Quick Reads

मुकनायकाची शंभर वर्ष व समांतर माध्यमांचं महत्त्व

माध्यमे मालकीची असण्याचं महत्त्व बाबासाहबांनी वेळीच ओळखलं होतं.

Credit : द वायर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मुकनायक’ वर्तमानपत्र सुरु केलं त्याला आज १०० वर्ष पूर्ण झाली. जे वाचा असून बोलू शकत नाहीत त्यांचा आवाज म्हणजे मुकनायक. 

माध्यम संस्थेत मालकांचा वृत्तपत्रांच्या संपादकीय धोरणांवर किती परिणाम होतो याची आंबेडकरांनी जाण होती. सुरवातीच्या काळात सुरु झालेली वृत्तपत्रे नॅशनल कॉंग्रेसशी संबंधीत होती. साहजिकंच त्यात केले जाणारे वार्तांकन एकांगी होते. तिथे वंचितांच्या प्रश्नांना जागा नव्हती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. महाडच्या चवदार तळ्याचा लढा आणि नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश ही गांधीजींच्या दांडीयात्रेसारखीचं सत्याग्रह पद्धतीने केलेली आंदोलने होती. परंतू दुर्देवाने त्याचे चित्रण वृत्तपत्रांनी तसे केले नाही. बाबासाहेबांनी फक्त दलितांचे नेते एवढीच ओळख शेवटपर्यंत चिटकून देण्यात मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांची भूमिका होती.

ए. मुजुमदार त्यांच्या इंडियन प्रेस एन्ड फ्रीडम स्ट्रगल या पुस्तकात म्हणतात, “भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास हा इथल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्याचं केंद्रस्थान नॅशनल कॉंग्रेस होतं. साहजिकंच फक्त कॉंग्रेसमधील लोकांनी सुरु केलेल्या वर्तमानपत्रांचा इतिहास हाच भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास म्हणून ओळखला गेला आणि इतर वृत्तपत्रांकडे डोळेझाक झाली.”

स्वातंत्रपूर्व काळात सुरु झालेल्या वर्तमानपत्रात धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा विषयांवर लिहायला सुरवात केली होती. राजा राम मोहन रॉय यांनी मिरत उल अखबार या पर्शियन भाषेतील वृत्तपत्रातून सतिप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता यांच्याविरोधात लिहलं. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या दीनबंधूने दलितांचे प्रश्न मांडायला सुरवात केली.  शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागुजी बनसोडे हे दलितांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करणारी मंडळी होती.

मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी दलितांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष ओळखून बाबासाहेबांनी मुकनायकची सुरवात केली. ते पाक्षिक होतं. मुकनायकच्या वरच्या भागात

काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले।।

नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।  

ही संत तुकारामांच्या अभंगातील वचने छापलेली होती. अंकातला मनोगत हा संपादकीय लेख बाबासाहेबांनी लिहिलेला होता. 

मुकनायकला बाबासाहेब पूर्ण वेळ देऊ शकले नाहीत. पहिले सहा महिने त्यांनी संपादकीय जबाबदारी सांभाळी. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सला डॉक्टरेटसाठी गेल्यावर पांडूरंग नंदराम भटकर यांना संपादक पदाचं काम सोपवण्यात आलं. ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टला कामाला होते. पुढे ज्ञानदेव घोलप यांनी मुकनायकंच संपादन केलं. 

मुकनायक त्याच्या ब्रीदवाक्याप्रमाणे दलितांचा आवाज होता. सामान्य माणसांनी लिहलेली पत्रे त्यात छापून येत. मुकनायकच्या पहिल्या अंकात बाबासाहेब लिहतात, "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.

मुकनायकाला सुरवातीला शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची मदत केली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी दैनिकाने मुकनायकच्या पहिल्या अंकाची जाहिरात मोफत तर सोडाच पण पैसे घेऊनही छापण्यास नकार दिला होता. मुकनायकचे मर्यादित सभासद होते. सुरवातीला ७०० असलेली संख्या पुढे जुलै १९२२ला १००० पर्यंत पोहोचली. एका अंकाची किंमत २.५ अणे होती. मुकनायक तीन वर्ष चालला. दरम्यानच्या काळात अनेक आर्थिक अडचणीत या पाक्षिकांनी तग धरुन ठेवला होता.  

महाड सत्याग्रहाच्या काळात ३ एप्रिल १९२७ 'बहिष्कृत भारत' सुरु केलं. मुकनायकच्या तुलनेत बहिष्कृत भारतला लोकांकडून बरं आर्थिक स्थैर्य मिळालं असं म्हणता येईल. परंतू पूर्णवेळ कामाला माणसं ठेवता येतील अशी परिस्थिती नव्हती. पुढे आर्थिक परिस्थिती नाजूक असण्याच्या काळात तर वार्तांकनापासून ते मजकुराचे संपादन तसेच संपादकीय लेख लिहण्यापर्यंत सर्व कामे बाबासाहेबांनी स्वतः केली.   

माध्यमे मालकीची असण्याचं महत्त्व बाबासाहेबांनी वेळीच ओळखलं होतं. याशिवाय एक पत्रकार म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती. पत्रकारितेतील संपूर्ण लिखाण त्यांनी मराठी भाषेत केलं. त्याकाळी जनसामान्यांना कळणारी तीच भाषा होती. याउलट तुलनात्मक  दृष्टीने पाहिल्यास महात्मा गांधींनी १९३३ साली अस्पृश्यांसाठीच सुरु केलेल्या हरिजन वृत्तपत्राची भाषा इंग्रजी होती. 

२००६ साली 'ऑक्सफॅम इंडियाने' केलेल्या सर्वेक्षणानुसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या हिंदू सर्वणांचे प्रमाण ७१ टक्के आहे. लोकसंख्येतील त्यांचा वाटा फक्त ८ टक्के आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या विविध ३७ माध्यमसंस्थात निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थानी असलेल्या ३१५ लोकांचा यात अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. भारतातल्या त्या काळच्या सर्वात मोठी वृत्तसंस्था असलेल्या असोसिएटेड प्रेस ऑफ इंडियाबद्दल बोलताना बाबासाहेब एका ठिकाणी नोंदवतात, "भारतातची मुख्य वृत्त वितरण संस्था असलेल्या असोसिएटेड प्रेसचे बहुतांश कर्मचारी हे मद्रासचे ब्राम्हण असल्यामुळं त्यांच्या हातात माध्यमांचा ताबा आहे, आणि ते त्यांनाच ज्ञात असलेल्या कारणांसाठी पूर्णतः काँग्रेस समर्थक आहेत आणि काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या कोणाहीविरोधात ते आक्रमक आहेत, अशा बाबी अस्पृश्यांच्या नियंत्रणापलीकडच्या आहेत.  

समांतर माध्यमांचे महत्त्व बाबासाहेब ओळखून होते म्हणून त्यांनी स्वतंत्र वृत्तपत्रे चालवली. वंचित घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा समावेशथेट माध्यमांमध्ये असणे गरजेचं आहे. भारतात लोकशाही मूल्ये रुजविण्याबरोबरंच पत्रकारितेतून वंचितांचे प्रश्न प्रभावापणे मांडण्याचे काम आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून केले.