Quick Reads

‘जून’: बिटरस्वीट समकालीनत्व

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

आपल्याकडे खूप साऱ्या घडामोडी, प्रसंग घडणाऱ्या चित्रपटांचे प्रस्थ आहे. ज्यात अनेकदा एकामागून एक प्रसंग घडत राहतात आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. मात्र, काही सिनेमे या रूढ प्रकाराला छेद देणारे असतात. अशा चित्रपटांमध्ये खूप सारे प्रसंग नसतात. मोजके प्रसंग आणि मोजकेच तपशील असले तरी उत्तम व्यक्तीचित्रण असणारी पात्रं भरमसाठ प्रसंगांची कमतरता भरून काढतात. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी सह-दिग्दर्शित केलेला (तसेच दोघांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला) ‘जून’ अशाच चित्रपटांमध्ये मोडतो. साधारण एका महिन्याच्या कालावधीत घडणाऱ्या चित्रपटात प्रसंग आणि घटना तशा कमी असल्या तरी प्रसंगांची लांबी आणि बराच काळ टिकून राहणारा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. हा प्रभाव सक्षमपणे समोर उभी राहणारी पात्रं आणि चित्रपटातील संकल्पनांचे गांभीर्य अशा दोन्ही स्तरावरील आहे. 

 

‘जून’मध्ये शहर, जागा आणि वेळ या तीन संकल्पना महत्त्वाच्या आहेत.

 

‘जून’मध्ये शहर, जागा आणि वेळ या तीन संकल्पना महत्त्वाच्या आहेत. (चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच या संकल्पनांचा उल्लेख येतो.) चित्रपट घडतो तो औरंगाबाद शहरात. चित्रपटाच्या सुरुवातीला या शहरात दोन समदुःखी जीवांची भेट होते. नील (सिद्धार्थ मेनन) हा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये नापास झाल्याने पुण्यातून औरंगाबादला परतला आहे. तो औरंगाबादला परत आला असला तरी हे शहर, इथल्या जागा आणि इथल्या माणसांविषयी त्याचे प्रेम असल्याचे दिसत नाही. या माणसांमध्ये त्याच्या पालकांचाही समावेश होतो. सामाजिक दडपण आणि “लोक काय म्हणतील?” या प्रश्नाने ग्रासलेले त्याचे आई आणि वडील (किरण करमरकर) सर्वस्वी दोषी आहेत असं नाही. मात्र, नीलची मनोवस्था, त्याच्या आता खदखदणारे दुःख समजून घ्यायला ते कमी पडतात, इतके खरे. होमटाऊन असूनही नीलच्या मनात या शहरात उपरा असण्याची भावना निर्माण झालेली आहेत. तर, नुकतीच औरंगाबादमध्ये, नीलच्याच सोसायटीमध्ये राहायला आलेली नेहा (नेहा पेंडसे) ही खरोखर या शहरात उपरी आहे. तीदेखील पुण्यातील फ्लॅट सोडून तिच्या पतीच्या, अभिजीतच्या फ्लॅटवर राहायला आलेली आहे. इथल्या मध्यमवर्गीय जाणिवा बाळगून असणाऱ्या सोसायटीमध्ये सिगारेट ओढणारी, शहरी नेहा ही स्वैराचारी आणि ‘बॅड इन्फ्लुएन्स’ असते. साहजिकच दोघांचं जगापासून तुटल्यासारखं वागणं आणि विमनस्क अवस्था त्यांच्यातील मैत्रीची सुरुवात ठरते. 

दोघं आपापल्या सुख-दुःखाची (मोस्टली दुःखच) देवाणघेवाण करतात. दोघांमध्येही आत्महत्या करण्याची प्रवृत्ती अस्तित्त्वात असते. दोघांनीही आत्महत्येचा बराचसा विचार केलेला असतो. एका शॉटमध्ये नेहाने यापूर्वी आत्महत्येचे प्रयत्न केले असण्याकडे निर्देश केला जातो. आत्महत्या, नैराश्य या संकल्पना पुरेशा गंभीरपणे समोर येतात. शिवाय, इथे नुसते संकल्पनांच्या स्वरूपातील गांभीर्य अस्तित्त्वात नाही, तर त्या अनुषंगाने येणारी (हेतूपुरस्सररीत्या) अस्वस्थ करणारी दृश्यंही आहेत. लेखक निखिल महाजनने या चित्रपटात त्याच्या स्वतःच्या औरंगाबादमधील वास्तव्याचा, वैयक्तिक अनुभवांचा बराचसा वाटा असल्याचे बोलून दाखवले होते. चित्रपट ज्या प्रकारे उलगडतो, त्यात ही बऱ्याच अंशी वैयक्तिक अवकाशातून येणारी (निर्माण झालेली) कलाकृती असल्याचे स्पष्ट होते. ज्यात मुख्य पात्रांचा ‘लिव्ह्ड एक्स्पीरियन्स’ शक्य तितक्या खरेपणासह चीतार्ण्याचे उद्दिष्ट दिसते. त्यामुळे पात्रांच्या अनुभूतीच्या शक्य तितक्या जवळ जाणाऱ्या मांडणीमुळे इथे मांडल्या जात असलेल्या संकल्पनांचा आणि प्रसंगांचा प्रभाव अधिक वाढतो. 

 

 

औरंगाबाद हे शहर, तिथले भाषिक आणि सांस्कृतिक संदर्भ चित्रपटातील जग उभारताना महत्त्वाचे ठरतात. नील आणि नेहाच्या मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर ते शहरातील विविध जागी प्रवास करू लागतात. नेहासोबतच्या प्रसंगांमध्ये ती नीलच्या स्वभावातील, वागण्यातील काही गोष्टींवर आक्षेप नोंदवते. त्याच्या मनातील मुस्लिमद्वेष (इस्लामोफोबिया) आणि त्याची प्रेयसी निक्कीशी (रेशम श्रीवर्धन) वागताना जाणवणारा स्त्रीद्वेष्टेपणा (मिसॉजिनी) हे ते मुद्दे. यापैकी पहिला मुद्दा हा औरंगाबाद की संभाजीनगर वाद, तसेच समाजात दिसून येणाऱ्या मुस्लिमद्वेषाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो; तर दुसरा मुद्दा मध्यवर्ती पात्राच्या काही अंशी स्त्रीद्वेष्ट्या स्वभावाबाबत चित्रपटातील व्यक्तिरेखेने आक्षेप घेणे हे ‘कबीर सिंग’सारख्या (२०१९) चित्रपटांतील नायक पाहण्याची सवय असलेल्या भारतीय पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. 

चित्रपटातील काळ हा समाजात नैतिक अधिसत्ता गाजवू पाहणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळे नील आणि नेहाच्या मनात जशी अस्वस्थता आहे, तशीच अस्वस्थता सामाजिक स्तरावरदेखील अस्तित्त्वात आहे. सिगारेट ओढण्यावरून किंवा कुठल्याही प्रकारचे असभ्य वर्तन करण्यावरून कुणालाही नैतिकतेचे धडे देण्याचा हा काळ. साहजिकच हे चित्रण औरंगाबादमधील एका विशिष्ट सोसायटीच्या आवारात घडणाऱ्या घटनांचे असले तरी त्याला विशिष्ट असा सामाजिक संदर्भ आहे. त्यामुळे हे चित्रण फक्त एका जागेपुरते मर्यादित राहत नाही. इथला जैस्वाल (निलेश दिवेकर) किंवा त्याला पाठिंबा देणारे लोक हे समाजातील एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. या सगळ्या नैतिक, सामाजिक बंधनांमुळे नील आणि नेहासारख्या पात्रांच्या कोंडमाऱ्यात अधिक भर पडते. 

 

चित्रपटातील काळ हा समाजात नैतिक अधिसत्ता गाजवू पाहणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळे नील आणि नेहाच्या मनात जशी अस्वस्थता आहे, तशीच अस्वस्थता सामाजिक स्तरावरदेखील अस्तित्त्वात आहे.

 

निक्कीचे पात्र लांबीच्या दृष्टीने लहान असले तरी त्या पात्राची वागणूक, विचारसरणी स्पष्ट करणारे तपशील व प्रसंग चित्रपटात दिसतात. हेच नीलच्या वडिलांच्या पात्राबाबत. मोजक्या, पण समर्पक दृश्यांतून या दोन्ही व्यक्तिरेखा उलगडत जातात. सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे या दोघांचे परफॉर्मन्सेस ठळकपणे उठून दिसणारे आणि प्रभाव टाकणारे आहेत. ही दोन्ही पात्रं बराच काळ मनात खूप काही दडवून बसलेली असतात. त्यामुळे हे विशिष्ट साचलेपण आणि अस्वस्थता पडद्यावर आणताना या अभिनेत्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरते. रेशम श्रीवर्धन, किरण करमरकर आणि निलेश दिवेकर हे तिघे कमी लांबीच्या, तरीही लक्षात राहणाऱ्या भूमिकांमध्ये दिसतात. चित्रपटातील प्रकाशयोजना, रंगसंगतीमध्ये भडक व तकतकीत रंगछटांचा टाळलेला वापर इथल्या आशयाला पूरक आहे. 

चित्रपटाच्या सुरुवातीला हारुकी मुराकामी या जगप्रसिद्ध जापानी लेखकाच्या ‘नॉर्वेजियन वुड’ या कादंबरीतील एका वाक्य दिसते. ते वाक्य असे - “What happens when people open their hearts?” “They get better.” मुराकामीच्या कादंबरीत देखील नैराश्य,आत्महत्या, मृत्यू, मृत्यूचे पडसाद या संकल्पना अस्तित्त्वात असल्याने हा संदर्भ समर्पक ठरतो. (चित्रपटात सुरुवातीला दिसणारे मांजर नंतर मात्र कुठे दिसत नाही, हे मात्र मुराकामीचा थेट संदर्भ देणाऱ्या चित्रपटात जरा खटकते.) 

चित्रपटात मध्यवर्ती पात्रांच्या संभाषणांमध्ये बऱ्याच गोष्टींवरील चिंतन घडून येते. हे चिंतन जगण्याची बदलती शैली, बदलत्या शैलीचे परिणाम, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा बऱ्याच गोष्टींबाबत आहे. विमनस्क अवस्था आणि तिच्यातून बाहेर पडण्याची गरज, त्याचे मार्गही काही ठिकाणी अधोरेखित होतात. नील आणि नेहाचे दुःख, दुःखाचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही त्याचे परिणाम कमी-अधिक फरकाने सारखेच आहेत. फरक इतकाच की, नेहाचं वयाने मोठं असणं आणि साहजिकच तिला या गोष्टींचा असलेला अनुभव नीलहून अधिक आहे. सध्याच्या काळात मानसिक स्वास्थ्य, नैराश्य, आत्महत्या, इत्यादी गोष्टींबाबत चर्चा घडून येत असताना ‘जून’चा आशय कालसुसंगत ठरतो. त्यामुळे चित्रपटामध्ये एक प्रकारचे सुन्न समकालीनत्व साचलेले आहे. अशा समकालीन आशयाची प्रभावी मांडणी चित्रपटांमध्ये वेळोवेळी दिसत राहणे जसे गरजेचे आहे, तसेच या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळणे देखील आवश्यक आहे. 

 

टीप: ‘जून’ हा प्लॅनेट मराठी या मराठी कलाकृतींसाठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २९ जून रोजी प्रदर्शित झाला आहे.