Americas

अखेर बोल्सनारो सरकारला जाग; व्हॅक्सिनसाठी भारताकडे घातली गळ

''लस घेतल्यानं बायकांना मिशी फुटेल आणि पुरूषांचा आवाज बायकी होईल," असं बोल्सनारो म्हणाले होते.

Credit : AP

देशातील कोव्हीडची परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच ब्राझीलनं सोमवारी कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन भारतात बनलेल्या कोव्हीडवरील लस आयात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ७० लाख बाधित रूग्णसंख्या आणि २ लाख मृत्यूंमुळे कोव्हीडचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझील अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे‌. 

''लस घेतल्यानं बायकांना मिशी फुटेल आणि पुरूषांचा आवाज बायकी होईल,'' अशा आपल्या चक्रम विधानांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष हायर बोल्सनारो यांच्या अवैज्ञानिक दृष्टीकोनाचा फटका ब्राझीलला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. दक्षिण अमेरिकेतील तुलनेनं कमी विकसित असलेले अर्जेंटिना, पेरू सारख्या छोट्या देशांनी कोव्हीडवरील लस शोधण्यासाठी आणि इतर देशांमधून आयात करण्यासाठी आक्रमकपणे पावलं उचलली आहेत. मात्र, इतक्या प्रमाणात रोज कोव्हीडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वरचेवर वाढत असतानाही बोल्सनारो सरकारनं जनतेपर्यंत लस पोहचवण्यासाठीही कुठलीच पावलं उचलली नव्हती. 

"कोव्हीड हा साधा ताप आहे लस घेणं सुरक्षित नाही", अशा बोल्सनारो सरकारच्या अवैज्ञानिक दृष्टिकोनामुळे ब्राझीलमधील २ लाखांपेक्षा जास्त लोकांना आधीच जीव गमवावा लागलाय. कोव्हीडवरील उपचार आणि आरोग्यव्यवस्थेतील  मागच्या ८ महिन्यांपासून सुरू असलेला हलगर्जीपणा विद्यमान सरकारनं लसीच्या बाबतीतही सुरूच ठेवला. याचाच परिणाम म्हणून शेजारील देशांमध्ये सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम एकीकडे सुरू झालेली असताना ब्राझीलमधील सरकारनं व्हॅक्सिन स्वतःच्या देशात विकसित करायचं की दुसऱ्या देशांकडून आयात करायचं याबाबतंही अद्याप निर्णय घेतला नव्हता. 

इतक्या संख्येनं लोकांचे रोज जीव जात असतानाही निष्काळजीपणातून राजकीय फायद्यासाठी अवैज्ञानिक दृष्टीकोन पसरवणाऱ्या सरकारविरोधात ब्राझीलमधील जनतेमध्ये असंतोष वाढत चालला आहे. लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील इतर देशांच्या तुलनेत ब्राझीलमधील पायाभूत आरोग्य सुविधा चांगल्या आहेत. एकेकाळी पोलीओच्या लसीकरणासाठी ब्राझीलने राबवलेल्या मोहीमेनं जगासमोर आदर्श घालून दिला होता. मात्र, कट्टर उजव्या राजकीय विचारसरणीच्या विद्यमान सरकारनं कोव्हीडवरील उपचार आणि लसीकरणाकडे केलेलं दुर्लक्ष याची चर्चा फक्त ब्राझीलमध्येच नव्हे तर जगभरात झाली.

आता अचानक जाग आलेल्या या कडव्या उजव्या सरकारनं ॲस्ट्राझेनेका या ब्रिटिश कंपनीनं भारतात बनवलेल्या लसीची आयात करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी भारतातून कोव्हीशिल्ड या लसीची आयात करण्यासाठी भारत सरकारसोबत करार करण्यासंबंधीचे प्रयत्न सुरु असल्याचं ब्राझीलच्या सरकारकडून सांगण्यात आलं. यासोबतच भारत बायोटेकच्या अजूनही ट्रायल फेझमध्ये असलेल्या 'कोव्हॅक्सिन' बाबतही विचारणा ब्राझीलकडून करण्यात आली आहे. 

इतर देशांनी आधीपासूनच स्वतः लस विकसित करण्याची आणि गरजेनुसार इतरांकडून आयात करण्यासंबंधीची तरतूद आधीच करून ठेवली आहे. यादरम्यान बोल्सनारो यांनी कोणतीच पावलं न उचलता केलेल्या अपप्रचाराची मोठी किंमत ब्राझीलला चुकवावी लागणार असल्याची भीती देशातील तज्ञांसोबतंच माध्यमांनीही व्यक्त केलीये. इतक्या उशीरा जाग आलेल्या बोल्सनारो सरकारसोबत भारतासारख्या देशांनी करार केलाच तरी प्रत्यक्षात लसीकरणाची मोहीम सुरू होण्यासाठी आता किमान एक वर्ष तरी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे २०२१ हे वर्ष ब्राझीलसाठी २०२० पेक्षा अवघड जाणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय. 

काही दिवसांपूर्वीच चीननं विकसित केलेली कोव्हीडवरील लस खरेदी करण्यासंबंधीचा करार राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांनी ऐनवेळी रद्द केला होता. आपले जवळचे मित्र आणि राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची मर्जी राखण्यासाठीच राजकीय स्वार्थ साधत हा करार त्यांनी अशा पद्धतीनं अचानक रद्द केल्याची टीका त्यावेळी झाली होती.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा प्राधान्यक्रम आधी आपल्या देशातील लोकसंख्येचं लसीकरण करण्याचा असणार, यात शंका नाही. सिरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनीही 'कोव्हीशिल्ड व्हॅक्सिन पहिल्यांदा भारतातील जनतेपर्यंत पोहचवून त्यानंतरच इतर देशांना त्याचा पुरवठा करण्यासंबंधी विचार केला जाईल', अशी भूमिका घेतलेली आहे. आता ऐनवेळी जाग आलेल्या बोल्सनारो सरकारनं जनतेचा वाढता दबाव लक्षात घेऊन अचानक ५० लाख व्हॅक्सिनचे डोस भारताकडून आयात करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. 

आंतरराष्ट्रीय व्यापार करारानुसार निर्यातीवरील बंधनं लक्षात घेता ब्राझीलची ही मागणी पूर्ण करणं भारताला शक्य नाही. या संभाव्य आयातीमधील अडथळे दूर करून शक्य तितक्या जास्त प्रमाणात व्हॅक्सिन मिळवण्यासाठी ब्राझील सरकारनं आता भारताकडे गळ घातली असून भारत आणि ब्राझीलच्या परराष्ट्र खात्यांमधील अधिकाऱ्यांची या संबंधीची एक उच्चस्तरीय बैठकही नुकतीच पार पडली. एका बाजूला जगभरातील इतर देश कोव्हीडमुक्त होण्याच्या दिशेनं पाऊल टाकत असताना निव्वळ बोल्सनारो सरकारचा अवैज्ञानिक दृष्टिकोन आणि धोरणलकवेपणामुळं कोव्हीडवर मात करण्यासाठीचा ब्राझीलचा मार्ग आणखी खडतर झालेला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या वाढत चाललेल्या रोषाचा सामना करणं हे ब्राझीलमधील विद्यमान सरकारसमोरील मुख्य आव्हान ठरेल.