी उत्पादन सुमारे १,२५१ किलो प्रति हेक्टर इतके नोंदवले जाते. आंबा-भुईमूग किंवा काजू-उडीद यांसारख्या आंतरपीक पद्धतींमुळे झाडांच्या सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढते. तसेच कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या उच्च उत्पादनक्षम वाणांमुळे गेल्या काही दशकांत उत्पादनात २–३ पट वाढ झाली आहे. मात्र मान्सूनमधील अनिश्चितता, हवामान बदल आणि मर्यादित पायाभूत सुविधा यांमुळे उत्पादकता अजूनही संवेदनशील आहे; तरी योग्य अनुकूलन उपाययोजना राबवल्यास २०३० पर्यंत उत्पादनक्षमता सुमारे ३३% पर्यंत वाढवण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.
स्रोत: भारत सरकार, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (ON2943)
भारताच्या इतर प्रमुख आंबा उत्पादक प्रदेशांच्या तुलनेत कोकणाचा आंबा उत्पादनाचा नमुना हा “उच्च मूल्य, पण कमी उत्पादन” (high-value, low-yield) असा वेगळा ठरतो. कोकणात प्रामुख्याने हापूस (Alphonso) या प्रीमियम वाणाची लागवड केली जाते; मात्र भौतिक उत्पादकतेच्या दृष्टीने कोकणाची सरासरी उत्पादकता २.०७ ते ३.१२ मेट्रिक टन प्रति हेक्टर इतकी असून ती राष्ट्रीय सरासरी आणि उत्तर व दक्षिण भारतातील विशेषीकृत आंबा क्लस्टर्सच्या तुलनेत खूपच कमी आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश मध्ये आंब्याची उत्पादकता २०२३–२४ मध्ये १७ मेट्रिक टन प्रति हेक्टरपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे, तर आंध्र प्रदेश मध्ये ती सुमारे १२–१३ मेट्रिक टन प्रति हेक्टर इतकी आहे; राष्ट्रीय सरासरी सुद्धा सुमारे ९ मेट्रिक टन प्रति हेक्टरच्या आसपास आहे. कोकणात हापूस वाणावर असलेले अवलंबित्व हे कमी उत्पादनाचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते, कारण उत्तर भारतातील दसहरी किंवा दक्षिण भारतातील तोतापुरी, बेनिशन, केसर यांसारखे वाण हापूसपेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. मात्र उत्पादनाच्या प्रमाणात मागे असतानाही कोकण आर्थिकदृष्ट्या स्पर्धात्मक राहतो, कारण हापूस आंब्याचा लाभ–खर्च गुणोत्तर सुमारे २.०८ इतका असून तो इतर वाणांपेक्षा अधिक आहे.
कोकणात हापूस वाणावर असलेले अवलंबित्व हे कमी उत्पादनाचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते
विशेष म्हणजे महाराष्ट्र (मुख्यतः कोकण) देशाच्या एकूण आंबा उत्पादनात केवळ २–४% वाटा उचलत असला, तरी भारताच्या एकूण आंबा निर्यातीपैकी ३५% पेक्षा जास्त वाटा देतो. तथापि, कोकणातील आंबा उत्पादनात अस्थिरता खूप जास्त असून उत्पादकतेतील चढउतारांचे प्रमाण सुमारे ५४.८८% इतके आहे. हापूसच्या नाजूक मोहोर अवस्थेवर अवकाळी पाऊस, जास्त आर्द्रता आणि हवामानातील अनिश्चितता यांचा तीव्र परिणाम होत असल्याने ही जोखीम वाढते. याच काळात गुजरात (केसर वाण) आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये नवीन लागवड क्षेत्र आणि उत्पादनात वेगाने वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळे कोकणातील पारंपरिक आंबा पट्ट्यांसमोर दीर्घकालीन धोरणात्मक प्रश्न उभे राहतात.
