Opinion

परिवर्तनाच्या प्रवाहातला ‘अर्जुन’

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

 

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारल्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, या महाराष्ट्राचे जीवन एका नवीन तऱ्हेने घडावे. त्यात एक प्रकारची नवी आशा व सामर्थ्य निर्माण व्हावे, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्राच्या जीवनातील जे सामाजिक प्रश्न आहेत, त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आमचे  सामाजिक मन भंगलेले आहे, ते आम्हाला सांधावयाचे आहे. ब्राह्मण ब्राह्मणांकरिता, मराठा मराठ्यांपुरता, महार महारांकरिता आणि माळी माळ्यांकरिता विचार करतो.

जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनसी होईल, असे उद्गार त्यावेळी यशवंतरावांनी काढले होते. मात्र गेल्या सहा दशकांत राज्यातील जातवाद कमी होण्याऐवजी वाढलाच आहे. १ मे रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीस ६३ वर्षे पूर्ण होत असून, भविष्यात तरी राज्यात सामाजिक ऐक्य निर्माण होईल, अशी आशा आपण करू या. १ मे हा कामगार असूनही असून, आज मात्र देशातच नव्हे, तर महाराष्ट्रातही कामगारांना कोणीही वाली उरलेला नाही. काही अपवाद वगळता, कामगार संघटनांची ताकदच दिसून येत नाही.

मुंबईत गिरणी उद्योगाची सुरुवात झाल्यानंतर, १८८३ साली सत्यशोधक चळवळीतील नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. आठवड्यात एकदा दर रविवारी कामगारांना सुटी मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि  तसा कायदा करून घेतला. १९१७ साली रशियात क्रांती झाल्यानंतर जगभर कम्युनिस्ट पक्षाचा विचार पोहोचू लागला आणि भारतातही १९२० साली आयटक या कामगार संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर आठच वर्षांत, म्हणजे १९२८ साली मुंबईतील गिरणी कामगारांनी सहा महिन्यांचा ऐतिहासिक संप केला आणि अनेक मागण्यांची पूर्ती करून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर, १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. केवळ आर्थिकच नव्हे, तर सांस्कृतिक-सामाजिक समस्या सोडवून घेणे आणि फक्त दलितांनीच नव्हे, तर सवर्णांनी ही संघटनेत समील होऊन एकत्रितरीत्या लढाई करावी, हा विचार डॉ. बाबासाहेबांनी मांडला. पुढे १९४२ साली डॉ. बाबासाहेब मजूरमंत्री झाले. फॅक्टरीमधील स्त्रियांची नाइट शिफ्ट बंद करणे, त्यांना बाळंतपणाची रजा देणे, तसेच कामगारांना महागाई भत्ता देणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पुरवणे, यासारखे अनेक निर्णय डॉ. बाबासाहेबांनी घेतले आणि त्याबाबत काही कायदेही केले.

आज देशात आणि महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन, प्रत्यक्षात मात्र संकुचित आणि धर्माधिष्ठित राजकारण करणारे लोक सत्तेवर आहेत. त्यांच्या विरोधात लढण्याचे ध्येय दाखवणाऱ्यांमध्ये अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्तेदेखील आहेत. दलितांच्या चळवळीचे नेतृत्व तरुणांकडे सोपवून जातीय त्याचप्रमाणे वर्गीय प्रश्न समजून घेतले पाहिजेत, सामाजिक आणि सांस्कृतिक लढा दिला पाहिजे, असे डांगळे यांना कळकळीने वाटते. ‘दलित पँथर : एक अधोरेखित सत्य’ हा डांगळे यांचा ग्रंथ अलीकडे खूप गाजला. आता ‘परिवर्तनाच्या प्रवाहातले अर्जुन डांगळे’ असा ग्रंथ प्रसिद्ध झाला असून, तो डॉ. मिलिंद कसबे यांनी संपादित केला आहे.

डांगळे यांचे व्यक्तिपर लेख, तसेच साहित्य, संस्कृती व सामाजिक विषयांवरचे लेख त्यात समाविष्ट आहेत. या पुस्तकाच्या आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत डॉ. कसबे म्हणतात की, ‘दलित चळवळीने आपले सांस्कृतिक राजकारण विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, ओबीसी या समाजाशी सांस्कृतिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दलित चळवळीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नेतृत्व तरुणांकडे सोपवले पाहिजे. म्हणजे नवीन पिढी नव्या विचाराने आणि नव्या आयुधांसह ही चळवळ पुढे नेईल, असा डांगळे यांना विश्वास वाटत आहे.’ 

डांगळे यांच्या लेखांचे हे पुस्तक लोककवी शाहीर वामनदादा कर्डक यांना अर्पण करण्यात आले आहे. 

वाट फुल्यांची सोडून

आंबेडकरांना सोडून

तुला चालताच इयाचं नाय

मनूचं अंगडंटोपडं

तुला घालताच इयाचं नाय

अशी वामनदादांची गीतं हा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा अमोल ठेवा आणि दस्तावेज आहे, असे डांगळे यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते. महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील झाल्यानंतर, पक्षाला मिळालेले निवडणुकीतील यश लक्षणीयच होते. सत्तास्पर्धेच्या राजकारणातही रिपब्लिकन पक्षाला, पर्यायाने आंबेडकरी तळवळीला एक प्रतिष्ठा होती, अशी मांडणी करून एका लेखात डांगळे यांनी, ‘आज मात्र आंबेडकरी चळवळ ही फेसबुक, व्हॉट्सॲप व यूट्यूवर जिवंत दिसत असली, तरी सत्तेच्या राजकारणत अस्तित्वहीन होत आहे’, असे नमूद केले आहे.

आता भूतकाळाचा फारसा विचार न करता, गंजलेले, गाजलेले व गांगरलेले सर्वच नेते नाकारावे लागतील. आम आंबेडकरी जनता कोणाचेही नेतृत्व एकमुखी स्वीकारायला तयार नाही. नव्या नेतृत्वाने हे पक्षउभारणीचे धाडस केले, तर सुविधा आणि साधने देणारे असंख्य हात त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी अत्यंत प्रभावी मांडणी डांगळे यांनी केली आहे. महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने अर्जुन डांगळे यांच्या या नव्या पुस्तकाबद्दल मुद्दामच लिहीत आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर अमर शेख यांचाही ठळक सहभाग होता आणि त्यांच्याबद्दलही एक लेख डांगळे यांनी लिहिला आहे.

 

लोकशहारी अमर शेखांचे व्यक्तिमत्तव इतके देखणे आणि आकर्षक होते की, त्यांचा पहाडी, पल्लेदार आवाज साखळदंड तटातट तुटून पडतील असाच होता. डोंगर उभे चिरले जातील, आकाशात स्फोट होईल, इतके सामर्थ्य अमर शेखांच्या सादरीकरणात होते, असा उल्लेखही डांगळे यंनी केला आहे. डांगळे यांचे बालपण माटुंगा लेबर कँपमध्ये गेले. त्यांचे सारेच कुटुंबीय चळवळीशी संबंधित असल्यामुळे, अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर द. ना. गवाणकर यांच्याशी त्यांचे भावनिक नाते होते. बलराज सहानी, ए. के. हंगल, कवी शैलेंद्र हे कार्यक्रमाच्या निमित्ताने लेबर कँपात यायचे. कॉमरेड डांगे, आचार्य अत्रे, दादासाहेब गायकवाड, कॉमरेड ए. बी. वर्धन, कॉ. एस. एस. मिरजकर, कॉ. अहिल्या रांगणेकर, क्रांतिसिंह नाना पाटील अशा नेत्यांनी डांगळे यांचे बालपण प्रभावित केले. 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रबोधनकारांना डॉ. आंबेडकरांनी सांगितले होते की, आपला पक्ष जिब्राल्टरप्रमाणे या लढ्यात आपल्या पाठीशी राहील. त्याच पद्धतीने राज्यातील आंबेडकरी जनता पुढच्या लढाईत उद्धव टाकरे यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही एका लेखात अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केला आहे. डांगळे हे राष्ट्रीय दर्जाचे लेखक आणि प्रागतिक चळवळींचे मार्गदर्शक असून, देशातील आजचे वर्गीय आणि जातीय प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांचे हे पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे. 

सर्वाना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा.