Quick Reads

फलसफी: तत्त्वज्ञानाच्या पाच पूर्वअटी

तत्त्वज्ञान विशिष्ट ऐतिहासिक सांस्कृतिक परिस्थितीत जन्माला येतं

Credit : Verso Books

तत्त्वज्ञानाचं उद्धिष्ट, चर्चा आणि दिशानिर्देश यांच्यातील संबंधाची चर्चा करताना बाद्यु तत्त्वज्ञानाच्या पाच पूर्वअटींबद्दल भाष्य करतो. बाद्युच्या मते तत्त्वज्ञान हे ऐतिहासिकरित्या अस्तित्वात असतं. ते ऐतिहासिकरित्या सुरू होतं आणि ते विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट संस्कृतीमध्ये जन्माला येत. तत्त्वज्ञान विशिष्ट ऐतिहासिक सांस्कृतिक परिस्थितीत जन्माला येण्याचं सोपं कारण म्हणजे त्या समाजात तत्त्वज्ञानासाठी गरजेच्या असण्याऱ्या पाच गोष्टी अस्तित्वात असतात म्हणून. उदाहरणार्थ ई.स पुर्व ६व्या शतकात योगायोगाने या पाच परिस्थिती ग्रीसमध्ये उपलब्ध होत्या म्हणून ग्रीक तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली असे बाद्यु म्हणतो. तर या पाच परिस्थिती कोणत्या ते आपण इथे आज पाहणार आहोत.

बाद्युसाठी तत्त्वज्ञान प्रथमतः चर्चा आहे, विधान आहे, नव्या विधानाबाबतच विधान आहे, अनेकविध प्रश्नांबाबतची बौद्धिक नाविन्यता आहे. पण या सगळ्यात तत्त्वज्ञान एक गोष्ट काटेकोरपणे, अगदी कायदेशीर एका गोष्टीचे पालन करते, आणि ही सामाईक गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञानातील प्रत्येक विधानाचे इतरांकडून परीक्षण केले जाणे. या अर्थाने तत्त्वज्ञान संवाद आहे, तत्त्वज्ञान चर्चा आहे. जेंव्हा तत्त्ववेत्ता लिहीत असतो, बोलत असतो तेंव्हा त्याला एक गोष्ट ज्ञात असते की तो जे बोलेल, जे लिहील, त्या गोष्टींबाबत इतर लोक चर्चा करणार आहेत, त्या गोष्टींबाबत इतर तत्त्ववेत्ते चर्चा करणार आहेत आणि शेवटी सर्वच लोक जे पुस्तक वाचतात आणि जे तत्त्ववेत्त्याला भिडतात, ते सर्वच त्याच्या विचारांची चर्चा करणार आहेत. या घडणाऱ्या चर्चेला जबाबदार तत्त्ववेत्ता नसतो, कारण तत्त्ववेत्ता हा राजा नसतो, तो पुजारी सुद्धा नसतो किंवा तो प्रेषितही नसतो.याचाच अर्थ असा की तत्त्ववेत्त्याची विशेषतः किंवा त्याच्या स्थानाची परिपूर्ण विलक्षणता याद्वारे तत्त्ववेत्ता त्याच्या चर्चेचा जबाबदार बनत नाही. तत्त्ववेत्त्यांची चर्चा ही समाजातील कोणत्याही पवित्र ठिकाणाहून सुरूही होत नाही. तत्त्ववेत्ता काही सत्य ही बोलत असेल पण आपण हे सत्य फक्त तत्त्ववेत्ता जे बोलला आहे, जे लिहलं आहे, त्याबद्दलच्या संवादातून जाणू शकतो, ना की तत्त्ववेत्ता हा 'तत्त्ववेत्ता' आहे म्हणून.

काही तत्त्ववेत्ते स्वतःचे तत्त्वज्ञानातील स्थान वापरतात आणि यामधून काही तरी वेगळेच निर्माण करतात पण बाद्युसाठी स्वतःच्या अधिकाराचा अस वापर करणे हे तत्त्वज्ञानाच्या गाभ्यात बसत नाही. आणि म्हणून तत्त्वज्ञान हे नेहमीच चर्चेद्वारे व्याखित केले आहे आणि म्हणून प्लेटोच्या तत्त्वज्ञानात चर्चा ही तत्त्वज्ञानाचं रास्त स्वरूप म्हणून मान्य केली गेली आहे. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात संवाद अथवा चर्चा ही पुरावा अथवा प्रमाण म्हणून वापरली आहे - प्रमाण, जी असत्य असतात, जी काही प्रमाणात योजलेली आहेत, प्रमाण जे सैद्धांतिक स्वरूपाचे आहेत पण हे सर्व प्रमाण असतात. आणि हे संवाद सुध्दा प्रमाण आहेत की तत्त्वज्ञान हे संवादासाठी जाहीर केले गेले आहे, तत्त्वज्ञानात जे काही व्यक्त केलं जातं ते सर्व संवादासाठी खुले आहे. 