सरकार आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका
कोकणातील शेती आज ज्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि कृषी शिक्षण–संशोधन संस्थांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. हवामान बदल, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारातील अस्थिरता या समस्यांना वैयक्तिक पातळीवर तोंड देणे शेतकऱ्यासाठी शक्य नाही. यासाठी धोरणात्मक पाठबळ, शास्त्रीय मार्गदर्शन आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. सरकारकडून विविध योजना, अनुदाने आणि विमा सुविधा उपलब्ध आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच यामध्ये मोठी दरी दिसून येते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा प्रकार आणि पर्जन्यमान लक्षात घेऊन स्वतंत्र व स्थानिक गरजांवर आधारित कृषी धोरणांची आवश्यकता आहे. एकाच चौकटीतील योजना सर्व प्रदेशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत, हे वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे.
याचबरोबर कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि कृषी विस्तार यंत्रणांनी केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. स्थानिक पिकांसाठी हवामान-सुसंगत जाती, रोग व कीड व्यवस्थापन, माती आरोग्य आणि उत्पादन खर्च कमी करणाऱ्या पद्धती यावर केंद्रित संशोधन झाले पाहिजे. हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि क्षेत्रीय मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवले गेले पाहिजे.
शेती शिक्षण आणि प्रत्यक्ष शेतातील वास्तव यामध्ये समन्वय साधला गेला, तरच धोरणे कागदावर न राहता जमिनीवर परिणाम घडवू शकतील. कोकणातील शेतीसमोरील गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार, कृषी शैक्षणिक व संशोधन संस्था, शेतकरी, कृषी सेवा पुरवठादार, प्रक्रिया उद्योग आणि बाजारातील इतर घटक यांच्यात प्रभावी सहकार्य अत्यावश्यक आहे. संशोधन अनुदाने केवळ प्रयोगशाळा किंवा प्रकल्प अहवालांपुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्ष शेतातील समस्यांवर आधारित असावीत. यासाठी सखोल सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणे, हवामान व उत्पादनविषयक डेटा संकलन, आणि शेतकऱ्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून धोरणे ठरवली पाहिजेत. असे सहकार्यात्मक संशोधन आणि निर्णयप्रक्रिया झाल्यास उपाय अधिक वास्तववादी, स्वीकारार्ह आणि परिणामकारक ठरू शकतात, आणि शेती व्यवस्थेतील प्रत्येक घटकाला त्याचा थेट लाभ मिळू शकतो.
कृषी-सेवा पुरवठादारांची भूमिका: “डॉक्टर–मेडिकल” मॉडेलची गरज
कोकणातील शेती अधिक शाश्वत आणि शास्त्रीय बनवायची असेल, तर कृषी-सेवा पुरवठादारांची (कृषी निविष्ठा विक्रेते, सल्लागार, तांत्रिक प्रतिनिधी) भूमिका केवळ उत्पादने विकणाऱ्यापुरती मर्यादित राहू नये. यासाठी “डॉक्टर–मेडिकल” मॉडेल उपयुक्त ठरू शकते. ज्या प्रकारे डॉक्टर रोगाचे निदान करतात आणि मेडिकल स्टोअर औषधे योग्य पद्धतीने पुरवते, त्याच धर्तीवर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ व संशोधक हे “डॉक्टर” म्हणून काम करतील आणि कृषी-सेवा पुरवठादार हे “मेडिकल सेवा केंद्र” म्हणून जबाबदारीने कार्य करतील, अशी रचना आवश्यक आहे.
आज अनेक वेळा कीड, रोग किंवा पोषणतुटीचे अचूक निदान न होता फवारणी केली जाते.
आज अनेक वेळा कीड, रोग किंवा पोषणतुटीचे अचूक निदान न होता फवारणी केली जाते. यामुळे खर्च वाढतो, उत्पादनावर अपेक्षित परिणाम होत नाही आणि पर्यावरणावरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे पिकनिहाय, हवामाननिहाय आणि वाढीच्या टप्प्यानुसार अद्ययावत फवारणी वेळापत्रक (spray schedule) असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन रसायने, जैविक उत्पादने किंवा नवीन फॉर्म्युलेशन्स यांचा पिकांवर होणारा एकत्रित परिणाम, माती व पाण्यावर होणारा प्रभाव आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यांचा अभ्यास करूनच त्यांचा वापर सुचवला गेला पाहिजे.
खाजगी कृषी कंपन्यांनी नवीन उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी प्रत्यक्ष शेतात क्षेत्रीय चाचण्या (field trials) घेणे अनिवार्य असावे. या चाचण्या केवळ कंपनीपुरत्या न राहता, त्यामध्ये शासकीय यंत्रणा, कृषी विद्यापीठे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सहभागी असावेत. अशा पारदर्शक चाचण्यांमुळे उत्पादनाची उपयुक्तता, मर्यादा आणि जोखीम आधीच स्पष्ट होऊ शकते.
संशोधन व विकास (R&D) प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर वेळ आणि आर्थिक गुंतवणूक लागते, हे वास्तव आहे. मात्र जे उत्पादने शेतकरी, उत्पादनक्षमता आणि पर्यावरण या तिन्ही दृष्टीने फायदेशीर ठरतात, अशा निवडक उत्पादनांना सरकारी अनुदान किंवा प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. यामुळे ती उत्पादने शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील. शेतीतील तंत्रज्ञान प्रगत असावे, पण ते खिशाला परवडणारे नसेल तर त्याचा प्रत्यक्ष उपयोग मर्यादित राहतो.
एकूणच, कृषी-सेवा पुरवठादार, सरकार, संशोधन संस्था आणि खाजगी कंपन्या यांच्यात विश्वासावर आधारित, शास्त्रीय आणि जबाबदार सहकार्य निर्माण झाले, तरच कोकणातील शेती अधिक सुरक्षित, फायदेशीर आणि टिकाऊ होऊ शकते.
शेतकऱ्यांची भूमिका: बदलाचा केंद्रबिंदू
कोकणातील शेती व्यवस्थेत शेतकरी हा केवळ उत्पादन करणारा घटक नसून, संपूर्ण कृषी परिसंस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी म्हणजे फक्त जमीनधारक नव्हे; तो निरीक्षक, निर्णयकर्ता, व्यवस्थापक आणि दीर्घकालीन जोखीम वाहणारा घटक आहे. बदलती हवामानस्थिती, वाढता खर्च आणि बाजारातील अस्थिरता या सगळ्यांचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो. त्यामुळे शेती टिकवायची असेल, तर शेतकऱ्यांनीही आपली भूमिका नव्याने परिभाषित करण्याची गरज आहे.
यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management – IPM) ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना ठरते. कीडनाशकांचा अतिरेक टाळून, कीड निरीक्षण, आर्थिक नुकसान पातळी (ETL), जैविक उपाय, यांत्रिक पद्धती आणि शेवटचा पर्याय म्हणून मर्यादित रासायनिक फवारणी - असा संतुलित दृष्टिकोन स्वीकारल्यास खर्च कमी होतो, किडींचा प्रतिकार कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. तसेच सहकारी व सामूहिक शेती (Co-operative / Community Farming) ही कोकणासाठी विशेषतः उपयुक्त संधी आहे. लहान, तुकड्यात विभागलेल्या जमिनी, मजुरीची कमतरता आणि यांत्रिकीकरणाच्या मर्यादा या समस्यांवर सामूहिक निर्णय, सामायिक साधनसामग्री आणि एकत्रित बाजारपेठेचा वापर प्रभावी उपाय ठरू शकतो. एकट्या शेतकऱ्याच्या मर्यादा समूहात सामील झाल्यावर कमी होतात.
