India

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीमुळे सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या मुस्कटदाबीनं प्रश्न चिघळण्याची शक्यता.

Credit : बेळगाव न्यूज

महाराष्ट्र  आणि कर्नाटक सीमावादावरून सध्या रान पेटलं आहे. मराठी एकीकरण समिती आणि शिवसेना या प्रश्नावरून नेहमी आक्रमक होत आलेली आहे. नुकताच 'तान्हाजी' चित्रपटाला कन्नड एकीकरणं समितिने विरोध दर्शवून तानाजीचे शोज बंद पाडले होते. त्यावेळीही वाद चिघळला होता पण पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. बेळगाव आणि सीमा भागात १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रातले नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच महामार्गावर तपासणी सुरू केली होती. 

मात्र कर्नाटक राज्य परिवहनाच्या बसमधून कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना तेथेच रोखण्यात आलं.  त्यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली. कहर म्हणजे पाटील यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखून दडपशाहीचे दर्शन पुन्हा एकदा घडवले. अभिवादन स्थळापासून दहा फुटांवर पोलिसांनी यड्रावकर यांना हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करण्यात आला. यावेळी मंत्र्यांचे सहकारी, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पोलिसांनी यड्रावकर यांना एका खासगी वाहनातून पोलिस आयुक्तालयाकडे नेले. तेथून त्यांना कोगनोळीजवळ महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्यात आले.

 

नेमकं प्रकरण काय ?

बेळगाव, कारवार, भालकी,बिदर, संतपूर आणि निपाणी सह सयुंक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. १७ जानेवारी १९५६ रोजी पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांनी हौतात्म्य पत्करले होते. निपाणी येथे कमलाबाई मोहिते, बेळगाव येथे पैलवान मारुती बेन्नाळकर आणि अन्य तिघांनी हौतात्म्य पत्करले. हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. शुक्रवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यड्रावकर हेही येणार असल्याची कुणकुण पोलिस खात्याला लागली होती. 

त्यामुळे अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सीमेवर, कोगनोळी येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे यड्रावकर यांनी गनिमी काव्याने बसमधून प्रवास करून बेळगाव गाठले. नंतर हुतात्मा चौकात ते रिक्षाने दाखल झाले. पोलिसांना चकवा देऊन यड्रावकर हुतात्मा चौकात आल्याचे समजताच पोलिस संतप्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी त्यांच्याभोवती गराडा घालत त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासूनही रोखले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही संताप व्यक्त केला. यड्रावकर यांना खासगी वाहनात घालून पोलिसांनी सुरुवातीला पोलिस आयुक्तालय आणि तेथून कोगनोळीजवळ सोडले. या संतापजनक प्रकाराचा मराठी भाषिकांनी ठिकठिकाणी तीव्र शब्दांत निषेध केला.  

 

कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

बेळगावात आल्यानंतर अटक करू, असे कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी म्हटले होते, तर आपल्याला अटक करून दाखवा, असे आव्हान खा. संजय राऊत यांनी कर्नाटक प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मी भारताचा नागरिक आहे, बेळगावात जाणार आणि तेथील लोकांशी बोलणार,’ असा निर्धार संजय राऊत यांनी केला होता. येथील गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत झाली. बेळगावमध्ये संजय राऊत यांनी बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटनहि केले.

काही दिवसांपूर्वी, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागाचा उल्लेख "कर्नाटक-व्याप्त महाराष्ट्र" असा केला होता. "नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे केंद्र सरकार परदेशातून येणाऱ्या हिंदूंचा विचार करत आहे. मग बेळगावात हिंदू राहात नाहीत का? बेळगाव, कारवार, निपाणीच्या हिंदूंच्या प्रश्नांचं काय, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला होता. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं," असं ते म्हणाले होते. यावरूनहि कर्नाटक सरकारने आगपाखड करत महाराष्ट्र सरकार वर ताशेरे ओढले होते.