India

मुंबईतील अपघातांनंतर पुण्यात आकाशचिन्हांवर कारवाई सुरु

गेल्या २ दिवसांत पुणे शहरातील एकूण १५६४ अनधिकृत होर्डंग्ज पाडण्यात आले आहेत.

Credit : इंडी जर्नल

 

वैष्णवी दाणीमुंबईत सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यात आकाशचिन्ह (होर्डिंग) कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेनं शहरातील आकाशचिन्हांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील सर्वच आकाशचिन्हांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. फक्त गेल्या २ दिवसांत पुणे शहरातील एकूण १५६४ अनधिकृत होर्डंग्ज पाडण्यात आले आहेत.

सोमवारी (दिनांक १३ मे रोजी) मुंबईत वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे घाटकोपर भागात एक महाकाय आकाशचिन्ह कोसळून त्याच्याखाली दबून १४ जणांचा मृत्यू झाला तसंच ७५ जण जखमी झाले. शहरांमधील मोठी आकाशचिन्हं हा बऱ्याच काळापासून वादाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा राहिला आहे. मुंबईसारखी दुर्घटना होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिका आता सतर्क झाल्याचं दिसत आहे.

“पुणे शहरात एकूण २५०० होर्डिंग्ज आहेत. या सर्व होर्डिंग्जची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. यातील जे होर्डिंग अनधिकृत असल्याचं आढळेल, ते पाडून त्याचे परवाने रद्द करण्यात येणार आहे,” पुणे महानगरपालिकेचे परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले.

त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्ज पाडले जाऊन त्यावर गुन्हादेखील दाखल होणार असल्याचं ते म्हणाले. महापालिकेनुसार पुण्यातील २५०० आकाशचिन्हांपैकी २३००चं सर्वेक्षण झालं आहे.

मुंबईच्या दुर्घटनेनंतरच पुण्यातील होर्डिंगविरोधी कारवाई सुरु केली हा, असं विचारलं असता जगताप यांनी सांगितलं, “पुणे महानगरपालिका ही प्रक्रिया राबवतच असते, परंतु निवडणुकीमुळं कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं, हे काम बंद होतं. इथून पुढंदेखील हे काम सतत चालू राहणार आहे.”

पुण्यातदेखील याआधी मोठी होर्डिंग्स रस्त्यांवर कोसळून दुर्घटना घडलेल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये मंगळवार पेठ भागात एक मोठं होर्डींग पडून त्याखाली रस्त्यावर सिग्नलला थांबलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर १० जण जखमी झाले होते. एप्रिल २०२३ मध्ये पिंपरी चिंचवडमध्येदेखील होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांना जीव गमवावा लागला होता तर ३ लोक जखमी झाले होते. २०२० मध्ये पहिल्या कोव्हीड लॉकडाऊनदरम्यान शिवाजीनगरमध्ये एक मोठं होर्डिंग कोसळलं होतं. मात्र फक्त लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणीही नसल्यानं त्यावेळी जीवितहानी टळली. अनेकदा अशा दुर्घटना समोर आल्यावरच अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होताना दिसते.