शेतीतील निर्णय अंदाजावर नव्हे, तर चाचणीवर आधारित असणे अत्यावश्यक आहे. माती परीक्षण, पाण्याचे परीक्षण, पान विश्लेषण आणि गरजेनुसार कीड–रोग निदान केल्यास अयोग्य खत व रसायनांचा वापर टाळता येतो. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य टिकते. याचबरोबर कमी दर्जाच्या, संशयास्पद गुणवत्तेच्या उत्पादनांचा वापर थांबवणे ही शेतकऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वस्त किंमतीच्या नावाखाली कमी परिणामकारक किंवा भेसळयुक्त निविष्ठा वापरल्यास तात्काळ फायदा झाल्यासारखा वाटतो, पण दीर्घकाळात त्याचा फटका उत्पादन, माती आणि उत्पन्नावर बसतो. शेतीमध्ये वेळापत्रकाचे (farming schedule) महत्त्व अमूल्य आहे. पेरणी, छाटणी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि काढणी - प्रत्येक टप्पा योग्य वेळी झाला, तरच त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येतो. उशीर किंवा घाई दोन्हीही नुकसानकारक ठरू शकतात.
कोकणातील शेती प्रामुख्याने आंब्यावर केंद्रीत असली, तरी काजू, भात आणि नाचणी यांसारखी पिके या प्रदेशाच्या कृषी संरचनेत तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. काजू लागवडीत उत्पादकता आणि संशोधनामुळे चांगली वाढ दिसून येत असताना, भात आणि नाचणी ही पिके अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. यासोबतच बांबू, फणस, काळी मिरी, जायफळ, दालचिनी, कोकम यांसारखी फळे व मसाला पिके - जी पुढे कोकण मेवासारख्या मूल्यवर्धित उत्पादनांसाठी वापरली जातात - यांमध्येही मोठी आर्थिक क्षमता आहे. पिकविविधीकरणामुळे हवामान जोखीम कमी करता येते आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतात. तसेच कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता सूक्ष्म सिंचन (मायक्रो-इरिगेशन) पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन स्थिर ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते.
कृषी-वनिकीचा नमुना : बांबू शेतीमध्ये भाजीपाला आंतरपीक
शेवटी, शेतकऱ्यांनी मध्यमवर्गीय दलालांवरील अवलंबित्व कमी करून थेट विक्रीकडे (direct selling) वळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), थेट ग्राहक विक्री, स्थानिक बाजारपेठा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा वापर केल्यास उत्पादनाचा योग्य दर मिळू शकतो. बाजारावर नियंत्रण वाढले, तरच शेती खऱ्या अर्थाने शाश्वत व्यवसाय ठरू शकते.
एकूणच, धोरणे, तंत्रज्ञान आणि सेवा उपलब्ध असल्या, तरी शेतीतील बदलाची सुरुवात शेतकऱ्यापासूनच होते. माहितीपूर्ण निर्णय, सहकार्याची मानसिकता आणि दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारला, तर कोकणातील शेतीसमोरील आव्हाने संधींमध्ये रूपांतरित होऊ शकतात.
सहकार्याची गरज: सरकार–संस्था–शेतकरी–इतर घटक
कोकणातील शेतीसमोरील समस्या बहुआयामी असल्याने त्यावर एकट्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या संस्थेच्या पातळीवर उपाय शक्य नाहीत. सरकार, कृषी शैक्षणिक व संशोधन संस्था, शेतकरी, कृषी निविष्ठा पुरवठादार, प्रक्रिया उद्योग, व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात समन्वय आणि सहकार्य असणे अत्यावश्यक आहे. संशोधन अनुदाने ही केवळ शास्त्रीय प्रकाशनांपुरती न राहता प्रत्यक्ष शेतातील प्रश्नांवर केंद्रित असली पाहिजेत. यासाठी पिकनिहाय आणि प्रदेशनिहाय सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणे, उत्पादन खर्च-उत्पन्नाचे अभ्यास, हवामान जोखीम विश्लेषण आणि बाजारातील व्यवहारांचा डेटा संकलन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव, स्थानिक ज्ञान आणि शास्त्रीय संशोधन यांची सांगड घातली गेली, तर धोरणे अधिक वास्तववादी आणि परिणामकारक ठरू शकतात. अशा सहभागी व सहकार्यात्मक दृष्टिकोनातूनच कोकणातील शेतीसाठी दीर्घकालीन, टिकाऊ आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग निर्माण होऊ शकतो.
