Asia

चीनधार्जिण्या नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी कोविड-लसीसाठी मानले भारताचे आभार

भारतात उत्पादित केलेली लस वापरणारा नेपाळ हा भारतानंतर पहिलाच देश ठरला आहे.

Credit : मलयाळम मनोरमा

काठमांडू: नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ‘कोविड लस’ उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारतात कोविशिल्ड ही लस उपलब्ध झाल्यानंतर आठवडाभरातच भारताने नेपाळला दहा लाख लशींचा पुरवठा केला होता.  राजधानी काठमांडूमध्ये आज दुपारी पार पडलेल्या कोविड-लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात ओली बोलत होते. 

भारतात उत्पादित केलेली लस वापरणारा नेपाळ हा भारतानंतर पहिलाच देश ठरला आहे. नेपाळमधील ६२ मोठे दवाखाने आणि १२० लसीकरण केंद्रांमधून ही रोगप्रतिकारक लस नेपाळमध्ये दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नेपाळमधील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे, असे नेपाळच्या आरोग्य आणि जनसंसाधन मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ओली यांनी यावेळी संपूर्ण नेपाळमधील जनतेला येत्या तीन महिन्यात कोविड लसीचे लसीकरण पूर्ण करून दाखवण्याचा मानस बोलून दाखवला. 

"आपल्याला कोविड लशींचा पुरवठा तुलनेने लवकर झाला आहे. यासाठी मी आपला शेजारी भारत, भारतातील लोकांचे, भारत सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो" असे ओली आपल्या भाषणात म्हणाले. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्रा-झेनका यांनी संयुक्तपणे शोधलेली व पुण्यातील सिरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाने 'कोविशिल्ड' या नावाने उत्पादित केलेली ही लस परदेशातही वापरण्यास सुरुवात झाली आहे. 

२०२०च्या डिसेंबरमध्ये ओली यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर आरोप करत नेपाळच्या संसदेच्या कनिष्ठ सदन बरखास्त केले होते. आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी एप्रिलमध्ये निवडणूक घेण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे तेव्हा नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अल्पकालीन सरकारांची परंपरा असलेल्या नेपाळमध्ये सध्या संसदीय पेच सुरु असुन ओली तात्पुरते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार बघत आहेत.  या पार्श्वभूमीवर चीनला झुकते माप देणाऱ्या ओली यांनी भारताची प्रशंसा करणे महत्त्वाचे मानले जात आहे. 

ओली यांच्या बरोबरीने कम्युनिस्ट पक्षाचे सहअध्यक्ष असलेले पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भ्रष्टाचाराचे  तसेच नेपाळचा पारंपरिक मित्र भारताला सोडून चीनशी जवळीक वाढवण्याचा आरोप केला होता. त्यामुळे पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वीच ओली यांनी कनिष्ठ सदन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.

नेपाळ हे सध्या संसदीय मार्गाने कम्युनिस्ट सरकार निवडून आलेले सध्या जगातील एकमेव राष्ट्र आहे. २०१८ साली नेपाळमधील 'संयुक्त मार्क्स-लेनिनवादी' आणि 'माओवादी' या प्रमुख दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन आपले वाद मिटवत 'नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची' स्थापना केली होती. भारत आणि नेपाळ यांच्या बदलत जाणाऱ्या संबंधांविषयी इंडी जर्नलने केलेला विस्तृत विश्लेषण केले होते. ते इथे वाचता येईल.