Opinion

बारामतीकरांचा उठाव!

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

 

‘तुमचे आता वय झाले आहे. तुम्ही थांबणार की नाही?’ असा थेट सवाल करत, अजितदादा पवार यांनी, आपले काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट वानप्रस्थाश्रमात जाण्याचा सल्लाच दिला. यापुढे आम्हाला मार्गदर्शन करत राहा व आशीर्वादही द्या, असे सांगून त्यांनी काकांना समृद्ध अडगळीत टाकण्याचा इरादा जाहीर केला आणि त्यानंतर खुर्चीसकट त्यांना बाजूला केले. सोनिया गांधी यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांना त्याच्या खुर्चीसकट फेकून दिले होते. त्याच धर्तीचा हा प्रकार म्हटला पाहिजे. 

अनेक वर्षांची मळमळ दादांनी बाहेर काढली, तेव्हा त्यांची आणि काकांची वाट पूर्णपणे अलग अलग असल्याचे स्पष्ट झाले. कोणाच्या पोटी जन्मलो हा माझा अपराध आहे का, असा सवाल उपस्थित करून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या बढतीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या दिवशी दादांनी मुंबईत ‘देवगिरी’ या आपल्या बंगल्यावर आमदारांची बैठक आयोजित केली होती, तेव्हाच पुण्यात शरद पवार यांना पत्रकार परिषदेत त्याबद्दल प्रश्न विचारला असता, अजितदादा हे विरोधी पक्षनेते आहेत आणि आमदारांची बैठक बोलावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे उत्तर पवारांनी दिले. 

त्यांना या कथित बंडाचा किंचित सुगावा असला, तरी ताबडतोब ही गोष्ट घडून येईल, असे वाटले नसावे. ‘देवगिरी’वर बैठक सुरू असतानाच, अचानकपणे तेथे सुप्रियाताई दाखल झाल्यामुळे दादांची गडबड उडाली आणि मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी जो शपथविधी होणार होता, तो रविवारीच उरकून घेण्यात आला... त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दादांनी माझी आहे, तीच खरी राष्ट्रवादी, असा दावा केला. आणि नवीन नेमणुका जाहीर केल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, अशी पृच्छा केली असता, ‘तुम्हाला माहीत नाही का, शरद पवार अध्यक्ष आहेत म्हणून’, असे उत्तर त्यांनी दिले होते. 

 

परंतु त्यापूर्वीच दादांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून, आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे कळवून टाकले होते.

 

परंतु त्यापूर्वीच कारस्थानी दादांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून, आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे कळवून टाकले होते. तसेच पक्षाचे नाव व चिन्हावर दावा केला होता. मे महिन्यात शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची अचानक घोषणा केली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्या, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. त्या नाट्याच्या वेळी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अजितादादांनी वयाच्या एका टप्प्यावर साहेब निवृत्त होत आहेत, यात चूक ते काय, अशी भूमिका घेतली. परंतु तेव्हा भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांवर ते ज्या प्रकारे डाफरत होते, ते सर्वांनाच खटकले. 

आपल्या भगिनी सुप्रियाताईंवरही ते मोठा भाऊ या नात्याने खेकसले. काकांनी तेव्हाच काय, त्यापूर्वी कित्येक वर्षे अगोदर घरी बसायला हवे होते, अशीच दादांची इच्छा असणार. वास्तविक पवार काही याच वर्षी एकदम वृद्ध झालेत, असे नव्हे. इतकी वर्षे अजितदादांनी आपल्या काकांचे वय कधीही काढले नव्हते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काकांनी बाजी लावली नसती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतक्या (५४) जागा निवडून आल्याच नसत्या. पक्ष साफ झाला असता आणि मग भाजपनेही ८० तासांसाठी दादांना आपल्याबरोबर येण्याचे आमंत्रण दिले नसते किंवा महाविकास आघाडीतही त्यांना मानाचे स्थान मिळाले नसते. 

मे महिन्यात आपला राजीनामा मागे घेतल्यानंतर, शरद पवार म्हणजेच साहेब बारामतीला पोहोचले. त्याच दिवशी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना अजितदादांबाबत काही प्रश्न विचारले. तेव्हा साहेब उत्तरले, ‘दादा हे वेगाने काम करण्याबाबत प्रसिद्ध आहेत, त्यांच्याबाबत चुकीच्या अफवा पसरवू नका. मी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेस ते उपस्थित नव्हते, याचा अर्थ, त्यांचे काही वेगळे सुरू आहे, असे नाही. काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो, तो दादांना नाही. ते मीडिया फ्रेंडली नाहीत, हे सर्वांना माहीत आहे. दादा बोलतात तेव्हा अनेकदा त्याचा गैर अर्थ काढला जातो’, अशा रीतीने साहेबांनी पुतण्याची बाजू घेतली. प्रत्यक्षात दादा दिल्लीशी संधान बांधून होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रक्षपणे ते संपर्कात होते. काकांना याचा त्यांनी पत्ताही लागू दिला नाही. 

साहेबांनी जर भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेतली असती, तर दादांनी ना त्यांचे वय काढले असते, ना त्यांच्या भूमिकांबद्दल जाहीरपणे असहमती दर्शवली असती. वयाचा मुद्दा दादा जेव्हा काढत होते, तेव्हा त्यांनी सरकारी कर्मचारी वा नोकरशहांच्या निवृत्तीचे वय ५८ वा ६० असते, याचा उल्लेख केला. हेच तत्त्व मान्य केले, तर दादांचे वय ६३, दिलीप वळसे पाटील ६६, सुनील तटकरे ६७, हसन मुश्रीफ ६९ आणि छगन भुजबळ ७५. या सर्वांनी घरी बसणे आवश्यक आहे. ज्या मोदीजींबद्दल दादांना परमादर आहे, त्यांनाही २०२५ साली आपण अहमदाबादला जाऊन विश्रांती घ्या, (भाजपमध्ये ७५ वय झाले की निवृत्तीचा नियम) असे दादांना सांगावे लागेल... 

 

भाजपबरोबर चर्चा अनेकदा सुरू का करण्यात आल्या आणि आयत्यावेळी माघार का घेण्यात आली, हा प्रश्नच आहे.

 

साहेबांच्या पुढाकारानेच २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजप नेत्यांशी चर्चा झाली होती. एवढेच नव्हे, तर उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापन करू या, असा प्रस्ताव दिल्याची माहितीही दादंनी दिली आहे. भाजपबरोबर गेला तो संपला, अशी भूमिका आज पवारसाहेब ठामपणे मांडत असून, हे कौतुकास्पदच आहे. परंतु तरीही दुसरीकडे भाजपबरोबर चर्चा अनेकदा सुरू का करण्यात आल्या आणि आयत्यावेळी माघार का घेण्यात आली, हा प्रश्नच आहे. यामुळे शरद पवारांच्यादेखील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, हे नाकारण्याचे कारण नाही. कदाचित पक्षातील सर्व आमदारांचा दबाव असल्यामुळे, वाटाघाटींचे नाटक करून वेळ निभावून न्यायची, असे ते करत होते का, हे बघावे लागेल. 

तसेच एका उद्योगपतीच्या घरीही बैठक झाल्याचा उल्लेख दादांनी आपल्या भाषणात आवर्जून केला होता. कदाचित तो संदर्भ गौतम अदानींचा असू शकतो. कारण एकीकडे राहुल गांधी अदानी-मोदी संबंधांबाबत तोफ डागत असताना, दुसरीकडे अदानी यांच्या कथित मनी लाँडरिंगच्या चौकशीबाबत शरद पवारांनी मवाळ भूमिका घेतली होती. असो. अडीच वर्षांपूर्वी एका इंग्रजी वेबसाइटला मुलाखत देताना मी म्हटले होते की, ‘जवळजवळ वर्षभरात ना भाजपने अजितदादांवर टीका केली आहे, ना दादांनी भाजपवर. ज्यावेळी काका निवृत्त होतील, केव्हा कोणत्याही मार्गाने आपली सत्ता आणि अधिकार कसा वाढेल, यासाठी त्यांनी सर्व दरवाजे खुले ठेवले आहेत’. अजितदादा महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री होते, तेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गाजत होता आणि देशभर आंदोलने सुरू होती. 

या कायद्याबाबत साहेबांनी चिंता व्यक्त केली असतानाच, या कायद्याच्या विरोधात विधानसभेत ठराव करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, अशी भूमिका दादांनी घेतली होती. सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येवरून उद्धव ठाकरे सरकारवर अनेक आरोप होत असताना, दादींनी त्याबद्दल अवाक्षरही काढले नव्हते. एवढेच नव्हे, तर त्यांचा मुलगा पार्थ याने सुशांत प्रकरणाची सीबीआय़ चौकशी व्हावी, या भाजपच्या मागणीस समर्थन दिले. त्यामुळे साहेब संतप्त झाले होते, परंतु दादा त्याबद्दल काहीही बोलले नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी दादांनी एक फोटो ट्विट केला होता. त्यामध्ये दादा, उद्धवजी, अन्य काही नेते व आमिर खान हे एका ओपन कारमधून जात असल्याचे दिसते. 

त्यावेळी ड्रायव्हिंग सीटवर दादा आहेत आणि मागे प्रवासी सीटवर उद्धवजी बसले आहेत. याचा अर्थ, सरकार आपण चालवत आहोत, असेच दादा सुचवू पाहत होते. मंत्रालयात सावरकरांच्या जन्मदिनी त्यांचया छायाचित्रास दादांनी हार घातला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतीय जनसंघाचे एकेकाळचे अध्यक्ष व नेते दीनदयाळ उपाध्याय यांनाही आदरांजली वाहणारे ट्विट दादांनी केले होते. त्यानंतर त्यांनी ते डिलीट केले. अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील पार्थच्या भूमिकेवरून सवाल उपस्थित झाले होते. दादा व पार्थ यांच्या मनात भाजपविषयी हळवा कोपरा असल्याचे यावरून दिसतच होते.

 

घराण्याबाहेरच्या व्यक्तींकडेही कर्तृत्व असू शकते, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

 

वास्तविक भाजपबरोबर अल्पायुषी सरकार स्थापल्यानंतर दादा जेव्हा माघारी परतले, तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री करून, शिवाय अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते देऊन साहेबांनी त्याना त्यांच्या चुकांबद्दल बक्षीसच दिले होते. त्यामुळे दादांची ताकद आणखीनच वाढली आणि पक्षातील आमदार त्यांना अधिकच उपकृत राहू लागले. साहेबांचा आशीर्वाद नसता, तर दादा एवढे मोठे होऊच शकले नसते. त्यांच्यात कर्तृत्व आहेच. परंतु घराण्याबाहेरच्या व्यक्तींकडेही कर्तृत्व असू शकते, हे लक्षात घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादीतही घराणेशाही आहेच. शरद पवार यांनी हिमतीने स्वतः पक्ष स्थापला आणि तो यशस्वीपणे चालवूनही दाखवला. 

परंतु तो राज्यात पहिल्या नंबरचा पक्ष बनू शकला नाही, हे वास्तवच आहे. शिवाय घराणेशाहीचे दोष राष्ट्रवादी पक्षातही शिरले आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेतृत्व पवार कुटुंबाबाहेर का असू नये? म्हणजेच काँग्रेसबाबत जी टीका केली जाते, ती राष्ट्रवादीबाबतही करावी लागेल. इंदिरा गांधीं ते सोनिया गांधींपर्यंतच्या काळात काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांचे खच्चीकरण केले गेल्यामुळे ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन्मोहन रेड्डी यांच्यासारख्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले. त्यामुळे काँग्रेसची ताकद संपली. काँग्रेसने शरद पवारांना सांभाळून घेतले असते, तर पवारांना स्वतंत्र पक्षाची स्थापनाच करावी लागली नसती आणि महाराष्ट्रात जातीयवादी विषवल्ली वाढली नसती. विचारसरणीशी काहीही संबंध नसलेल्या सत्ताकांक्षी नेत्यांचा आणि सरदारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी ओळखला जातो. त्यातील बहुसंख्य नेते आज गोडसेवाद्यांच्या कच्छपी लागले आहेत, यात आश्चर्य नाही.