सहकार्यात्मक दृष्टिकोन: हिमाचल प्रदेश मधील सफरचंद उत्पादक मॉडेल
या सहकार्यात्मक दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण हिमाचल प्रदेश मधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीत पाहायला मिळते. दरवर्षी नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या गावांतील शेतकरी गट एकत्र येऊन संपूर्ण हंगामाचा आराखडा ठरवतात. या बैठकीला जिल्हा कृषी विभागाचा प्रतिनिधी, स्थानिक संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी सेवा पुरवठादार उपस्थित असतात. या सामूहिक चर्चेत छाटणी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि काढणी यांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. शास्त्रज्ञ नवीन कीड-रोग, त्यांचे निरीक्षण आणि नियंत्रणाच्या उपायांबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करतात, तर कृषी विभागाचा प्रतिनिधी मागील वर्षीच्या उत्पादनाची स्थिती आणि बाजारातील प्रवृत्ती स्पष्ट करतो. कृषी सेवा पुरवठादार नव्या उत्पादनांची माहिती आणि त्यांचे फायदे सांगतात, मात्र निर्णय प्रक्रियेत शेतकरी केंद्रस्थानी असतो.
या पद्धतीमुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा प्रभावी अवलंब होऊन फवारण्यांची संख्या आणि उत्पादन खर्च दोन्ही कमी होतात. काढणीनंतर शेतकरी आपले उत्पादन एकाच ठिकाणी जमा करून दर्जानुसार वर्गीकरण करतात आणि बाजारात माल पाठवण्याऐवजीथेट दलालांना लिलावासाठी बोलावतात. यामुळे वाहतूक खर्च कमी होतो आणि स्पर्धात्मक लिलावामुळे शेतकऱ्याला योग्य दर मिळतो. शास्त्रज्ञ आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती फसवणुकीचा धोका कमी करते, पारदर्शकता वाढवते आणि शेतकऱ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन रुजवते. असे सर्व भागधारकांचे समन्वयावर आधारित मॉडेल कोकणातील शेतीसाठीही दिशादर्शक ठरू शकते.
दुर्लक्षित पण महत्त्वाची पिके
कोकणातील शेती आंब्यावर केंद्रीत असली तरी काजू, भात आणि नाचणी ही पिके ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिर आधाररचना तयार करतात. काजू लागवडीत संशोधन आणि सुधारित वाणांमुळे उत्पादकतेत वाढ झाली असून प्रक्रिया उद्योगाशी थेट जोडण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. भाताखालील क्षेत्र शहरीकरणामुळे काही प्रमाणात घटले असले, तरी सुधारित तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांमुळे उत्पादकतेत वाढ होत आहे, ज्यामुळे अन्नसुरक्षा कायम राहते. नाचणी हे कमी पाण्यावर येणारे, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि हवामान बदलास तुलनेने तग धरणारे पीक असल्याने भविष्यात त्याचे महत्त्व वाढू शकते.
यासोबतच फणस, बांबू, काळी मिरी, जायफळ, दालचिनी, कोकम, तसेच विविध औषधी वनस्पती यांसारख्या पिकांमध्ये मोठी व्यावसायिक क्षमता आहे. बांबू व फणसावर आधारित प्रक्रिया उद्योग, मसाला पिकांची निर्यात, औषधी वनस्पतींची लागवड आणि साग, अॅकेशिया यांसारख्या व्यापारी लाकूड प्रजातींची शाश्वत लागवड यामुळे दीर्घकालीन उत्पन्नाचे स्थिर स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पिकविविधीकरण हा केवळ पर्याय नसून कोकणातील शेती अधिक शाश्वत, जोखीम-प्रतिरोधक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो.
