India

फटाक्यांवर बंदी वगैरे आणून आणीबाणी लावायची माझी इच्छा नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवाळी जवळ येत असल्याच्या मूहूर्तावर राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.

Credit : CMO Maharashtra Facebook Live

कोरोनावरील ठोस उपचार आणि लसही अजून आलेली नाही. त्यामुळे जाईल तिथे मास्क वापरणं आणि प्रदूषणाला हातभार न लावणं इतकंच आपल्या हातात आहे. "फटाक्यांवर बंदी वगैरे आणून आणीबाणी लावायची माझी इच्छा नाही‌. राज्यातील जनता स्वत:हून फटाके न वाजवता कोरोनाविरूद्धच्या या लढाईला साथ देईल," असा विश्र्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी आणीबाणीवरून राजकारण करणाऱ्या आपल्या विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवाळी जवळ येत असल्याच्या मूहूर्तावर राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. कोरोनाचं अजूनही न टळलेलं संकट आणि दिवाळीतील वायूप्रदूषणातून कोरोनाची दुसरी लाट राज्यात येण्याच्या धोक्याविषयी खासकरून ते आज बोलत होते. त्याशिवाय भाजपचं थेट नाव घेता अशा अवघड काळातही मंदीरं उघडण्यासारख्या बाबींवरून राजकारण करत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्यांनी टोला लगावला.दिवाळी जसजशी जवळ आलीये तसं फटाक्यांमुळे होणारं वायू प्रदूषण आणि या वायू प्रदूषणाचा कोरोना संक्रमणाच्या दरावर होणारा परिणाम यावर तज्ञांनी सुद्धा चिंता व्यक्त केलीये‌. त्यामुळे "येत्या दिवाळीत फटाके वाजवून वायू प्रदूषण करू नका. दिवे लावून आणि हवा प्रदूषित होणार नाही ही काळजी घेऊनंच दिवाळी साजरी करा," अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केली‌‌. युरोपातील देशांमध्ये कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि त्याच्या भयाणतेची जाणीव करून देताना राज्यातील जनतेला दक्ष राहण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दिल्लीमध्ये अचानक कोरोना रूग्णांच्या वाढलेल्या संख्येमागे वायू प्रदूषाणाचंच कारण असून गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाविरूद्धच्या या सुरू असलेल्या लढाईवर फटाक्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळं पाणी फेरलं जाण्याची भीती आहे.

कोरोनाची दुसरी लाट येऊच नये, याची सगळी काळजी आम्ही घेत आहोत. तरी दुर्दैवानं ती वेळ आलीच तर राज्यातील आरोग्य सुविधा सज्ज राहाव्यात यासाठी अतिरिक्त बेड्सची सुविधा राज्यात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाचा हातभार असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि विशेषतः 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सारखी मोहीम यशस्वीरित्या राबवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत. "स्वतः सोबतच इतरांची काळजी घेणं आणि खासकरून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून मास्क न घालण्याचा निष्काळजीपणा करणाऱ्यांना दंड लावलाच जाईल," असं ठाम प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं.

 

 

'घरी बसून राहणारा मुख्यमंत्री' अशी जी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून होत आहे त्याचाही समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. लॉकडाऊनमध्ये घरी बसूनच ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार राज्याने केले असून रुतलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी परकीय गुंतवणूक आणण्यात अजूनही महाराष्ट्रच देशात आघाडीवर असल्याचा दाखलाही देण्यास ते विसरले नाहीत. कांजूरमार्गला हलवण्यात आलेल्या मेट्रो कार शेड प्रकल्पाला अडथळा निर्माण करणारं महाराष्ट्रद्वेषी राजकारण खपवून घेतलं जाणार नाही आणि वेळ आल्यावर त्यांना योग्य उत्तर देऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अनलॉक मोहीमेअंतर्गत राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम, सिनेमागृह, नाट्यगृह, ग्रंथालय, वाचनालय, महिलांसाठी लोकल इत्यादी गोष्टी सुरू करण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टीही हळूहळू पूर्ववत सुरू करण्याचा सरकारचा इरादा आहे. मंदीरं पुन्हा उघडी करण्याची मागणी आणि राजकारण विरोधकांकडून होतंय. याला उत्तर देताना "मंदिरं उघडल्यावर रूग्णांची संख्या वाढलीच तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का?" असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर परिस्थिती बघून हळूहळू मंदिरही उघडली जातील, असं आश्वासन दिलं.

कोरोना सोबतच अतिवृष्टी आणि दुष्काळाचं संकट राज्यावर आलेलं असून या अतिवृष्टीत राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विविध संकटांचा सामना करणाऱ्या राज्यातील जनतेला जितकं होईल तितकं आर्थिक सहाय्य करण्यास सरकार बांधील आहे. मात्र, राज्यांचा हक्काचा पैसाही केंद्राकडून दिला जात नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जीएसटी थकबाकीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोट ठेवलं. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पीक खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल, याची खातरजमा सरकार करणार असल्याचा दिलासा त्यांनी यावेळी दिला.