Quick Reads

ईडा पीडा घेऊन जा गे मारबत!

दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला नागपुरात मारबत आणि बडग्याचा उत्सव साजरा केला जातो.

Credit : नवभारत/शुभम पाटील

कल्याणी राठोड | मारबत व बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. यंदाही नागपुरात बडग्या-मारबत महोत्सव साजरा करण्यात आला. श्रावण महीना सुरु झाला की, महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. त्यातही विदर्भात काही वेगवेगळ्या सणांची प्रथा आहे. काही सण असे आहेत की ते फक्त नागपुरातच साजरे करण्याची प्रथा आहे. यामध्ये काळी-पिवळी मारबत व बडग्या हा मिरवणुक प्रकार नागपूरात साजरा करण्याचा इतिहास आहे. 

मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. पिवळी मारबत उत्सव १३७ वर्षांपासून तर काळी मारबतला १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला, त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षादेखील जुना असलेला हा उत्सव पोळ्याच्या पाडव्याला अविरत साजरा केला जातो.

 

देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य

बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याची मिरवणूक शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतळे) तयार केले जातात. काली आणि पिवळी मारबत हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण आहे. बरेच लोक नमाज पढतात आणि या मारबतांच्या पायावर आपले चिमुकले ठेवतात. स्त्रिया साड्या आणि नारळ अर्पण करून वातावरणाला प्रसन्न करतात. अनेक भक्त नवस पाळतात आणि नवस पूर्ण झाल्यावर प्रार्थना करायला येतात. अनेक निपुत्रिक जोडपी पिवळी आणि काळी मारबत येथे प्रार्थना करण्यासाठी देखील भेट देतात. 

गेल्या काही वर्षांत, दहशतवाद, महागाई, गरिबी, भ्रष्टाचार, हुंडाबळी आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याबरोबरच भ्रष्ट नेत्यांना आणि कॉर्पोरेट्सना लक्ष्य करणाऱ्या डझनभर बडग्यांच्या उपस्थितीने मिरवणूक अधिक रंगतदार झाली आहे. परंपरेनुसार, भाविक वाईट शक्तींचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे घेऊन मिरवणूक काढतात. काळी आणि पिवळी यांचे मातीचे पुतळे किंवा 'मारबत' हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आहेत, जे स्थानिक लोक जाळतात.

 

मारबत व बडग्या मिरवणुकीमागचा इतिहास

नागपुरात भोसले राजाचे राज्य होते. भोसले घराण्याच्या राणी बांकाबाई भोसले यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. हे सर्व सामान्यांना आवडले नाही. याला आळा घालण्यासाठी आणि निषेध म्हणुन बांकाबाईच्या कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्याची व मग त्याचे दहनकरण्याची परंपरा सुरु झाली. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बांकाबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही. म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात.

 

 

या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहान मुलांना घेउन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच असते. शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरांना हा एक विरंगुळा वाटतो. इंग्रजांचे राज्य जाऊन आज ७५ वर्षे लोटली. परंतु नागपूरकर आणि या परिसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.

महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला प्राचीन काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात, असाही इतिहास काही जण सांगतात. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.

 

कसे तयार होतात मारबत?

ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून 'घेऊन जा रे मारबत, घेऊन जा रे मारबत! ढेकूल मोंगसा, राई रोग घेऊन जा गे मारबत' असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबत बरोबर जो बडग्या असतो, त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.

 

मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत.

 

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उभे असतात.

काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत आहे, असे मानले जाते.

 

नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते

या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. आणि अखेरिस या मारबतीच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. या दहनाबरोबरच समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणुंचा नाश होतो. व त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, असा समज आहे. या मिरवणुकीच्या शेवटी पिवळी व काळी मारबत यांची गळा भेट केल्या जाते. आणि नंतर त्यांचे दहन केल्या जाते. 

मारबत व बडग्याच्या या मिरवणुकीला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. लाखो नागरीक या उत्सवात सहभागी होतात. या एका दिवसाच्या मिरवणुकीमुळे अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो.