Quick Reads

कोरोना स्क्रिनिंगसाठी मालेगावमध्ये मेडिकल पथकातून गेलेल्या तरुणा डॉक्टरचा अनुभव

मी नाही गेलो तर कोणाला तरी जाणं भागच होतं. त्यामुळं मी जायचं ठरवलं.

Credit : इंडी जर्नल

- डॉ. सौरभ पटाईत

जेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की मालेगावच्या स्क्रिनींग कॅम्पसाठी  तुमची निवड झालेली आहे, तेव्हा मी आणि माझे दोन इंटर्न बॅचमेट लगेच तयार झालो. जेव्हा बाकीच्यांना हे कळलं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की जाऊ नकोस. मालेगावला जाणं म्हणजे सुसाईड करण्यासारखं आहे. मी न जाण्याची सगळी कारणं तपासून पाहिली, मात्र मला एकही कारण सापडलं नाही आणि मी नाही गेलो तर कोणाला तरी जाणं भागच होतं. त्यामुळं मी जायचं ठरवलं.

मी मालेगावला कधीच गेलो नव्हतो. ही पहिलीच वेळ आणि तेही अशा परिस्थितीत जेव्हा मालेगाव हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. माझ्या कॉलेजमधील १२ रेसिडंट डॉक्टर्स, ३ इंटर्न डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ,मेडिकल सामाजिक कार्यकर्ते अशी २० जणांची टीम बनवली गेली. मालेगावमधील परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची जादा कुमक तिथे मागवली गेली आहे. त्यांची राहाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या मंगल कार्यालय आणि समाज मंदिरात केली आहे. या सर्व पोलिसांच्या स्क्रिनींगसाठी आमची टीम तिथे दाखल झाली.

आम्हाला न्यायला पोलिसांची गाडी आली. कोणताही गुन्हा न करता पोलीस व्हॅनमधून प्रवास. गाडी नाशिकमधून निघाल्यानंतर ड्राइवरने सांगितलं की आजच सकाळी मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ला झाला. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपेक्षा कोणी येऊन मारेल याचीच जास्त भीती वाटायला लागली. पण तरी आपल्यासोबत पोलीस आहेत म्हणून बिनधास्त होऊन आम्ही निघालो. कॉलेजमधून निघताना १ सॅनिटायजरची बॉटल, १ ग्लोव्हजची जोडी, एन 95 मास्क एवढं दिलं गेलं. मालेगावला गेल्यावर पीपीई (PPE) किट दिली गेली. आम्हाला जेवढ्यांना निवडलं गेलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोरोना ओपीडीचा अनुभव होता. त्यामुळे प्रोटोकॉल सर्वांना माहीत होता. पण नाशिक शहरात जास्त केसेस नसल्यामुळे आम्हाला ओपीडीमध्ये जास्त रिस्क वाटली नाही आणि आम्ही जिथे जात होतो तिथे प्रत्येक माणूस सस्पेक्ट आहे, अशीच काहीशी परिस्थिती तयार झालेली आहे.

तिथे गेल्यावर आमच्या ३-३ जणांच्या टीम केल्या गेल्या. त्यानुसार प्रत्येक टीमला १०० ते १२० पोलिसांचं स्क्रिनिंग करावं लागणार होतं. दोन रेसिडंट डॉक्टर आणि मी एक इंटर्न डॉक्टर अशी आमच्या तिघांची टीम बनली. पुढचे ४ ते ५ तास आम्हाला 'पीपीई'मध्ये राहायचं होतं. पण पीपीई अंगावर घातल्यानंतर ५ मिनिटातच घामाच्या धारा सुरु झाल्या. बाजूचा काय बोलतोय हेही ऐकू येत नव्हतं. चष्मा आणि त्याच्यावरून 'फेस शिल्ड', त्यामुळे अंधुक दिसत होतं. त्यात चष्म्यावर धुकं जमा झालं तरी ते पुसता येत नव्हतं.

आमच्यासोबत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या (Hydroxychloroquine) गोळ्या दिल्या होत्या. जे पोलीस मालेगावच्या हॉटस्पॉट एरियामध्ये नेमलेले आहेत अशांना या गोळ्यांचा  फुल कोर्स द्यायचा होता. जर कोणाला लक्षणं (symptoms) असतील किंवा ती व्यक्ती संशयित वाटली तर त्या व्यक्तीचा स्वॉब (swab) घेण्यासाठी रिपोर्ट करायचा होता. स्क्रिनिंगसाठी आम्हाला दोन दिवस दिले होते. दुसऱ्या दिवशी तर आमच्याकडे फेस शिल्ड सुद्धा नव्हती. त्यामुळे रिस्क अजून जास्त होती. त्यात माझ्या मास्कची दोरी तुटली. ती तशीच बांधून वेळ भागवून नेली. कारण दुसरा मास्क दिला गेला नव्हता.

आमच्यापेक्षाही भयानक परिस्थिती पोलिसांची होती. महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून उचलून त्यांची पोस्टिंग मालेगावला लावली होती. त्यांची राहाण्याची व्यवस्था करण्यासाठी पश्चिम मालेगावमधले १० ते १२ मंगल कार्यालय, तसेच समाज मंदिरे, सभागृह ताब्यात घेतलेली आहेत. जे पोलीस हॉटस्पॉट असलेल्या पूर्व भागात ड्युटीला आहेत त्यांचीही व्यवस्था पश्चिम मालेगावमध्येच करण्यात आली आहे. त्यामुळे सगळे पोलीस एकत्रच राहातात. हॉटस्पॉटमध्ये असेलेले किंवा नसलेले असे विभाग त्यांच्यात केले गेले नाहीत. त्यांच्या राहाण्याच्या कॅम्पमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सोय नाही. त्यांच्या बेडमध्ये २ फुटांपेक्षा कमी अंतर आहे. कुणी खाली गाद्या टाकून झोपतो. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली की मालेगावच्या बंदोबस्तातून हिंगोलीला परतलेल्या ६ एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची बाधा झाली. जर अजूनही हॉटस्पॉटमध्ये तैनात असणाऱ्या जवानांना बाकीच्यांसोबतच ठेवले जात असेल, तर पोलिसांतच कोरोनाचा प्रसार किती पटकन होईल याचा आपण विचार करू शकतो. त्याचप्रमाणे बाकीच्या लोकांतसुद्धा कोरोना किती वेगाने पसरेल याचा अंदाज आपण बांधू शकतो.

पूर्व भाग हा हॉटस्पॉटचा भाग. या भागात बंदोबस्तात असलेल्या बहूतेक पोलिसांचं वय पन्नासच्या वर आहे. जवळपास ६० टक्के पोलिसांना डायबेटिस, हाइपरटेंशन असे आजार जडलेले. त्यामुळे हे लोक कोरोनाच्या इन्फेक्शनला आज ना उद्या बळी पडणार हे निश्चित. वयस्कर पोलिसांना तिकडे ड्युटी का लावली हे एका वरिष्ठाला विचारले असताना त्याचे उत्तर होते की हे लोक मॉब व्यवस्थित हँडल करू शकतात. तरुण पोलिसांना ड्युटी लावली तर लोकांसोबत पोलिसांचे क्लॅशेस वाढण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वयस्कर लोकांच्या ड्युटी तिकडे लावण्यात आल्या.

 

 

पोलिसांसोबतच्या संभाषणात बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार मालेगाव पूर्व हा मुस्लिमबहुल भाग आणि त्यातच ९० टक्के केसेस समोर आलेल्या. त्यामुळे त्या भागात नियम कडक असणे आवश्यक होते. मालेगावला पूर्व आणि पश्चिममध्ये विभागणाऱ्या मौसम नदीवर सात पूल आहेत. ते सर्व बंद केले आहेत. पूर्व भागात झोपडपट्टीचा परिसर जास्त आहे. त्यामुळे गरिबी जास्त. शिक्षणाचा अभाव आणि धर्माचा प्रचंड पगडा आहे. या सर्व कारणांमुळे कोरोनाचा प्रसार त्या भागात खूप जलद होतो आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. लोक बिलकुल नियम पाळत नाहीत अशी पोलिसांची तक्रार आहे.

एक पोलीस म्हणाले, "१२ बाय १५ च्या खोलीत १५ माणसं किती वेळ बसू शकणार सर! मान्य आहे आम्ही पोलीस तिथे लोकांनी नियम पाळावे म्हणून आहोत. पण घरात राहाणेसुद्धा त्या लोकांना शक्य नाहीये. त्यात काही लोक असे की ते पंधरा दिवस घरात राहिले तर खायला मोहताज होतील अशी अवस्था. या सर्व कारणांमुळे आपण कितीही रोखले, तरी ते लोक रस्त्यावर येणारच. त्यात त्यांचे मौलाना भर घालतात आणि त्यांना हा कोरोना सीएए, एनआरसीशी कसा निगडित आहे हे सांगून भडकावून देतात. त्यामुळे त्यांच्या भागात जायला पोलिसांनासुद्धा भीती वाटते."

मी म्हणालो मुस्लिम पोलीस असतीलच ना. त्यांना तिकडे पोस्टिंग दिली तर त्यांचंही ऐकणार नाहीत का ते लोक. त्यावर त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं पोलीसांनी कितीही सांगितलं तरी त्यांना ते पटत नाही. मौलाना म्हणजेच सगळं काही. ज्या मौलानाने कधी कुराण वाचलंही नसेल तो कुराणचा हवाला देऊन सांगतो की ये कोरोना कुराणमें नही है. ज्यावेळी त्याला आम्ही ताकीद देऊन सांगतो तेव्हा तो खूप चांगला बोलतो. पण नंतर त्या बिचाऱ्या गरीब लोकांना  भुलवत राहातो.

आम्ही गेलो त्यादिवशी सकाळी पोलिसांवर हल्ला झाला. मालेगाव पूर्वचे लोक दोन्ही गावच्या सीमेवर जमले. आम्हाला किराणा आणायला तिकडे जायचंय असं म्हणू लागले. त्यावेळी तिथे पाच सहाच पोलीस होते. हळूहळू गर्दी वाढत गेली. जवळपास शंभर दीडशे लोक जमले. त्यांनी बॅरिकेड्स पाडले. पोलिसांवर हल्ला करायला लागले. जेव्हा अतिरिक्त  पोलिसांचा ताफा तिथे आला तेव्हा हे लोक पळून गेले. मीडियामध्ये बातम्यादेखील आल्या की पोलिसांवर हल्ला झाला म्हणून. पण त्यामागचं कारण पोलिसांच्या बोलण्यातून आम्हाला कळलं जे मीडियात आलं नाही. पूर्व आणि पश्चिम मालेगावला जोडणारे सगळे पूल ब्लॉक केल्यामुळे पूर्व मालेगावला वाळीत टाकलंय असा गैरसमज त्यांच्यात तयार झाला आहे. आणि याच असंतोषातून तेवढे लोक हळूहळू एकत्र जमले. आम्हाला अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूर्व भागात सगळं मिळतं. उलट व्यवसाय करणारे लोक तिकडेच जास्त असल्याचं त्यांनी सांगितले. पण या सगळ्या असंतोषाचा परिणाम कोरोना संपल्यानंतर मालेगावात दिसेल. "कोरोना संपल्यावर मालेगावात दंगल होईल," असं एक पोलीस म्हणाला.

मृतांचा आकडा दिसतोय त्यापेक्षा खूप जास्त आहे असंही काहींचं म्हणणं आलं. दररोज १०० ते २०० लोक मरतात. पण त्यांची नोंद होत नाही. आज ये हार्ट अ‍ॅटॅक से गया, कल वो उससे गया असं लोक बोलत राहातात. त्यामुळे पूर्व मालेगावमधील ६० ते ७० टक्के लोक आज बाधीत असण्याची शक्यता आहे असं पोलीस म्हणतात. या आकड्याला काही आधार नाही, हा फक्त त्यांच्या सुप्त भीतीतुन येणारा अंदाज होता. 

लॉकडाऊन झाल्यापासून सगळी दुकानं बंद झाली. एक समोसेवाला दुकान बंद झालं म्हणून घरीच समोसे बनवून विकत होता. त्याच्याकडे एक पोलीस समोसे खायला गेला होता. आणि दोन दिवसानंतर तो समोसेवाला आणि त्याची बायको दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्या दिवसापासून तो पोलीस हवालदार खूप तणावात आहे असं पोलिसांनी सांगितलं. पण त्या हवालदाराला क्वॅरंटाईन केलं गेलं नाही किंवा त्याची टेस्टिंगसुद्धा केली गेली नाही. आता त्या समोसेवाल्याच्या घरी त्या पोलिसाप्रमाणे अजून किती तरी लोक गेले असतील. पण त्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. ते लक्षणरहीत वाहक असतील, तर ते किती लोकांना बाधीत करू शकतात याचा अंदाज बांधता येणं अवघड आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही,टेस्टिंग नाही मग केसेस बाहेर येणार कशा?

ज्याप्रमाणे हिमनगाचे टोक फक्त वर दिसते पण त्याचा ९८ टक्के भाग पाण्याखाली असतो आणि तोच भाग टायटॅनिक ला धडकला होता आणि त्यात टायटॅनिक बुडाली होती. समजा जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत. ते सगळे निगेटिव्ह जरी झाले आणि आपण कोरोना फ्री झालो तरी आपण फक्त हिमनगाच्या टोकाशीच सामना केला आहे हे लक्षात ठेवावे लागेल. आणि पाण्याखाली असलेल्या हिमनगाचा सामना करण्यासाठी आपल्याला सुसज्ज राहावे लागेल!

लेखक वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक, येथे इंटर्न डॉक्टर आहेत.

(वरील अनुभव हे लेखकाचं वैयक्तिक कथन आहे. याला सार्वत्रिक अनुभव वा वार्तांकन समजू नये.)