Opinion

आपण मोर्चे का काढतो?

जनसमूह माणूस म्हणून विवेकी असतो पण वैचारीक विवेकाचा मात्र कोणत्याही जनसमूहात अभावच असतो.

Credit : Indie Journal

 

काल दिवसभर मराठी चर्चाविश्वात मोर्चा आणि त्यावर कुस्तीकपणे भाष्य करणाऱ्या 'कवयत्री'  बद्दल' बरीच चर्चा झालीय. मला या चर्चेत पडून अजून त्या व्यक्तीला प्रसिद्धी द्यायची इच्छा नाहीं. मला मोर्चा या संकल्पने बद्दल बोलायच आहे.

उपोषण, सत्याग्रह, उठाव, क्रांती इत्यादी प्रमाणेच मोर्चा हा विरोध दर्शवण्यााठी वापरण्यात येणार राजकिय साधन आहे. एक ठराविक ठिकाणा पासून इच्छित ठिकाणा पर्यंत विशिष्ठ राजकिय उद्देशाने मिलिटरी शिस्ती नुसार चालणे म्हणजे मोर्चा. यात तुम्ही अगदी येशूचे जेरुसलेम पर्यंत चालत जाण्यापासुन ते अगदी मराठा क्रांती मोर्चा पर्यंतचे मोर्चे उदाहरण म्हणून घेऊ शकता.

मोर्चाचा उद्देश वेगवेगळा असु शकतो, एखाद्या घटनेचा निषेध म्हणून काढलेला मोर्चा, एखाद्या गोष्टीचा विरोध म्हणून रस्त्यावर एकत्रित आलेला जनसमूह, न्याय मिळवण्यासाठी काढलेला मोर्चा, अथवा मुक्ती च्या उद्देशाने काढलेला मोर्चा उदाहरणार्थ लाँग मार्च.

अर्थात मोर्चा हे साधन (means) आहे साध्य नाही (end). मोर्चा जर साधन आहे तर उद्देश काहीतरी वेगळा असणार. हा उद्देश तात्कालिक असू शकतो किंवा दीर्घकालीन असु शकतो. उद्देश नागरी सुविधा मिळत नाहीत म्हणून काढलेला मोर्चा असेल अथवा माणसाच्या संपूर्ण मुक्तीसाठी क्रांतीच्या उद्देशाने काढेलाला मोर्चा असेल. 

मोर्चाचा उद्देश असेल तर त्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा देखील असेल, ही प्रेरणा कदाचीत भावनीक असेल, अर्धवट जाणीवेवर आधारित असेल, गरजेवर आधारित असेल किंवा विवेकी असेल.  प्रेरणा ही उस्फुर्तपणे ठरू शकते अथवा मोर्चाचा आयोजक, पक्ष, संघटना इत्यादी घटक ही प्रेरणा ठरवतात. 

उस्फुर्त अथवा तात्कालिक उद्देश म्हणजे नळाला चार दिवस पाणी नाही आले म्हणून नगरपालिकेवर काढलेला मोर्चा अथवा स्त्रीवर रेप झाला अथवा व्यक्तीची हत्या करण्यात आली म्हणून काढण्यात आलेला मोर्चा. अशा मोर्चा काळ, उद्देश हा तात्कालिक आहे. लोकांना विरोध दर्शवायचा आहे म्हणून लोकं मोर्चात सामील होतात. अर्थात न्यायाची अपेक्षा देखील असते पण न्याय ही दीर्घकालीन गोष्ट आहे आणि त्या साठी एक मोर्चा पुरेसा नसतो. त्यासाठी चळवळ आवश्यक असते. 

उस्फुर्तता तात्कालिक असली तरीही लोकं प्रेरित होताना वैश्विक भुमिका घेऊनच प्रेरित होतात. म्हणजे 'क्ष' या परिस्थितीत 'य' या व्यक्तीवर अथवा समाजावर अन्याय होत असेल अथवा जे 'य चं आहे ते नाकारलं गेलं असेल तर मी या विरोधात 'य' च्या हक्कासाठी, समर्थनात रस्त्यावर उतरले पाहिजे. आणि माझ्या जागी दुसर कोणी असतं तरीही त्याने हेच करण अपेक्षित आहे. इथे मोर्चाचं आयुष्य फारतर दोन-चार दिवसाचं आहे, पण उद्देश उस्फुर्त असला तरीही तो विवेकी आहे आणि वैश्विक आहे. ही उस्फुर्त जाणिव कांटच्या पहिल्या सोपाधिक आदेशा जवळ जाणारी असते. "Act only according to that maxim whereby you can at the same time will that it should become a universal law" (Kant, 1785, p. 30). म्हणजेच मोर्चात सामील होणारी व्यक्ती, बघताय काय सामील व्हा अशी घोषणा देत लोकांना अपील करते तेंव्हां ते नुसत अपील नसत तर लोकांना सांगण्याची पद्धत असते की मी जे करतोय ते न्यायी आहे, विवेकी आहे आणि तुम्ही देखील माणूस म्हणून या मोर्चात सहभागी व्हा कारण मी जे करतोय ते तुम्हाला देखील लागू पडत. 

या प्रकारच्या मोर्चात प्रत्येक समाजातील शून्याहूनही उणे असे लोकं, ज्यांच्या हक्क नाकारला आहे त्यांच्या न्यायासाठी काढलेला मोर्चा देखील येईल नाहीतर, अत्याचार विरोधात काढलेला मोर्चा देखील येईल किंवा अरब स्प्रिंग, जस्मिन क्रांतीत सहभागी झालेला जनसमूह नाही तर थोडं इतिहासात मागे जायचं असेल तर १९४२चा चले जाव लढा इत्यादी मोर्चे यात येऊ शकतात. 

दुसऱ्या प्रकारचा मोर्चा आणि त्याचा उद्देश, प्रेरणा ही आयोजकाने ठरवलेली असते. ही प्रेरणा, उद्देश नक्कीच विवेकी देखील असतो आणि वैश्विक देखील पण मोर्च्यात सहभागी झालेले सर्वच लोकं आणि आयोजकाचा उद्देश, प्रेरणा यामधे समानता असते का हा प्रश्न इथे फार महत्त्वाचा आहे. आयोजक म्हणजे पक्ष, संघटन इत्यादी याची एक तार्किक रचना, स्पष्ट राजकीय भूमिका, विचारधारा, उद्दिष्ट आणि ध्येय असतं. या पक्षाने अथवा संघटनेने ठरवलेला मोर्चाचा जो उद्देश आहे तो विवेकाच्या आधारे पक्ष सदस्य आणि कार्यकर्त्याना लागू पडतो. कारण मोर्चाचा उद्देश विशिष्ठ विचारसरणी नुसार निर्धारित झालेला आहे आणि पक्ष सभासद, कार्यकर्ते या विचारसरणीचे पाईक असतात, त्याचं सोबत निर्णय कदाचीत लोकशाहीक असल्याने तो पक्ष सदस्यासाठी समान असू शकतो. 

 

जनसमूह माणूस म्हणून विवेकी असतो पण वैचारीक विवेकाचा मात्र कोणत्याही जनसमूहात अभावच असतो.

 

इथे मुद्दा येतो तो मोर्चात सहभागी झालेल्या जनसमूहाचा. हा जनसमूह माणूस म्हणून विवेकी असतो पण वैचारीक विवेकाचा मात्र कोणत्याही जनसमूहात अभावच असतो. कारण वैचारीक विवेक ही शिकवण्याची अथवा बिंबवण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी वैचारीक विवेक म्हणजे काय हे माहीत असले पाहिजे. हा वैचारीक विवेक शिकवणारे लोकं डावे देखील असु शकतात आणि उजवे देखील असु शकतात. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता लोकांची  वर्ग जाणीव प्रगल्भ करु शकतो त्याचप्रमाणे एखादा शाखेचा स्वयंसेवक लोकांची धर्म जाणिव विकसीत करु शकतो. येशूचे संदेश अपॉसल लोकांना सांगतात त्याचप्रमाणे बुध्द तत्वज्ञान शिकवण्याचं काम भिक्षुचं आहे. 

मुळात लोक जन्मतः जाणीव घेऊन जन्माला येत नाहीत त्यासाठी जाणीव प्रगल्भ असणारे लोकं लागतात. मोर्चात सहभागी होणारे लोकं हे विवेकी जाणिव प्रगल्भ असणारे पाहिजेत म्हणजेच ते स्वायत्त असले पाहिजेत. आयोजकांची जी भूमिका आहे ती लोकांनी विचारपूर्वक स्वीकारलेली पाहिजे. त्यासाठी आयोजकाने प्रबोधननाचे काम देखील केले पाहिजे. हे प्रबोधनाचे काम करणारे लोक बुद्धिजीवी असतील, विचारवंत असतील, धर्मप्रचारक, कार्यकर्ते देखील असू शकतात. 

स्वायत्त विवेकी जाणीव नसलेले लोक मोर्चात सहभागी असतील तर ते लोक आयोजकांचे साधन आहेत, आणि हेच अविवेकी लोक मोर्चादेखील साधन म्हणून पाहत आहेत. असा मोर्चा फारतर लोकांच्या स्वार्थी उद्देशाने प्रेरित असु शकतो किंवा आजोजकाच्या तात्कालिक उद्देशाने प्रेरित असेल म्हणजेच या मोर्चाचा उद्देश वैश्विक, मुक्तीदाई साध्य नाही आणि हा मोर्चा अश्या उद्देशाचे साधन देखील असु शकत नाही. 

माणूस म्हणून आपण in itself (स्वतःच) आणि for itself (स्वतःसाठी) असतो. In itself म्हणजे असणे (Is). आणि for itself म्हणजे ज्याची जाणीव कृतिशील आहे तो. A active being. A being which chooses his/her freedom consciously. आपण जातीत, वर्गात, लिंगात, वंशात, समूहात, अथवा प्रदेशात जन्माला येतो म्हणजे त्या विशिष्ठ कॅटेगरी मध्ये जन्मला आलोय म्हणजे आपणं फक्तं प्राणी आहोत याचा अर्थ असा नाही की त्या संकल्पनेची जाणीव मला आपोआप येते. जात/वर्ग/वंश/लिंग जाणिव आत्मसाथ करावी लागते, शिकावी-शिकवावी लागते. मी कामगार आहे म्हणून कामगारवर्गीय जाणिव आपोआप येईल ही चुकीची भुमिका आहे त्यासाठी एक तर Marx, Lenin वाचावा लागेल नाही तर एखाद्या कम्युनिस्ट व्यक्तीने मला ती जाणिव शिकवण गरजेचं आहे त्यानंतर कदाचीत मी वर्गीय जाणिव आत्मसाथ करून कम्युनिस्ट पक्षाचा घटक बनेल. तसेच नवं बौद्ध म्हणून जन्माला आल्याने मी अँटी कॉस्ट होऊ शकत नाही, प्रबुद्ध होऊ शकत नाही अथवा आंबेडकरवादी होऊ शकत नाही त्या साठी हे सगळ आत्मसाथ कराव लागेल अथवा कुणीतरी शिकवाव लागेल. 

बहुतांश मोर्चे हे in itself या प्रकारावर आधारित असतात. म्हणजे एखादा मोर्चा हा 'क्ष' या समूहाच्या न्यायासाठी आहे आणि 'य' हा व्यक्ती 'क्ष' समूहाचा आहे म्हणून मोर्चाच्या आयोजकाने 'य' या व्यक्तीला 'क्ष' साठीच्या मोर्चात सामील करून घेतलं तर आयोजक 'य' ला स्वभाववादाच्या दृष्टीने पाहत आहे. स्वभाववाद म्हणजे व्यक्तींची  जाणिव, धारणा, विचार हे जन्मतः येतात किंवा विशिष्ट समूहात जन्मल्यास व्यक्तीची धारणा व विचार जन्मतः निश्चित होतो. 

म्हणजे फक्तं 'य' हा 'क्ष' चा घटक आहे म्हणून तो मोर्चाचा घटक आहे, होऊ शकतो ही चुकीची भुमिका आहे. आयोजकांनी 'य' ला मोर्चाचा उद्देश, कारण, प्रेरणा समजून सांगितली पाहिजे जर 'य' ला ती धारणा पटली तर 'य' हा मोर्चाचा योग्य घटक होईल. असे घडले नसेल तर आयोजक 'य' सोबतच 'क्ष' या समूहाला स्वताच्या राजकिय स्वार्थाचे साधन म्हणून वापरत आहे आणि त्याचं सोबत या मोर्चाचा उद्देश देखील मुक्तिदाई व वैश्विक असु शकत नाही.

 

शेवटी मोर्चा कुणाचा असावा?

 

आजकाल woke ही एक नवीन कॅटेगरी आपणाला आढळते. Woke हे in itself देखील नसतात आणि for itself देखील नसतात हे मधोमध असतात म्हणजे यांची संपूर्ण जाणीव प्रगल्भ नसते पण थोडाफार सेन्स असतो. प्लेटो च्या अज्ञान आणि ज्ञान यामधे ज्यांच्या कडे मत (opinion)आहे असे लोकं. या लोकांचं प्रत्येक गोष्टी बद्दल एक मत असत त्यांच्या साठी ते योग्य देखील असत पण मत हे संपूर्ण ज्ञान नाही. म्हणजेच मोर्चाची absolute भुमिका अथवा उद्देश या woke व्यक्तीला माहीत नसेल पण त्या बद्दल त्याचं मत आहे म्हणून ती व्यक्ती मोर्चात सामील होत असेल तर ती भूमिका स्वायत्त नाही तात्कालिक आहे. मत उद्या बदलू शकतं आणि फारकत होऊ शकते. 

शेवटी मोर्चा कुणाचा असावा? तर उत्तर सोप आहे, मोर्च्यात सहभागी होणारे लोकं, यांची स्वायत्त जाणिव आणि मोर्चाचा उद्देश, भुमिका ही एक समान असेल आणि विवेक आधारित वैश्विक मुक्तिदाई असेल तर तो मोर्चा पुर्ण अर्थाने एखाद्या वैश्विक राजकिय उद्धिष्टाचे/साध्याचे साधन असू शकतो.

 

लेखक तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक व कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.