Quick Reads

'खिसा' ला राष्ट्रीय पुरस्कार, लेखक कैलास वाघमारेंशी गप्पा

'खिसा' सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे.

Credit : इंडी जर्नल

"खिसा" या सिनेमाला नॉन फिचर फिल्म कॅटेगरी मधून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यात लेखन आणि अभिनेत्याची भूमिका साकारलेल्या कैलास वाघमारे शी इंडिजर्नलचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भंडारे यांनी केलेली बातचीत.

 

खिसा या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, लेखक म्हणून आपल्या भावना काय आहेत ? 

खिसा या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच. तो आनंद शब्दांत मांडणं अशक्य आहे.  त्याचबरोबर आपण लहानपणापासून जे पाहत आलो. ते वास्तव कुठेतरी मांडावं यातून "खिसा" लिहली गेली. खिसा काही वेगळी कथा नाहीये. ती माझ्या तुमच्याजवळ घडणारी कथा आहे. मी तेच मांडत गेलो आणि त्या वास्तवदर्शी मांडण्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली याचा आनंद आहे. आता  "नितळ हवेचा श्वास घेतोय" असं वाटतंय. मला आनंद याचा आनंद आहे माझं म्हणणं समाजापर्यंत ऐकायला गेलं आहे. हे मोलाचं. 

 

तांड्यावरील कैलास वाघमारे आहे आणि आज राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा लेखक कैलास वाघमारे याविषयी काय सांगाल? 

आपण समाजात जाती-धर्माच्या नावाखाली निरागसपणा संपवतो. आणि ते पिढ्यापिढ्या संपवत आलोय. हे कुठंतरी खटकतं होतं. आणि त्यातून "खिशा" ही गोष्ट लिहली गेली. गावाकडच्या लोकांचं जगणं संपत. परंतु, त्यांच्या गोष्टी संपत नाहीत. समाजातील या गोष्टी समाजासमोर मांडाणार कोणतरी हवं होतं आणि ते काम आपण करावं एवढंच वाटलं. आणि मी लिहीत गेलो. तांड्यावरील कैलास वाघमारे आहे आणि आज राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा लेखक कैलास वाघमारे यात मला काहीही फरक वाटत नाही. मी समाजाचे प्रश्न माझ्या माध्यमातून मांडत राहणार. 

 

 

अगदी नेमक्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सरकार राष्ट्रीय पुरस्काराचं महत्व कमी करतंय का? 

राष्ट्रीय पुरस्कार हा त्या कलाकारांच्या कलाकृतीला दिला जातो. कलाकार  आणि राजकारण ह्या दोन्ही वेगळ्या बाजू आहेत. कलाकाराने कोणत्या राजकारणाची भूमिका घ्यायची आहे, हे ज्याने त्याने ठरवावं.

 

या प्रवासाविषयी आणखी काय सांगाल? 

ग्रामीण भागात अनेक अशा गोष्टी आहेत. त्या समाजाला दिशा देणाऱ्या आहेत. अगदी लहानपणापासून समाजाची विविध रूपे पाहत आलोय. त्या आपल्या कलाकृतीतुन मांडल्या पाहिजेत. ते मी मांडणारच आहे. आपल्या हातात जे माध्यम आहे त्या माध्यमातून समाजाची वास्तविकता मी लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम करणार आहे.