Quick Reads

मुलाखत: नदी आणि नदीच्या माणसांची गोष्ट सांगणारे मनोज बोरगावकर

बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा २०१९ या वर्षासाठीचा हरि नारायण आपटे हा उत्कृष्ट मराठी वाड्.मय पुरस्कार मिळाला आहे.

Credit : Shubham Patil

मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा २०१९ या वर्षासाठीचा हरि नारायण आपटे हा उत्कृष्ट मराठी वाड्.मय पुरस्कार मिळाला आहे. या अगोदर ‘कोरा कागद निळी शाई’ हा काव्य संग्रह तसंच ‘अकथ कहाणी सद्गुणांची’ हा ललित लेख संग्रह या अगोदर प्रकाशित झाला आहे. नदीष्ट या कांदबरीविषयी मनोज बोरगावकर यांची इंडी जर्नलसाठी अंगद तौर यांनी घेतलेली ही मुलाखत.

 

१) नदीष्टची सुरवात कशी झाली?

मला माझ्या बालवयात जावं लागेल. बालपण खेड्यात गेलं. त्याचवेळी मी निसर्गाकडे गेलो. मला हुलबा नावाचं पात्र भेटलं. त्यानं मला निसर्ग वाचायचा असतो हे पहिल्यांदा शिकवलं. तो मधमाशांचं पोळ हुकमी उठवायचा. त्या मधमाश्याच्या पोळाचा आम्ही मुआयना करायचो. तो आम्हाला सांगायचा की मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत तर त्या गोळा करुन मांडून ठेवतात. संग्रह आणि व्यवस्थापन त्या एकदाच करत असतात. एक मधमाशी जरी सुटली तरी अवघा पोळाचा अवकाश खाली येतो. त्यानं असा हा शिकवलेला निसर्ग कुठेतरी माझ्यात साठला होता. हुलबाचं बोटं पुढे सुटलं आणि पुढे ते जिम कार्बेटनं पकडलं.  

जिम कार्बेटसारखा निसर्ग आपल्याला वाचता येणार नाही पण निदान आपण जिम कार्बेट तरी वाचला पाहिजे. तो शिकारी होता. लेखक होता. त्याचबरोबर कित्येक किलोमीटर जंगलात अनवाणी पायानं चालणारा सच्चा अदिवासी होता. वयाच्या पंधराव्या वर्षी मला जिम कार्बेट वाचायला मिळाला. स्वतःच्या पाळीव कुत्र्याला दिलेला शब्द भावनिकपणे पाळणारा जिम कार्बेट होता. मी निसर्गाशी पुढे जोडला गेलो आणि पुढे नदी मला मिळाली.

 

२) विकासप्रक्रियेमुळं आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत...

विकास या शब्दालाच माझा आक्षेप आहे. विकास ही करायची गोष्ट नाही. विकास कागदोपत्री होत राहिल. खालच्या स्तरातल्या माणसाला वर नेण्याची ती प्रक्रिया असली पाहिजे. विकास कुणी आणायचा आणि कोणाला देण्याचा विकास नाही. लोकं या प्रक्रियेचा भाग असली पाहिजेत.

सतत जर आपण निसर्गातल्या कुठल्याही विराटाच्या संपर्कात राहिलो तर आपण विराट होत नाही. पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागते आणि ती कणभर माती म्हणजे नदीष्ट. हे नदीचं माझं बोलणं आहे. यात काळजातले बोल आहेत. तेच कादंबरीच्या रुपात बाहेर आले.  

 

३) नदीष्टमध्ये नदीविषयीची खूप निरिक्षणं बारकाव्यासह येतात. कादंबरीतल्या नायकाला नदीच्या तळाखालची वर्जिन जागा शोधायची असते. हा अभ्यास तुम्ही कसा केलात?

आम्ही पूर्वी नदीवर जायचो. पंचवीसएक लोकांचा ग्रुप होता. सुरवातीला आम्ही सर्वजण नदीवर मजा म्हणून जायचो. नंतर मला असं वाटायला लागलं की या गोंगाटाशिवाय आजूबाजूला काहीतरी घडत आहे. ते आपण ऐकायला हवं. ते जर ऐकायचं असलं तर त्याचा वॉल्यूम आपण वाढवला पाहिजे. म्हणून मी नदीवर एकटा यायला लागलो. पहाटे चार वाजता उठून नदीवर यायला सुरवात केली. मग माझ्या लक्षात आलं की नदी काहीतरी बोलू पाहते आहे. तिला काहीतरी सांगायचं आहे. माझं पोहणं व्हायचं आणि नंतर लोकं नदीवर यायला लागले. मला लोकं उत्सुकतेनं विचारायचे की तू एवढ्या लवकर का नदीवर येतोस. मी त्यांना काहीतर उडवाउडवीची उत्तर द्यायचो. पुढं नदीवर येणारी माणसं कमी होत शेवटी येईनाशी झाली. कुणी स्विमिंग पूलावर जायला लागले. कुणाची बाहेरगावी बदली झाली.  

मी जात होतो त्या नदीच्या एक दीड किलोमीटरच्या पट्ट्यात जर एवढं काही घडत असेल तर पूर्ण गोदामाईच्या उगमापासून ते शेवटापर्यंत तिच्या पात्रात काय काय घडत असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. आपण भूगोलाच्या पुस्तकात लहाणपणी वाचलेलं असतं की वस्ती आणि संस्कृती नदीच्या किनारी वसत असते. ते वाक्य त्या वेळी पाठ करावं लागलं. जेव्हा मी नदीवर जायला लागलो तेव्हा ते मी अनुभवलं. नदीच्या त्या निखळ प्रवाहात मला रोज नवी माणसं भेटत होती. नदीच्या अव्यक्त हाका ऐकू येत होत्या. निसर्ग आपल्याशी खूप काही बोलत असतो. आपण त्याच्या जवळ गेलं पाहिजे. वेलीवरुन एक फूल पडतं साधं ते हळूवार गिरक्या घेत खाली येतं. एकवेळ असं वाटतं की त्याला गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू नसावेत. ते फूल आपल्याला सांगत असतं की तुम्ही हलके व्हा. इगोनं जड होऊ नका. हे असं मी पाहत गेलो. मला त्याचा नाद लागला. मी हे अजाणतेपणानं जगत होतो. निरिक्षण करत होतो. हे सगळं लिहण्यासाठी नव्हतं. तर या माझ्या जगण्याच्या नोंदी होत्या.

 

४) आत्मवृत्तपर वर्णन करतानाच कादंबरीचा नायक स्वतः आपल्याला त्याची आणि त्याला भेटणाऱ्या माणसांची गोष्ट सांगतोय. आपण जर आत्ता कादंबरीच्या फॉर्मबद्दल बोलायचं ठरवलं तर काय सांगता येईल.

आजपर्यंतचे जे काही फॉर्म आहेत ते सर्व मानवनिर्मीत आहेत. कुठलाच फॉर्म हा काही काळ्या दगडावरची रेघ नसतो. फॉर्मचा प्रयोग करणं ही कल्पना कुठेतरी माझ्या डोक्यात होती. हा प्रयोग तसा सहज घडत गेला. कांदबरी हा साहित्यप्रकार तुम्हाला नवा प्रयोग करायला जागा देते अशी माझी वैयक्तीक धारणा आहे. कदाचित माझं हे विधान चूक असू शकतं. परंतू प्रयोगाच्या सर्वात जास्त संधी कादंबरीत मिळतात असं मला वाटतं. या पुस्तकात आहे ते मी जगलोय. नदीवरून आलो की माझी पत्नी गौरीला मी सगळं सांगायचो. मला वाटतं यातल्या सर्व नोंदी जिंवत होत्या. त्या मी अनुभवल्या आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीनं मी नोंदवत गेलो त्याच स्टाईलनं लिहण्यात ते येत गेलं.

वाचकांसमोर कुठलीही कलाकृती ठेवल्यानंतर प्रत्येक वाचकासाठी त्या कलाकृतीतून अर्थाच्या अनेक शक्यता तयार होत असतात. मी कधी नदीवर जात होतो हे माझ्या परिचयाच्या काही लोकांनाच माहित आहे. त्यामुळं कुठल्या ति-हाईत माणसाला ही काल्पनिक कथा वाटू शकते.

यातला जवळचा आणि महत्त्वाचा भाग असा की फक्त गोदावरी या नदीपुरती मर्यादित गोष्ट नाही. ही फक्त एका नदीची गोष्ट नाही. नदिष्ट ही कोणत्याही नदीवर घडू शकते. हीच घटना गंगा किंवा ब्रम्हपुत्रेच्या काठावर घडू शकते. हाच सारा पट अमेझॉन किंवा नाईल नदीच्या काठीसुद्धा घडू शकतो. फिक्शन किंवा नॉनफिक्शन असं काही तुम्ही विचारत असाल तर मला वाटतं की नदीष्ट हे सत्याचा कुठेतरी आधार घेऊन उभं राहिलेलं फिक्शन आहे.

 

५) मराठी साहित्यात कविता महाजन यांची 'भिन्न' कादंबरी आणि राजन गवस यांची 'भंडारभोग' ही प्रातिनिधीक उदाहरणं देता येतील ज्यात तृतीयपंथीय व्यक्तींबद्दल सकसपणे लिहलं गेलं. सगुणा हे तृतीयपंथीय पात्र तुमच्या कांदबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा.

ह्या दोन्ही कादंबऱ्यात हा विषय हाताळला आहे. दोन्ही लेखकांबद्दल मला खूप आदर आहे. सगुणाबद्दल सांगताना मला असं वाटतं की आपली जी संस्कृती आहे ती वंचितांनी जपलेली आहे. सगुणा मला आधी रेल्वेमध्ये भेटली. नंतर नदीवर भेटत गेली. एक सगुणा भेटली म्हणून त्या अख्ख्या बिरादारीबद्दल मी कसं सांगू शकतो. ते तसं सागणं म्हणजे वाचकांची प्रतारणा झाली असती किंवा तपशील चुकले असते. मला सगुणा भेटल्यानंतर मी बिरादारीसोबत एक वर्ष जोडलो होतो. एकदा त्यांच्याकडे राहायला गेलो.

मी प्रामाणिकपणे सागंतो की मला सुरवातील भीती वाटायची. सगुणाचा चांगला अनुभव आणि तिची मैत्री पाठीशी असतानाही बिरादारीसोबत वाड्यावर राहण्याबद्दल माझ्याच मनात जरा संकोच होता. सकाळी जावं आणि संध्याकाळी परत यावं असा माझा प्लॅन होता. मी संध्याकाळी घरी निघालो तेव्हा त्यांची गुरु म्हणाली की "अरे तेरेको जाना है और फिर कल आना है तो जाताच कायको है. यहीं पे रह जा." माझ्याकडे फक्त तीनचार सेकंद होते. मी जर तिथे राहिलो नसतो तर कदाचीत त्यांचा आणि माझा संवादाचा धागा अर्धवट राहिला असता. मी धाडसानं हो म्हणालो. त्यांच्या गुरूनं माझ्या गालावर बोटं फिरवून तिच्या कानशीलावर ठेवून कडकडा मोडली. त्या बोटांचे कडकड वाजलेले आवाज मला आजही नदिष्टच्या पानपानातून ऐकू येतात.

 

६) बिरादरीसोबत राहत असताना तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगता येईल?

मी या अगोदर असं म्हणालो की वंचितांनी आपली संस्कृती जपली आहे. एक प्रसंग सांगतो. मुक्कामाला राहिलो तेव्हा जेवायचं म्हणून मी डाईनिंग टेबलवर जाऊन बसलो. बराच वेळ झाला तरी कुणी वाढायला का येत नाही म्हणून मी विचारलं. तेव्हा आदिती म्हणाली की "देख तेरा तु परोस ले और खा ले. हम खानेवाले के सामने नही आते. एक तो तू शरमा जाता और दुसरा मैं अगर जाने अनजाने में रोटी गिन भी लेती तुझको नजर लग न जाये."

यातला रिवाज रितीचा भाग वगळता मला त्यांची ती संवेदनशीलता खूप भावून गेली. तृतीयपंथीय व्यक्तींच्या आयुष्याचा अख्खा पट माझ्यापुढं त्यांनी उभा केला होता. समाजात चांगली वाईट लोकं सगळीकडेच आहेत. एखाद्या तृतीयपंथीय व्यक्तीनं अमुक काहीतरी केलं म्हणून त्यांना एकाच मापात मोजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेबद्दल मला माझ्यासकट वाईट वाटलं.

संपूर्ण नदीष्ट लिहताना माझी एकंच धारणा होती की ही कादंबरी वाचल्यानंतर शक्य असेल तेवढ्या लोकांचा तृतीयपंथीय व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. या एकाच ध्यासानं मी ही कादंबरी लिहली. मला आजही अनेक वाचकांचे फोन येतात आणि तुम्ही आम्हाला तृतीयपंथी समजून सांगितल्याचं बोलून दाखवतात. तेव्हा मला माझ्या लिहण्याचं सार्थक झालं असं वाटतं.

 

७) आजुबाजूच्या सामाजिक वास्तवाचं भान राखत असताना एक कलावंत आणि साहित्यीक म्हणून आपली जागा कुठं असते असे तुम्हाला वाटतं. तृतीयपंथीय व्यक्तीच्या आयुष्याबद्दल लेखक म्हणून लिहताना तुम्ही कुठं होता?

कलावंत आणि लेखकाचं ईमानं शाबूत असलं पाहिजे. ते नसेल तर तुम्ही कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही. मी नदीष्टबरोबर हे सगळं शिकत गेलो. बिरादारीसोबत राहून आल्यानंतर असाच एका मित्राच्या घरी मुलाच्या जन्मानिमित्त पुन्हा एकदा तृतीयपंथीय व्यक्तींची भेट झाली. मित्र मला बोलवायला आला होता. गाणीबजावणीचा कार्यक्रम झाल्यावर त्यातल्या एकीला गाडीवर सोडण्याचा प्रसंग आला. “मुझे वहां तक छोडते क्या?” असं विचारल्यावर मी क्षणभर विचारात पडलो. तिथे मला नकारही देता येत होता. शिवाय तो नकारही आमच्या दोघांच्यात राहिला असता. पण तिथे मला सगुणाची आठवण आली. मी तिला नांदेडपासून २४ किलोमीटर तिच्या गावी तिच्या घरी सोडून आलो. ही तशी फार मोठी घटना आहे किंवा नाहीसुद्धा. पण मला वाटतं ते धाडस मला आलं त्याहीपेक्षा लेखक म्हणून माझं ईमान शाबूत राहिलं.

 

८) काही अपवाद वगळता आजवरचं साहित्यातलं आणि खासकरून माध्यमातून येणारं तृतीयपंथीय समुदायाचं आजवरंच चित्र एकतर खूप कमी मांडलं गेलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मांडलं आहे.

आजूबाजूच्या माध्यमांचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यावरून आपली मतं तयार होतात. माझं उदाहरण घ्या. मी सगुणाला नंतर चांगलं ओळखू लागलो होतो. पण तरीही माझ्या मनातला संकोच पूर्णतः गेला नव्हता. माझं मत बदललं नव्हतं. हा बदल एकदम होत नाही. नदीच्या काठी झाडीत तिला एकटीला घेऊन बसताना सुरवातीला मला भीती वाटायची. कदाचीत ही तिच्या बिरादारीच्या लोकांना बोलावून आणेल का. नंतर माझी मलाच लाज वाटली. परिस्थितीनं एवढं पिडलेलं असतानाही ही माणसं एवढा उच्च विचार करतात हे अनुभवल्यानंतर मी अवाक झालो. सगुणा सतत माझा लौकिक जपायचा प्रयत्न करायची.  ती माझी काळजी घ्यायची. तू नदीवर पुढं जा, मी मागून येते असं म्हणून माझ्यासोबत चालणं टाळायची.

 

९) पर्यावरण आणि बदलत्या निसर्गचक्राबद्दल बोलत असताना वेगवेगळ्या वयाची माणसं नदीष्टमध्ये येतात. ही माणसं वेगळी असली तरी पुन्हा नदीच्या काठानं त्यांना एकत्र बांधून ठेवलं आहे.

मला ही माणसं आपोआप भेटली. निसर्गाकडे पुन्हा वेगानं जाऊ पाहणारी ही माणसं आजही आहेत. नव्या पिढीनं आणि स्त्री वाचकांनी नदिष्टवर प्रेम केलं. त्यांना ही त्यांच्या आजुबाजूची गोष्ट वाटली.  

 

१०) तुम्ही सोशल मिडीया तसा फार वापरत नाही. नवमाध्यमांच्या येण्यानं, खासकरून सोशल मिडियानं माध्यमांचं जग बदललं आहे. साहित्य त्याला अपवाद नाही. बदलत्या मराठी साहित्य व्यवहाराबद्दल तुम्हाला काय वाटतं.

मला वाटतं आपण कलावंत म्हणून एक जाग सजगपणे ठेवली पाहिजे की कलावंत म्हणून आपण किती निर्मळ आहोत. आपल्याला समोरच्याला दाद देता येते का. एखाद्यानं चांगलं लिहलं, नव मत मांडलं तर त्याला दाद देता आली पाहिजे. वैचारिक मतभेद असले तरी ही दाद देण्याची प्रवृत्ती शाबूत असली पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. मला वाटतं गटातटांत बरीच उर्जा जाते.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की नदीष्टला लोकाश्रय आणि रायाश्रयही मिळाला. साहित्यीक समीक्षकांनीही तिच्यावर प्रेम केलं आणि सामान्य वाचकांनीही तिला डोक्यावर घेतलं. नदी आणि तृतीयपंथीयांबद्दलच्या आस्था बदलण्याच्या माझ्या प्रयत्नांवर शासनानंही मोहर उमटवली याचा मला आनंद वाटतो. नदीनं मला शिकवलं आहे की ज्याचं श्रेय त्याला दिलं की ही कायनात आपल्याला सर्व देऊन टाकते.

 

११) नदीष्ट हे नाव ते राज्य पुरस्कारप्राप्त कांदबरी हा प्रवास कसा होता?

नदीष्ट लिहली यात माझ्यापेक्षा जास्त कष्ट माझी पत्नी गौरीचे आहेत. जेव्हा मी तिला विचारून रात्री अकरा वाजता नदीवर जायचो. तेव्हा ती एवढंच म्हणायची, जा पण पाण्यात उतरू नका. परंतू तिला माहित असायचं की मी नदी पार करुन येणार आहे. नदीवर लिहताना मी माणसं जोडत गेलो. नदीनं मला समृद्ध केलं आहे. "मला स्त्री, आई आणि नदी साऱख्याच वाटतात."

हे माझं एकट्याचं नाही. नदीवर जशी माणसं होती, तशीच माझ्या सोबतीलाही माणसं होती. नाशिकचे विनायदादा पाटील यांच्याशिवाय ही कादंबरी होऊ शकली नसती. ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्यामुळेच ही कादंबरी प्रकाशीत झाली. मराठीतला महत्त्वाचा समीक्षक आणि माणूस म्हणून उत्तुंग असलेला रणधीर शिंदे आणि दत्ता डांगे सर यांचा उल्लेख मला करावा लागेल. कादंबरी प्रकाशीत झाल्यानंतरही माझा मित्र श्रीधर नांदेडकर, ऋषिकेश देशमुख आणि विष्णू देशमुख या लोकांनी नदी वाहती राहावी म्हणून प्रयत्न केले ते कायम माझ्या मनात आहेत. तसा या मंडळींचा आणि माझा फार काही जुना संबंध नाही. परंतू नदिष्ट ही वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे आणि ही आपली एक सांस्कृतिक जबाबदारी आहे या जाणिवेतून ही माणसं झटली आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक चंद्रकांत पोकळे सरांनी एका महिन्यात नदिष्टचा कन्नड अनुवाद केला. म्हणून म्हणतो की हे यश सर्वांचं आहे. यात मनोज बोरगावकर बाजूला केला तरी नदी वाहती राहिली पाहिजे.

 

१२) आजची पिढी वाचत नाही अशी तक्रार केली जाते. तर एकीकडे प्रकाशन व्यवसाय मरगळीत आहे. प्रकाशक तोट्यात जाताहेत असाही सूर आहे. वाचनाची साधनं बदलली आहेत. ई-बुक आहे. किंडल आलयं. तुमचं निरिक्षण काय आहे?

नदीष्टच्या अनुभवावरून मी सांगू शकतो की वाचन कमी झालं आहे असं म्हणण्याचा मला काहीच अधिकार नाही. वर्षभरात तिसरी आवृत्ती संपत येत आहे. विशेष म्हणजे एक दिवस असा गेला नाही की वाचकांचा फोन, ई-मेल किंवा निदान मेसेज तरी आला नाही. नवी पिढी वाचत नाही हा जो आरोप होतो तो चुकीचा आहे. मी म्हणेन की ही पिढी उलट वाचनाच्या बाबती जास्त चोखंदळ आहे. माझं आकलन मर्यादित असेल पण मला तरी असं वाटतं. अनेकांनी नदीष्टवर वर्तमानपत्र, मासिकातून आणि सोशल मीडीयावर लिहलं आहे.

 

१३) मराठीतल्या बोलींचा पुरस्कार करणारे अनेक प्रयोग कांदबरीत नेहमीच होत असतात. अलीकडेच प्रसाद कुमठेकर यांनी चक्क दोन कादंबऱ्या मराठवाड्यातील खास उदगिरी भाषेत लिहल्या आहेत. नदिष्टमध्ये अनेक शब्द बेमालुपणे येतात. त्या भाषिक प्रयोगाबद्दल थोडंस बोलूयात. आणि जाता जाता वाचकांना काय सांगाल.

नदीष्टमध्ये भाषेची जी सरमिसळ आहे ते अगदी सहज घडलं. त्याला रणधीर शिंदेंनी हिरवा कंदील दिला. मी लिहलं ते अगदी सहज असलं तरी त्या मागे भाषेबद्दलची ती भूमिका होती. आपण अगोदरंच माणसांमाणसामध्ये जात पात, धर्म असे भेद करून ठेवलेच आहेत. त्या पुन्हा भाषिक भेदाभेदा कशासाठी. भाषा ह्या सरमिसळ होऊन एकत्र येत असतात. त्यामुळे एका भाषेत लेखन करत असतानाही शब्दयोजनेबद्दलचे ही मराठी, ती उर्दू, ही तेलगू हे भेद मला फार कृत्रिम वाटतात.

मी हे काही मुद्दाम केलं नाही. मला कोणतेच शब्द ओढून ताणून आणावे लागले नाहीत. उदाहणार्थ नदीवर गेलो की मी मुआयना करतो. मला तोच शब्द आठवतो. इथं निरिक्षण, अभ्यास हे शब्द वापरण्याचा प्रश्नचं येत नाही.

मी राज्यशास्र्चा प्राध्यापक आहे. राज्यशास्त्रात एक संकल्पना आहे 'राईट टू रिकॉल'. एखादा लोकप्रतिनिधी नीट वागत नसेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार असतो. मी वाचकांना ग्वाही देतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला बट्टा लागले असं मी लिहणार किंवा जगणार नाही. तसं जगलो तर राईट टू रिकॉल म्हणून तुम्ही तुमचं प्रेम परत घेण्याचा हक्क मी तुम्हाला तहेदिल देऊन ठेवतो.