India

जम्मू-काश्मीर: पूंचमध्ये लष्कराच्या ताब्यात असताना तीन तरुणांचा मृत्यू

बकरवाल समुदायातील तीन तरुणांना २ दिवसांपूर्वी पूंच भागात लष्कराच्या गाड्यांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्करानं ताब्यात घेतलं होतं.

Credit : इंडी जर्नल

 

जम्मू-काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात तीन नागरिकांचा लष्कराच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर या प्रदेशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बकरवाल समुदायातील या तीन तरुणांना २ दिवसांपूर्वी पूंच भागात लष्कराच्या गाड्यांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्करानं ताब्यात घेतलं होतं. लष्कराच्या ताब्यात असताना त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासनानं तसंच लष्करानं या घटनेची नोंद घेतली असून, याचा तपास करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

साफीर हुसेन (३७), मोहम्मद शौकत (२६) आणि शाबीर अहमद (३२) हे तिघेही पूंच जिल्ह्यातील टोपा मस्त्रांडा या गावाचे रहिवासी होते. त्यांच्यासोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्य पाच तरुणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘द हिंदू’नं केलेल्या बातमीनुसार या घटनेचा एक २९ सेकंदांचा व्हिडियो व्हायरल झाला होता, ज्यात लष्करातील काही जवान तीन तरुणांचे कपडे काढून त्यांच्या अंगावर लाल मिरची पूड टाकताना दिसत होते. या बातमीनुसार या व्हिडियोमध्ये हे तरुण जमिनीवर निपचित पडलेले दिसतात. याशिवाय व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडियोमध्ये काही सैनिक एका तरुणाला मारताना दिसत आहेत, असं समजतं. मात्र इंडी जर्नलला हे दोन्ही व्हिडियो सापडले नाहीत आणि त्यामुळंच त्याची सत्यता तपासून पाहता आली नाही.

 

 

या घटनेनंतर जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांतुन त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काश्मीरमध्ये लष्कराविरोधात आंदोलनंदेखील झाली. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मृत तरुणांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना गृहकैदेत टाकण्यात आल्याचं त्यांच्या पक्षानं एक्स (ट्विटर) वरून सांगत त्याचा निषेध केला. यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षानं या तरुणांच्या लष्कराच्या कोठडीत असताना झालेल्या मृत्यूचा निषेध करत या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि अपनी पार्टी या दोन्ही पक्षांनी श्रीनगरमध्ये या घटनेविरोधात आंदोलन केलं. या घटनेवर आलेल्या प्रतिक्रियेनंतर पूंचमधील अनेक रस्ते लष्करानं बंद केले, तसंच या भागातील इंटरनेट सेवादेखील ठप्प करण्यात आली.

नोव्हेंबर २०१८ पासून जम्मू-काश्मीरमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार अस्तित्वात नाही. जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये, तर जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लष्कराकडून या घटनेत सहभागी सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या संघटनांनी आणि इतर राजकीय पक्षांनी भूतकाळातील घटना पाहता यावर संदेह व्यक्त केला आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंच आणि राजौरी या जम्मूमधील जिल्ह्यांमध्ये आतंकवादी हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या आठवड्यात पूंच जिल्ह्यातील डेरा की गली भागात काही लष्करी वाहनांवर अचानक झालेल्या हल्ल्यात चार सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर याच भागातील गुज्जर-बकरवाल समूहातील आठ तरुणांना सैन्यानं ताब्यात घेऊन जवळच्याच एका लष्करी कॅम्पमध्ये त्यांना अटकेत ठेवण्यात आलं. यादरम्यान त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यांच्यानुसार या तीन तरुणांच्या मृतदेहावर शारीरिक छळाच्या खुणा आहेत. इतर पाच तरुणांचाही शारीरिक छळ झाल्याचं आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असल्याचं, मृत तरुणांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

प्रत्येक वेळी आतंकवादी हल्ला झाल्यानंतर या जमातींमधील तरुणांना का वेठीस धरलं जातं आणि या मृत्यूंची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न या भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विचारात आहेत.