कोकणातील कृषी–बागायती–वनउपज
यासोबतच कोकणातील अर्ध-सदाहरित (semi-evergreen) वनसंपदेचा विचार केल्यास वनौपज (NTFP – Non-Timber Forest Produce) क्षेत्रातही मोठी संधी दडलेली आहे. पारंपरिकरीत्या स्थानिक लोकजीवनाशी जोडलेल्या रानभाज्या, जंगली फळे, औषधी वनस्पती, मध, करंज, हिरडा, बेहडा, जांभूळ, करवंद, तसेच विविध वनौषधी यांना बाजारात वाढती मागणी आहे. आज आरोग्यपूरक आहार, सेंद्रिय उत्पादने आणि आयुर्वेदिक औषधनिर्मिती यामुळे या वनसंपत्तीचे व्यावसायिक मूल्य अधिक वाढले आहे. योग्य संकलन पद्धती, प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि संघटित विपणन यांद्वारे स्थानिक समुदायांना अतिरिक्त आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. मात्र यासाठी वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नियंत्रित शाश्वत उपसा या तत्त्वांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. शेती आणि वनसंपदा यांचा समन्वय साधला गेला, तर कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्था केवळ बागायती पिकांवर अवलंबून न राहता अधिक व्यापक, पर्यावरणपूरक आणि स्थिर स्वरूप धारण करू शकते.
खर्च, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्याचा नफा: धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज
कोकणातील शेतीसमोरील सर्वात मोठे वास्तव म्हणजे वाढता उत्पादन खर्च आणि त्याच वेळी मर्यादित किंवा अनिश्चित नफा. खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशके, मजुरी, इंधन, पाणी व्यवस्थापन, उपकरणे, देखभाल आणि वाहतूक—या सर्व घटकांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः बागायती पिकांमध्ये फवारण्यांचे प्रमाण जास्त असल्याने निविष्ठांवरील खर्च मोठा असतो. हवामानातील अनिश्चिततेमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे अतिरिक्त फवारण्या कराव्या लागतात, ज्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढतो. मात्र बाजारातील दर त्या प्रमाणात स्थिर राहत नाहीत, परिणामी शेतकऱ्याचा निव्वळ नफा कमी होत जातो.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे शक्य असले, तरी त्याच्या स्वीकारामध्ये अनेक अडथळे आहेत. सूक्ष्म सिंचन प्रणाली, हवामान-आधारित सल्ला, सुधारित वाण, यांत्रिकीकरण, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) यांसारख्या उपाययोजना उपयुक्त आहेत; परंतु त्यासाठी लागणारी प्रारंभिक गुंतवणूक, तांत्रिक ज्ञान आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध नसते. विशेषतः लहान आणि तुकड्यात विभागलेल्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक व व्यवस्थापकीय भार अधिक पडतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची त्यांची क्षमता मर्यादित राहते.
या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सर्वप्रथम, दर्जेदार व प्रमाणित कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करणे ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. निकृष्ट किंवा बनावट खतं आणि कीटकनाशके बाजारात येऊ नयेत यासाठी कठोर देखरेख, तपासणी आणि पारदर्शक परवाना प्रणाली आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आणि सुधारित वाण यांचा प्रभावी तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कृषी विस्तार यंत्रणा, प्रात्यक्षिक प्लॉट्स, शेतशाळा (Farmer Field Schools) आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून शास्त्रीय माहिती सहज आणि व्यवहार्य स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजे.
यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता देणाऱ्या योजना अधिक परिणामकारकपणे राबवणे गरजेचे आहे. पीकविमा योजना, सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान, यांत्रिकीकरणासाठी अनुदान, शेततळे व जलसंधारण प्रकल्प, तसेच व्याजदर सवलतीसह कर्ज सुविधा या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेद्वारे शेतकऱ्यांना कार्यकारी भांडवल उपलब्ध करून देणे, तसेच डिजिटल व्यवहारांद्वारे पारदर्शकता वाढवणे हेही महत्त्वाचे आहे.
सरकारने केवळ अनुदान देण्यापुरते मर्यादित न राहता, उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण साखळी दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. गुणवत्तानियंत्रण, निर्यात मानके, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) यांना बळकटी देणे यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढवता येऊ शकतो.
शेवटी, खर्च नियंत्रण, तंत्रज्ञानाचा समावेशक स्वीकार आणि प्रभावी शासकीय हस्तक्षेप यांचा समन्वय साधला गेला, तर कोकणातील शेती अधिक टिकाऊ, स्पर्धात्मक आणि नफादायक बनू शकते. अन्यथा वाढता खर्च आणि अनिश्चित उत्पन्न यांचे दुष्टचक्र शेतकऱ्यांना अधिक असुरक्षित बनवत राहील.
संभाव्य दिशा आणि उपाय
कोकणातील शेती अधिक शाश्वत, जोखीम-प्रतिरोधक आणि नफादायक बनवायची असेल, तर एकात्मिक आणि बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारणे अपरिहार्य आहे. एकात्मिक कृषी–बागायती–वनशेती पद्धतीमुळे एकाच जमिनीवर विविध पिकांचे संतुलित संयोजन साधून उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करता येतात आणि हवामान जोखीम कमी करता येते. आंतरपीक पद्धती (उदा. आंबा–भुईमूग, काजू–डाळी) झाडांच्या प्रारंभिक अवस्थेत अतिरिक्त उत्पन्न देतात आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात. एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) अवलंबल्यास रासायनिक फवारण्यांचे प्रमाण कमी होते, उत्पादन खर्च घटतो आणि पर्यावरणीय समतोल राखला जातो. लहान व तुकड्यात विभागलेल्या जमिनींच्या पार्श्वभूमीवर समुदाय किंवा सामूहिक शेती ही यांत्रिकीकरण, साठवणूक आणि विपणनासाठी उपयुक्त ठरू शकते.
हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादकांचे सहकार्यात्मक मॉडेल कोकणात थेट नकल करता येणार नाही, पण स्थानिक परिस्थितीनुसार रूपांतरित (adapt) करणे पूर्णपणे शक्य आहे. कोकणात आंबा, काजू, नारळ आणि मसाला पिकांसाठी तालुका किंवा क्लस्टर पातळीवर शेतकरी गटांची स्थापना करून हंगामपूर्व नियोजन बैठकांची सुरुवात करता येऊ शकते. प्रत्येक हंगामाच्या आधी शेतकरी, कृषी विभागाचा प्रतिनिधी, स्थानिक कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ (उदा. आंबा-काजू तज्ज्ञ) आणि निवडक कृषी सेवा पुरवठादार एकत्र येऊन छाटणी, खत व्यवस्थापन, फवारणी, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि काढणीचे वेळापत्रक ठरवू शकतात. शास्त्रज्ञ स्थानिक हवामानानुसार संभाव्य कीड-रोगांची पूर्वसूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगू शकतात, तर कृषी विभाग मागील वर्षांचे उत्पादन, नुकसान आणि बाजारातील प्रवृत्ती मांडू शकतो.
काढणीनंतर प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे माल विकण्याऐवजी सामूहिक संकलन व दर्जानुसार वर्गीकरण (grading) केल्यास व्यवहारशक्ती वाढू शकते. त्यानंतर बाजारात माल पाठवण्याऐवजी दलाल, व्यापारी किंवा निर्यातदारांना थेट लिलावासाठी बोलावणे हा कोकणासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय ठरू शकतो. यामुळे वाहतूक खर्च कमी होईल, दरांमध्ये पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढेल. अशा प्रक्रियेत शासकीय अधिकारी आणि शास्त्रज्ञांची उपस्थिती फसवणूक टाळण्यास मदत करेल आणि शेतकऱ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन व विश्वास निर्माण करेल. योग्य नियोजन, संस्थात्मक पाठबळ आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास हे मॉडेल कोकणातील बागायती शेतीसाठी दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकते.
