Opinion

जयंत पाटील: एक दृष्टिक्षेप

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत, अजित पवार गटाने आठ हजाराहून अधिक बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. खोटारडेपणा हा या गटाच्या हाडीमाशी मुरलेला आहे. एकदा ‘शरद पवार हे आमचे दैवत आहे’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची घोषणा करायची, त्यांच्याविरुद्ध कारवाया करायच्या, हेच दादा गटाचे धोरण आहे.

परंतु या गटातील प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे अथवा खुद्द अजितदादा पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे वा अन्य प्रकारचे गंभीर आरोप झाले आहेत. यापैकी भुजबळ हे स्वतः तुरुंगाची वारी करून आले आहेत आणि दादा गटातील अन्य अनेक नेते तुरुंगाच्याच वाटेने जाण्याची शक्यता होती. अत्यंत कलंकित प्रतिमेचा आणि विश्वासार्हता गमावलेल्या नेत्यांचा हा गट आहे. शरद पवारांच्या छत्राखालीच हे नेते वाढले. मात्र पवारांची बौद्धिक व वैचारिक उंची यापैकी कोणाकडेही नाही. पवारसाहेबांना असलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा आवाकाही यांच्यापैकी कोणाकडेही नाही.

पवार अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा एस.एम जोशी, गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील, उत्तमराव पाटील यांच्यासारख्या सामाजिक कामे उभी करणाऱ्या तसेच वैचारिक पाया असलेल्या नेत्यांच्या सहवासात ते आले. यशवंतराव चव्हाण यांचा सहवासही त्यांना लाभला आणि विविध क्षेत्रांतील नामवंतांकडून वेगवेगळे विषय समजावून घ्यावे, हा संस्कार त्यांनी यशवंतरावांकडूनच घेतला. यशवंतरावांनी जशी नेतृत्वाची एक फळी उभी केली, तशीच पवारांनीही ती उभी केली. आता त्यापैकी काही नेत्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली असली, तरीदेखील अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि मुख्य म्हणजे, जयंत पाटील यांच्यासारखे नेते पवारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.

 

 

जयंतराव हे भाजपच्या वाटेवर आहेत, असा बोगस आणि भंपक आरोप एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला होता. हा त्यांच्यावर दबाव आणण्याचाच प्रकार होता. जयंतरावांची ईडीने कित्येक तास चौकशीही केली. परंतु ते अजिबात डगमगले नाहीत. अशा चांगल्या नेत्याची केवळ राजकीय द्वेषापोटी चौकशी करणे, म्हणजे समाजातील लोकशाही मूल्ये व चांगला विचार संपवण्याचे षड्यंत्र होय, अशी रास्त ट्विपणी टोपे यांनी केली होती. एक स्वच्छ प्रतिमेचे अभ्यासू, संयमी व संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून जयंतराव ओळखले जातात. जयंतराव हे कमी बोलतात. पण अत्यंत मार्मिक पद्धतीने व्यक्त होतात.

आपण प्रदेशाध्यक्षपदी किती दिवस आहोत, यावर अजितदादांचे बारीक लक्ष आहे, अशा आशयाची मिश्कील टिप्पणी जयंतरावांनी करून राष्ट्रवादीतील फुटीपूर्वी धमाल उडवून दिली होती. महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारले तरी तो सांगेल की राष्ट्रवादी कोणाची आहे ते, असे भेदक उद्गारही त्यांनी काढले होते. मध्यंतरी जनरल मोटर्स कंपनीने आपल्या कामगारांना क्लोजरच्या नोटिसा दिल्या. तेव्हा तेथील कामगारांची भेट घेऊन, सरकारवर टीका करणारे जयंतरावच होते. तळेगाव, चाकण इथल्या कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रय़त्न होत असून, यविरोधात विधानसभेत दाद मागण्याचे अभिवचन जयंतरावांनी कामगारांना दिले.

 

जयंतरावांनी राज्यव्यापी यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुका व कार्यक्षमतांवर बोट ठेवण्याचे काम केले आहे.

 

जयंतरावांनी राज्यव्यापी यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुका व कार्यक्षमतांवर बोट ठेवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनाही मजबूत केली आहे. जगातील सर्व चांगली विकासकामे ही फक्त आम्हीच केली आहेत, असा मोदी आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांचा आविर्भाव असतो. त्यामुळे यापुढे अधूनमधून आज विरोधी छावणीत असलेल्या पक्षांमधील काही नेत्यांनी गाजवलेल्या कर्तृत्वाचाही धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याची सुरुवात जयंतराव पाटील यांच्यापासून करतो आहे.

