Quick Reads

ये बम्बई है, मालूम...

मुंबई नावाच्या युटोपियाचा कालविस्तार

Credit : Shivam

आपण सगळे मुंबईवर प्रेम करतो. हे आपलं शहर आहे. जो कुणी मुंबईत येतो त्याला मुंबईत आपलंसं वाटतं. मग तो कुठूनही आला असेल, कोण असेल किंवा मग कोणतीही भाषा बोलत असेल. मुंबई शहर धकाधकीचं आहे, धांडपणाचं आहे. उदरनिर्वाहासाठी ‘लोंढे’ च्या ‘लोंढे’ इथे येत असतात. हे शहर जिद्दीचं आहे, संध्या मिळतात या शहरात. या शहरात येणारा प्रत्येक जण आशादायी असतो. गरिबाला रात्री भुकेलं नाही झोपणार याची आशा आणि उमंगी लोकांना टॉप वरती जाण्याची आशा. हे सगळं असल तरी प्रत्येक शहराची एक स्वतंत्र आणि स्वायत्त ओळख असते. तशीच सिंगापुर, हॉंगकॉंग, मँचेस्टर, न्यूयॉर्क अन मग मुंबईचीही तीच आहे. ही शहरे छोट्या मोठ्या बेट्टांनी बनलेली आहेत. हा या शहरांमधला सारखेपणा. जागेची कमतरता या शहरांना. मग सामान्य शहरांपेक्षा हे शहर थोडी प्रबळ आणि परिपक्व बनतात. या शहरांमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे जागेचा विनिमय महागडा आहे आणि त्यातही तो काही बोटांवर मोजण्या इतपत लोकांकडे गेलाय. आणि विकासाच्या मक्तेदारांना मुंबई ला शांघाई बनवण्याची घाई लागलेली आहे. त्यातही कुठलं साम्य न शोधता. या सगळ्या शहरांची गत आहे की हे शहरं येणाऱ्या प्रत्येक जनाला ही शहरे काही तरी वाटत असतात.

मुंबईत येणारे लोंढे हे नुसते लोंढेच नाहीत तर शोषित, पीडित आणि बळी पडलेली जनता आहे देखील. काही एक दोन नमुनेच असतील की ते हौसेखातर मुंबईत दाखल होतांना दिसतात. भारतीय पीडित, शोषित आणि बळी पडलेली जनता मुंबईला पसंती दाखवतात. याचंच सादरीकरण म्हणून काही माध्यमं, येणारी जनता आनंदाची भावना घेऊन येत असते असे दाखवतात.

मुंबईला मिळालेला किनारा हा नुसता किनाराच नाही तर सगळ्यांना भुरळ घालणारी आकर्षक बक्षीस आहे. म्हणूनच की काय इंग्रजांनी त्यांचा कारोभार सुरत ऐवजी मुंबईहूनच चालवण्याचं ठरवलं. बघता बघता मुंबई आर्थिक केंद्रही बनलं. आज आर्थिक केंद्राच्या नावाखाली एकट्या मुंबईतुन भारताचा ४६ टक्के आयात निर्यातीचा कारभार होतो. मुंबईच्याच किनाऱ्याला लागून असलेला बॉम्बे हाय गॅस आणि खनिज तेल या क्षेत्राला लागलेला ‘खजिना’ आहे. गॅस चा ६१ टक्के तर तेलाचा ४८ टक्के कारोभार एकट्या मुंबईतून होतो. देशाची तिमाही कमाई ही तेल सप्लाय मुळे होते आणि या तेल धंद्याचं आयकर हा अक्ख्या भारताचा एक तृतीआंश आहे. मुंबईतून ६० टक्के सीमाशुल्क कमवला जात असतो. आणि एकट्या मुंबईतूनच २० टक्के तेलाचा शुल्क कमवला जात असतो. हिरा व्यापारांसाठी मुंबई हे प्रवेशद्वार म्हटलं जातं. मुंबईत बॉलीवूड साठी चित्रपट निर्मिती करीत असते. जगात सर्वाधिक चित्रपटांची निर्मितीही मुंबईत होते. देशातले सगळ्यात मोठे नाविक दल हे मुंबईतच आहे. भारतातल्या ८० टक्के जाहिरात निर्मिती करणाऱ्या कंपन्या या मुंबईतच आहेत. मुंबई एअरपोर्ट देशातल्या निम्म्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची देवाण घेवाण करते तर घरगुती विमानांची वर्दळ ही ४० टक्के आहे. असंही म्हटलं जात की न्यूयॉर्क पेक्षा जास्त लक्षाधीश हे मुंबईतच आहेत. महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक बँकांचे व संस्थांचे मुख्यालये हे एकट्या मुंबईतच आहेत. असंही म्हटलं जात की ही मुख्यालये मशिन्स आणि समुद्रकिनारा असल्यामुळे जास्त उत्साही असतात.

वरील सगळी माहिती किती सुखदायी, आनंददायी आणि समृद्धीची असली तरी सुद्धा आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईतच आहे. ग्रेट गिरणी संप पण मुंबईत झालेला. हुतात्मा चौक बनवण्यासाठी एकशे पाच लोक गमवावे लागतात, तो पण इथेच आहे. एवढी समृद्धी असून सुद्धा सत्तर टक्के मुंबईची जनता ही झोपडपट्टीत आहे. मग स्वच्छ, सुंदर आणि आनंददायी मुंबई ही जाहिरातीपुरतीच राहते. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कल्पित करायला नाही होत. मुंबई देशाची राजकीय राजधानी नाही बनली पण नेत्यांचे टायकून्स हे नेत्यांसाठी गस्थ घालतांना दिसतात. पण राजकीय नेतेही माशी बनून मध चाटायला आलेले असतात. यातही थोडं मागे गेले तर, दिसेल की ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवातही मुंबईतूनच झाली. राष्ट्रीय काँग्रेस पासून तर आत्ता आत्ताची वंचित बहुजन आघाडीची सुरुवात इथूनच झाली. मग शिवसेना वेगळं सांगायला नको. डॉ. बाबासाहेबांची नोकरी ते मसुदा समिती सारखे देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारे सगळी महत्वाची कामे मुंबईतच झाली आहेत. बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, मूकनायक या सारख्या वर्तमान पत्रांची सुरुवात मुंबईतूनच झाली. गांधींचे असहकार चळवळ आणि चले जाओ आंदोलन पण मुंबईतच सुरु झाले. मुंबईला प्रशासनिक बनवण्याचे काम जरी इंग्रजानी चालू केले असेल तरी स्थलांतरित करणाऱ्या लोंढ्यांच शहर म्हणजे मुंबई. मुंबई च आधीच नाव होत बॉम्बे. आणि ते मुंबई असं रूपांतर करण्यासाठीचा कहर पण काही कमी नाहीये. मुळात बहुभाषीय-बहुधार्मिक, बहुवर्गीय, बहूराजकीय असं गुळगुळीत आधार जरी असला तरी मुंबईत असहनशीलतेची (इनटॉलरन्स) उदाहरणे काही कमी नाहीत. असहनशीलतेची कारणे गुप्त आणि स्वायत्त ठेवण्यात आलेली आहेत आणि कारण दिले गेले आहे; बावीस दशलक्ष असणाऱ्या लोकसंख्येला. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला तेवढिचं स्वायत्त आणि गुप्तता आहे. पण समानतेचा अर्थ स्पर्श ही करत नाही.

