Opinion

कचखाऊ सुशीलकुमार शिंदे

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला त्यानिमित्ताने महाराष्ट्रात भरपूर आणि उलटसुलट चर्चा झाली. टिळक आणि गुजरात यांचा संबंध किती जवळचा होता, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि हा पुरस्कार घेताना मी जितका उत्साहित आहे, तितका भावूकही आहे, असे उद्गार त्यांनी काढले. अहमदाबादमध्ये टिळकांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अहमदाबाद महापालिकेचे अध्यक्ष सरदार पटेल यांनी घेतला होता. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. पण मी पद सोडेन, परंतु पुतळा व्हिक्टोरिया उद्यानातच उभारला जाईल, असे सरदार यांनी सांगितले.

त्या पुतळ्याचे उद्घाटन १९२९ मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले. नेहमीप्रमाणे मोदी यांचे भाषण उत्तम झाले. पण एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र यांचे संबंध जवळचे होते. आज अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवले का जात आहेत, असा प्रश्न त्यावेळी सातत्याने टाळ्या वाजवणाऱ्या उपस्थित पुणेकरांच्या मनात आला की नाही, याची कल्पना नाही. ईडीमुळे ज्यांची झोप उडाली, असे विरोधक भाजपविरुद्ध आघाडी उभारत आहेत. परंतु त्यांना देशाचे काही पडलेले नाही. त्यांना आपण केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई रोखायची आहे. त्यांना आपल्या मुलाबाळांना घरादाराला वाचवायचे आहे. त्यांना घराणेशाही जपायची आहे. तर मला देशाचा विकास करायचा आहे. त्यांना आपल्या घराणेशाहीचा विकास करायचा आहे, असे उद्गार मोदी यांनी अलीकडेच भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना काढले होते.

 

भाजपने पवार यांचे घर फोडून अजितदादांना आपल्याकडे वळवले आणि पावन करून घेतले.

 

परंतु टिळक पुरस्कार दिला जात असताना व्यासपीठावर मोदी यांच्या सरकारच्या वतीने ज्यांना नोटीस दिली होती आणि ज्यांनी न घाबरता ईडीस आव्हान दिले, ते शरद पवार होते. त्याचप्रमाणे सिंचन घोटाळ्यात ज्यांच्यावर मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते, ते अजितदादा पवार उपस्थित होते. भाजपने पवार यांचे घर फोडून अजितदादांना आपल्याकडे वळवले आणि पावन करून घेतले. केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा दहशतवाद’ असा शब्द वापरल्यामुळे देशभर खळबळ माजली होती. शिंदे देखील पुण्याच्या सोहळ्यात व्यासपीठावर होते. दहा वर्षांपूर्वी जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात भाषण करताना सुशीलकुमार म्हणाले होते की, भाजप आणि संघपरिवाराच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जातात. देशात भगव्या व हिंदू दहशतवादास रा. स्व. संघ आणि भाजप उत्तेजन देत आहेत, असे उद्गार शिंदे यांनी काढले होते.

त्यावेळी भाजपने शिंदे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत माफीनाम्याची मागणी केली होती. हे वक्तव्य मागे न घेतल्यास, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिला होता. तेव्हा काँग्रेसनेही शिंदेंच्या वक्तव्यापासून स्वतःला बाजूला केले होते. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिंदेंनी घुमजाव करत आपले वक्तव्य मागे घेतले. शिंदे यांना तसे म्हणायचे नव्हते, पण त्यांची जीभ घसरली असे त्यांच्या निकटवर्तीयांनी पत्रकारांना सांगितले होते. थोडक्यात, शिंदे यांनी पलटी मारली. संघ आणि भाजपवर एवढी जोरदार टीका करणाऱ्या शिंदे यांनी, नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जात असताना त्यास विरोध दर्शवला नाही. ट्रस्टचे विश्वस्त असूनही, त्यांनी या पुरस्कारास मान्यता दर्शवली. वास्तविक मोदी यांचे हिंदुत्व जहाल असून, देशातील लोकशाहीचा संकोच करण्यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही.

अशावेळी हा पुरस्कार मोदी यांना देण्यास माझा विरोध आहे, असे सांगून शिंदे यांना विश्वस्तपदाचा राजीनामा देता आला असता. परंतु तेवढे धैर्य त्यांच्यामध्ये कधीच नव्हते आणि नाही. मुळात काँग्रेसवाले हे पहिल्यापासूनच गेली कित्येक वर्षे लेचे-पेचे असल्याचे दिसून आले आहे. गुजरातमध्ये दंगली होत असताना आणि त्यात गुलबर्ग सोसायटी हत्याकांडामध्ये काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी मारले गेल्यानंतरही, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दंगल शमवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे धाडस दाखवले नाही. दंगलग्रस्तांना वाचवण्यासाठी, दंगलग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या बाजूने लढण्यासाठी अनेक गांधीवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर असोत किंवा तिस्ता सेटलवाड, खंबीरपणे उभ्या राहिल्या. २००४ नंतर केंद्रात सत्ता असूनही, गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या विरोधाची प्रकरणे तडीस नेण्याची जिद्द काँग्रेसने दाखवली नाही. ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचा वापर करून, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेसचे तेव्हाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनीही वक्तव्ये केली होती.

