Opinion

हिंदुत्वाचे सोंग आणि अव्वल दर्जाचे ढोंग!

मीडिया लाईन सदर.

Credit : इंडी जर्नल

 

एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येचा दौरा केला. त्यावेळी आपल्या दौऱ्यामुळे विरोधकांना पोटदुखी उद्भवली असून, त्यांना हिंदुत्वाची ॲलर्जी झालेली आहे, असे उद्गार त्यांनी पत्रकार परिषदेत काढले होते. वास्तविक त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नव्हता. परंतु त्यापलीकडे जाऊन ते म्हणाले की, ‘हिंदुत्वविरोधकांचा अंत आता समीप आला आहे... संघ आणि भाजप यांना परमानंद होईल, अशी वक्तव्ये करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी अनुक्रमे विरोधकांचा व काँग्रेसचा अंत होण्याची स्वप्ने पाहिली होती. परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जे भाजपबरोबर नाहीत, ते हिंदुत्वविरोधक, अशी संघ-भाजपची भूमिकाच शिंदे यांनी आत्मसात केलेली दिसते. परंतु हेच शिंदे गतवर्षीचे बंड यशस्वी झाले नसते, तर गोळी घालून घेऊन स्वतःचाच अंत घडवून आणणार होते, असा सनसनाटी गौप्यस्फोट महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

गद्दारीला एक वर्ष होऊन गेल्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारची लोकप्रियता वाढलेली नाही. उलट सरकारमधील अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे धाडस या ईडी (एकनाथ-देवेंद्र) सरकारला झालेले नाही. उद्धव ठाकऱ्यांना प्रचंड सहानुभूती मिळत असून, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उलट खोके आणि मिंधे गट म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा आटोकाट प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ते गोळी घालून घेणार होते, ही पसरवण्यात आलेली ष्टोरी. शिंदे हे छत्रपती शिवरायांना आपण कसे मानतो आणि आपण कसे मर्द मराठे आहोत, हे दाखवत असतात. मग असा माणूस लढण्याऐवजी स्वतःच्या डोक्यात गोळी कशी घालून घेईल? हिंदी सिनेमात खलनायक कधी कधी सोज्वळतेचे नाटक करतो, त्यातलाच हा प्रकार आहे.

गद्दारी केल्याचे पाप शिरावर असल्यामुळे, आता ‘खरे गद्दार तुम्हीच’, असा आरोप ते उद्धव ठाकरे यांच्यावर करत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण कसे गरिबीतून वर आलो आणि राहुल गांधींसारखे नेते कसे शहजादे आहेत, हे सांगत असतात, त्याचप्रमाणे शिंदे हेदेखील आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत दुःखाचे प्रदर्शन मांडू लागले आहेत. उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असतात आणि मी मात्र सतत लोकांमध्ये फिरत असतो, असेही ते कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील घरूनच काम करत असत. परंतु त्याबद्दल शिंदे कधीही बोलेले नाहीत. बाळासाहेबांनी शिंदेंना मुख्यमंत्री करायचे ठरवले होते, अशी भाकडकथाही शिंदे गटाकडून संगितली जात आहे. बाळासाहेब आता हयात नसल्यामुळे, त्यांच्या नावाने काय वाट्टेल ते सांगितले जात आहे. परंतु आपल्या मुलाशी वा पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना बाळासाहेबांनी माफ केले असते का, हा खरा प्रश्न आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळी महायुतीला जनादेश, अशी हेडलाईन ‘सामना’ने केली होती. फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतला ‘महा’ हा शब्द सामनाने जाणीवपूर्वक खोडला होता.

 

२५ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यावेळी महायुतीला जनादेश, अशी हेडलाईन ‘सामना’ने केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर राज्यभर महाजनादेश यात्रा काढली होती. त्यामुळे ‘सामना’ने महाजनादेशमधला ‘महा’ हा शब्द जाणीवपूर्वक खोडला होता... भाजपच्या जागा अनपेक्षितरीत्या कमी झाल्यामुळे, ‘आम्हाला गृहीत धरू नका’, असाच मेसेज या हेडलाईमधून देण्यात आला. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. तेव्हा आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह अनेक आमदारांनी, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आदित्यनेच मुख्यमंत्री व्हावे अशी आहे, अशी भावना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेबाबतचा निर्णय घ्यावा, असा ठराव एकनाथ शिंदे यांनीच मांडला. मुख्यमंत्रिपद हे रोटेशनल असावे, म्हणजेच अडीच-अडीच वर्षांचे असावे, असे लेखी आश्वासन भाजपकडून घ्यावे, अशी मागणीही आमदारांनी केली होती. हिंदुत्वाच्या आधारेच आपली भाजपशी युती झालेली आहे. परंतु अडीच-अडीच वर्षांची मागणी मान्य न झाल्यास, आपल्याला अन्य पर्याय उपलब्ध आहेत, असे तेव्हा स्पष्टपणे उद्धवजींनी आपल्या भाषणात  सांगितले होते.

भाजपशी युती करायची नसेल, तर काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापणे, हाच तो अन्य पर्याय होता. एकनाथ शिंदेंसह, आज त्यांच्याबरोबर जे जे आमदार गेले आहेत, त्या सर्वांना याची कल्पना होती. त्यावेळी कोणीही उद्धवजींच्या या वक्तव्याबद्दल आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले. नेतेपदी निवड झाल्या झाल्या आदित्यसमवेत शिंदे व अन्य शिवसेना नेते राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनवर गेले होते. अर्थात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी नव्हे, तर अवकाळी पावसाने नुकासान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरेने मदत द्यावी, हे आवाहन करण्यासाठी. विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्यची नव्हे, तर शिंदेंची निवड करून, एकप्रकारे उद्धवजींनी संधी निर्माण झाल्यास, त्यांनाच मुख्यमंत्री करण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली होती.

 

 

विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०१९च्या पहिल्या आठवड्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओल्या दुष्काळाबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली होती. मावळत्या सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे त्या समितीचे सदस्य होते. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला न जाता, ते औरंगाबादलाच निघून गेले होते. त्या सुमारास देवेंद्रजींचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड हे वेगवेगळी आमिषे दाखवून, शिवसेना आमदार फोडत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. कोणाचेच सरकार न आल्यास, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणली जाईल, असा इशारा देऊन भाजपवाले शिवसेनेवर दबाव आणत होते. अशावेळी उद्धजींनी निवडून आलेल्या आमदारांची बैठक बोलवली आणि पक्षाने काय करावे, याबद्दल विचारविनिमय सुरू केला. भाजपबरोबर जायचे का काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, याचा निर्णय आपण घ्या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे तेव्हा शिंदे, अब्दुल सत्तार व अन्य आमदारांनी सांगितले होते. आज जे उद्धवजींनी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली, असे म्हणत आहेत त्या शिंदेंसह सर्व नेत्यांनी महाविकास आघाडी स्थापण्यास आपली संमती दिली होती. या सरकारमध्ये जाऊन सर्व सत्तापदे या मंडळींनी अडीच वर्षे उपभोगली. त्यावेळी नगरविकाससारखे अत्यंत महत्त्वाचे खाते उद्धवजींनी एकनाथ शिंदेंकडे सोपवले. या खात्याचा पुरेपूर उपयोग करून शिंदेंनी आपली समृद्धी वाढवली. त्यामधूनच शिवसेनेतील आमदारांना उपकृत करून आपल्या गटात ओढले.

२०१९ मध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आदित्य ठाकरे जेव्हा राजभवनात गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर शिंदे व सुभाष देसाई दोघेही होते. शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यास उद्धवजींनी शिंदे यांनाच सांगितले होते. महाविकासचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई व एकनाथ शिंदेच सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार संजय बनसोडे हे अचानकपणे ‘बेपत्ता’ झाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी एकनाथजींचीच मदत मागितली. त्यावेळी ठाण्यातील शिवसैनिक घेऊन, हॉटेल सहारमधून एकनाथजींनीच बनसोडे यांना सोडवून आणले होते.

थोडक्यात, हिंदुत्व खुंटीला बंधून एकसंध शिवसेना महाविकासमध्ये सहभागी झाली होती, असे शिंदे आज म्हणत असले, तरी या सर्व प्रक्रियात खुद्द तेच सामील झाले होते. त्यांनी आपला विरोध न दर्शवता, उलट तेव्हा उद्धवजींच्या प्रत्येक कृतीस समर्थन दिले होते. परंतु केवळ मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे ते संतप्त होते आणि उद्धवजी मुख्यमंत्री झालेले त्यांना मनातून बिलकुल आवडलेले नव्हते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीनेच उद्धवजींच्या नावाचा आग्रह धरला होता, हे सत्य आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्याशी संगनमत करून शिंदे यांनी आपल्या पक्षाशी गद्दारी केली. शिवसेना हा पक्ष फोडला आणि हा गद्दारीचा कलंक पुसला जावा म्हणून आता एकनाथ शिंदे हे बाळासाहेब व धर्मवीर यांचे विचार आणि हिंदुत्व वगैरेची भाषा करून, या सगळ्यास तात्त्विक मुलामा देत आहेत. ही अवव्ल दर्जाची चलाखी आणि बदमाषीच असून, त्यास महाशक्तीचा आशीर्वाद आहे, हे विशेष.