Americas

१.१ कोटी लोकांच्या नागरिकत्वासाठी विधेयक आणणार: कमला हॅरिस

नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची घोषणा.

Credit : USA Today

नागरिकत्व नसलेल्या, सरकारदरबारी नोंद नसलेल्या १.१ कोटी अमेरिकास्थित लोकांना नागरिकत्व देण्याकरता अमेरिकन संसदेत (कॉंग्रेस) विधेयक मांडलं जाणार आहे. नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी तसं जाहीर केलं आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या आणि नागरिकत्व नसलेल्या भारतीयांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

‘ड्रीमर्स’ना सुरक्षितता देण्यासाठी एक आराखडा तयार करून हे विधेयक मांडलं जाणार आहे, असं हॅरिस यांनी म्हणलं आहे. ‘ड्रीमर्स’ हा शब्द अमेरिकेच्या संदर्भात, स्थलांतरित तरुणांसाठी वापरला जातो. असे तरुण जे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि इतरही अनेक स्वप्नं घेऊन आपलं आयुष्य आजमावून पाहण्याकरता जगभरातून अमेरिकेत जातात. गेली चार वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील सरकारनं परदेशी स्थलांतरित व निर्वासितांविरोधी कठोर भूमिका घेत धोरणं राबवली व अनेक पारंपरिक अमेरिकन धोरणं बदलली. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित बायडन-हॅरिस सरकारकडून घेतली गेलेली ही धोरणात्मक भूमिका महत्त्वाची ठरते.

 

 

उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, सगळ्यात आधी अमेरिकन नागरिकांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याला प्राधान्य असेल, त्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जातील, असंही हॅरिस यांनी म्हणलं आहे. याशिवाय पॅरिस कराराबाबत सकारात्मक विचार करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात पॅरिस कराराबाबत हेकेखोर भूमिका घेतली होती. पॅरिस करार, हा पर्यावरणासंबंधातला एक महत्त्वाचा करार आहे, ज्यातून जागतिक प्रदूषणात मोठा हातभार असणाऱ्या अमेरिकेसारख्या महासत्तेनं ट्रम्प यांच्या धोरणानुसार हात काढून घेतले होते व हा करार अस्वीकार केला होता. त्यादृष्टीनंदेखील नव्या सरकारचा हा धोरणात्मक बदल महत्त्वाचा असणार आहे.kamala harr