२००७ साली पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट होऊन, अनेकजण मृत्यू पावले होते. या बॉम्बस्फोटामागे भगवा दहशतवाद असल्याचे विधान तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी केले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंदला अटकही झाली होती. या बॉम्बस्फोटात आपला हात असल्याचा कबुलीजवाब त्याने दिल्याची माहिती यूपीए सरकारने प्रसृत केली होती. परंतु या प्रकरणाचा पाठपुरावा सरकार प्रभावीपणे करू शकले नव्हते आणि असे असीमानंदला  पुढे जामीनही मिळाला होता. त्यानंतर कबुलीजबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असल्याचे या स्वामींनी जाहीर केले. नंतर ८०० पानी आरोपपत्र सरकारतर्फे न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु त्यात कोठेही ‘भगवा दहशतवाद’ यामागे आहे असे यूपीए सरकारने नमूद केलेले नव्हते.

 

जर देशात भगवा दहशतवाद होता तर त्याचा कणा मोडून काढण्यासाठी शिंदे यांनी काय केले, असाही प्रश्न निर्माण होतो.

 

तसे यूपीए सरकार सिद्धही करू शकले नाही आणि त्यासाठी त्या सरकारने फारसे प्रयत्नही केले असल्याचे दिसले नाही. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री झाले. जर देशात भगवा दहशतवाद होता तर त्याचा कणा मोडून काढण्यासाठी शिंदे यांनी काय केले, असाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय ‘भगवा दहशतवाद’ असे म्हणायचे होते तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादास त्यांनी ‘हिरवा दहशतवाद’ असे म्हटले होते का? तर नाही. काँग्रेसच्या अशा पक्षपाती भूमिकांमुळेच यूपीएची सत्ता गेली आणि काँग्रेसची वाट लागली. संघ आणि भाजप का वाढला, ते काँग्रेसने नीट समजून घेतले पाहिजे. शहाबानो प्रकरणापासून याची सुरुवात होते. काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला यश आल्यामुळे काँग्रेसला लोकांनी नाकारले, अशा आशयाचे वक्तव्य उद्गार काँग्रेसला माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी २०१७ साली काढले होते.

त्यावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी हे वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देत होते. ते आधीही मंदिरात जात असत. परंतु पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही गरज असते, असे त्याबाबतचे स्पष्टीकरण सोनियाजींनी दिले होते. वास्तविक काँग्रेसमध्ये अर्थातच हिंदू कार्यकर्ते बहुसंख्येत आहेत. काँग्रेसच्या मतदारांतही बहुसंख्य हिंदूच आहेत. परंतु काँग्रेसने केलेल्या काही चुका आणि काँग्रेसचा संबंध फक्त मुसलमान, पाकिस्तान, देशद्रोह अशा गोष्टींची जोडण्यात भाजपचा स्वार्थही आहे. परंतु आपली ही प्रतिमा बदलताना काँग्रेस नेते एकीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या निसरड्या व टोपीफिरवू भूमिका घेतात. अथवा भाजपची कॉपी करण्याचा भंपकपणा करत चुकीच्या भूमिका ही घेतल्या जातात. मध्य प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बागेश्वर बाबासाठी लाल गालिचा अंथरला आहे.

कमलनाथ यांच्या छिंदवाडा जिल्ह्यात सिमरिया या गावात बागेश्वर बाबा येणार असून, पाच ते सात ऑगस्ट दरम्यान त्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या बागेश्वरबाबाने छत्रपूर जिल्ह्यातील आपल्या मायभूमीत घर वापसीचे कार्यक्रम आयोजित केले होते. भारताचेच नव्हे, तर पाकिस्तानचेही रूपांतर हिंदुराष्ट्रात करू, अशी गर्जना त्याने केलेली आहे. आपल्याकडे चमत्कारी शक्ती असल्याचा दावा बागेश्वरबाबा करत असतो. त्याच्याकडे एवढी शक्ती असेल, तर त्याने जोशी मठाला वाचवून दाखवावे, असे आव्हान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले होते. अशावेळी कमलनाथ यांनी बागेश्वरबाबाचा धावा केला हे लक्षात घेतले पाहिजे. याच कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे १०१ फूट उंचीवर हनुमान मंदिर उभारले आहे. मध्यप्र देशचे भवितव्य सुरक्षित असावे यासाठी हनुमानाच्या चरणी आपण लीन होत असल्याचेही कमलनाथ यांनी म्हटले होते. गर्व से कहता हुँ कि मै हिंदू हूँ, असे कमलनाथ वारंवार म्हणत असतात.

वर्षभरापूर्वी कमलनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचा ‘धर्म एवं उत्सव’ या विभागाची प्रवचनकार रिचा गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली. या विभागातर्फे महाशिवरात्रीच्या दिवशी सुंदरकांड, रुद्राभिषेक यासारखे सोहळे आयोजित करण्यात आले. भागवत कथा आणि हनुमान चालीसा पठण यासारखे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात. काँग्रेस नेते नेहमीच धार्मिक राहिले आहेत. परंतु ते त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करत नव्हते. मात्र भाजपने काँग्रेसला धर्मविरोधी ठरवले, असे रिचा यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसच्या या अध्यात्मिक आघाडीतर्फे आघाडीच्या शाखा स्थापन केल्या जात आहेत. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गोशाळा स्थापन करणे, नर्मदा परिक्रमेच्या मार्गाचा विकास, तसेच राम वनगमनपथाचा विकास अशी आश्वासने मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली होती. २०१८ पूर्वी काँग्रेसने मध्य प्रदेशातील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आपली मुस्लिमांचे लांगुलचालन करणारी प्रतिमा बदलण्यासाठी २०१७ साली दिग्विजय सिंग यांनी नर्मदा परिक्रमा केली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र तरीही काँग्रेसने मध्य प्रदेशातही सॉफ्ट हिंदुत्व हेच आपले धोरण असल्याचे अधोरेखित केले आहे. एकूण, भाजपच्या हिंदुत्वाला काँग्रेसचे हिंदुत्व हेच उत्तर आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.