Opinion

आम्ही केली, तर ती श्रावणी...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

अयोध्येतील राम मंदिरामुळे नवीन कालचक्राला सुरुवात झाली असून, भारतात पुढील एक हजार वर्षे रामराज्य स्थापित होईल, असा विश्वास भाजपच्या नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावात व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशात कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कालचक्र बदलले असून, नवे युग अवतरले आहे. भारतरूपी मंदिर उभारण्याची डबाबदारी साक्षात परमेश्वरानेच माझ्यावर सोपवली आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले. मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. असो.

सत्तेत जाण्यासाठी विचारसरणीशी तडजोड करावी लागते, असे स्पष्ट उद्गार, अमित शहा लोहपुरुष होण्याच्या अगोदर, भाजपचे जे लोहपुरुष मानले जात होते आणि ज्यांनी हा पक्ष देशभर वाढवला व तोच पक्ष ज्यांना विसरला, त्या लालकृष्ण अडवाणी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत काढले होते. ही मुलाखत २००५ सालची आहे. सरकार स्थापायचे असेल आणि ते स्थिर असावे अशी इच्छा असेल, तर विचारसरणीशी तडजोडी या कराव्याच लागतात. अन्यथा केवळ वैचारिक गट म्हणून किंवा दबावगटासारखे काम करावे लागेल. परंतु सत्ता मिळवण्याची आणि ती मिळवून गुड गव्हर्नन्स देण्याची इच्छा असेल, तर तडजोड ही करावीच लागते. आमच्या आघाडीत अनेक घटक पक्ष असे आहेत की, जे केवळ सत्तेसाठी आमच्याबरोबर आलेले आहेत. पण आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली, असेही अडवाणी या मुलाखतीत म्हणाले होते.

१९९८च्या भाजपच्या जाहीरनाम्यात ‘श्रीरामा’चा पाचवेळा उल्लेख करण्यात आला होता. परंतु १९९९च्या एनडीएच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख नव्हता. आघाडीने ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमातील गोष्टीच जाहीरनाम्यात होत्या, असा खुलासा अडवाणी यांनी केला होता. याचा अर्थ, भाजपने सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोड केली होती आणि तशी ती करावी लागते, हे अडवाणींनी स्पष्ट शब्दात सांगितलेही होते. जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये झाल्यानंतर 'गांधीवादी समाजवाद' हीच आमची यापुढे मुख्य विचारधारा असेल, असे वाजपेयींनी जाहीर केले. आयुष्यभर गांधीजींना नावे ठेवणाऱ्या परिवारातल्या भाजपने हे एकदम नवे धोरण स्वीकारले. ही विचारसरणीशी तडजोडच होती. याचे कारण, त्या अगोदरच्या जनता पक्षात संघटना काँग्रेस हा पक्ष आणि मोरारजी देसाईंसारखे गांधीवादी नेते होते. तसेच समाजवादीही होते. या मंडळींचा आदर्श गांधीजी हाच होता.

 

गांधीवादी समाजवाद पक्षाला लोकप्रियता मिळवून देईल, असे वाटले, म्हणूनच वाजपेयींनी तडजोड केली होती.

 

परंतु जनसंघ- भाजपच्या दृष्टीने गांधीविरोधाकडून गांधीवादाकडे जाणे ही तडजोड नव्हती का? हा गांधीवादी समाजवाद तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना मुळीच रुचलेला नव्हता. हिंदुत्व आणि गांधीवादी समाजवाद एकत्र कसा नांदू शकेल, अशी त्यांची भावना असणे स्वाभाविक होते. परंतु गांधीवादी समाजवाद पक्षाला लोकप्रियता मिळवून देईल, असे वाटले, म्हणूनच वाजपेयींनी तडजोड केली होती ना? पण तरीदेखील आम्ही विचारसरणीशी कधीही तडजोड करत नाही, असे आज  मोदी - शहांपासून सारे नेते अहोरात्र म्हणत आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे ते उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेत आहेत. तसे करण्याचा त्यांना नैतिक अधिकार पोहोचतो का? काँग्रेससमोर पर्याय म्हणून मुख्य धारेतला पक्ष होण्यासाठी गांधीजींना जवळ करावे लागेल, असे वाजपेयींना वाटले होते. परंतु संघ-भाजपमधील कट्टरवाद्यांना वाजपेयींचे हे धोरण मान्य नव्हते आणि म्हणून लवकरच भाजपने पुन्हा एकदा हिंदुत्ववादाकडे वाटचाल सुरू केली.

संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ आणि भारतीय लोकदल यांनी आपल्या या चार पक्षांचे विलीनीकरण करून, संयुक्त अशा 'जनता पक्षा'ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि २३ जानेवारी १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींविरोधी आघाडी हवी म्हणून हा पक्ष स्थापन झाला असला, तरीदेखील परस्परविरोधी विचारसरणीचे लोक त्यात एकत्र आले होते. त्यामुळेच जनसंघाबाबत दुहेरी निष्ठेचा प्रश्न उद्भवला. तेव्हा जनसंघाने विचारांशी तडजोड केली नव्हती का? अकाली दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, शेकाप आणि रिपब्लिकन पक्ष अशा अनेक पक्षांनी जनता पक्षाबरोबर आघाडी केली होती.

