Opinion

शिवसेनेची जागा घेण्याचा ‘राज’निर्धार

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

‘मी धर्मांध नसून, धर्माभिमानी आहे’, असा पुकारा करत गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा मुखवटा आमूलाग्र बदलला आहे. शिवसेनेत असताना बेरोजगार तरुणांचे आंदोलन हाती घेणारे, १९९५ ते ९९ या काळात युती सरकार असताना, तरुणांना नोकरी-उद्योग मिळवून देण्यासाठी ‘शिव उद्योग सेना’ काढणारे राज आता धर्मकेंद्री राजकारण करू लागले आहेत. धर्माभिमानी लोक केव्हाही सीमारेषा ओलांडून धर्मांध बनू शकतात, हे देशाने आणि खास करून महाराष्ट्राने १९९२-९३च्या दंगलीत अनुभवले आहे.

२०१९ पर्यंत राज हे सामान्यतः धार्मिक प्रश्नावर टिपिकल पद्धतीने कधीच रिॲक्ट झाले नाहीत. धर्मांधतावादी मुसलमानांनी आझाद मैदान परिसरात पोलिसांवर आणि त्यातही महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ २०१२ साली मनसेने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. मनसेत असताना आमदार राम कदम यांनी विधानसभेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या कानफटात लगावली होती. यासारखे अपवाद वगळता, राज यांनी मनसेच्या स्थापनेपासून, शहरांमधील पायाभूत सुविधा, तरुणांमधील बेरोजगारी आणि मराठीची अवहेलना तसेच विकासाच्या प्रश्नांचेच मुख्यत्वे राजकारण केले.

मनसेच्या ध्वजातही भगव्याबरोबर निळा व हिरवा हेदेखील रंग होते आणि त्यामधून पक्षाने आपले सर्वसमावेशक स्वरूप दाखवून दिले होते. त्यानंतर ध्वज फक्त भगवा झाला, हा भाग वेगळा. पक्षाच्या स्थापनेनंतर लवकरच मनसेला महापालिकांमध्ये तसेच विधानसभेत उल्लेखनीय यश मिळाले. परंतु त्यानंतर सातत्याने भूमिका बदलत राहिल्यामुळे, मतदार नाराज झाले आणि २०१४, २०१७ व २०१९ या वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांत मनसेला लोकांनी पार धुडकावून लावले. प्रथम मोदीस्तुती, नंतर मोदीविरोध, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला काहीसे झुकते माप देत मोदीविरोध आणि नंतर पुन्हा एकदा भाजपशी आँखमिचौली, असा मनसेचा रोलर कोस्टरसारखा प्रवास आहे. यावर कोणीही ‘लाव रे तो व्हिडिओ’, असे केलेले नाही...

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्ववादाची बाजारपेठ विस्तारत चालली आहे.

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्ववादाची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. भाजप, शिवसेनेचे दोन गट आणि मनसे हे चार खेळाडू त्यात खेळत आहेत. हिंदुत्वाची मक्तेदारी आपल्याकडे आहे, असा भाजपचा पक्का समज आहे. महाराष्ट्रात शेतकरी संकटात असताना आणि भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता बेजार असताना, सावरकर अवमानावरून महाराष्ट्र विधिमंडळात गदारोळ होतो. सत्ताधारी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारतात. एवढेच नव्हे, तर मोदींसंबंधात काढलेल्या वक्तव्यांवरून राहुल यांना शिक्षा सुनावली जाताच, समस्त ओबीसी समाजाचा अपमान त्यांनी केला, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकार परिषद घेऊन करतात. ही पत्रकार परिषद बावनकुळे यांनी संबोधित करावी, असा भाजपच्या पक्षपातळीवर जाणीवपूर्वक निर्णय घेतला जातो.

धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगतात. आमदार नितेश राणे हे महाराष्ट्रात ‘लँड जिहाद’ चालू आहे, अशी आरोपवजा आरोळी ठोकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला अयोध्या दौरा असल्याचे जाहीर करतात. मीरा रोड येथे बागेश्वर बाबा नावाचा भोंदू बाबा येतो आणि त्याच्या कार्यक्रमास हजारो लोक गर्दी करतात. या बाबाचे समर्थन आमदार राम कदम करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरून मनसैनिकांना संबोधित करताना, येणारी रामनवमी जोरात साजरी करा, असे आवाहन राज ठाकरे करतात, हे सगळे विलक्षण आहे... मशिदीवरील भोंगे, माहीम येथील समुद्रात बेकायदेशीरपणे दर्गा उभारणे तसेच सांगलीच्या कुपवाड रोडवर अनधिकृत मशीद उभारणे, हे मुद्दे राज यांनी आपल्या भाषणात ठळकपणे मांडले. त्याचप्रमाणे मशिदीवरील भोंगे महिनाभरात हटवावेत, अशी मागणीही केली.

महाविकास आघाडी सरकार असताना राज यांनी भोंग्यांचा प्रश्न हाती घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तो प्रश्न अत्यंत कुशलतेने हाताळला आणि दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ दिली नाही. भोंग्यांवरून ठाकरे सरकारवर तोफ डागणाऱ्या राज यांनी, गेले नऊ महिने शिंदे सरकार भोंगे हटवू का शकले नाहीत, असा सवाल मात्र विचारला नाही. माहीममधील अनधिकृत दर्ग्यास तर ठाकरे सरकारने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असेल, तर या जबाबदारीतून शिंदे सरकारला तरी मोकळे कसे ठेवता येईल? आता राज यांच्या मागणीनंतर, शिंदे सरकार तात्काळ ते अनधिकृत बांधकाम हटवते आणि १२ तासांच्या आत ‘आम्ही कसं करून दाखवलं’, याचे मनसेचे फ्लेक्स शहरभर लागतात, याचा अर्थ काय? शिवसेनेला फोडून भाजपचे समाधान झाले नाही.

उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनात असलेली सहानुभूती कितीही प्रचार केला, तरी नष्ट होत नसल्यामुळे, आता उद्धवजींना पर्याय म्हणून राज ठाकरे यांना अधिकाधिक मोठे करण्याचा प्लॅन राबवला जात आहे, असे दिसते. भोंग्यंच्या प्रकरणात हजारो मनसैनिकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून, ठाकरे सरकारच्या काळात हे घडले होते. परंतु गेल्या दोन महिन्यांत शिंदे सरकारने या केसेस मागे का घेतल्या नाहीत, असा सवाल राज यांनी विचारलेला नाही. शिवसेना ज्या पद्धतीने फुटली, त्यामुळे मीही अस्वस्थ झालो, अशी वरपांगी भावना व्यक्त करणाऱ्या राज यांनी ‘जे पेरले ते उगवले’, अशी उद्धव यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव यांच्याप्रमाणेच आपला पक्षही रिकामा झाला असून, अनेक नेते भाजप वा अन्य पक्षात गेले, हे राज यांना कसे आठवत नाही?

 

उद्धव यांच्या भोवती चौकडी असल्याचेही सातत्याने बोलले जाते.

 

नारायण राणे व आपल्या विरोधात उद्धव यांनी कारस्थाने केली, असा आरोप त्यांनी केला. उद्धव यांच्या भोवती चौकडी असल्याचेही सातत्याने बोलले जाते. ते खरे असले, तरी मनसेतही चौकडीचे दरबारी राजकारण चालते, अशा प्रतिक्रियाही नेहमी उमटत असतात. जनतेची कामे करा, असा ‘आदेश’ विद्यमान सरकारला देताना मनसेच्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची नजर पुणे, मुबई आणि नाशिकच्या हद्दीबाहेर किती जाते, हाही प्रश्न विचारण्यारखा आहे. केवळ एक आमदार असताना, ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी सगळ्यांना सुतासारखे सरळ करीन’, असे उद्गार राज यांनी कढले असून, यात आत्मप्रौढीचे व एकाधिकारशाही प्रवृत्तीचे दर्शन घडते. पाकिस्तानात जाऊन तेथील अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचे कौतुक करणाऱ्या राज यांना, जावेद यांची हिंदू धर्मांधांवर केलेली टीकाही आठवते ना?

त्यांचा नास्तिकतावाद आणि एकूण पुरोगामी मूल्ये यांचाही विचार राजना करावासा वाटतो की सोयीस्कर तेवढेच आठवते? महाराष्ट्रातून मुंबईबाहेर वित्तीय केंद्र गेले आणि ते गुजरातेत हलवण्यात आले. पालघरला होणारी नॅशनल मरीन पोलीस अकादमी गुजरातमधील द्वारकेत हलवण्यात आली. पेटंट आणि डिझाईन कार्यालय मुंबईबाहेर गेले. वेदान्त फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. वस्त्रोद्योग आयुक्तांसह अनेक अधिकारी मुबईतून नॉयडाला हलवण्यात आले आहेत. दिल्लीतील भाजप सरकार महाराष्ट्र व मुंबईची उपेक्षा करत असून, यावर आवाज उठवावा, असे मनसेला वाटत नाही. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जागा आपण घ्यावी, अशा राज ठाकरे यांचा प्लॅन दिसतो. म्हणजे २०१४ नंतर भाजप-मनसे अशा युतीची सत्ता यावी, अशी स्वप्ने कोण पाहत असल्यास, त्यास आक्षेप घेता येणार नाही. मात्र माझ्या हाती एकहाती सत्ता द्या, असे वारंवार आवाहन करूनही, जनता ऐकत नसेल, तर किमान युतीतून सत्तेत जावे, अशी मनसेची योजना असावी. परंतु उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेही वर्क फ्रॉम होम अधिक पसंत करतात. भाजप-मनसे यांची सत्ता आल्यास, या मुद्द्यावरून भाजप नेते राज यांना लक्ष्य करतील काय? विचार करा.