मुंबईची लोक गरमी आणि पावसाला त्रासलेले असतात. आणि अजून बरेच वरवरच्या समस्या आहेतच. मुंबईला बनिया सिटी पण म्हटलं जात. दलाल स्ट्रीट आणि स्टॉक एक्सचेंज त्या साठी पॉप्युलर. एकोणीसशे एकवीस मध्ये टिळक वारले आणि गांधी पर्व सुरू होणार होते, त्यासाठी मुंबईनेच साठ लाख गोळा करून दिले. The Young India मध्ये गांधी लिहितात की “मुंबई; सुंदर तिच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स मुळे नाही तर दान करणाऱ्या अश्या जनतेमुळे आहे.”

मुंबईची जेव्हा मँचेस्टर सोबत तुलना केली जायची त्याचे कारण इथला गिरणगाव आणि तो कारोभार आहे. कापूस, मुंबईच्या जवळपास असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रात मिळता-उगवण्या होता. सुती-कापड उद्योगाला पूरक कच्चा माल आरामाने भेटत गेला. गिरणगाव अस्तित्वात आली. गिरणगाव मुंबईतील प्रमुख उदरनिर्वाहाचं साधणंच नाही तर उत्तरोत्तर स्वतंत्र्य काळाचं प्रमुख चळवळीची चावडीच बनली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हुतात्मा चौकाची प्रस्तावना आणि राजकीय घडामोडींना पूरक आणि अनुकूल खतपाणी या चळवळीच्या चावडीनेच दिले. तरीसुद्धा गिरणगावाच वास्तव कष्टकऱ्यांचं, मजुरांचं आणि श्रमिकांचे खच्चीकरणाचे सांस्कृतिक आणि आर्थिक कारण बनलं. तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या काळात -- तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईने घेतलेला; मुंबई ला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा निर्णय दोघांनाही महागात पडला. अख्खी मुंबई शाहिरांनी पिंजून काढली. जागोजागी मोर्चे बांधले गेले होते. अण्णाभाऊ, अमर शेख आणि हुसेन दलवाईंच्या गाण्यांनी जनता रस्त्यावर येत होती. त्याचवेळी अण्णाभाऊंची ‘माझी मैना’ गाजली. त्यांनंतरच्या काळात मग अण्णाभाऊंनी अजून एक कलाकृती सादर केली आणि ती म्हणजे --

“मुंबईत उंचापरी मलबार हिल इंद्रपुरी

कुबेराची वस्ती तिथे सुख भोगिती”.

ही कलाकृती म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून छक्कड आहे. छक्कड ही लोकशाहिरीचाच प्रकार आणि ती सादर करतांना हजरजबाबीपण धारधार आहेत. छक्कड मध्ये बऱ्याच गोष्टी थोडक्यात सांगायच्या असतात. म्हणजेच वाटायला ही पोवाड्यासारखा, पण त्यात तसं रांगडेपण किंवा मग पहाडीपण नसतं.

Photo Credits- Shivam

म्हणायला गेले तर १९८२ च्या ऐतिहासिक संपानंतर भरपूर सरकारे आली आणि गेली. प्रत्येक मुजोराने गिरणी कामगार, कष्टकरी मजुराच्या जीवनात दुःख आणल्याशिवाय काहीही दुसरं केलेलं दिसत नाही. मात्र सरकार दरबारी घर मिळण्याच्या आश्वासनाला जोर देतांना मात्र, हा मुजोर दिसत असतो. MHADA आणि SRA गिरणी कामगारांची १ BHK ची स्वप्ने पूर्ण करत आहे की नाही हा एक संशोधनाचा मुद्दा आहे पण दत्ता इस्वलकरांचा बंद गिरणी कामगार समिती आजही रस्त्याच्या आजूबाजूला मोर्चे घेऊन उभी राहतांना दिसत असतात. राजकीय पक्षांची उदासीनता तसेच सरकारी नावाचा कारभार गिरणी कामगार नाव विशेषण पुरता वापरत आहेत. आणि निराश गिरणी कामगार आणि त्याची मुंबई हताश होऊन आजूबाजूला मुंबईचं शांघाईकरण बघत आहेत. शांघाईकरण तसं भांडवलदार, सरकार, बिल्डर्स आणि माफियांच्या मनासारखंच आहे. गगनचुंबी इमारते. म्हणे अंबानीच घर हे जवळजवळ दोन अब्ज रुपये खर्च करून बनवलं गेलंय आणि तेही गिरणी कामगाराच्या एरियात. तसेही बघितले तर दक्षिण मुंबईची बरीच जागा ही गिरण्यांनी व्यापली आहे. ती जागा आपल्याकडे कशी करता येईल या कडे, हे किडे लक्ष केंद्रित करून आहेत. चळवळ्या पोकळ झाल्यात. दक्षिण मुंबई A-वॉर्ड आहे आणि गिरणी कामगारांचं खच्चीकरण आहे. A-वॉर्ड यासाठी की सगळ्याच प्रकारच्या मोठमोठ्या बिल्डिंगी इथेच बांधल्या गेल्यात.

हीच गिरणगावाची उतरती कळा मग गॅंगमाफिया आणि गुंडाराजच पाया बनला. जिथे गेट मिटिंग आणि जिंदाबादचे नारे व्हायचे तिथे घुसखोरी, किडनॅपिंग, चोरी, दरोडे, रेप आणि मांडवली होत आहे. जिथे नाटकभजन मंडळी जोरात चालायची तिथे आज चित्रपटाची शूटिंग होते आणि त्यानिमित्ताने सर्व्हिलन्स केलं जातंय. नाटकमंडळी तिची कायमची जागा बदलत गेली कारण हेच गिरणगावातले लोक इकडे तिकडे जीव वाचवण्यासाठी स्थलांतरित झाली. त्यांच्या कामाच्या जागेवर येण्यासाठी जो येण्याचा प्रवास ते लोकल मध्ये करत करत येतात त्याच्यात ते भजन कीर्तन करतात. दक्षिण मुंबईतच अरुण गवळी आणि अमर नाईक राडेबाजी भडकली. याच सगळ्या परिस्थितीने नामचीन गुंडांची दहशत ही भोगली आणि ऱ्हासही बघितला. गिरणगावातच दाऊद  इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक, रमा नाईक, बाबू रेशीम, बबल्या सावंत, अशोक चौधरी, विलास चौघुले यासारख्यांनी सुपाऱ्या फोडल्या. कित्येक गिरण्यांच्या जमिनी विकल्या गेल्या. चाळीस पन्नास मजली टॉवर्स उभ्याही राहिल्यात. आजही लालबाग, वरळी किंवा मग सात-रस्त्याला तुम्हाला दगडी भीतीच्या आत बिल्डिंगा उभ्या राहतांना दिसत आहेत. गिरण्यांमध्ये पूल पार्लर्स, कार शोरूम, सॉफ्टवेअर पार्क्स ची वर्दळ दिसते. भोंगा नाही वाजत आजकाल. सरकार माफिया, कापडशेत, गिरणी मालक, भांडवलदार यांची मजा आहे. पण गिरणी कामगाराची मागणी आजही अपूर्ण आहे. गेट मीटिंगी, महिलांचे पीकेट मीटिंगी, जिंदाबाद मुर्दाबादचे नारे, लाल सलाम च्या घोषणा, कवी संमेलने, लाल बावटेवाले हे सगळं मुंबईला तीच गावपण देत होतं;  हे सगळं संपल्यागत आहे. एवढंच नाही तर चेकमेट, मांडवली किंवा मग शूट आऊट ही बाद झाली आहे. हे सगळं असून सुद्धा जरी एंकॉउंटर्स तरी या भागातील गुंडांची संख्या वाढत आहे, कमी नाही होत.

गिरणी संपामुळे बेकार झालेले कामगार आणि त्यांची बेकार तरुण मुलं हे भकास आयुष्य जगूनही सरकारच्या शांघाई बनण्याच्या प्रक्रियेत हातभार लावतांना दिसत आहे. या तरुण पिढी अगोदरची पिढी सारेआम गुंडगिरी ला सामोरे जात होती. गल्लीतले दादा आजकाल मॉलचा सेक्युरिटी गार्ड आहे. पूर्वी जरी गिरणगावाचा एकात्म गावपण जिवंत होत, तरीसुद्धा मदनपुरा, बैरामबाग, जोगेश्वरी आणि मोमीनपुराचा तिरस्कार सगळ्यांनी केलाय. हे मुस्लिमबहुल इलाके सगळ्यांच्या नजरेत आणि जेव्हा जेव्हा धार्मिक दंगे धगधगतात तेव्हा तेव्हा या इलाख्यातील मुस्लिमांना त्रास सहन करावा लागायचा. राडे हे दंगलीचे कारणही बनलेत. राडे जेव्हा जेव्हा झालेत तेव्हा तेव्हा सरकारी फौज सुरक्षा करण्या ऐवजी तडजोड करीत भाईगिरीलाच प्रोत्साहन देत खंडणीचा बाजार मोठा करीत गेली. आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्गीय-कनिष्ठ वर्गीयांची वस्ती, आगरी लोकांची वस्ती अशी या गिरणगावाची गावाची ओळख पण गिरण्या वाढू लागल्यात आणि कामगार श्रमिक वाढू लागलेत. काही काही गिरण्यांमध्येच चाळी  होत्या. जशा गिरण्या बंद पडल्यात तशा गिरणी कामगारांनी पोट भरण्यासाठी चाळी विकून मिळेल तिकडे पडायला सुरु केलं. काही सायन कुर्ल्याला तर काही चेंबूर देवनार ला स्थलांतरित झाले. काही गिरणी कामगार थक धरून आहेत.

 

M-N वॉर्ड

“माझ्यापाठी माझ्या समाजाचे काय होईल” अशा चिंताग्रस्त अवस्थेत बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला. तदनंतर महापरिनिर्वाणाच्या दिवशी जो जनसागर धावून येतो मुंबईला त्याला कारणही इथला दलित समाज आहे कारण ते एक तर नातेवाईकांना भेटायला पण येतात आणि त्याचवेळेला महामानवास आपला आदर पण अर्पण करून जातात. दलित समाज वडाळा-घाटकोपर-चेंबूर-धारावी-सायन-कुर्ला-गोवंडी-मानखुर्द-माहीम-बैरामपाडा-माहुल-वाशीनाका (M-N वॉर्ड ) इथे विस्तावलेला आहे. बाबासाहेबांचा समाज शोषित, पीडित आणि बळी पडलेला आहे. शिक्षणाला वाघिणीचे दूध मानून शिक्षण घेत दलित समाज स्थलांतर करत लोंढे बनत गेला. दळण-वळणाचे साधन चांगल्या रीतीने available असल्या कारणामुळे आणि मुंबईत रात्री कुणीही भुकेलं झोपत नाही या मिथकांवर विश्वास ठेवून आणि त्यालाच सत्यता मानून दलित समाज मुंबईत यायला लागला. स्वतःला राघू म्हणत विलास घोगरे लिहतात की;

“माझा राघू  मुंबईला गेला ना

त्याच्या काळजाचा का गुणी आला.”

राघू ची मेहनत, राघू ची बांधीलकी, राघूचा त्रास या गाण्यात दिसतोय. त्यांचाच दुसरं गाणं म्हणजे,

“ममय वाले के लागून नादी, मेरी उरकून ठाकली शादी

काय सांगू मेरी बरबादी घे, सून गे फातिमा दीदी.”

हे गाणी अस्वस्थता वाढवतात अश्या लोकांची जे जाणिवेतून बोलतात. १९८०-८१ दशकात रमाबाई नगर घाटकोपर ही वीस हजार लोकांची वस्ती होती. आठ जुलै १९९७ ला रमाबाई नगरातच समाजकटंकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. आणि तिथला दलित समाज त्याचा विरोध धाकवून देण्यासाठी highway वरती आला. तो समाज घोषणा देत होता. घोषणा चालू असतानाच मनोहर कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबारीचा आवाज दिला. त्यात अकरा दलित लोक ठार मारले गेलेत. मरणारे सगळे नवबौद्ध मुलं, स्त्रिया आणि तरुण होते. बरेच लोक जखमीही झालेत. सरकार या कृत्यावर काही एक हरकत नाही दाखवत आणि चळवळ्या संस्कृती या हत्याकांडावर काही बोलत नाहीये; हे बघून खस्ता खाल्लेले विलास घोगरे अस्वस्थ होतात आणि स्वतःला फासी लावून घेतात.

या कारणाने का होईना मुंबईतही दलित राहतात ही ओळख इतर मुंबईकरांना व पूर्ण महाराष्ट्र भराला झाली. भेटेल ते काम हा समाज शोधत, अजिविकेखातर मुंबईत कसा बसा दिवस काढत आहे. स्थलांतर वाढतंच गेलं. वस्त्या वाढत राहिल्या. मग त्या सायन, वडाळा, माहीम च्या उत्तरपूर्वेला जास्त वाढल्या. यातही धारावीचा कत्तल खाना बंद पाडल्यानंतर अजिविकेखातर आलेला हाच समाज चेंबूर-गोवंडी- देवनार ला विस्थावाला. मुंबईत दलितांच्या वस्त्या आहेत. काही विखुरलेल्या आणि काही वरळी किंवा मग गोरेगावचा फिल्म सिटीतला मजूर. घाटकोपर ते माहुल गाव आणि चेंबूर ते मानखुर्द असा जो विस्थावलेला समाज, जसा जसा वस्त्या वाढत गेल्या तसा तसा एकमेकांशी जोडला गेला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा बालेकिल्ला पण ठरला. चेंबूर मधून खासदाराची एक सीट नक्कीच एका दलिताला भेटत असते. काँग्रेस ची युती आणि मग भाजपची युती अशा थोड्याफार फरकात, रिपब्लिकन चे नेते वावरत आहेत.

घाटकोपरच्या रमाबाई नगरला लागून सिद्धार्थ नगर, कामराजनगर, रमाबाई कॉलनी, फुले नगर, यशोधरानगर, हर्षवर्धननगर, कामराजनगर, कन्नमवार नगर, आंबेडकरनगर, गौतमनगर, भीमनगर, भीमवाडी, लुम्बिनी बाग, गायकवाड चौक, ट्रान्सीट कॅम्प, पांजरपोळ, राहुलनगर, सगळ्या सिग्नल च्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या, महाराष्ट्रनगर, मंडाला, भारतनगर अश्या सगळ्या वस्त्या एका ला एक लागून आहेत. इंतझार हुसेन ने लिहलेली वस्ती आणि वसंत मून ने लिहलेली वस्ती; थोड्या फार प्रमाणात मेळ खाते पण या वस्त्या आता शांघाई बनण्याच्या आडे येत आहेत. असं प्रस्थापित व्यवस्थेचे म्हणणं आहे. एकाला एक लागून पत्र्याची आणि कच्ची बच्ची घरं उभी आहेत. धारावीची वस्ती ही एकाला एक लागून आणि सायन वडाळाची वस्ती ही एकाला एक लागूनच. कुर्ला ते वाशी बेलापूर हार्बर लायन ही याच वस्त्यांना जोडून जाते. सायन बेलापूर हायवे या वस्त्यांमधूनच जातो. चेंबूर पुलावरून घाटकोपरच्या दिशेनं खाली उतरलं की एक फाटा येतो आणि सरळ मग गोवंडी-लुम्बिनी आणि देवनार कत्तलखाना. त्याच रस्त्याने पुढे आलो की मानखुर्दच महाराष्ट्रनगर, मंडाला. खेड्यापाड्यातून दलित मुंबईत येतंच आहे त्यामुळे इथल्या खाडींना आत जाण्याशिवाय काही पर्याय पण उरला नाही हे. असं ही नाही की मुंबईत या सगळ्या लोंढ्यांना राहायला जागा उपलब्ध नाहीये. जागा आहे. ते सरकार किंवा मग रिअल इस्टेट माफियांच्या मांदियाळी पडलेली आहे. बिल्डिंगा बिल्डिंगा ओस पडल्या आहेत. पण SRA, MHADA च्या बिल्डिंगांमध्ये गावच्या गाव कशाबशा दाबून दाबून भरलेत.

तसंही हा सगळा पट्टा दहा पंधरा कोलोमीटरचा पण मुंबई महानगरपालिकेला अजूनही याच मोजमाप करता आलेलं नाही. अशी त्यांनीही ग्वाही दिली. हा पूर्ण परिसर १९६५-६६ पासून बनायला सुरुवात झाली आहे. एक आज्जी म्हणाली होती की,

“१९६२ ला भयानक दुष्काळ आला. गावातल्या पाटलांनी आणि दुष्काळाने आमचं राहणं मुश्किल केलं आणि आम्ही जीव वाचवून मुंबईला धावून आलो. राहायला पर्याय उरला न्हवता. ही कचरापट्टी आम्हाला पाटलानं पेक्षा बरी भासली होती. इथे येण्याचा पच्छाताप कधीच नाही झाला.”

वस्तीतल्या रस्त्याच्या दोघ टोकाला चाळीच्या चाळी उभ्या आहेत. रस्त्यांची लांबी उपलब्ध जागेनुसार बदलत जाते. तरीही सरासरी अर्धा किलोमीटर लांबीच्या एका रस्त्याच्या दोन्ही बाजूला वीस ते तीस चाळी उभ्या आहेत. याच रस्त्याच्या कुठेतरी BMC ने एक स्वच्छतागृह प्लस संडास दोन रुपये भावाचा दिलेला आहे. कचराकुंडी. त्याला लागूनच एक समाजमंदिर.  याच समाजमंदिरात मग लग्न, दहावं, उटणं-बसणं होत असत. समाजमंदिराच्या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा बुटका पुतळा पण असतो. बुद्धांचा कमरेएवढा पुतळा पण बघायला भेटतो. रमाबाई पासून तर मानखुर्द पर्यंत हेच चित्र. हा परिसर गच्चं भरून गेलाय. चालतांना रस्ता शोधावा लागतो. प्रत्येक रस्त्याच्या कडेला नाला, सांडपाण्याने काळ्याशार पडलेला खाडीचा कुबट वास, त्यात देवनारच डम्पिंग ग्राउंड, माहूलच्या कंपन्यांमधला उचकटणारा वास हे सगळं यांनाच भोगावं लागत. इथला पूर्ण समाज हा ऐंशी टक्के दमा-अस्थमा ने ग्रसित आहे. सूर्याची  किरणे, ऑक्सिजन यांना मिळत नाही.

वडाळ्याजवळची दलित वस्ती ही अश्याच प्रमाणात श्वास घेत आहे. पांजरपोळ आणि वाशी नाक्याची वस्ती ही दलितानीच भरून पडलेली आहे. या एरियामध्ये नाशिक-सांगली-साताऱ्याहून आलेल्यांची संख्या जास्त. परिस्थिती बघून डी बी पवारांनी गरजू व्यक्तींना जागा मिळवून दिली. कामही शोधून दिले. एवढंच नाही तर त्यांच्या मुलं-मुलींसाठी प्राथमिक शाळाही सुरु केल्या. लेबर कॅम्प ही तसाच उभा. म्हणजे धारावीची लोक जशी कत्तलखाना हलवल्यामुळे देवनार ला आली, तशी ती इथे तिथे सांभाळ करीत होती. हा एरिया नवबौद्ध बहुल पण इतरही मोठ्या संख्येने नांदीगोडीने राहत आहेत.

कामासाठी गावाकडून मुंबईत आलेल्या सर्वानांच नोकऱ्या पाहिजे होत्या. शिक्षणाचं प्रमाण कमी. कार्यकुशलता नाही. भांडवल नाही म्हणून BMC ची कचरा उचलणे, गोळा करणे, फेकणे, गटारीत उतरणे, गटारींना साफ करणे, संडास साफ करणे, मुळदे उचलणे-फेकणे अशी कामे पदरात पाडून घेतलीत. म्हणजेच मनुस्मृतीने आणि वर्णाश्रमाने गांडीला बांधून दिलेला  झाडू आणि तोंडाचे मडके गेले पण कामं तीच राहिली. या खालोखालच वॉचमन, गार्ड, हेल्पर कंत्राटावर किंवा रोजंदारीवर काम करीत दलित समाज जिवंत आहे. काही लोक डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा एखाद्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारा म्हणजेच पुढारलेला मनाला जातो किंवा जाते. कचऱ्यामधून प्लास्टिक कागद, भंगार गोळा करून गुजराण करणाऱ्याला पोरी भेटणे कधीच अवघड गेलं नाही. ज्यांचे नवरे कामाला  नाहीत अशा बायका धुणीभांडी, भाजी-मच्ची विक्री आणि आता आता ऑफिस ची कामे थोड्या फार फारकत करतात. १९६०-६५ ला पहिली पिढी आली. आता त्या पिढीची नातवंडे कॉलेज ला किंवा मग कुठे तरी मॉल मध्ये, मॅकडॉनल्ड्स मध्ये, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मग इतर छोट्या-मोठ्या प्रकारची कामे करतांना दिसतात. घरच्या गरिबीला न हरता तिसऱ्या पिढीतील काही टक्के जनता ही पॉलिटिक्स कडे ही वळली आहेत. काही नशेत बेकार झालीत तर काही राजकीय दृष्ट्या सजग झाली आहेत. या वस्त्या त्या अर्थाने डोळे उघळूनच आहे. पिचलेला दलित समाज आणि त्याची परिस्थिती अशी का झाली आहे याच उत्तर त्याच्याकडे नाहीये. त्याच्याचमुळे त्याचा एकटा चालो रे चा आवाज त्याला गिळंकृत करत असतो. त्याच्या खटपटीला एक दिवशी स्पॉट स्फोट होतो. कधी काय तर कधी कोण त्याचं लक्ष्य बनत असतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना, अत्याचाराची बातमी किंवा मग काही ही कारण त्याला मुंबई बंद पडायला भरपूर असत. ३ जानेवारी २०१८ रोजी मुंबई बंद आणि महाराष्ट्रभर धर पकड हे त्यांचं फलित होतं.  

दलितांमधील अस्वस्थता, त्यांच्यातला उद्वेग व्यक्त होत असतो. जयभीम बोलो बम्बई चलो म्हणत, लोंढे एकदा अनुभव घेतात. त्यामागचा खरा उद्देश नोकरी-भाकरी. आणि महारवाडा, बौद्धवाडा, राजवाडा, मांगवाडा, चमारवाडा मधून त्याची सुटका होईल हा पण त्याचा आतला आवाज. त्याच्या उराशी स्वप्न की, रोजीरोटी मिळेल आणि अस्मितेने जगेल. गावातली घृणास्पद वागणूक मुंबईत आल्यावर बंद होईल अशी त्याची समज झालेली…. पण, गावाकडे जन्माला चिकटलेलं आयुष्य मुंबईतही नाही सुटलं. दलित वस्त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच वसलेल्या आहेत. गावातल्या दलित वस्त्या आणि इथल्या दलित वस्त्यांमध्ये काही गुणात्मक फरक आढळून येत नाही. ही असं आयुष्य जगायला प्रवृत्त करणारी प्रकिया, घृणात्मक अनुभव देणारी ठरली. म्हणूनही की काय ‘जगण्याचं नाव लवडा’ रूपक म्हणून वापरलं असावं. असंतोष विलास घोघरे सखोल चिंतन मनन करून लिहून जातात ---

 

“आम्ही पुण्या-ममयची लोकं

कसा बेकडं आमचा झोक

जयभीम जयभीम म्हणतो

गांडूचं जिणं जगतो”

 

आजही बोचणारे शब्द जणू काय बेकडं झोक दाखवायला जत्रेत जातं असावा.

या परिसरातल्या लोकांच्या नशिबी एका बाजूला कंत्राटदाराकडून मिळणारी सफाईची कामे आहेत किंवा मग तशाच प्रकारचे दुसरं काम असतं. फुटकड मजुरीची, श्रमाची कामे ही जनता करत आहे. म्हणजेच जातिव्यवस्थेने ठरवून दिलेली कामे आजही त्यांना करावी लागत आहे. त्यांना शिकताही येणार नाही आणि कुठल्याच  धंद्यात जाता पण येणार नाही अशी ग्वाही देत व्यवस्था आपली लाथ दलितांच्या मानेवर धरून उभी आहे. ती लाथ कापून टाकण्याची धडपड करणारा शांघाईत स्वतःला इमॅजिन करीत बसला आहे. तो असाही गुन्हेगार तसाही गुन्हेगारच ठरला. जबरदस्तीने घोषित केल्या जाणाऱ्या गुन्हेगारांचं परत मॅपिंग केलं जात आहे. त्यांचे रोजी रोटी बेटी व्यवहारे बंद करण्यात येत आहेत. तरीसुद्धा मोठ्या धडपडीने यांचे रोजीरोटीबेटी व्यवहार होत आहेत. एकमेकांमध्ये त्याचे व्यवहार सीमित आहे. थोड्याफार प्रमाणात असे व्यवहारे आंतरजातीय आणि धर्मीय आहेत. चुकून यांचे व्यवहारे जर हा एरिया सोडून झालेच तर ते गावाकडे आणि आपापल्या जातींमध्येच. वडाळा-घाटकोपर-चेंबूर-धारावी-सायन-कुर्ला-गोवंडी-मानखुर्द-माहीम-बैरामपाडा-माहुल-वाशीनाका आणि विस्तवालेला दलित समाजाचा  विकासच नाही तर मुंबईचे शांघाई कस शक्य?  

मुंबईच्या एकूण विकासात ज्या वर्गाच्या हाती काहीही लागलं नाही. उलटं त्यांची आयुष्य वेगवेगळ्या कारणांनी धुमसतच गेली. मग त्या दंगली असोत किंवा मग रोगराई. बॉम्बस्फोट असोत की मग महागाई. मुंबईतल्या शोषित पीडित जनतेचं श्रम इथल्या ठेकेदारांना हवंय; पण ते श्रमिक कामगार नकोत. असा जो पायंडा पडला आहे तो कितपत योग्य आहे? श्रमिक तो फक्त श्रमिक आहे असं भासवण्यात व्यस्त झालाय.  

 

मुंबईची सभ्यता की मुंबईची स्पिरिट?

बुद्धिस्ट, शैव, मुसलमान आणि पोर्तुगीज अश्या प्रकारच्या प्राचीन सभ्यता मुंबई मध्ये आढळून आल्या आहेत. बदल होत गेले, आर्थिक राजकारण जोमात आलं. पण, प्राचीन सभ्यतेचा गर्व न बाळगता मुंबई धगधतच राहीली. मग ती धगधग काही कारणांसाठी का असेना मुंबई झालेले बॉम्ब हल्ले मग आतंकवादी हल्ले घोषित पण झालेत तरी सुद्धा मुंबईची सभ्यता ही बुद्धिस्ट, शैव मुसलमान, पोर्तुगीज च्या पल्याड गेली. मुंबईची स्पिरिट ही इथली सभ्यता बनून गेली. मुंबईच्या विकासात ज्याच्या हाताला काहीच लागलं नाही अश्या वर्गाचंच जिणं धुमसत राहिलंय. मग त्या दंगली असोत की रोगराई किंवा मग बॉम्बस्फोट हल्ले असोत की महागाई. धुमसत राहणारा वर्ग हा पिडीतच राहिला. इथल्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेला जनतेचं श्रम पाहिजेत पण ते गरीब श्रमिक नको. हा जो पायंडा पडलेला तो कितपत योग्य? सफाई कामगार पाहिजेत पण दलित नको. भैय्या नकोत पण टॅक्सिवाले, चाट, भेळ बनवणारे पाहिजेत. कोळी लोक नकोत पण त्यांची मासी क्युसीन साठी पाहिजेत. सेक्युलर भावना आहे असं दाखवण्यासाठी मुस्लिमांचे एस्थेटिक पाहिजेत पण मुस्लिम नकोत. वेश्या व्यवसाय करणाऱ्या, डान्स बार मध्ये नाचणाऱ्या पाहिजेत अन त्यांच्या वस्त्या नको. जणू काही असाच होणार आहे मुंबईचा कायापालट आणि मुंबईच्या शांघाई असाच करणार आहेत बहुतेक.

Photo Credits- Shivam

मुंबईमध्ये मुस्लिमांच्या वस्त्या तशा बऱ्याच ठिकाणी आहेत. लहान मोठ्या जुन्या नव्या अशा वस्त्या मुस्लिमांच्याही आढळून येतात. कुलाब्यापासून तर देवनार डम्पिंग पर्यंत मुस्लिमांच्या वस्त्या आहेत. त्यातही युपी बिहारमधून येणारा मुस्लिम समाज जास्त दिसून येतो. हाच समाज मुंबईच्या रस्त्यावर १८-१९ तास काम करतांना दिसतो. दूधवाला, भाजीवाला, चक्कीवाला, भंगार विकणारा, घेणारा, पानवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला, बांधकाम मजूर, रखवालदार, सेक्युरिटी गार्ड, प्लम्बर, सुतार फर्निचरवाला, चौकीदार, भेळ बनवणारा, कुल्फी विकणारा व प्राध्यापक, डॉक्टर बिल्डर ही आहेत. उच्च अधिकारी आहेत. यांच्या वस्त्या कर्जत-कसारा-विरार-पनवेल पार जातात. पण त्यात युपी बिहारीच नाहीत तर राजस्थानी, उडिया बंगाली अन बांगलादेशी ही त्यात आहेत. मुंबईचा तबेला त्यात ही फेमस होता. एक तबेला सेठ पूर्ण गावाला उचलून आणायचा अन मग त्याला गावातले सगळे भैय्या म्हणायचेत. जोगेश्वरी ला तबल्याचं गाव म्हटलं जायचं. आता हा सगळा तबेला बोरिवली गोरेगावच्या जंगलात ढकलला गेला आहे. या सगळ्यांना तबेला आणि त्यांच्या आजूबाजूच्या धंद्याला याच धंद्याचं आधारही होत. या लोकांचा तबेला जेव्हा त्यांच्यापासून दूर गेला तेव्हा या लोकांची मेहनतचं त्यांची संपत्ती झाली.  

मुंबईत जशीजशी जागेची कमतरता भासायला लागली तसतशी या तबेल्यांची जागा बिल्डरांना खजिना वाटला. या लॉबीने राजकीय, सामाजिक, आर्थिक कोंडी करून दहशतीचा वापर करून तबेल्यांच्या जागा ताब्यात घेतल्या. तंबेलांच्या जागेवरही मोठमोठाले बिल्डिंगी आणि उपनगरे उभी आहेत. श्रमिक मजुराने १८-२० तास काम करून मुंबईवर छाप तर सोडलीच पण १८-२० तास काम करण्याचं अमानवीय कृत्ये त्यांना लाज बाळगायला टाईम पण उरू देत नाही. कारण तर काय गावखेड्यातील दरिद्रता, उपासमार, वरच्या जातीतल्या लोकांचा त्रास एकंदरीत बेरोजगारी. जे खोक्यामध्ये पान विकत होते ते मोठे पानवाले झालेत. हा त्यांचा प्रवास अतोनात मेहनतीचा आहे. एका एका खोप्यात १०-१५ लोक राहतात. समस्या आहेत त्यांना, पण ते जास्त बोलत नाहीत. या सगळ्यात ही मुंबईत स्थलांतरितांना छपरं आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला की ते इथल्या दयनीय अवस्था आणि व्यवस्थेशी दोन हात करायला तयार होतात. पण असंही  नाही की ही लोक जात मानत नाहीत. मुंबईत येणार प्रत्येक जण त्याच गावपण जपून आहे, मग भैय्याने का मागं राहावं?

आत्ताआत्ताच्या “काला” ने धारावीतल्या तत्सम मद्रासी लोकांना आस दिली. बरेच लोकांनी मग मद्रासी लोकांच्या जीवनमानाच्या बाबतीत चर्चा सुरु केली. असं न्हवत की आधी यांच्या बाबतीत चर्चा नाही झाली. धारावीला असच थोडी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणतात. चर्चा झाली होती धारावीची पण मद्रासी बाबू लोक माटुंग्याला आणि गरीब पीडित जनता ही धारावीला अशी दरी दाखवणारी कधीच नाही झाली. बाबू लोकांमध्ये बहुसंख्य हे ब्राम्हण आणि कामगार मुखत्वेकरून अनुसूचित आणि मागासवर्गीय आहेत. जेव्हा कामगार चामड्याच्या धंदा करीत त्याला लागूनच ते लब्बाइचा धंदा करीत. असेही म्हटलं जात की लब्बाइचा धंदा करनारे तमिळ आणि बाबू लोकांची तमिळमध्ये फरक आहे.

शेटवाडी मध्ये तेवर राहतात.छोटेमोठे व्यवसाय करणारे कोणार्क यादव, न्हावी, धोबी इत्यादी.म्हणजेच  अन्य मागासवर्गीय अरुंधती, आसारी, सोनार, चेट्टीयार, व मुदलियार ही इथे राहतात.शिकलेले रेड्डीयार आणि पिल्लेपण आढळून येतात. तमिळच नाही तर अक्ख्या दक्षिण भारतातल्या बऱ्याच जाती धारावीत राहतात.धारावीतल्या चामड्याच्या धंद्यात असलेले बहुतेक लोक आपली आपली ओळख चर्मकार म्हणूनच करतात. पण ते ढोर, हराळे, चांभार, हरळय्या, रोहिदास, कंकऱ्या, हे ही आढळून येतात. असं भासतं की हे जुने रहिवाशी इथे कसाबसा श्वास घेत आहेत. चर्मकार उद्योग गलीच्च मानला जातो पण चामड्याचा उद्योगाला आयात निर्याती मध्ये अनन्य साधारण महत्व आहे. प्रक्रिया करणारा ढोरं आजही वंचितच आहे. प्रक्रिया छोट्यामोठ्या कारखान्यामध्ये होतात. हे ब्राम्हण कारखानदार आज गळगट्ट पैसेवाले आहेत. पंडित, दाभोलकर, लेले, भागवत हे कारखानदार आणि हे कधीच ढोरांसारखे जगले नाहीत. काही जैनांचा चामड्याच्या व्यवसाय आहे तर तिथे त्यांना त्यांची भूतदया आडवी येत नाही. एक मेलेल्या ढोरावर प्रक्रिया करून चामडे बनवायला सात दिवस लागतात.

एका चामड्यामागे मजुराला जास्तीत जास्त सातशे रुपये मिळतात. ढोरांची तिसरी पिढी आज जयभीम करतांना दिसते. त्यांनी पिढ्यांगात चालत आलेल्या कामाला नकार दिला. पण धंदा तडजोडीने चालूच आहे. गावाकडची शोषित बेरोजगारीला कंटाळून मुंबईत येणाऱ्या लोंढ्याचा गैरवापर हे चमडी कारखानदार करीत आहेत. ढोरं आज बहिष्कृत झाल्यागतच आहे. धारावीचा मजूर कुलाबा किंवा इतर मुंबईमधून दृढतापूर्वक आणि जबरदस्तीने आणला गेलाय. धारावीचा कत्तलखाना मग देवनार ला आला. हा मजूर मग देवनार-घाटकोपर-चेंबूर-गोवंडी-मानखुर्द ला परत दृढतापूर्वक आणि जबरदस्तीने आणला गेला. आता शांघाईच्या वाऱ्यात हा परिसर चांगला दिसत नाहीये. त्यातले काही कल्याण-बदलापूर विरार पनवेल ला गेलाय. चामड्याचा खालोखाल धारावीत चालणारा मोठा धंदा म्हणजे गारमेंट्सचा धंदा. या धंद्यात तमिळ-केरळी आणि युपी बिहारचे मुसलमान अधिक. मग जेव्हा जेव्हा दंगली उसळल्यात तेव्हा तेव्हा यांच्या मधेच तणाव. सहजासहजी यांना धर्माच्या नावावर तोडणे कठीण आहे तर सगळ्याच प्रकारच्या साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हीच जनता आज भारताचा पंतप्रधान दहशत वाद्यांपासून वाचवायला भाजप ला मतदान करा म्हणतोय. २००८, २००६, २०११, १९९३, २००२ या वर्षी झालेले मुंबईतले हल्ले यांनी मुंबईतल्या गोर गरीब जनतेला अजून धोक्यात टाकून ठेवलंय. पंतप्रधान मोदी सरळ सरळ धमकीच देता हेत जणू की भाजप ला मतदान करा दंगे आणि हल्ले होणार नाहीत. जर नाही मतदान झालं तर हमखास होईल. उपरोधिक भाष्य.

माणसांनी आयुष्य तुडवून कष्ट केलीत तर ही अशी उभी राहिलेली मुंबई. धारावी, वडाळा-घाटकोपर-चेंबूर-धारावी-सायन-कुर्ला-गोवंडी-मानखुर्द-माहीम-बैरामपाडा-माहुल-वाशीनाका मुंबई महानगरपालिकेच्या आदेश GR मध्ये घुरफ़टून आहे. मुंबईच शांघाई बनेल आणि तीच कॅपिटल बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बनेल. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ला एका साईड ने धारावी तर दुसऱ्या बाजूने कुर्ला आहे. शांघाईच्या कॅपिटल ला लागून असणारा धारावी कुर्ला कसा शोभून दिसेल. ही दयनीय अवस्था शांघाईत नसणार आहे म्हणे.

जनतेची मुंबई सोबतची कशी बांधिलकी दाखवण्यासाठी शिफारशी देणाऱ्या बऱ्याच कलाकृत्यांचं योगदान आहे. नामदेव ढसाळ आणि मुंबई यांचं नातं नुसत्या शिवाशिवीच्या  रूपक भाषेत कधीच सीमित होऊ शकत नाही. त्याला साहित्याच्या इतिहासाची अन त्यासोबतही स्थलांतर, बेरोजगारी आणि दयनीय अवस्थेचं पाठबळ आहे. फॉल्कलंड ला वाढलेले नामदेव ढसाळ टॅक्सी चालवून चालवून कविता लिहीत गेले. जे त्यांनी पाहिलं-अनुभवलं, ते त्यांनी कवितेत उतरवायला सुरुवात केली. रंगिल्या मुंबईची, उघड्या-नागड्या मुंबईची, इथल्या फाटक्या जिंदगाणीचा आस्वाद तर त्यांनी दुनियेला दिलाच…. त्याचबरोबर उत्तमप्रकाराचा तयार केला गेलेला लेखी पुरावा आहे. मुंबईतच त्यांना उद्ध्वस्थपणाची जाणीव झाली आणि स्वतःच्या आयुष्याला शब्दांनी व्यापून टाकले. त्यांचे साहित्य मग जातिव्यवस्थेविरोधी, परंपरेविरोधी, सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड पुकारायला लागली. त्यांची ‘मुंबई मुंबई प्रिये रांडे’ ही कविता जेवढी अंतरंग समजून घेण्याची कुवत ठेवते; तेवढी हिम्मत दुसऱ्यांच्या कविता हिम्मतपण करीत नाही. आणि त्याला पाठबळ हे भोगलेले आयुष्य आहे. मुंबईला ते स्वतःला स्वीकारायला लावतात आणि प्रस्थापितांच्या थोबाडि थापड मारून ते म्हणतात की,

“माझ्या प्रियेचा दगड मला अधिकच प्रिय आहे

चार वेद अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे

मी मारतो लंडावर

सहा राग छत्तीस रागिण्या

मी खेळवतो उरावर

छान या सुभगवेळी

तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?”