जनता पक्षाच्या छत्राखाली सगळे विरोधी पक्ष एकजूट होत असतानाच, २ फेब्रुवारी १९७७ रोजी जगजीवनराम, बहुगुणा, नंदिनी सत्पत्थी आणि के आर गणेश हे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी 'काँग्रेस फॉर डेमोक्रसी' या पक्षाची स्थापना केली. हा पक्षही ५ मे १९७७ रोजी जनता पक्षात विलीन झाला.  जनता पक्षात विलीन झालेल्या अन्य पक्षांशी तसेच ज्या ज्या पक्षांनी जनता पक्षाशी आघाडी केली होती, त्या त्या पक्षांच्या विचारसरणीशी जनसंघाचा काय संबंध होता? म्हणजे जनसंघाने तडजोड केली नाही का?

 

गैरकाँग्रेसवादी विचारातून १९६७ मध्ये बिहार, बंगाल, केरळ, ओडिशा, पंजाब, मद्रास वगैरे राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आली.

 

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन गैरकाँग्रेसवादी राजकारण करावे, असा विचार समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी मांडला आणि त्याच वर्षी, म्हणजे १९६२ साली लोकसभा निवडणुकीत नेहरूंच्या विरोधात लढून लोहिया यांचा फुलपूर मतदारसंघात पराभव झाला. परंतु १९६३ च्या फरुखाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत लोहिया यांचा विजय झाला. आचार्य कृपलानी आणि मिनू मसानी हेदेखील काँग्रेसविरोधात निवडून आले. विरोधी एकजुटीतून काँग्रेसचा पराभव करता येईल, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली.

गैरकाँग्रेसवादी विचारातून १९६७ मध्ये बिहार, बंगाल, केरळ, ओडिशा, पंजाब आणि मद्रास वगैरे राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आली. एकाच वेळेस सात राज्यांमध्ये काँग्रेसेतर पक्षांची सरकारे अस्तित्वात आली होती. राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत निवडणूकपूर्व युती करण्यात आली होती. त्यामुळे या राज्यांमध्ये त्यांना चांगले यश मिळाले. विजयाराजे शिंदे, कुंभराम आर्य, पवित्रमोहन प्रधान, अजय मुखर्जी या काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी पक्ष सोडून स्वतःचे स्वतंत्र पक्ष स्थापन केले होते, त्याचा काँग्रेसला तडाखा बसला. १९६७च्या निवडणुकीत स. का. पाटील, अतुल्य घोष, बिजू पटनाईक, कामराज यांचा पराभव झाला होता. अनेक ठिकाणी समाजवाद्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा अन्य पक्षांबरोबर जनसंघ सत्तेत बसला होता, तेव्हा ती तडजोड नव्हती का? उत्तर प्रदेशात पहिले गैरकाँग्रेसवादी सरकार स्थापन झाले आणि ही आघाडी लोहिया व जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांनी मिळून स्थापन केली होती. विचारसरणीशी केलेली ही तडजोड नव्हती का? ३८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर चौधरी चरणसिंग काँग्रेसच्या बाहेर पडले आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. संयुक्त विधायक दलाचे नेते म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यात जनसंघही होता. चरणसिंग आणि जनसंघ यांच्यात वैचारिक साधर्म्य असे कोणते होते?

बिहारमध्ये १९६७च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस सरकार बनवू शकले नाही. त्यानंतर चरणसिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन केलेले भारतीय क्रांती दल, तसेच संयुक्त समाजवादी पक्ष, जनसंघ, सीपीआय, आणि प्रजासमाजवादी पक्ष यांनी मिळून सरकार स्थापन केले. चरणसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेसनंतर तेव्हा दुसरा सगळ्यात मोठा पक्ष 'संयुक्त समाजवादी पक्ष' हा होता आणि त्याचे नेते कर्पूरी ठाकूर होते. परंतु त्यांच्या नावावर  एकमत होऊ शकले नाही. मग जनक्रांती पक्षाचे महामाया प्रसाद सिन्हा यांचे नाव पुढे येऊन एकमत झाले व ते मुख्यमंत्री झाले. जनसंघाचे या अन्य पक्षांशी वैचारिक नाते कोणते होते? बिहारमध्ये काँग्रेसला विधानसभेतील ३१८ पैकी सर्वाधिक जागा (१२८) मिळूनही त्यांना सरकार बनवता आले नव्हते. अशावेळी इतरांनी मिळून हे सरकार बनवले. जनसंघाला २६ जागा, सीपीआयला २४, प्रजासमाजवादी पक्षाला १८, तर संयुक्त समाजवादी पक्षाला ६८ जागा मिळाल्या होत्या. याच सरकारात कर्पूरी उपमुख्यमंत्री बनले. पुढे ते बिहारचे मुख्यमंत्री बनले हा भाग वेगळा.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांचे व शिवसेनेचे एकमत न झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आले, तसेच हे घडले. मित्र पक्षांत मतभेद झाल्यास, इतर कोणताही पर्याय नसल्यास अन्य कोणाशी तरी दोस्ती करून सरकार स्थापन करावे लागते. नाहीतर पुन्हा लगेच निवडणूक  घ्यायची का? बिहारमध्ये जनसंघ तेव्हाच्या 'महाविकास आघाडी'चा एक भाग होता. ते योग्य आणि शिवसेना जर काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेली, तर ते मात्र अयोग्य आणि ते तळवे चाटणे, असे कसे म्हणता येईल?

 

केंद्रात वाजपेयी सरकारनेही अनेक पक्षांना बरोबर घेताना समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम ३७० हे मुद्दे बाजूला ठेवले होते.

 

१९६७ च्या निवडणुकीत अनेक राज्यांत संयुक्त विधायक दल सरकारे अस्तित्वात आली. 'संविद'मध्ये भारतीय जनसंघ, संयुक्त समाजवादी पार्टी, भारतीय क्रांती दल आणि प्रजासमाजवादी पार्टी यांचा समावेश होता. काँग्रेसविरोध या एकमेव (चुकीच्या) विचारसरणीतून हे एकत्र आले होते. काँग्रेसविरोध ही विचारसरणी होऊ शकते का? पण काँग्रेसच्या द्वेषातून जे पक्ष एकच आले होते, त्यात जनसंघदेखील होता. आज मात्र 'भाजपविरोधातून हे लोक एकत्र येत आहेत', अशी टिंगल मोदी आणि शहा विरोधी पक्षांबद्दल बोलताना करत आहेत.

कर्नाटकात समाजवादी विचारांच्या रामकृष्ण हेगडे यांच्या मदतीनेच भाजपने सत्तेत प्रथम चंचुप्रवेश केला. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार स्थापन झाले.  पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेस सरकार आणले. पवारांच्या या 'खंजिरा'चा उल्लेख भाजप नेहमीच करत असतो. परंतु खंजीर खुपसून पवारांनी जे पुलोद सरकार स्थापन केले, त्यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी होते. जनता पक्षात जनसंघही होता. उत्तमराव पाटील, हशू अडवाणी वगैरे जनसंघाचे चांगले नेतेही त्या सरकारात पवारांबरोबर  गुण्यागोविंदाने नांदत होते. आज त्याच जनसंघ-भाजपचे नेते 'पवारांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले', 'नायनाट केला', अशी टीका करत आहेत…

केंद्रात वाजपेयी सरकारने सुद्धा अनेक पक्षांना बरोबर घेताना समान नागरी कायदा, राम मंदिर आणि ३७० वे कलम हे मुद्दे बाजूला ठेवले होते. याचा अर्थ भाजपने विचारांशी तडजोड केल्यानंतरच विविध घटक पक्ष त्यांच्याबरोबर आले आणि भाजप सत्तेत येऊन वाजपेयी पंतप्रधान होऊ शकले. थोडक्यात, जनसंघ आणि भाजपने अनेकदा विचारांशी समझोते केले आहेत. भाजपने अलीकडील काळात ज्या तडजोडी केल्या आहेत, त्या  सर्वांना माहिती असल्याने, त्यांचा उल्लेख करत नाही. पण ज्या गोष्टी तरुण पिढीला फारशा माहिती नाहीत, त्या येथे मुद्दामच सांगितल्या.

एकूण, भाजपने अनेकदा विचारसरणी खुंटीला बांधून ठेवली आहे. परंतु हीच तडजोड सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार, उद्धव ठाकरे वा अन्य कोणी केली, तर भाजप त्यांना स्वार्थी, भ्रष्ट, देशद्रोही, हिंदुत्वविरोधी वगैरे ठरवते. पण भाजपनेही हिंदुत्वाशी तडजोड केली आहे किंवा हिंदुत्व मागे वा बाजूला ठेवून तडजोडी केल्या आहेत, हे लोकांनी पक्के लक्षात ठेवावे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षास नावे ठेवण्याचा भाजप किंवा एकनाथ शिंदे यांना कोणताही अधिकार पोहोचत नाही. 'आम्ही केली, तर ती श्रावणी आणि दुसऱ्याने खाल्ले, तर ते शेण, ही या चारित्र्यसंपन्न पक्षाची खरी वृत्ती आहे. सामान्य जनतेने यांच्या ढोंगबाजीला भुलू नये. त्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि आपल्यापेक्षा कोणीही सत्तेच्या जवळपासही असू नये, ही त्यांची इच्छा आहे. आपल्याबरोबर न येणारे नेते, लोक वा पक्ष हे  देशाचे, विकासाचे शत्रू, राष्ट्रद्रोही असा त्यांचा सिद्धांत आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका!