Opinion

गाझामधली आग

मीडिया लाईन

Credit : इंडी जर्नल

 

खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांवर अप्रत्यक्षपणे आपले नियंत्रण असावे, या उद्देशाने अमेरिका-ब्रिटन व अन्य बड्या राष्ट्रांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये सातत्याने हस्तक्षेप केला. अमेरिकेचा आर्थिक साम्राज्यवाद आणि इस्रायलची विस्तारवादी दादागिरी यामुळे जगात ठिकठिकाणी राजकीय ज्वालामुखी तयार झाले. पॅलेस्टाईनमधील हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर, अमेरिकेसह भारत व इतर काही देशांनी इस्रायलला समर्थन दिले. यासंबधी काँग्रेसने काढलेल्या निवेदनात हमासचा उल्लेखच नसल्यामुळे संघपरिवार व भाजपने काँग्रेसवर तोफ डागली. तर नेहरूंपासूनचे भारताचे धोरण बदलून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका व इस्रायलची पालखी वाहणे पसंत केले, अशी टीका काँग्रेसवाल्यांनी केली.

हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रतिहल्ल्याच्या नावाखाली विध्वंसाची परमावधी गाठली. या दोन्हींचा तितक्याच तीव्रतेने धिक्कार करणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आपल्या निवेदनात हमासचा उल्लेख करणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्यांनी अनेक जबाबदारीची पदे भूषवून महत्त्वाची कामगिरी निभावली, अशा काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र या संदर्भात कमालीची संतुलित भूमिका मांडली आहे. भारत सरकारने सुरुवातीला काहीसे एकतर्फी निवेदन काढले. परंतु नंतर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. इस्रायल व पॅलेस्टाईन शांततेने नांदावेत, यासाठी वाटाघाटीतून मार्ग काढला पाहिजे, ही भारताची भूमिका असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

झालेल्या टीकेनंतर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले, हे बरेच झाले. त्याचप्रकारे काँग्रेस व त्याच्या नेत्यांनी इस्रायलप्रमाणेच हमासच्या हिंसाचाराचाही निषेध केला पाहिजे. अन्यथा येथील हिंदुत्ववाद्यांच्या सापळ्यात नेहमीप्रमाणे काँग्रेस व इंडिया आघाडीतील अन्य पक्ष आपोआप अडकतील...आपल्याकडील काही घरात बसलेले शूरवीर ‘आम्हाला इस्रायलच्या लष्करात भरती व्हायचे आहे’, अशी इच्छा समाजमाध्यमांवर प्रकट करू लागले आहेत. दिवाळीत पायाशी लवंगी फटाका फुटला तरी ज्यांचे धाबे दणाणते, ते वरणभातलिंबू खाऊन समरगीते म्हणू लागले आहेत...ही मंडळी एकाच वेळी हिटलर-मुसेलिनीचा पुरस्कार करतात आणि त्याच वेळी इस्रायललाही डोक्यावर घेऊन नाचतात...सध्या युद्धाबद्दलच्या फेक न्यूजही करोडोंच्या संख्येत समाजमाध्यमावरून पसरत आहेत.

 

पायाशी लवंगी फटाका फुटला तरी ज्यांचे धाबे दणाणते, ते वरणभातलिंबू खाऊन समरगीते म्हणू लागले आहेत.

 

गाझापट्टीपासून तीन किलोमीटर अंतरावर किबुत्झ कफर अजामध्ये ४० बालकांचा शिरच्छेद करण्यात आला. काहींना जाळण्यात आले. महिलांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. लोक जेवत असतानाही त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, अशी बातमी चालवण्यात आली. प्रत्यक्षात इस्रायली लष्करानेही आमच्याकडे याची माहिती नाही, अशा खुलासा कला आहे. युक्रेन-रशिया युद्धात अथवा फ्रान्समध्ये झालेल्या दंगलीतही याच गोष्टी झाल्या होत्या. व्हिडिओ गेम्समधील काही गोष्टींचा वापर करून त्यावेळी फेक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते. ट्विटरवर तर सध्या युद्धासंबंधीच्या फेक न्यूज व व्हिडिओंचा महापूर आला असून, त्यात ट्विटरचा नवा मालक एलॉन मस्क स्वतः सहभागी असतो.

अल्जिरियातील फटाक्यांची दृश्ये फ्रांन्समधील दंगलीची असल्यचे दाखवणे किंवा फुटबॉलपटू रोनाल्डोच्या हातात पॅसेस्टाईनचा झेंडा दाखवणे या करामतीही करण्यात आल्या. भारतातही उत्तर प्रदेशपासून कोल्हापूरपर्यंत दंगेधोपे घडवण्यात समाजमाध्यमांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रान्समधील मार्सेलिस येथील अल् कझार लायब्ररी ही हल्ल्याचे लक्ष्य अवश्य ठरली होती. परंतु ती बेचिराख करण्यात आली, अशी हूल उठवली गेली. प्रत्यक्षात ती फक्त एक दिवस बंद होती. आपल्याकडच्या उजव्या लोकांनी त्यावरून ८०० वर्षांपूर्वी नालंदा येथे ९० लाख पुस्तके जाळण्यात आली, याची आठवण काढून, मुस्लिमद्वेषाची आपली हौस भागवून घेतली. या मंडळींना वाराणसीत सर्व सेवा संघाच्या इमारतींवर नुकताच बुलडोझर चालवण्यात आला, याची सोयीस्करपणे आठवण झाली नाही.

 

 

भारतात गोदी मीडियाने पूर्वग्रहदूषित प्रचाराचे शिखर गाठले असले आणि अहोरात्र मोदीजींचा उदोउदो सुरू असला, तरी इस्रायलमधील अनेक वृत्तपत्रादी माध्यमे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर तुटून पडत आहेत. इस्रायलवर हल्ला करण्यात आला असला, तरी गाझापट्टीत बॉम्बफेक करताना इस्रायलने काही मर्यादा बाळगावी, युद्धाचे नियम आणि कायदे पाळावेत, मध्यपूर्वेचा भूगोल बदलण्याच्या गोष्टी करू नये, अशी टीकाही तेथील माध्यमे करत आहेत. भारतातील माध्यमांनी त्यापासून शिकण्यासारखे आहे. या युद्धात आतापर्यंत १४०० पॅलेस्टिनी आणि १२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याखेरीज इस्रायलच्या भूमीत १५०० हमास अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे, असे खुद्द इस्रायलनेच म्हटले आहे. अर्थातच हमासच्या प्रवक्त्याने याचा इन्कार केला आहे.

 

गाझापटटीत आतापर्यंत साडेचारशे बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्यखात्याने दिली आहे.

 

गाझापटटीत आतापर्यंत साडेचारशे बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्यखात्याने दिली आहे. युनोच्या को-ऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनेटेरियन अफेअर्सच्या कार्यालायाने दिलेल्या माहितीनुसार, २००८ ते २०२३चे हे युद्ध सुरू होईपर्यंतच्या काळात इस्रायली फौजांनी पॅलेस्टाईनच्या भूमीत ६४०० पॅलेस्टिनींचा खातमा केला आहे. १९४८, १९६७ आणि १९७३ मध्ये या दोन बाजूंमध्ये मुख्य युद्धे झाली. १९८७ ते ९३ आणि २००० ते २००५ या काळात पॅलेस्टाईनमध्ये दोन इंतिफाद किंवा उठाव झाले. इस्रायलने लेबानन आणि सीरियन भूभागातही आक्रमण केले आहे. त्यावरूनही संघर्ष झालेला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये पॅलेस्टाईनमधील आक्रमित भूभागात हजारो लोकांचा मृत्यू झाला. इस्रायलने त्यावेळी गाझापट्टीत तुफान बाँबफेक केली होती.

गेल्या १५ वर्षांत पॅलेस्टाईनच्या तुलनेत इस्रायली मृत्यूंची संख्या खूपच कमी आहे. केवळ ३०८ इस्रायलींचा चकमकीत मृत्यू झाला. मात्र २००८ पासूनचा हा सर्वात भीषण संग्राम असून, त्यात गाझापट्टीतीलच साडेतीन लाख लोक बेघर झाले आहेत. इस्रायलमधील याबाबतची आकडेवारी मिळालेली नाही. हमासने केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायलने तेथील वीज, पाणी आणि इंधनाचा पुरवठाच बंद केला असून, त्यामुळे लोकांच्या हालांना पारावार उरलेला नाही. कोणत्याही युद्धाची सर्वाधिक किंमत ही महिला व बालकांना द्यावी लागते. मुलांचे शिक्षण व आरोग्य आणि भवितव्य धोक्यात येते. मग पुन्हा तरुणपणी या मुलांच्या हातात बंदुकी व बाँब दिसू लागतात. १५ वर्षांपूर्वी इस्रायली अतिक्रमणाच्या विरोधात पहिला उठाव झाला, तेव्हा प्रथम हमास प्रकाशात आले.

 

 

शेख अहमद यासीन हा हमासचा संस्थापक आणि आध्यात्मिक नेता. विद्यार्थी जीवनात इजिप्तमध्ये असताना, यासीन मुस्लिम ब्रदरहूडच्या प्रभावाखाली आला. ब्रदरहूडने गाझापट्टी व वेस्ट बँक भागात आपली गुप्त पथके स्थापन केली होती. त्यामधूनच हमासचा उदय झाला. १९६७ साली अरब-इस्रायल युद्ध झाले. त्यावेळी पॅलेस्टाईन निर्वासित छावण्यांमध्ये यासीनने मदतकार्य सुरू केले. त्यासाठी ‘दावा’ नावाची धर्मादाय संघटना स्थापन करून पॅलेस्टिनी नागरिकांना धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मदत करण्याचे कार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन किंवा पीएलओ ही यासर अराफतची संघटना जोरात होती. तिच्याच स्पर्धेत हमाससारखी आणखी एक संघटना उदयास आली, तर त्यास इस्रायल सरकारची हरकत नव्हतीच.

 

धर्मनिरपेक्षतावादी पीएलओला असलेला पाठिंबा कमी व्हावा, म्हणून हमाससारखी धार्मिक संघटना पसरली.

 

उलट धर्मनिरपेक्षतावादी पीएलओला असलेला पाठिंबा कमी व्हावा, म्हणून हमाससारखी धार्मिक संघटना पसरली, तर इस्रायल सरकारला ते हवेच होते. त्यामुळे इस्रायलने हमासला सुप्त पाठिंबाच दिला होता. १९७८ साली यासीनने ‘अल-मुजम्मा अल इस्लामी’ या नावाने हमास ही संघटना इस्रायलमध्ये रजिस्टर केली. श्रीमंत व सनातनी अरब देशांनी तिला उदार हस्ते निधीही दिला. पॅलेस्टाईनमध्ये इस्लामी सरकार स्थापन करणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हमास लोकप्रिय होण्यात इस्रायलच्या उजव्या सरकारचे हितसंबंध गुंतलेले होते. याचे कारण अगोदरच्या इस्रायल सरकारने ऑस्लोचा शांतता करार केला होता आणि त्यावर पीएलओनेही स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतरच हमासच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी बाँबिंग सुरू केले आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून इस्रायलच्या राजकारणात शांतता कराराचे शत्रू असलेले एरियल शेरॉन आणि नेतान्याहू यासारखे जहाल उजवे नेते तयार झाले.

आक्रमित प्रदेशात नागरी युद्ध व्हावे आणि पॅलेस्टाईन विरुद्ध पॅलेस्टाईन अशा हाणामाऱ्या व्हाव्यात, ही इस्रायलची इच्छा राहिली आहे. हमासने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायली कट्टरतावाद्यांना धिंगाणा घालण्याची नवीन संधीच मिळाली आहे. भारतातील एखाद्या नेत्यात कुणाला नेतान्याहू दिसतात का?