India

मुळशी तालुक्यातील रासायनिक कंपनीत आग, १८ कामगारांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

या कंपनीत सोमवारी ३७ कामगार काम करत होते.

Credit : Indie Journal

मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस ऍक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. ७) दुपारी घडली. अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत १५ ते २० कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचं काम सुरु होतं. 

या कंपनीत सोमवारी ३७ कामगार काम करत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं. या परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट निघत असून चार किलोमीटर पासून हे धुराचे लोट दिसत होते.

“अग्निशमन विभागाला माहिती मिळताच पीएमआरडीएचे सहा आणि एमआयडीसीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. दरम्यान सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून घटनेत १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे,”  पुणे अग्निशमन विभागाचे निलेश महाजन म्हणाले.

कंपनीत अडकलेल्या कामगारांमध्ये काही महिला कामगार देखील आहेत. आग विझली असून कुलिंगचं काम सुरू आहे. आगीचं नक्की कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.