Opinion

संघ-भाजपचा ‘बाकी इतिहास’

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

 

स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून मौलाना आझाद यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली. पारंपरिक इस्लामी शिक्षणपद्धतीनुसार त्यांनी फारसी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून, नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमद खान यांच्या प्रभावामुळे मौलानांनी इंग्रजीचा स्वतंत्रपणे अभ्यास सुरू केला. लोकजागृतीसाठी १९१२ साली कोलकाता येथे त्यांनी ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फारसी भाषांवर चांगले प्रभुत्व होते. तजकिरा, गुब्बारे खातिर, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान अशी त्यांची उर्दू पुस्तके प्रसिद्ध झाली होती.

मौलाना आझाद यांनी भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे उद्दिष्ट होते. आयआयटी, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या स्थापनेचे श्रेयही त्यांचेच. १९७१ ते १९७७ या काळात प्रा. सय्यद नुरुल हसन हे भारताचे शिक्षणमंत्री होते. भारतीय इतिहास या विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली होती. लंडनमधील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’मध्ये ते अध्यापक होते. त्यानंतर ते अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिकवू लागले. ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’चे ते अध्यक्षही होते, त्याचप्रमाणे लंडनच्या ‘रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी’चे फेलोदेखील. शिक्षणमंत्री असताना प्रा. नुरुल हसन यांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ची नवी दिल्लीत स्थापना केली. तसेच ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ची नवी दिल्लीत स्थापना करून, तिच्या आधिपत्याखाली त्यांनी देशभर २७ संशोधन संस्था स्थापन केल्या.

 

वाजपेयी सरकारमध्ये मुरली मनोहर जोशी हे मनुष्यबळ विकासमंत्री असताना, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भगवा अजेंडा राबवण्यास सुरुवात केली.

 

१०+२+३ या शिक्षणपद्धतीचे प्रा. हसन हेच उद्गाते होते. ते पूर्णतः धर्मनिरपेक्षतावादी व स्त्रीवादी होते. भारतातील स्त्रियांच्या स्थितीबद्दलचा एक अहवाल तयार करण्यामागे प्रा. हसन यांनी मोठी भूमिका वठवली. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, शिक्षणमंत्री हा सुधारणावादी असल्यास, देशात चांगला बदल घडू शकतो. मात्र वाजपेयी सरकारमध्ये मुरली मनोहर जोशी हे मनुष्यबळ विकासमंत्री असताना, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भगवा अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. आता धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्री असून, त्यांनीही हाच कित्ता गिरवण्याचे ठरवलेले दिसते. यापूर्वी गेल्यावर्षी मोदी सरकारने एनसीईआरटीच्या बारावीच्या पुस्तकात काही बदल केले. बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या दंगलींचा भाग पुस्तकातून वगळण्यात ला. या मशिदीचा उल्लेखही नव्या सुधारित आवृत्तीत ‘तीन घुमट असलेली वास्तू’ असा करण्यात आला आहे. गुजरात दंगलींचा भागही गाळण्यात आला आहे. शाळांमध्ये दंगलींबाबत शिकवण्याची गरज नाही, असा आश्चर्यकारक युक्तिवाद एनसीईआरटीच्या संचालकांनी तेव्हा केला होता. 

इतिहास माणसाला शहाणा करतो, असे जगद्विख्यात इतिहासकार बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनवताना दिसत आहे. जगातील अनेक आपत्ती आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होताना दिसत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी केले होते. यहुद्यांना इतिहास नसता, तर त्यांची विटंबना थांबली असती. हिटलरच्या उदयाचे एक कारण मुळातच खुडले गेले असते, असेही त्यांनी म्हटले होते. तर इतिहास म्हणजे केवळ घटनांची नोंद नाही. तर त्यामागील कार्यकारणभाव आणि मानवी स्वभाव यांचा अभ्यास आहे, असे मत नामवंत इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी व्यक्त केले होते. अनेक वर्षे ब्रिटिशांनी सांगितलेला इतिहासच आपण कथन करत राहिलो. या इतिहासात परकीयांच्या दृष्टिकोनातून एक विकृत इतिहास मांडण्यात आला.

 

नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशहा बाबरचे ‘अत्यंत क्रूर आणि निर्दयी’ अशा शब्दांत वर्णन करण्यात आले आहे.

 

आता इतिहास या विषयामुळे सतत चर्चेत येणाऱ्या एनसीईआरटी बोर्डाने, म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशहा बाबरचे ‘अत्यंत क्रूर आणि निर्दयी’ अशा शब्दांत वर्णन करण्यात आले आहे. बाबरने अनेक शहरांमध्ये लोकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली, असेही त्यात म्हटलेले आहे. तर अकबराचे शासन हे क्रौर्य आणि सहिष्णुता यांचा ताळमेळ असलेले होते. औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारे तोडले, असेही त्यात नमूद केले आहे. ‘इतिहासातील काळे अध्याय’ असा उल्लेख करत, मुघलांचा इतिहास एनसीईआरटीच्या या आठवीच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे. ‘समाजशास्त्र’ या विषयाच्या आठवीच्या नव्या पुस्तकात मुघलांचा तसेच मराठ्यांचा इतिहास या धड्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

मात्र शालेय वयातील मुलांना इतिहास शिकवताना, तो समतोल पद्धतीने आणि विविधांगांनी शिकवला जावा, अशी अपेक्षा असते. कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात. परंतु वाईट गोष्टींचा उल्लेखच केला नाही, तर चांगल्या बाबींचे महत्त्व अधोरेखितही होऊ शकत नाही. ‘रिशेपिंग इंडियाज् पोलिटिकल मॅप’ नावाचा भाग या पुस्तकात असून, त्यात तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत काय घडले, या घटनांची माहिती देण्यात आली आहे. दिल्ली साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मुघल शासन, शिखांचा उदय अशा सगळ्या विषयांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. त्या काळातील खेडेगावांची व शहरांची रचना कशी होती, हेही वाचायला मिळते. इतिहास म्हणजे केवळ युद्ध, संघर्ष आणि रक्तपात नव्हे. त्यावेळचे स्थापत्यशास्त्र, नगररचना, व्यावसाय-उद्योग यांची माहिती मिळाल्यास, राष्ट्राची प्रगती कसकशी होत गेली, हेही समजू शकते.

मुघलांनी हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर हल्ले केले, हे नाकारण्याचे कारण नाही. एनसीईआरटीच्या पुस्तकात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम, रामेश्वरम यासारख्या मंदिरांवर ह्ल्ले केले. मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती फोडण्यात आल्या आणि लूट करण्यात आली. बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लावण्यात आला होता. तसेच त्यांचा मुघलांकडून अपमान केला जात होता. तुम्ही धर्म बदला आणि इस्लाम स्वीकारा, असेही त्यांना सांगितले जात होते. तर बाबर हा अत्यंत क्रूर शासक होता, त्याने शहरांवर हल्ले करून लोकांची हत्या केली. महिला व लहान मुलांना कैदेत टाकले, अशी माहितीही पुस्तकात देण्यात आली आहे. यात कोणतीही चूक नसून, जे होते तेच नमूद करण्यात आले आहे. औरंगजेबाने मथुरा, सोमनाथ येथील मंदिरे आणि जैन मंदिरे तोडली, तसेच त्याने शिखांच्या गुरुद्वारांवरही  हल्ले केले, याचे संदर्भ पुस्तकात आहेत. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दुही निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले, हे खरे आहे. परंतु आजचे मोदी सरकारदेखील याबाबतीत काय वेगळे आहे? मुसलमानांची केवळ नकारात्मक बाजू असलेले धडे समाविष्ट करणे, हे आक्षेपार्ह आहे. आज जुन्या इतिहासाची मढी उकरून, मुसलमानांना त्रास दिला जाऊ नये, ही अपेक्षा आहे. 

एनसीईआरटीने गेल्यावर्षीही आपल्या पुस्तकांमध्ये काही बदल केले होते. अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ हा विषय अंतर्भूत केला होता. यासोबतच शालेय पुस्तकांमध्ये वीर अब्दुल हमीद यांच्यावरील एक प्रकरण सामविष्ट केले होते. मात्र १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम, गांधीजींच्या नेतृत्वाखालील चळवळ, त्याचप्रमाणे १९४७ नंतरच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात अनेक मुस्लिमांनी भारतमातेसाठी केलेले प्राणार्पण, हेही लक्षात ठेवले पाहिजे. सेतुमाधवराव पगडी यांच्यासारख्या इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे की, मध्ययुगात मुसलमानांनी भारतीय संगीताचा अभ्यास केला आणि त्यावर फार्सीत ग्रंथ लिहिले. अकबर बादशहाने तर भाषांतराचे एक स्वतंत्र खातेच उघडले, अबुल्फजल, फैझी, अब्दुल्कादर बदायूनी इत्यादी मंडळींकडून त्याने महाभारत, रामायण, हरिवंश, भागवत योगवासिष्ठ.

 

जहांगीरच्या काळात मुल्ला मसीहा याने रामायणावर फार्सीतून महाकाव्य रचले.

 

राजतरंगिणी, पंचतंत्र, सिंहासनबत्तिशी इत्यादी संस्कृतग्रंथांची फार्सी भाषांतरे करवून घेतली. त्याचा राजकवी फैझी यांने तर ‘नलदमयंती आख्याना’वर फार्सीतून एक महाकाव्य रचले आहे. या काव्यातून त्याचा भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान व्यक्त झाल्याचे आढळून येते. आणखी एक गोष्ट म्हणजे, जहांगीरच्या काळात मुल्ला मसीहा याने रामायणावर फार्सीतून महाकाव्य रचले. तर शहाजहाँचा मुलगा दारा शुकोह हा तर भारतीय संस्कृतीचा मोठा चाहता होता. त्याने अनेक पंडितांना आश्रय दिला. उपनिषदांचे त्याने अनुवाद करवले. दाराने स्वतः भगवद्गीतेचा फार्सी अनुवाद केला. इस्लाम आणि हिंदू धर्म यांच्यात समान तत्त्वे कशी आहेत, हे दाखवण्यासाठी त्याने ‘मज्मुअल बहरैन’ म्हणजे ‘समुद्रसंगम’ हा फार्सी ग्रंथ लिहिला. दारा शुकोहची काही संस्कृत पत्रे उपलब्ध झाली आहेत. परंतु ३० ऑगस्ट १६५९ रोजी औरंगजेबाच्या आज्ञेने त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. थोडक्यात, इतिहासाच्या सर्व बाजू विद्यार्थ्यांना कळाल्या पाहिजेत. अरबांमुळे इराण्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. पण त्यांनी फार्सीची-स्वभाषेची जोपासना केली. इराणची अस्मिता कायम ठेवण्याचे काम फिरदौसीच्या ‘शाहनामा’ या महाकाव्याने केली. या एका महाकाव्यामुळे इराण्यांना आपण अरबांहून भिन्न असून, आपली संस्कृती प्रचीन, बलशाली आणि संपन्न आहे, याची जाणीव झाली. त्यांनी अरबांचे वर्चस्व झुगारून दिले आणि इराणी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला.

या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रवादाची जोपासना करण्यासाठी आपला वैभवशाली इतिहास, त्यातील कटू आठवणींसह लोकांसमोर ठेवलाच पाहिजे. परंतु हा राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभा असलेला हवा. तो द्वेषाधारित नसावा. परंतु रा. स्व. संघ-भाजपचा हिंदू राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. त्यासाठीच ते इतिहासाला वेठीस धरत आहेत. लहान मुलांची डोकी भडकवणे, हेच त्यामागील मूळ उद्दिष्ट आहे.