Opinion
आकडे दाखवतात निकोबार समुद्री कासवांचं घर, मात्र हरित लवादाचा दावा वेगळाच
द ग्रेट निकोबार प्रकल्पावर लेखमालिका
लेखक: पंकज सेखसरिया, अनुवादक: रेश्मा जठार । यंदा फेब्रुवारी महिन्यात ग्रेट निकोबार बेटावरील छायाचित्रे आणि अहवालांनुसार, ‘गलाथिया बे’ किनाऱ्यावर जाएंट लेदरबॅक कासवासह समुद्री कासवांच्या प्रजातींनी वीणीच्या हंगामात विक्रमी संख्येने घरटी करून अंडी घातली.
ही नोंद प्रसिद्ध होण्याच्या सुमारास राष्ट्रीय हरित लवादाने (‘एनजीटी’ने) १६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात ग्रेट निकोबार बेटावर प्रस्तावित प्रचंड बहुद्देशीय पायाभूत प्रकल्पाच्या बांधकामावरील आक्षेप फेटाळून लावताना, प्रकल्पाच्या जागेचा कोणताही भाग ‘किनारा नियमन क्षेत्र’ म्हणजेच सीआरझेड १ ए अंतर्गत येत नाही, असे नमूद केले होते. त्यामुळे या नोंदीला विशेष महत्त्व आले आहे.
सीआरझेड १ ए श्रेणीत समुद्रकिनाऱ्यालगतची पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जमीन येते, तिच्या पर्यावरणीय महत्त्वामुळे सर्वोच्च संरक्षण देण्याची ही कायदेशीर तरतूद आहे. समुद्री कासवांची अंडी घालण्याची ठिकाणे, जमिनीवर घरटी करणारे पक्षी, खारफुटी आणि प्रवाळ आदी विविध घटकांची उपस्थिती पाहून हे क्षेत्र ठरविले जाते. या क्षेत्रांमध्ये मोठ्या विकास प्रकल्पांना निश्चितच परवानगी नसते.

अंड्यांना संरक्षण देण्यासाठी तयार केलेल्या जागा. फोटो: विशेष सहकार्यातून
छायाचित्रांमध्ये गलाथिया बे इथे समुद्री कासवांच्या अंड्यांना संरक्षण देण्यासाठी तयार केलेल्या दोन जागा दिसतात. यामध्ये काठ्या आणि फलकांद्वारे अंडी घालण्याची तारीख, कासवाची प्रजाती आणि गोळा केलेल्या अंड्यांची संख्या अशी मूलभूत माहिती दिली आहे. छायाचित्रात दिसणारी सर्वात अलीकडील नोंद १३ फेब्रुवारीची असून, त्यामध्ये जाएंट लेदरबॅक आणि ऑलिव्ह रिडले या दोन कासव प्रजातींची प्रत्येकी एक नोंद आहे. जाएंट लेदरबॅक कासवासाठी अनुक्रमांक ८९९ आणि ऑलिव्ह रिडलेसाठी अनुक्रमांक ९०० या नोंदी सूचित करतात की यंदा समुद्री कासवांच्या वीणीच्या हंगामात इथे १३ फेब्रुवारीपर्यंत अंडी घालण्याच्या किमान ९०० घटना दिसून आल्या आहेत.
प्रजाती-निहाय अचूक तपशील उपलब्ध नसला तरी, इथे अलीकडील नोंदींनुसार (खालील तक्ता पाहा), यापैकी सुमारे ९०% घटनांमध्ये अंडी घालणारी कासवाची प्रजाती जाएंट लेदरबॅक असण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवर लेदरबॅक कासवांना IUCN Red List of Threatened Species मध्ये 'असुरक्षित' (वल्नरेबल) म्हणून सूचीबद्ध केले आहे. परंतु, प्रशांत महासागरातील काही भागांमध्ये या प्रजातीच्या विशिष्ट उप-लोकसंख्या 'अतिविलुप्तप्राय' (क्रिटिकली एण्डेंजर्ड) मानल्या जातात.
संपूर्ण किनाऱ्यावर विखुरलेली कासवांची घरटी हुडकून, त्यातील अंडी काढून वन्यजीव अधिकारी ही अंडी सुरक्षिततेसाठी हलवून एका भागात तात्पुरते कुंपण घालून वाळूत पुन्हा पुरून ठेवतात. अशा कुंपण घालून राखलेल्या जागेला इंग्रजीत ‘टर्टल हॅचरी’ म्हणतात. समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी ज्या समुद्र किनाऱ्यांवर येतात त्यापैकी अनेक किनाऱ्यांवर अशा हॅचरी बनविण्याची पद्धत रूढ झाली आहे. कासवांच्या अंड्यांना संरक्षण देण्यासाठी, विशेषतः घोरपडी, भटकी कुत्री यांसारख्या प्राण्यांनी कासवांची अंडी खाऊन टाकून नयेत म्हणून हे करण्याची पद्धत आहे.
सोबत दिलेली छायाचित्रे फेब्रुवारीच्या मध्यातील असली तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंडी घालण्याच्या घटनांची नोंद झाली. तसेच, किनाऱ्यावरील सर्वच घरटी सापडतील आणि त्यातील अंडी हॅचरीमध्ये आणली जातील, असे होत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अंडी घालण्याच्या एकूण घटनांची संख्या याहून अधिक असू शकते.
राष्ट्रीय हरीत लवादासमोर दाखल केलेल्या याचिकेत नोव्हेंबर २०२२ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ९०,००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पाला मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीला आव्हान दिले होते. या प्रकल्पाचा मुख्य भाग असलेले बहुद्देशीय बंदर थेट गलाथिया बे इथेच उभारण्याचा प्रस्ताव आहे.

जाएंट लेदरबॅक कासवाची पिल्लं. फोटो विशेष सहकार्यातून
या बंदर प्रकल्पामध्ये अनेक बर्थ आणि ब्रेकवॉटर रचनांच्या बांधकामाचा समावेश आहे. यासाठी सध्या सुमारे ३ किमी रुंदीचे असलेले खाडीमुख ९०% ने कमी होऊन फक्त ३०० मीटर इतके होणार आहे. त्यामुळे इथे बंदर उभारल्यास होणाऱ्या अपरिहार्य पर्यावरणीय हानीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे आक्षेप आणि विरोध फेटाळून लावताना हरीत लवादाने दिलेल्या आदेशात, प्रकल्प क्षेत्रातील कोणताही भाग (यामध्ये गलाथिया बे देखील आहे) सीआरझेड १ ए क्षेत्रात येत नाही, असा एक मुख्य मुद्दा आहे.
उपलब्ध असलेल्या सर्व नोंदींनुसार गलाथिया बे परिसर सीआरझेड १ ए श्रेणीचे अनेक निकष पूर्ण करतो. इथल्या किनाऱ्यावर समुद्री कासवांच्या चार प्रजाती अंडी घालतात, पाण्याच्या काठावर खारफुटीच्या जंगलांचे विस्तृत पट्टे आहेत आणि इथे २०,००० हून अधिक प्रवाळ वसाहतीदेखील आहेत, असे ‘झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने आपल्या नोंदींमध्ये नमूद केले आहे.

जाएंट लेदरबॅक कासव घरटं बांधताना. फोटो: विशेष सहकार्यातून
गलाथिया बे परिसराची १९९७ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून सरकारने घोषणा केली होती. परंतु इथे बंदर बांधकामाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी २०२१ मध्ये ती अधिसूचना रद्द करण्यात आली. राष्ट्रीय सागरी कासवे कृती आराखडा (National Marine Turtle Action Plan) २०२१ मध्ये प्रकाशित झाला, त्यात समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात अशा सर्वात महत्त्वाच्या स्थळांपैकी देशातील एक म्हणून गलाथिया बेची नोंद केली आहे. उत्तर हिंद महासागरातील जाएंट लेदरबॅक कासवांसाठी सर्वात महत्त्वाचे अंडी घालण्याचे ज्ञात ठिकाण अशीही याची ओळख आहे. गलाथिया बे इथे अलीकडच्या वर्षांतील लेदरबॅक कासवांच्या अंडी घालण्याच्या नोंदींची ‘अंदमान आणि निकोबार वन विभागा’कडे असलेली आकडेवारी याची पुष्टी करते. वर्ष २०२२ मध्ये ६४९; २०२३ मध्ये ५०५ आणि २०२४ मध्ये ६१९. सुमारे चार दशकांपूर्वी इथे निरीक्षण सुरू झाले तेव्हापासून झालेल्या नोंदींमध्ये हे आकडे कदाचित सर्वाधिक आहेत (खालील तक्ता पहा). हा कल यावर्षीदेखील कायम राहिलेला दिसून येतो.
“या हंगामात इतक्या मोठ्या संख्येने कासव अंडी घालत असल्याने हे सीआरझेड १ ए क्षेत्र नाही, या राष्ट्रीय हरीत लवादाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते,” असे बेटावरील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती असलेल्या एका संशोधकाने सांगितले. संशोधकाने पुढे म्हटले, “जणू कासवांनी स्वतःसाठी उभे राहण्याचा आणि खूप उशीर होण्यापूर्वी आपली नोंद घेतली जाईल याची खात्री करण्याचा निर्णय घेतला आहे!”
या संदर्भात चार वेगवेगळ्या वनाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रश्नांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