त्याचबरोबर स्थानिक प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि साठवण सुविधा उभारल्यास कच्च्या उत्पादनाऐवजी मूल्यवर्धित उत्पादन विकण्याची संधी मिळते. शेवटी, पुरवठा साखळीतील पारदर्शकता आणि दलालांवरील नियंत्रण वाढवण्यासाठी थेट लिलाव, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि डिजिटल व्यवहार यांचा वापर केल्यास शेतकऱ्याला योग्य दर मिळू शकतो. या सर्व उपायांचा समन्वय साधल्यास कोकणातील शेतीला दीर्घकालीन स्थैर्य आणि स्पर्धात्मकता प्राप्त होऊ शकते.
पुढचा प्रश्न: कोकणातील शेती टिकणार का?
कोकणातील शेती आज निर्णायक वळणावर उभी आहे. सध्याचीच दिशा कायम राहिली - हवामानातील वाढती अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारातील अस्थिरता आणि तुटक धोरणात्मक प्रतिसाद - तर भविष्यात बागायती शेती अधिक जोखमीची आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर होण्याची शक्यता आहे. “उच्च मूल्य पण कमी उत्पादन” या रचनेवर उभी असलेली कोकणातील अर्थव्यवस्था हवामानातील एका गंभीर धक्क्याने डळमळीत होऊ शकते. उदाहरणार्थ, फयान (२००९) आणि निसर्ग (२०२०) यांसारख्या चक्रीवादळांनी कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात झाडे, बागायती क्षेत्रे आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ एका हंगामाचेच नव्हे तर पुढील अनेक वर्षांचे उत्पादनही बाधित होते, कारण आंबा आणि काजू यांसारख्या झाडाधारित पिकांना पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे केवळ आकडेवारीतील वाढ किंवा निर्यातीचे प्रमाण हा विकासाचा मापदंड ठरू शकत नाही; केवळ आकड्यांचा खेळ करून वास्तव झाकता येणार नाही.
या पार्श्वभूमीवर ही काळाची गरज आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप कृषी नियोजन, संशोधन–शेतकरी संवाद, तंत्रज्ञान हस्तांतरण, पिकविविधीकरण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, आणि पारदर्शक पुरवठा साखळी यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. शेती ही केवळ उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय नाही; ती माती, पाणी, जैवविविधता, वनसंपदा आणि ग्रामीण समाजजीवन यांची एक गुंतागुंतीची परिसंस्था आहे. त्यामुळे निर्णय घेताना आर्थिक नफा आणि पर्यावरणीय समतोल या दोन्हींचा समन्वय साधणे अत्यावश्यक आहे.
निष्कर्ष: वास्तव स्वीकारून बदलाची सुरुवात
समस्या स्पष्ट आहे - उत्पादनातील अस्थिरता, वाढता खर्च, मर्यादित नफा आणि हवामान जोखीम. पण उपायही शक्य आहेत - सहकार्यात्मक मॉडेल, समुदाय आधारित शेती, संशोधनाधारित मार्गदर्शन, मूल्यवर्धन आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापन. यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती, परस्पर विश्वास आणि स्थानिक वास्तवाला केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन. सरकार, संशोधन संस्था, बाजार घटक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकरी—हे सर्व घटक एकत्र आले, तर कोकणातील शेती केवळ टिकणारच नाही तर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होऊ शकते.
आज घेतलेले निर्णय उद्याचा कोकण घडवतील. जर कोकणाची शेती वाचवायची असेल, तर चर्चा पुरेशी नाही - आत्ताच ठोस, समन्वित आणि दूरदृष्टीपूर्ण कृती करणे आवश्यक आहे.
चारुहास दळी चेक रिपब्लिकच्या मेंडेल विद्यापीठात संशोधक आहेत.