जयंतरावांचे वडील राजारामबापू पाटील हे अनेक वर्षे मंत्री होते, प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीही अंहाकार दिसला नाही आणि हीच वृत्ती जयंतरावांचीही आहे. जयंतराव हे सिव्हिल इंजिनियर असून, अर्थशास्त्राचाही त्यांचा उत्तम व्यासंग आहे. लहानपणापासून यशवंतराव, वसंतराव नाईक, मोरारजी देसाई, जगजीवनराम, बहुगुणा, एसेम जोसी, चंद्रशेखर, बाळासाहेब देसाई, मृणालताई गोरे असा मोठ्या माणसांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. जयंतराव यांनी जेव्हा वडिलांनी स्थापन केलेल्या सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा कारखान्याची क्षमता दोन हजार टनांची होती, ती त्यांनी तिपटीहून अधिक वाढवली. इस्लामपूरची गार्मेंट फॅक्टरी जयंतरावांनी स्वतः उभी केली आणि आज जगातील या क्षेत्रातील बडे बडे तज्ज्ञ ती बघायला येतात.

‘राजाराम सॉल्व्हेक्स’ ही एक स्वतंत्र संस्था स्थापन करून ‘राजधारा’ नावाच्या गोडोतेलाचे उत्पादन त्यांनी सुरू केले. राजारामबापूंनी स्थापन केलेले इंजिनियरिंग कॉलेज अधिक अद्ययावत करून, तेथे मूल्याधिष्ठित शिक्षणावर जयंतरावांनी भर दिला. आज हे कॉलेज देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जयंतराव पवारसाहेबांची साथ करत आहेत. परंतु त्यांचेही स्वतःचे असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. जयंतराव हे महारष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेही आहेत. राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत जयंतरावांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.

 

१९९९ मध्ये जयंतराव पाटील यांनी पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता.

 

१९९९ मध्ये जयंतराव पाटील यांनी पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा अगोदरच्या शिवसेना-भाजप युतीच्या आर्थिक बेशिस्तीच्या कारभारामुळे तिजोरीत खडखडाट होता. त्यामुळे जयंतरावांनी अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून, त्या प्रतिकूलतेवर मात करण्याची आपली रणनीती काय असेल, हे विषद करणारे भाषण सभागृहात केले. त्याचे विरोधकांनीही कौतुक केले होते. मानवी विकास निर्देशांकावर भर देणारे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन जयंतरावांनी आपल्या पहिल्या बजेटमध्येच आरोग्य व शिक्षणावर भर दिला. तसेच आदिवासी, दलित, मागासवर्गीय, अन्य मागासवर्गीय, भटके व विमुक्त यांच्याकरिता खास योजना आणल्या, राज्याचा महसुली खर्च कमी करण्यासाठी मंत्री व अधिकाऱ्यांचा वाहनखर्च कमी करणे, स्वेच्छानिवृत्ती योजनेकरिता सवलती देणे, काही काळ महागाईभत्ते वगैरे गोठवणे असे कठोर उपाय त्यांनी योजले. डॉक्टर्स, कन्सल्टंट्स अशा प्रोफेशनल्सनाही करकक्षेत आणून, करांचे जाळे विस्तारले. व्हॅट करप्रणालीतही जयंतरावांनी अनेक सुधारणा केल्या. 

 

 

सहकारी साखर कारखान्यांना शासकीय हमी देण्यावर निर्बंध आणले. काही वर्षांतच जयतंरावांनी अर्थव्यवस्था रूळावर आणली आणि राज्याचा जीडीपी आठ टक्क्यांवर नेऊन ठेवला. राज्यपातळीवर आर्थिक सुधारणा राबवणारे जयंतराव यांचा उल्लेख यांचा उल्लेख मी पूर्वी ‘महारष्ट्राचे मनमोहन सिंग’ असा केला होता. एवढे सर्व करूनही, ‘मीच विकासपुरुष आहे’, असा फडणविसी टेंभा त्यांनी कधी मिरवला नाही. राज्य शासनाच्या आर्थिक दायित्वाचे व्यवस्थापन करण्यासाठी न्यास स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राज्य वीज मंडळाची पुनर्रचना करण्याचे ठरवले. ग्रामीण आणि शहरी गरिबांसाठी ग्रामीण निवारा योजना, वाल्मीकी आंबेडकर आवास योजना आणि इंदिरा आवास योजना त्यांनी सुरू केली.

तयार कपडे निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गार्मेंट पार्क’ची घोषणा केली. ग्रमीण क्षेत्रात इंटरनेट किऑस्क स्थापन करण्याचा उपक्रम जयंतरावांनी हाती घेतला. दलित विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी अर्थसंकल्पात ९० कोटी रुपयांची तरतूद केली. जयंतराव अर्थमंत्री असतानाच केंद्राच्या नियोजन आयोगाने महाराष्ट्राचा ‘ज्युवेल ऑफ इंडिया’ या शब्दांत गौरव केला. लोकशाही आघाडी सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री असताना, जयंतरावांच्या चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्राने केरळसारख्या राज्यावरदेखील मात करत, पंचायत राज उत्तरदायित्व आणि प्रोत्साहन योजनेंतर्गत ग्रामविकासात देशात प्रथम स्थान मिळवले.

 

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जवळ बोलावून, जयंतरावांची पाठ थोपटली आणि हे तुम्ही कसे घडवले, अशी विचारणाही केली.

 

त्यावेळी झालेल्या सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जवळ बोलावून, जयंतरावांची पाठ थोपटली आणि हे तुम्ही कसे घडवले, अशी विचारणाही केली. ग्रामीण विकासात केरळने आदर्श निर्माण केला होता, म्हणून जयंतरावांनी स्वतः त्या राज्याचा अभ्यासदौरा केला होता. त्यानंतर संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र, अर्थता संग्राम योजनेची यशस्वी अंमलबजावणी त्यांनी केली आणि ग्रामपंचायतींचे काम ऑनलाइन पद्धतीने होईल, अशी योजना राबवून दाखवली. बहुतेक महत्त्वाचे दाखले गावातल्या गावातच मिळण्याची सोय होऊ लागली. पंचायत राज संस्थांमधील घरात शौचालय नसलेल्या लोकप्रतिनिधींना निवडून येण्यास व सदस्य राहण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण जयंतरावांनी राबवले.

बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दारिद्र्यनिर्मूलनाच्या कामाला वेग दिला. जयंतराव अर्थमंत्री असताना राज्याचा मानवविकास निर्देशांक निश्चित करण्याचे काम सुरू झाले व त्याचे सुपरिणामही दिसू लागले. गृहमंत्री म्हणून काम करताना जयंतरावांनी केवळ स्वतःच्या इमेज बिल्डिंगचे काम न करता, पोलीस दलास आधुनिक शस्त्रास्त्रे, सुरक्षा साधने आणि बुलेटप्रूफ वाहने खरेदी करून दिली. ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवले. महाविकास आघाडीच्या काळात जलसंपदामंत्री म्हणून काम करताना मध्य गोदावरी उपखोऱ्यातील सुमारे १९ टीएमसी अतिरिक्त पाणीवापरास मान्यता देऊन, त्यांनी मराठवाड्यातील जनतेला अनोखे गिफ्ट दिले. शाश्वत सिंचनावर भर दिला.

तीन बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करून २ लाख १५ हजार हेक्टर सिंचनक्षमता नव्याने निर्माण केली. गोदावरी खोऱ्यातील पूर्वीच्या मंजूर पाणीवापरातील त्रुटी दूर केल्यामुळे सुमारे १९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येऊ लागले. आपल्या मतदारसंघात मान मोडून केलेली कामे, ग्रामीण आकलन, शहरातील विकासाच्या प्रश्नांचे भान आणि मुख्यतः व्यापक सामाजिक-आर्थिक दृष्टिकोन यामुळे जयंतरावांसारखे नेते सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या मात्र टीव्हीसमोर येऊन फालतू बकवास करणाऱ्या नेत्यांची चलती आहे. तसेच वेगवेगळ्या पक्षांत चापलुसी करत पुढे आलेले नेते आहेत. अशावेळी कधीही संयम न सोडणारे अभ्यासू, वाचनवेडे असे मनमोहन संप्रदायातले नेते अपवादानेच दिसतात. जयंतराव पाटील हे त्यापैकी एक आहेत. एकूण, राज्यातील खोकेयुक्त अशा विषारी वातावरणात आणि भाजपच्या विखारवन्हीत जयंतरावांसारखे स्वयंभू नेतेच नवी उमेद निर्माण करू शकतील.