India

महिला रिक्षाचालकांचे देशातील पहिले स्वतंत्र रिक्षा स्टँड निगडीत

कष्टकरी महिलांच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग

Credit : File

पुणे: महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने निगडी भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन आज गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालक महिलांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅन्डचे स्वागत केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असे निगडी येथे सुरू होणाऱ्या महिला रिक्षा स्टँडचे नाव आहे. 

महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिले रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले. अनेक वर्षे धुणीभांडी अन् मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग आले आहे. रोजगारांच्या या नवीन संधीने अर्थिक स्वावलंबनाबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक बाबा कांबळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या २० वर्षांपासून रिक्षा पंचायतीबरोबरच कष्टकरी महिलांसाठी त्यांचे काम सुरू आहे. राज्य शासनाने २०१७ ला रिक्षा परवाना सर्वांसाठी खुला केला. त्यामुळे केवळ मोलमजुरी व धुणीभांडीची कामे करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलांना नवीन संधी उपलब्ध झाली. कष्टकरी संघटनेतील सुशिक्षित व धाडसी महिलांनी रिक्षाचालक म्हणून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वेदांत ड्रायव्हिंग स्कूलने सामाजिक बांधिलकीतून कष्टकरी महिलांना मोफत रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले.

 

बँक, आरटीओ अधिकाऱ्याची मदत

पिंपरी-चिंचवड आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सुबोध मिडसीकर यांना महिला रिक्षाचालकांची संकल्पना सांगितली. त्यांनीही सर्व महिलांना तातडीने शिकावू परवाना उपलब्ध करून दिला. त्यानंतर महिलांनी रिक्षा चालविण्याचा सराव केल्यानंतर लायसन, बॅच व परमिट त्वरित मिळाले. राष्ट्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करीत मुद्रा योजनेतून १०० महिलांना रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून विविध भागात कष्टकरी महिला रिक्षाचालक म्हणून पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.

 

महिलांसाठी रोजगाराची नवी संधी

महिलांसाठी हक्काचे रिक्षा स्टँड नसल्याने त्यांना इतर ठिकाणी थांबण्यास मज्जाव केला जात होता. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड शहराचे पश्चिमद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या स्टँडचे अनावरण गुरुवारी (दि. ६) सायंकाळी झाले. प्रवाशांसाठी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे रिक्षा स्टँड सुरू असणार आहे. महिला रिक्षा स्टँड, निगडीच्या अध्यक्षा सरस्वती गुजलोर म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असे निगडी येथे सुरू होणाऱ्या महिला रिक्षा स्टँडचे नाव आहे. आम्ही सर्व महिला याअगोदर धुणीभांडी, मोलमजुरी, साफसफाईची कामे करीत होतो. मात्र, रिक्षा चालविण्याची संधी मिळाल्याने आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहत आहोत. महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही पाऊल उचलले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे याविषयी आनंद व्यक्त करतांना म्हणाल्या, "पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत आणि त्यांनी स्वतःचे रिक्षा स्टँड निर्माण केले आहे हे शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महिलांच्या रिक्षा स्टॅण्डवर वाचनालय, पानपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील."

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष, कामगार नेते बाबा कांबळे म्हणाले, "पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला कामगारनगरी म्हणूनही ओळखले जाते. शहरात सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना महिलांना सुरक्षित वाटत नाही. महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला रिक्षाचालक ही संकल्पना राबविली आहे. आता निगडीत महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड सुरू केले आहे. पुणे व पिंपरी शहरातील प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे."