Opinion

‘मामुं’चे मामुलीकरण

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

कॅप्टन अमरिंदर सिंग, दिगंबर कामत, एस. एम. कृष्णा, विजय बहुगुणा, एन. किरण रेड्डी, एन. डी. तिवारी, जगदंबिका पाल, पेमा खांडू, अशोक चव्हाण, अशा अनेक काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमरिंदर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या पत्नीच्या व मुलाच्या परदेशी बँक खात्याची माहिती दिली नाही. त्यांच्यासारखे लुटेरे परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यास विरोध करत आहेत, असा थेट आरोप मोदी यांनी २०१६ मध्ये केला होता.

गोव्यात ‘लुईस बर्गर’ ब्रायबरी केस गाजली होती. या प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सहभाग होता आणि भ्रष्ट व्यवहार करणे ही त्यांची सवयच आहे, असे गोवा गुन्हा अन्वेषण शाखेने न्यायालयात सांगितले होते. ही २००५ ची गोष्ट असून, तेव्हा गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे भाजपचे सरकार होते. कामत यांच्यामुळे गोव्याची बदनामी झाली आहे, असेही गुन्हा अन्वेषणच्या तक्रारीत म्हटले होते. गोव्याच्या खाण घोटाळ्यातही कामत यांचा समावेश होता. २०१० साली गोव्यात ‘जिका’ पाणी प्रकल्प हाती घेण्यात आला, त्याला सल्लासेवा देण्याचे कंत्राट देण्याकरिता लाच स्वीकारण्यात आली, असा कामत सरकारवर आरोप होता. त्यांच्याबरोबर तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचेही नाव घेण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी कामत आणि अन्य सहा काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अर्थातच कामत यांची सर्व पापे धुऊन निघाली...

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा हे यूपीए सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना, मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु सात वर्षांपूर्वी कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप. मोदी यांनी स्वतःचे आयुष्य पक्षाला समर्पित केले आहे, असे कौतुकही त्यांनी केले होते. काँग्रेसने सर्व पदे देऊनही, वयाची ऐशी वर्षे पार केल्यानंतर कृष्णा यांनी अचानकपणे मोदींसमोर मुरलीवादन सुरू केले. विजय बहुगुणा हे आहेत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री. काँग्रेस नेते हेमवतीनंदन यांचे ते चिरंजीव. त्याच्या भगिनी रिटा याही काँग्रेसमधून भाजपवासी झाल्या आहेत. २०१६ साली मोदी यांच्या भाजपने स्कूटर घोटाळा प्रकरणात बहुगुणा यांच्या काँग्रेस सरकारवर टीका केली होती. तेच बहुगुणा आपले नऊ सहकारी आमदार घेऊन भाजपमध्ये सामील झाले. अर्थताच भाजपत त्यांचे जंगी स्वागत झाले.

 

मोदी यांनी २०१९ च्या प्रचारदौऱ्यात चंद्राबाबू नायडू यांच्यावर घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

 

आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. किरण रेड्डी यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलवर तुफान टीका केली होती. आज ते भाजपमध्ये आहेत. मोदी यांनी २०१९ च्या प्रचारदौऱ्यात चंद्राबाबू नायडू यांच्यावर घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. नायडूंना त्यांनी ‘यूटर्नबाबू’ असेही संबोधले होते. आज मात्र चंद्राबाबू हे आंध्रचे विकासपुरुष आहेत, असे कौतुक मोदी करत आहेत. नायडूंनी आंध्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा त्या सोहळ्यास मोदी हजर होते. शपथ घेतल्यानंतर थेट नायडू मोदींच्या पाया पडण्यासाठी झुकत असताना, मोदींनी त्यांना थांबवले आणि कडकडून मिठी मारली. वीस सेकंद एकमेकांची गळाभेट झाली. त्यापूर्वी एनडीएच्या बैठकीत मोदींच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना नायडूंनी त्यांची खूप प्रशंसा केली.

काँग्रेस हा पक्ष प्रचंड भ्रष्टाचारी असून, कल्याणकारी योजनांचे पैसे काँग्रेसवाले हडप करतात असे मोदी नेहमीच म्हणत असतात. नारायण दत्त तिवारी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री. तसेच केंद्रातही त्यांनी मंत्रीपदे भूषवली होती आणि पुढे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले होते. तिवारी यांचे एका महिलेची अनैतिक संबंध होते आणि त्यातून त्यांना एक अपत्यही झाले होते. परंतु हे प्रकरण बाहेर आल्यावर तिवारींनी आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असा पवित्र घेतला. परंतु प्रकरण कोर्टात गेल्यानंतर, संबंधित स्त्रीपासून झालेला मुलगा हा माझाच आहे, हे त्यांना कबूल करावे लागले. अशा या ‘पुण्यशील’ काँग्रेस नेते तिवारी यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मोदी यांनी गुजरातचा चेहरामोहरा बदलला आणि देशाचाही ते विकास करत आहेत, असा साक्षात्कारही तिवारी यांना झाला होता. आज हे गृहस्थ हयात नाहीत.

भाजपमध्ये ब्रँड मोदी हा चालणार नाही, पक्षात लालकृष्ण अडवाणी यांनाच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाठिंबा आहे, असे उद्गार काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी काढले होते. ही गोष्ट २०१३ सालची. तेच पाल हे यथावकाश भाजपमध्ये सामील झाले. पाल हे उत्तर प्रदेशचे एका दिवसाचे मुख्यमंत्री राहिले होते. यावेळी ते लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली होती. योगीजींचे स्वागत करण्यासाठी पाल हे पुढे सरसावले आणि नंतर पुन्हा व्यासपीठावर येत असताना, कडमडून खाली पडले. पण त्यावेळी त्यांना हाताला धरून उठवण्यासाठी योगीजी पुढे आले नव्हते, अशी टीकाही झाली. मात्र भ्रष्ट काँग्रेसमधील या भ्रष्ट नेत्याचे मोदींनी आपल्या पक्षात जंगी स्वागत केले.

पेमा खांडू हे आज अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील दोरजी खांडू हेही मुख्यमंत्री होते. २०१६ पेमा खांडू मुख्यमंत्री होते, तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’ची स्थापना केली. मग लगेच डिसेंबर २०१६ मध्येच ते भाजपात दाखल झाले. यापूर्वी खांडू हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांवर त्यांनी देशद्रोहाचे आरोप लावले होते. एरवी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात बोंब ठोकणाऱ्या भाजपला पेमा खांडू यांचे मात्र स्वागत करावेसे वाटले.

 

मोदी यांनी मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या डीएनएमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असल्याची टिप्पणी केली होती.

 

२५ जुलै २०१५ रोजी मुझफ्फरपूर येथील सभेत भाषण करताना, मोदी यांनी मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या डीएनएमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असल्याची टिप्पणी केली होती. त्यानंतर नीतीशकुमार यांनी हा बिहारचा अपमान असल्याचे वक्तव्य केले होते. ५० लाख बिहारी आपल्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी मोदींकडे पाठवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्याच नीतीशकुमार यांचे आता मोदींनी एनडीएमध्ये वाजत गाजत स्वागत केले आहे. नीतीशकुमारही एनडीएच्या बैठकीत मोदी यांचा चरणस्पर्श घेऊ इच्छित असल्याचे दृश्य कॅमेऱ्याने टिपले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केल्याची आठवण मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या एका भाषणात केली. तसेच आर्थिक कामगिरीबद्दलच्या श्वेतपत्रिकेत चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेखही केला. त्यामुळे आता आपल्याला तुरुंगात जावे लागणार, या भीतीमुळे अशोकराव भाजप दाखल झाले. त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. मात्र चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळेच माझा पराभव झाला असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांची युती अनेक वर्षे होती आणि त्यांनी संयुक्तपणे सरकारदेखील चालवून दाखवले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे कोडकौतुक करणाऱ्या मोदी यांनी उद्धवजींनी भाजपची साथ सोडल्याबरोबर, त्यांना उद्देशून ‘नकली संतान’ असे शब्द वापरले. उद्धवजींची शिवसेना ही नकली सेना आहे, अशा दुगाण्याही त्यांनी झाडल्या.

 

तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी जे जे ‘मामु’ भाजपमध्ये सामील झाले आहेत, ते आपोआप स्वच्छ आणि पावन झाले आहेत.

 

ओडिशामध्ये बिजू जनता दल आणि भाजप यांची पूर्वी युतीदेखील होती, त्यानंतर या युतीचा भंग झाला. परंतु केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे तेव्हाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोदी यांच्याशी उत्तम संबंध ठेवले होते. मागच्या दहा वर्षांत अनेकदा मोदी सरकार अडचणीत आले, तेव्हा तेव्हा नवीनबाबूंनी सरकारला मदत केली किंवा ते सरकारच्या बाजूने उभे राहिले. अविश्वास ठराव आणला गेला किंवा एखादे वादग्रस्त विधेयक असेल, तर त्या त्या वेळी नवीनबाबूंनी मोदींची पाठराखण केली. परंतु यावेळी ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रथम बीजेडीशी युती करण्याचे ठरवले होते. मात्र ज्या क्षणी भाजपच्या लक्षात आले की, आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यास सत्ता मिळू शकते, तेव्हा त्यांनी बिजू सरकारवर तोफ टाकायला सुरुवात केली. देशातील एक चांगले मुख्यमंत्री, जे नैसर्गिक संकटात कार्यक्षमतेने काम करतात, असा ज्यांचा गौरव मोदींनी केला, त्यांच्याच प्रकृतीबद्दल भाजपने अफवा उठवायला सुरुवात केली. मोदींनीच त्यांच्या शारीरिक आरोग्यासंबंधी निवडणुकीनंतर एक समिती नेमण्याची घोषणा केली. आज ओडिशा राज्यात भाजपची सत्ता आली आहे. नवीनबाबूंनंतर त्यांचे सहकारी आणि माजी नोकरशहा व्ही. के. पांडियन हेच त्यांचे वारसदार असतील, अशा कंड्या पिकवायला होतीही भाजपने सांगायला सुरुवात केली.

थोडक्यात, जे पक्ष भाजपाशी मैत्री करतात किंवा भाजपची लाचारी करतात, त्यांचा गुणगौरव करायचा आणि एखादा पक्ष मतभेदामुळे भाजपपासून दूर गेला, तर त्याच्या कुळाचा उद्धार करायचा, त्याच्यावर वाटेल ते आरोप करायचे, त्याच्याबद्दल जनतेत विष कालवायचे ही मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपची नवीन संस्कृती आहे. म्हणूनच तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी किंवा भाजपच्या जाचापासून बचाव करण्यासाठी जे जे माजी मुख्यमंत्री किंवा ‘मामु’ भाजपमध्ये सामील झाले आहेत, ते आपोआप स्वच्छ आणि पावन झाले आहेत. जगातील सर्वात मोठा बदमाश पक्ष कोणता, हे आता वेगळे सांगायची गरजच नाही!