तत्त्वज्ञानाच्या या संवादात्मक धारणेमुळे तत्त्वज्ञान सत्याबाबत पुर्णतः वेगळी भूमिका घेते. तत्त्वज्ञानातील सत्य हे वर्चस्वाच्या भूमिकेतून किंवा स्थानातून निश्चित होत नसते, उदाहरणार्थ, तत्त्वज्ञानातील सत्य हे राजा, पुजारी, प्रेषित अथवा दस्तुरखुद्द ईश्वर म्हणतो म्हणून सत्य नसते तर तत्त्वज्ञानातील सत्य हे संवादातून किंवा चर्चेमधून निर्मिती होत असते. तत्त्वज्ञान तत्त्वतः अशी महत्वकांक्षा आहे जी ईश्वराच्या अस्तित्वाव्यतिरिक्त सत्य जाहीर करते. दुसऱ्या बाजूला आपण हे पाहतो की प्रेषित सत्य बोलू शकतो कारण तो ईश्वराचा अर्थ लावणारा आहे म्हणून, राजा बोलू शकतो कारण त्याच्याकडे बोलण्याची शक्ती आहे म्हणून, पुजारी बोलतो कारण तो धार्मिक प्रतिनिधी आहे म्हणून पण तत्त्ववेत्ता बोलतो कारण तो जे बोलतो त्याबाबतचा वाद अथवा युक्तिवाद निर्माण करू शकतो म्हणून. आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो की, तत्त्वज्ञान हे विचार करण्याचा मुक्त निश्चय आहे, तत्त्वज्ञान हे सामाजिक परिपेक्षांतून विचार करण्याचा मुक्त निश्चय आहे.

बाद्यु असे जाहीर करतात की, प्रत्येक व्यक्ती तत्त्ववेत्ता बनू शकतो! अर्थात हे नैसर्गिक तथ्य नाही पण ही एक शक्यता आहे तत्त्वज्ञानाच्या व्याख्येच्या मुळात आहे. प्रत्येक व्यक्ती तत्त्ववेत्ता बनू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती तत्त्ववेत्त्याशी संवाद करू शकतो. तत्त्वज्ञानाची ही शक्यता पुन्हा आपण प्लेटोच्या तत्त्वज्ञानात पाहू शकतो: आपणास माहीत आहेच की सॉक्रेटिस सर्वांशी संवाद करतो. आणि म्हणून तत्त्वज्ञान हे विचारांचा मुक्त निश्चय आहे कारण तत्त्ववेत्त्याचे स्थान हे समाजाने विहित करून दिलेले नसते, त्याचसोबत या संवादाचे मुल्य हे तत्त्ववेत्त्याच्या सामाजिक स्थानानेसुध्दा विहित नसते, तर हे मुल्य फक्त या संवादाच्या अंतर्गत मुल्यातून निहित होत असते. 

हे संवादात्मक मुल्य फक्त वर्तमानापुरते मर्यादित नसते तर  हे भविष्यातील संवादासाठी सुध्दा लागू पडते, अगदी त्या तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाचा नवा अर्थ लावल्या नंतर ही लागू पडते. प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो ही धारणा तत्त्वज्ञानात्मक विचारांचा अधिकार आहे. आणि याच सोबत प्रत्येक व्यक्ती नाकारू ही शकतो आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाच्या जन्मासाठीची पहिली परिस्थिती म्हणजे लोकशाही होय! पण इथे लोकशाहीचा अर्थ बृहद अर्थाने घ्यावयाचा आहे: प्रत्येक व्यक्ती हा इतर सर्वांनी जे म्हटले आहे ते नाकारू शकतो.

आपणाला सर्वांना कल्पना आहे की समाजाच्या इतर कोणत्याही स्वरूपात प्रत्येकाला काही एक नाकारण्याचा अधिकार नसतो. बहुतांश समाजात लोक  त्यांच्या राजाच्या विधानाला नाकारू शकत नाहीत किंवा त्यांच्या हुकूमशाहाच्या विधानाला नाकारू शकत नाहीत आणि साहजिकच बहुतांश समाजात कोणतीही व्यक्ती धार्मिक प्रभुत्वाला नाकारू शकत नाही. जर ईश्वर हा समाजाच्या कायदा असेल तर साहजिकच तो जे म्हणतो त्या गोष्टींना कुणी नाकारणार नाही. जर ईश्वर आहे, तर त्याला कोणी कसे नाकारू शकते? ईश्वराच्या शब्दाबाबत त्याच्या वर्चस्वाबाबत आपण कशी चर्चा करू शकतो? आणि म्हणून ईश्वर जे म्हणतो तेच सत्य असते आणि हे सत्य चर्चेसाठी जाहीर केलेले नसते. तत्त्वज्ञानात्मक सत्यापन हे पुर्णतः नवीन असते आणि म्हणून तत्त्वज्ञानाची पहिली अट ही सुद्धा सत्याचा नवीन अर्थ आहे.

तत्त्वज्ञानात्मक सत्य हे त्याच्या व्याख्येनुसार खंडणाचा प्रतिकार करून, आक्षेपांचा प्रतिकार करून निर्माण होत असते. आणि अशा प्रकारची नकारात्मक व्याख्या ही तत्त्वज्ञानाच्या मुळाशी आहे. तत्त्वज्ञानाच्या सत्याबाबत ची ही व्याख्या सकारात्मक नाही जसे की हे सत्य आहे कारण ईश्वराने सांगितले आहे म्हणून, हे सत्य आहे कारण पुजाऱ्याने संगितले आहे म्हणून किंवा प्रेषितांने सांगितले आहे म्हणून हे सत्य आहे, या उलट तत्त्वज्ञानाची व्याख्या ही नकारात्मक व्याख्येतुन येते कारण तत्त्वज्ञान हे तेंव्हाच सत्य असते जेंव्हा ते चर्चेच्या प्रक्रियेत खंडणाचा प्रतिकार करते - हे नकारात्मक समर्थन हे सत्याचे प्रमान आहे, हुकमत नाही. आणि म्हणूनच सत्य हे तथ्य नसून सत्य हे परिणाम आहे, चर्चेच्या अनुभवातून निर्माण होणारा परिणाम. 

या अनुषंगाने आपण असे म्हणू शकतो की तत्त्वज्ञानात एक सामुहिक आयाम असतो कारण तत्त्वज्ञान हे चर्चेतून निर्माण झालेला निर्णय असतो ना की सत्ते समोरील अथवा ईश्वरा समोरील सामूहिक शरणागतीमधून निर्माण होणारे सत्य नाही. आपणास ज्ञात आहेच की अभिजात आधिभौतिकशास्त्र ईश्वराच्या अस्तित्वासंदर्भात पुरावे देण्याचा सिद्धांत मांडते, पण हे पुरावे ईश्वराच्या वाणीद्वारे सिध्द होत नसतात तर हे पुरावे सुध्दा तत्त्वज्ञानाच्या विवेकीय साधनांद्वारे सिध्द होत असतात. याद्वारे आपण असे म्हणू शकतो, की ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील मुक्त तत्त्वज्ञानात्मक विचारांचा घटक मात्र आहे, तत्त्वज्ञानात ईश्वराचे अस्तित्व सुध्दा चर्चेसाठी खुले आहे, तसेच त्याचे अस्तित्व सत्तेद्वारे लादलेले नाही किंवा त्याच्या प्रकटीकरणाद्वारे सिद्ध झालेले नाही आणि ना ही कोणत्या पवित्र पुस्तकाद्वारे सिद्ध केले गेले आहे.

थोडक्यता तत्त्वज्ञान हे पवित्र स्थानाच्या व पवित्र ग्रंथाच्या अभावामुळे शक्य असते आणि म्हणून तत्त्वज्ञान हा वाद आहे. म्हणूनच बृहद अर्थाने लोकशाही ही तत्त्वज्ञानाची पहिली अट आहे. जर सत्य कोणत्याही प्रकारच्या सत्तेपासून मुक्त नसेल तर अशा परिस्थितीत तत्त्वज्ञान निर्माण होत नाही अथवा तत्त्वज्ञानाची सुरवात देखील होत नाही. सत्याचे सत्तेवर अवलंबून असणे हे तत्त्वज्ञानात वर्जित आहे. आणि म्हणून बाद्यु लोकशाहीला (निवडणूकी द्वारे राज्यसंस्थेचे व्यवस्थापन करणारी संस्था इतक्याच अर्थाने नव्हे) म्हणजेच सत्य आणि सत्ता यांच्या मधील वियोगाला लोकशाही म्हणतो जी तत्त्वज्ञानाची पहिली अट आहे. तत्त्वज्ञानात सत्य आणि सत्ते कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. तत्त्वज्ञान हे लोकशाहीक संदर्भात जन्माला येऊ शकते आणि म्हणूनच लोकशाही ही तत्त्वज्ञानाची पहिली अट आहे. 

तत्त्वज्ञानाची दुसरी अट पहिल्या अटीसारखी मुक्त नाही. हे विचारांचे स्वातंत्र्य, मुळात विचारांच्या समान कायद्याचे अस्तित्व मान्य करते. तत्त्वज्ञानाची पहिली अट जर स्वातंत्र्याच्या बाजूची आहे तर तत्त्वज्ञानाची दुसरी अट जिच्यामुळे युक्तिवादाची, पुराव्याची  शक्यता निर्माण होते तर ही दुसरी अट कायद्याकडे वळलेली आहे, विशेषतः सामुहिक कायद्याकडे वळलेली आहे. बाद्युच्या मते कोणत्याही समान कायद्याच्या अस्तित्वात शिवाय तत्त्वज्ञानाच्या विधानाबाबत तत्त्ववेत्ता आणि त्याच्यासोबत संभाषणात भाग घेणाऱ्यांना चर्चा करणे शक्य नाही , म्हणजेच चर्चा म्हणजे काय अथवा विवेकात्म चर्चा म्हणजे काय, याबाबत एक विशिष्ट कायदा असणे गरजेचे आहे. साहजिकच कोणताही व्यक्ती तत्त्ववेत्त्याला प्रतिउत्तर देतांना असे म्हणू शकतो की तत्त्ववेत्ता जे म्हणत आहे ते सत्य नाही, पण हा व्यक्ती कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद न करता तत्त्ववेत्त्याची भूमिका अमान्य करत असेल तर याला चर्चा म्हणता येत नाही. जर चर्चा नावाची गोष्ट अस्तित्वात असेल तर त्याच सोबत विचारांचा समान कायदा अस्तित्वात असणं गरजेचं असत जो चर्चेला साजेशा असेल. या समान कायद्याद्वारेच आपण शांतीपुर्वक चर्चा घडवू शकतो.

तर एका बाजुला आपण पाहतो की विचारांचे संपुर्ण स्वातंत्र्य आहे जिथे कोणतेही भितीदायक स्थान नाही, जिथे सर्वजण बोलू शकतात, जिथे सर्वच लोक प्रश्न करू शकतात ही परिस्थिती तत्त्वज्ञानाची पहिली अट आहे.पण या नंतर तत्त्वज्ञानाला एक समान कायदा ही लागतो आणि तो म्हणजे विवेकशिलता आणि तर्क होय. म्हणून आपण असे म्हणू शकतो की विवेकात्म चर्चा जेंव्हा एक समान तार्किक चौकट अथवा समान तर्क अस्तित्वात असते तेंव्हाच घडते. आणि हे घडण्याचं कारण म्हणजे युक्तिवाद हा काही विधानांच्या परिणामातून निर्माण होत असतो जसे की आपण पहिल्यांदा काही जाहीर करतो आणि त्यानंतर आपण दुसरे काही तरी जाहीर करतो, आणि हे जे दुसरे जे जाहीर केले आहे ते पहिल्याचा  परिणाम आहे. 

तर इथे प्रश्न निर्माण होतो, की आपण सकारात्मक विधानांवरून दुसऱ्या विधानाला परिणाम कसे म्हणू शकतो? हे फक्त एखादया तार्किक कायद्यामुळे शक्य होते आणि हा तार्किक कायदा हा दुसरे विधान हा पहिल्याचा परिणाम आहे याचा पुरावा असतो. म्हणजेच जर आपण एखाद्या व्यक्तीला  अ १ या विधानांपासून अ २ या विधानापर्यंत पोहचायला सांगितले या दोन विधानांनमध्ये एक विवेकात्म रस्ता व विवेकात्म संक्रमण असले पाहिजे व त्याच सोबत आपण हे ग्राह्य धरले पाहिजे की समोरच्या व्यक्तीमधील विवेकाची संकल्पना/धारणा ही आपल्या संकल्पने सारखीच असली पाहिजे. तत्त्वज्ञान हे नेहमीच परिपुर्ण स्वतंत्र आणि कायद्याची परिपुर्ण शक्ती या दोन विचित्र मिश्रणाने निर्माण होते, जर या पद्धतीचे द्वंदात्मक मिश्रण उपलब्ध नसेल तर तत्त्वज्ञानात्मक चर्चा ही घडू शकत नाही आणि तत्त्वज्ञान ही जन्माला येऊ शकत नाही. 

सांस्कृतिकदृष्टीने बोलायचं झाल्यास, इतिहासात पहिल्यांदा पुराव्याची संकल्पना आपणाला ग्रीसमध्ये आढळून येते. इथे पुरावा म्हणजे परिणामावरून खात्रीपूर्वक सत्य विधानास सत्य मानू शकतो या तर्काला पुरावा असे म्हणतात. बाद्युच्या मते हा पुराव्याचा सिध्दांत गाणितीय आहे आणि विशेषतः प्रात्यक्षिक गणितीय सिध्दांत आहे. गणिताच्या उत्पत्तीचे पुरावे आपणास इतर पुरातन संस्कृतींमध्ये दिसतात परंतू प्रात्यक्षिकीय गणित हे ग्रीकांनी लावलेला शोध आहे. या आधारे बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञानाची पहिली अट लोकशाही आहे तर तत्त्वज्ञानाची दुसरी अट गणित आहे.

तत्त्वज्ञानाची तिसरी अट म्हणजे वैश्विकतेची शक्यता होय. वैश्विकता म्हणजे - सत्य विधान, त्याचे परिणाम त्याच्या बद्दलची चर्चा या सर्व गोष्टी जगातील सर्वांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय संबोधित असतात.  तत्त्वज्ञानाच्या वैश्विकतेच पहिलं उदाहरण आपणास प्लेटो च्या मेनो या संवादात आढळत. या संवादात सॉक्रेटिस एका गुलाम मुलाशी भूमितीय प्रश्नांबाबत संवाद साधून हे दाखवून देतो की मुलभूत संकल्पनांचे ज्ञान हे सर्वांना होऊ शकत. इथे हा गुलाम मुलगा अथेन्सचा नागरिक नाही किंवा त्याला माणुस म्हणून सुध्दा काही स्थान नाही, त्याचसोबत सॉक्रेटिसचा उद्देश गुलामगिरीचे उच्चाटन सुध्दा नाही. या अर्थाने सॉक्रेटिस आणि तो गुलाम मुलगा यांच्यात काही एक साम्य नाही पण दोघे ही माणुस आहेत आणि दोघेही विचार करू शकतात. 

ही घटना तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील पहिली घटना आहे, त्याचसोबत ही घटना सकारात्मक विधान आहे जे ठामपणे प्रतित करते कि विवेकात्म चर्चा या सर्वांना खुल्या आहेत अगदी गुलामांना सुध्दा! यालाच आपण तत्त्वज्ञानाची वैश्विकता म्हणू शकतो, व हा मेनोचा संवाद या वैश्विकतेचा ठोस पुरावा आहे. आणि म्हणून बाद्यु म्हणतो तत्त्वज्ञान हे सर्वांना संबोधित करते, तत्त्वज्ञान हे सर्वांसाठी आहे.

या अनुषंगाने जर तत्त्वज्ञानाची पहिली अट स्वातंत्र्य आहे तर तिसरी अट समानता आहे. इथे बाद्यु राजकिय किंवा सामाजिक समानतेच्या बद्दल बोलत नाही, साहजिकच या पद्धतीची समानता १९ व्या शतकात निर्माण झाली आहे पण विचारांच्या क्षेत्रात हा समानतेचा विचार नक्कीच  ग्रीस मध्ये अस्तित्वात होता आणि यालाच बाद्यु तत्त्वज्ञानात्मक समानता म्हणतो. सॉक्रेटिस ने मेनो मधील संवादातून हे दाखवून दिले आहे की तत्त्वज्ञानात्मक चर्चेत गुलाम सुध्दा माणसांच्या समान असतो आणि किमान या परिस्थितीत तो इतरांसारखा समान असतो.

बाद्युच्या मते तत्त्वज्ञानात्मक समानता ही दोन गोष्टींनी बनलेली आहे : एक म्हणजे सत्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे  साधारणपणे जगात माणुस म्हणून एक गोष्ट अस्तित्वात असते आणि हे मनुष्यत्व आपण गरीब, श्रीमंत, गुलाम अथवा राजा इत्यादी मध्ये घटित करू शकत नाही.सत्य सुध्दा आपण विशिष्टामध्ये घटित करू शकत नाही म्हणजे सत्य हे सर्वांसाठी असते. म्हणजेच सत्यासमोर सर्वच समान आहेत, अगदी गुलामांना सुध्दा सत्याचा अधिकार आहे. हे जे कोणत्याही विशिष्टामध्ये घटित होऊ शकत नाही, हे जे प्रत्येक माणसात अस्तित्वात आहे ती गोष्ट संपुर्ण मनुष्यजातीचा सामान्य घटक आहे. बाद्यु म्हणतो तत्त्वज्ञानात्मक संकल्पना असे म्हणते की हा सर्वसामान्य घटक प्रत्येक माणसात असतो, हा सर्वसामान्य घटक त्यांच्या सर्व विशिष्टाचा अपवाद असतो. हे सकारात्मक विधान मुळातच वैश्विक आहे आणि म्हणून तत्त्वज्ञान वैश्विक आहे. जोपर्यंत आपणाला सर्व मनुष्यमात्रांमध्ये समान काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत तत्त्वज्ञान निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून वैश्विकता व समानता या तत्त्वज्ञानाच्या तिसरी अट आहे.

बाद्युसाठी वैश्विकता ही तत्त्वज्ञानाची पुर्वअट असण्याची दोन कारणे आहेत. यामधील पहिलं कारण म्हणजे जवळ जवळ सर्वच संस्कृत्यांमध्ये माणुस कुणाला म्हणावे याबाबत एकमत आहे. सर्वच संस्कृती असे जाहीर करतात की त्या संस्कृती मधील व्यक्तीच हा माणुस असतो इतर कोणत्याही संस्कृती मधील अथवा समाजातील मनुष्यांना माणुस म्हणूनचा दर्जा देण्यात येत नाही.

तत्त्वज्ञानात्मकदृष्टीने ही गोष्ट खरी नाही. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आपण जाहीरपणे मान्य केलं पाहिजे की विचारांच्या क्षेत्रात सर्वच माणसे समान असतात. आणि म्हणूनच तत्त्वज्ञानात संस्कृतीमध्ये घटित करण्याजोगी गोष्ट नसते, तत्त्वज्ञान या अनुषंगाने काही प्रमाणात प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या पलीकडे असते. आणि पुन्हा हा विचार आपणास प्लेटो मधेच आढळतो आणि तो म्हणजे तत्त्वज्ञान तरुणांना भ्रष्ट करते.

तत्त्वज्ञान तरुणांना भ्रष्ट करते कारण: तत्त्वज्ञानात एक संकल्पना अंतर्भूत आहे जी हे मान्य करते की कोणत्याही समाजाच्या अथवा संस्कृतीच्या कायद्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा विचार संस्कृती चा नकार नाही किंवा विशिष्टा चा सुध्दा नकार नाही, तर हा विचार फक्त सकार आहे जो इतकंच जाहीर करतो की विशिष्ट संस्कृती आणि समाजापेक्षा देखील काहीतरी महत्त्वाचे अस्तित्वात असते. आणि हे जे काही महत्त्वाचे आहे ते म्हणजे नवी समानता होय: ही माणसा- माणसांनमधील समानता आहे, ही समानता फक्त एका विशिष्ट देशातील नागरिकांपुरती समानता नाही, ही समानता सर्वच मनुष्यामधील परिपूर्ण समानतेचा सकार आहे, ही समानता स्व (subject) मधील समानता आहे. आणि म्हणून बाद्यु म्हणतो तत्त्वज्ञान सत्य आणि 'स्व' शिवाय अशक्य आहे, या दोन सहसंबंधी संकल्पना तत्त्वज्ञानाची तिसरी अट आहेत.

क्रमशः