India

महाराष्ट्रभर ३० एप्रिलपर्यंतचे नवे निर्बंध काय असतील?

राज्य सरकारनं जवळपास महिन्याभराचा लॉकडाऊन सदृश नियम लागू केले आहेत.

Credit : Indian Express | Arul Horizon

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढत संसर्ग थोपवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं ५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ४९,४४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तसंच राजधानी मुंबईत जवळपास ११,००० तर पुण्यात जवळपास ७,००० नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. ३ एप्रिल पासून पुणे शहरात देखील कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र राज्यातली गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता आता राज्य सरकारनं जवळपास महिन्याभराचा लॉकडाऊन सदृश नियम लागू केले आहेत.

या निर्बंधांना ब्रेक द चेन असं संबोधत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.  

नवीन निर्बंधांनुसार राज्यातली सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरूच राहणार आहे, मात्र गर्दीची ठिकाणं बंद करण्यात येणार आहेत. थेट कोरोनाशी संबंधित असलेली कार्यालयं सोडून बाकी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ५० टाके असेल.वित्तीय आणि आपत्ती व्यवस्थापन सोडून बाकी सर्व खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम बंधनकारक राहील.

 

रात्रीची संचारबंदी आणि वीकेंडला पूर्ण लॉकडाऊन

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यात 144 कलम लागू केलं जाईल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. तसंच  सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी असेल, म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील.

दुकानं, मॉल्स,करमणुकीची ठिकाणं, इ. ठिकाणं बंद 

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकानं, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. मनोरंजन आणि करमणुकीची स्थळं जसं की  चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुलं, सभागृहं, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळं बाहेरून येणाऱ्या भक्त आणि दर्शनार्थींसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.

सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.

 

हॉटेल, बार बंद 

उपाहारगृहं आणि बार पूर्णतः बंद राहतील. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. तसंच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.

काय सुरु राहील

शेती व शेतीविषयक कामं, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू राहील.

स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसंच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालयं सुरू राहतील.

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.

वृत्तपत्र छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. 

अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याची सूचना राज्य सरकारनं केली आहे.