India

राज्यात लंपी स्किन रोगाविरुद्ध लसीकरण सुरु, पशुपालकांना सावधतेचा इशारा

लसींची उपलब्धता पुरेशी नसल्यानं पशुपालकांना योग्य वेळी उपचार सुरु करण्याचं प्रशासनाचं आवाहन.

Credit : पीटीआय

देशभरात ५७,००० हुन अधिक गायींचा बळी घेणाऱ्या लंपी स्किन रोगानं महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये शिरकाव केलेला आहे. गायींचं या रोगाविरुद्ध लसीकरण राज्यात सुरु झालं असलं, तरी अचानक वाढलेल्या संक्रमणामुळं प्रशासनाकडे लसींची संख्या पुरेशी नाहीये. त्यामुळं सध्या पशुपालकांनी घाबरून न जाता योग्य वेळी गायींचे उपचार सुरु करावेत, असं आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

"सध्या तरी आपल्याकडे घाबरण्यासारखं कारण नाही. पण शेतकऱ्यांना आवाहन आहे की जनावर आजारी पडल्यास लवकरात लवकर जवळच्या केंद्रात कळवा. सुरवातीला ताप असतानाच उपचार सुरु झाले, तर जनावर लवकर उपचारांना दाद देईल," पुणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी भिमाजी विधाटे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले.

लंपी हा त्वचेचा आजार आहे, जो विषाणुमुळे गुरांमध्ये पसरतो. या आजारामुळं जनावरांच्या शरीराला गाठी येतात आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर गाठी येण्यापूर्वी २ दिवस जनावरं खात नाहीत, त्यांना ताप येतो. तेव्हाच त्यांच्यावर उपचार सुरु होणं गरजेचं असल्याचं विधाटे सांगतात. 

राज्यभरात या रोगामुळं यावर्षी ४३ जनावरांचा मृत्यू झाला आहे, ज्यातील साधारण ५ पुणे जिल्ह्यातील आहेत. "आपल्याकडे अजून तरी जास्त मृत्यू झाले नाहीत. जे झाले तेदेखील आदिवासी भागात झाले, जिथं जनावरांना घरी खाण्यासाठी चारा उपलब्ध नसतो. बाहेर पाऊस असल्यामुळं माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं संक्रमणाची शक्यता जास्त आहे," विधाटे पुढं सांगतात.

राज्यभरात लसीकरण सुरु झालं असलं तरी लसीचा सध्या तुटवडा असल्याचं त्यांनी सांगितलं. "प्रत्येक बाधित गावाच्या ५ किमी पर्यंत लसीकरण करण्याचे केंद्र शासनाच्या धोरणानुसार आदेश आहेत. मात्र मागणी वाढल्यामुळं सध्या लसी कमी पडतायत. पण आमचे प्रयत्न चालू आहेत. जिल्ह्यात साधारण ८.५ लाख गायी आहेत, त्यातील जवळपास सव्वादोन लाख गायीचं लसीकरण झालेलं आहे. निधी मिळाला तर अजून लसी मिळवता येतील," ते म्हणाले. 

मात्र तोवर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय करण्याची आवश्यकता आहे. "हा रोग कीटकांमार्फत पसरतो. त्यामुळं कीटकांचा नायनाट करून, जनावरं अलिप्त ठेऊन आणि लक्षणांचं वेळेत कळवून, लस मिळेपर्यंत संक्रमणावर नियंत्रण आणता येऊ शकतं," विधाटे सांगतात.

 

लक्षणं तातडीनं कळवण्यासाठी शेतकरी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 

 

देशभरात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश येथील जनावरांना लंपीची लागण सुरु झाली. राज्यात ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये  लंपीची लागण झाली. त्यानंतर हा राेग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, काेल्हापूर, सातारा, सांगली आणि साेलापूर या जिल्ह्यांमध्ये पसरत गेला. सलग तिसऱ्या वर्षी राज्यात या रोगाचं संक्रमण झालेलं आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी यासंदर्भात पत्रक काढून पशुसंवर्धन विभागाला जागरूक राहण्याची सूचना दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी स्किन रोगाच्या बाबतीत ‘नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली असल्याचं आज पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितलं. तसंच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरवणं, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शनांनाही मनाई करण्यात आली आहे.

हा आजार झालेल्या जनावरांमध्ये दूध उत्पादन कमी होतं. मात्र राज्यात जास्त जनावरांना लागण न झाल्यानं दूध उत्पादनावर फारसा परिणाम होण्याची सध्या तरी शक्यता नसल्याचं अधिकारी सांगतात. तसंच हा आजार प्राण्यांपासून माणसांना होत नाही, त्यामुळं लोकांनी दूध घ्यायला घाबरू नये, असंही आवाहन प्रशासनानं केलं आहे.

“हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसंच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे काही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल,” पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पशुपालकांना शासनाच्या वतीनं आवाहन केलं आहे.

२०१९ मध्ये सर्वप्रथम भारत, बांगलादेश आणि चीनमध्ये या रोगाची लागण आढळून आली होती. माशा, डास, पिसवा तसंच प्रदूषित अन्न आणि पाण्यामुळं या रोगाचं संक्रमण होतं.