ढसाळांबरोबर बाबुराव बागुल, भाऊ पाध्ये, नारायण सुर्वे हेही तेवढेच दमदार लिखाण करणारे साहित्यिक. बागुलांची कथा ‘मुंबई स्वस्थ होत आहे’ मध्ये मुंबईचे जे वर्णन त्यांनी केलंय किंचितही एवढी दारिद्र्यता थोड्या शब्दात कोणी वर्णन करू शकेल. नव्या जाणिवांतून जन्मलेली, भावविवशता, तंत्रबद्धता, सांकेतिकपणा इत्यादी दोषांपासून मुक्त झालेली मरण स्वस्थ होत आहे. नवकवितेप्रमाणेच जीवनाच्या सा-या अंगांना मनमोकळेपणाने भिडत मुंबईतल्या लोकांचं विश्व, भावविश्व, कल्पना आणि मुंबईतलं त्यांचं जिणं दाखवत असते. प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालून भारतीय समाजाचं भीषण आणि धडकी भरवणार प्रखर वास्तव दया पवार मुंबईतील बालपण त्यांच्या ‘बलुतं’ मध्ये दाखवत असतात. त्यांचे आत्मकथन दुःख यातना आणि कशा बलुतं बांधून ठेवत आहे, दाखवत असते. बलुतंमधला दगडू हा मुंबईच्या दयनीय व्यवस्थेविरुद्ध राहता राहता कसा मुंबईतल्या वस्तीत रोल मॉडेल बनतो, हा दगडूचा प्रवास. दगडूचा प्रवास बलुतं मध्ये कावाखान्यातून होते. दगडूचा बाप सुक्या गोदीत कामाला. दहा बाय बारा च्या खोलीत दगडूचे आई वडील आज्जी आणि त्याच्या चुलत्याची फॅमिली पण राहायची. कावाखाना आता शोधून सापडणार नाही पण तो नागपाडा मध्ये आहे. कामाठीपुरा, गोलफिटा, चोरबाजार अशी वर्दळ आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच मुंबईच आयुष्य, दया पवार टिपतात. सुर्व्यांची मुंबईची लावणी आणि बिगारी नाका या कविता सूक्ष्म रीतिने वाचकांना टिकवून ठेवतो. प्रस्थापितांच्या मुंबईवरच्या कविता ठोसत वाटतात. सुर्वे म्हणतात की,

“बिगारी नाक्यावर येणारा कामगार

दुसऱ्यांसाठी बिल्डिंगी बांधतो

पण त्याच स्वतःच घर

जमीनदोस्त होतांना बघून

त्याचा अपमान ज्या प्रकारचा असतो

तसा दुसऱ्याचा कधीच होत नाही.”

मग जगणं किती महाग आहे अन मरण किती स्वस्थ याच उदाहरण मग बागुलही देतांना दिसतात. रेल्वे पटरीच्या एका बाजूला बायका शौच करतात आणि दुसऱ्या बाजूला पुरुष करतात, आणि तरीही नांदीने सगळं चाललंय.स्मार्ट बनण्याच्या नादात आताच आयुष्य जसा पोलीस पहारा देतो संशयितांवर, तसेच काहीसे जनता ही संशयित झाली पहारा पाळत ठेवला जात आहे. अण्णाभाऊ साठेंची मैना लावणी ही जणू काय एकात्म महाराष्ट्र निर्माण करण्यासाठीच बनली की काय असा भाष होतो. त्यांची लावणी मुंबई तर पिंजून काढतच होती तरी सुद्धा ती मुंबईची दरी दाखवत होती. आणि जगाला मुंबई बाबतची एक अनोळखी बाजू ही दाखवते.

आगर म्हणजे भात, आणि भाताची शेती करणारे आगरी, असल्या इतिहासात न जाता, असं बघता येईल की, कोळी समाजाला आगरी पण म्हटलं जात. हा समाज तसा OBC कॅटेगरीत गणला जातो. मुंबई शहराच्या आजूबाजूला वसलेला आगरी समाज धन साठ्याच्या बाबतीत बराच पुढारलेला आहे. त्यांची घरे, गाड्या तसेच सोन्याची अलंकारे बघून, ‘सामान्य’ (?) मिडल क्लास पण थकीत होतो. दुबईचा माल सात बेटांच्या बराच दूर म्हणजे ठाणे, कल्याण, उरण, अलिबाग, पनवेल, कर्जत, विरार, वसई, डहाणू, रेवास, जंजिरा याठिकाणी उतरायचा, आणि इथून मुंबई मेनलॅन्ड मध्ये ट्रान्सपोर्ट केला जायचा. आता ‘दुबई वरून येणारा माल आणि त्याचा हिस्सा इथल्या लोकांना नाही तर मग कोणाला’, अशी पण एक समज आहे. यावरूनच हा समाज मजबूत-दणकट आणि भोळा भाबडा मानला जातो. कारल्याला-हिंगळाईला आणि गावदेवीची पूजा जेव्हा होते, तेव्हा हा समाज नशा प्राशन न करता नशेत. दरयेचा राजा आणि समानता इथे नांदलेली. आदिवास्यांमध्ये जेवढा डान्स, स्त्री-पुरुष सोबत करत असतात, तेवढाच हे पण सोबत करत असतात. हुंडा यांना अमान्य.

Photo Credits- Shivam

शिवाजी महाराजांना यांनी मदत केली, तसे हे त्याकाळात मावळे म्हणूनच ओळखले जायचे. हे सगळे शाबूत ठेवण्यासाठी हा समाज परत स्वतःला मावळा म्हणून जीवाचं रान करून सागरी किल्यांवरती साफ सफाई करायला जात असतो. इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महारांजाच्या बाबतीत एक आख्यायिका आहे. कल्याणची सुभेदाराची सून आणि ‘कुलकरण्या’ म्लेंच्छांना धडा शिकवण्यासाठी तिला शिवाजी महाराजांना भेट देत असतो, आणि तिच्या कमरेचा बेचा तोडायला लावतो, शिवाजी महाराज तेव्हा त्या कुलकरण्याला शिकवतात, ते तसे झालेत, आपण नको व्हायला. ही आख्यायिका कल्याणचे आगरी आजही मावळे स्वतःला संबोधुन अस्मिता जपण्याचं प्रयत्न करत असतो. एका अर्थाने इतिहास जिवंत ठेवून आहेत.

आगरी आजही म्हणतांना दिसतात की, महाराष्ट्राची खरी संपत्ती पूर्णरूपात आणण्यासाठी आगरी मावळ्यांचे योगदान महत्वाचे. आजही खाड्या आणि समुद्राचे बरेच हिस्से कोणाला नाही तर यांना माहित आहेत. मुंबई जसी उभी त्यात पण यांनीच रेती पुरवली. मासे पुरवितात. बोटी चालवतात. गाणी गातात. मुंबईत जेव्हा लोकं येतात, तेव्हा ते बिल्डींग्स, VT स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, ताज आणि तत्सम गोष्टींकडे लक्ष जात असते. समुद्र आणि किनारा लाभलेला असून सुद्धा त्याच्या सगळ्यात जवळची नागरी व्यवस्था म्हणजेच आगरी कोळ्यांचे जिणं दुय्यम आणि इग्नोरड मानण्यात आलेले आहे. हा तोच समाज आहे जो मुंबईला घडवण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलतो.