Quick Reads

देशीवाद हा प्रतिक्रांतीचाच भाग आहे: डॉ. रावसाहेब कसबे (मुलाखत)

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्याशी खास मुलाखत.

Credit : livemint

हैद्राबाद येथे स्थित मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता, कुणाल रामटेके, यांनी मराठीतील प्रसिद्ध तत्त्वज्ञ व अभ्यासक डॉ. रावसाहेब कसबे यांची घेतलेली मुलाखत.

 

कोणतही तत्वज्ञान हे एका विशिष्ट कालखंडात जन्माला येतं. एक प्रकारची कालसापेक्षता त्या तत्वज्ञानाचा भाग असते. अशा वेळी समकालीन तत्वज्ञानाची मांडणी करत असतांना या तत्वज्ञानाचा संदर्भ हा ‘फॅक्ट्स’च्या आधारावर घ्यावा की विवेकाच्या आधारावर? उदाहरणार्थ प्रस्थापित बौद्ध तत्वज्ञानाच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेब नाकारतात आणि एका नव्या परीपेक्षात त्याची मांडणी करतात किंवा इकडे महाराष्ट्रात चक्रधर कृष्णाचा आणि तिकडे कबीर राम-रहीम चा ‘रेफरन्स’ घेतात. पण आजच्या काळात अशा संदर्भांमधून ‘कन्फ्युजन’ क्रिएट होणार नाही का ? 

डॉ. कसबे: होईल ना !

 

मग त्यासाठी काय करावं ? कारण त्यातून तो महापुरुष पण पूर्णतः मागे पडू शकतो. उदाहरणार्थ तुकाराम महाराज जर घेतले तर ते विठ्ठलापासून विष्णू आणि थेट वैकुंठापर्यंत मांडणी करतांना दिसतात. या अँगलनं तुकाराम, चक्रधर, कबीर, बुद्ध हे सारेच विचारावंत संदर्भांच्या बाबतीत मागे पडत जातील. 

डॉ. कसबे: हे ‘कन्फ्युजन’ असणं सहाजिक आहे. मुळात ‘रेफरन्स’ कशासाठी घ्यायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आता उदाहरणार्थ कबीर आहे, कबीराने रामाला फार महत्व दिलं. आणि तो आयुष्यभर सामान्य माणसासारखा जगला. असं जगतांना त्त्याने सांगितलं की, ‘रामाचं नाव स्मरता-स्मरता मी स्वतःच राम झालेलो आहे. तेव्हा मला आता बाकी कशाचीच गरज नाहीए.’ मुळात त्याचा एक फार सुंदर दोहा आहे की,-  

“जब मैं था तब हरी नहीं,अब हरी हैं हम नाय ! 

प्रेम गली अति सांकरी, जा में दो न समाय !!”

अशा अनेक दोह्यांमधून कबीर आपणच ईश्वर झाल्याचं सांगत आहे. अश्या प्रकारची अनुभूती ज्यावेळी एखाद्या संताला येते त्यावेळी ‘माणसाला एक अंतर्विश्व असतं’ असं जे लोक मानतात त्यांना ‘अध्यात्म’ मानावं लागतं. आणि जे फक्त बाहेरचा विचार करतात, तंत्रज्ञान - टेक्नॉलॉजी, विवेक, अमुक-ढमुक…खरं म्हणजे माणूस हा विवेकशील प्राणी नाहीच आहे मुळात ! 

 

हे कसं काय? 

डॉ. कसबे: माणूस ‘इरॅशनल’च आहे मुळात! पण त्याच्यामध्ये ‘रॅशनल’ होण्याची क्षमता आहे आणि तो ‘रॅशनल’ होऊ शकतो. हे एकदा तुम्ही मान्य केलत तर त्या ‘इरॅशनल’शी जो संघर्ष तुम्हाला करावा लागतो. तो वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. मुळात, ‘मला जो ‘रेफरन्स’ घ्यायचा आहे तो कशासाठी घ्यायचा आहे ? त्यातून मला काय सांगायचय ?’ हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. मग त्यातून फक्त ‘ईश्वर’ सांगायचाय की तुमच्या प्रत्यक्ष जीवनामधले जे काही अनुभव येतात ते तुम्हाला अभिव्यक्त करायचेत ? आता उदाहरणार्थ, तुकारामांचा एक अभंग - 

‘आपुले मरण पाहिले म्या डोळा। 

तो जाला सोहळा अनुपम्य॥’

असं जो मृत्यूचा अनुभाव तुकाराम महाराज सांगतात हे सारं ‘ग्रेट’ आहे ना ! तसच बुद्धाचं पण आहे. बुद्धाच्या जीवनात पण तेच होतं.  फक्त भाषा बुद्धाची वेगळी आहे. तुकारामांची वेगळी आहे.

 

पण पुन्हा तत्वज्ञानात्मक प्रश्न निर्माण होणार नाहीत का? उदाहरणार्थ मला जातिअंतक समाजरचनेच्या संदर्भात भूमिका मांडायची आहे. आणि त्याचवेळी मला एखाद्या धार्मिक कट्टरतावाद्याला ‘ऍड्रेस’ करायचं आहे. त्यावेळी मी जर ही मांडणी त्यांच्या महापुरुषांच्या संदर्भात केली तर त्यातून पुन्हा एकदा वेगळं कन्फ्युजन क्रिएट होईल. कारण अशी मांडणी करणं सुद्धा एका अर्थाने शक्यच आहे जर हाच निकष लावला तर?

डॉ.कसबे: त्यासाठीच तुम्हाला मार्क्सच्या ‘हिस्टॉरिकल मटेरिलिझम’चा अभ्यास करावा लागेल. म्हणजे प्रत्येक इतिहासाच्या टप्प्यावर माणसाची प्रगती कशी-कशी होत गेली हे तुम्हाला समजेल. कारण तुम्हाला आजच्या तत्वज्ञानातले निकष मध्ययुगीन संतांना लावता येत नाहीत. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळच्या माणसाच्या जगण्याचे प्रश्न वेगळे होते. त्यावेळच्या माणसाचं जीवन पूर्णपणे वेगळं होतं. आणि आजचं पूर्णपणे वेगळं आहे. म्हणून तुम्हाला जाती अंताचा विचार मांडायचा असेल तर वैदिक काळापेक्षा मध्ययुगातले संत किती पुढे गेले होते ? किंवा मागे होते ? हे समजावून सांगावं लागेल. त्यांनी काही परिवर्तन केलं किंवा नाही ? परिवर्तन केलं ! असं जर तुम्हाला वाटत असेल तर कसं केलं ? याची मांडणी तुम्हाला करावी लागेल. जाती अंताच्याच संदर्भात बोलायचं झालं तर त्यानंतर फुले येतील. किंवा त्याच्या नंतर आंबेडकर येतील. म्हणजे ही सगळीच मंडळी येतील ! त्यांनी काय-काय केलं ? आणि ते कोणत्या परिस्थितीत केलं ? 

समजा बाबासाहेब आंबेडकर हे तेराव्या शतकात जन्माला आले असते तर चोखोबा आणि कर्ममेळ्याने वापरलेली भाषा या पेक्षा किती वेगळी भाषा त्यांनी वापरली असती? किंवा भारतामध्ये ब्रिटिशशाही आली नसती आणि त्यांनी सैनिकांच्या मुलांना शिक्षण ‘कंपल्सरी’ केलं नसतं तर बाबासाहेब ‘बाबासाहेब’ झाले असते का ? हा प्रश्न आहे ना... ! म्हणजेच त्या-त्या काळामध्ये जी-जी परिस्थिती असते त्यानुसार माणूस घडत असतो. कारण प्रत्येक माणूस हा इतिहासाचं अपत्य असतो. आणि जसा तो इतिहासाचं अपत्य असतो, तसाच तो इतिहास घडवीत पण असतो. तुम्हाला असा ऐतिहासिक दृष्ट्या विचार करावा लागेल. म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातली जी ताकत आहे, जे सामर्थ्य आहे ते कळेल. 

सगळ्याच संतांच्या कवितांमध्ये-तत्त्वज्ञानामध्ये अशी ताकत तुम्हाला दिसेल पण संत समाजक्रांती करू शकत नव्हते. राजकीय क्रांती करू शकत नव्हते. एका अर्थाने ते सगळे गरीब लोक होते. ते बिचारे एक गोष्ट मात्र करू शकत होते की, एकमेकांच्या हातात हात घालून चोखामेळ्याला मध्ये घेऊन इंद्रायणीच्या काठी नाचू शकत होते. एवढं ते करू शकत होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. 

 

म्हणजे सामाजिक क्रांतीचा एक वेगळा ‘डिस्कोर्स’ त्यांनी तयार केला. असं आपल्याला म्हणता येईल पण सर… 

डॉ. कसबे: नाही-नाही, सामाजिक क्रांतीचा असा कुठला ‘डिस्कोर्स’ नसतो! सामाजिक क्रांती ही एक प्रक्रिया असते. ‘सोशल रेव्हल्युशन इज अ प्रोसेस’. सुरुवातीपासून ती हळूहळू पुढे जाते आणि तिच्यामध्ये हे सगळे गुंफले जातात. तीच गुंफण पुढे बाबासाहेबांपर्यंत येऊ शकते. तेव्हा क्रांतीचा विचार हा सुद्धा एक ‘प्रोसेस’ आहे. आता जुन्या काळामध्ये ज्या लोकांना ती समाज व्यवस्था मान्य होती त्यांनी संन्यास घेतला. सन्यास हा एक विद्रोह आहे. व्यवस्थेच्या विरोधातला तो विद्रोह होता. ज्यांना ही समाज व्यवस्था मान्य नव्हती ते ‘मला काही तुमच्याशी देणं-घेणं नाही’ असं म्हणून रानात निघून गेले. क्रांतीची सुरुवात इथून झालेली आहे. 

क्रांतीची ही ‘प्रोसेस’ सुरू झाली ? मग ती सामाजिक पातळीवर कशी गेली ? मग मार्क्सने त्याला अधिक ‘सायंटिफिक’ शब्दात कसं मांडलं ? हा एक वेगळा विषय आहे. अर्थात ते ‘सायंटिफिक’ म्हणजे त्याच्या काळात उपलब्ध असलेले ‘सायंटिफिक’. कारण मागच्या काळात जे होतं ते आजच्या काळात तुम्हाला काही लागू पडणार नाही. कारण मार्क्स ज्या काळामध्ये होता त्यावेळी काही ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ नव्हते आणि ‘इलेक्ट्रिसिटी’ थोडीशी सुरू झालेली होती. थोडीशी. ती सुद्धा काही फार मोठ्या प्रमाणात नव्हती. लेनिनच्या काळात ती बऱ्यापैकी होती आणि म्हणून लेनिन ला जो प्रश्न विचारला की, ‘क्रांती नंतर तुम्ही काय कराल?’ त्यावेळी लेनिन म्हणाला की संपूर्ण रशियामध्ये ‘इलेक्ट्रिसिटी’चं जाळं निर्माण करील. का? तर त्यामधून उद्योग उभे राहतील. वगैरे-वगैरे.  

तेव्हा कोणत्याही महापुरुषाचा विचार करताना हा ‘कालसापेक्ष’ करावा लागेल. तो महापुरुष कोणत्या काळात होता ? त्याला आजूबाजूची परिस्थिती कोणती होती ? त्यावेळेची सामाजिक मूल्य कशी होती ? आणि सामाजिक ‘सोर्सेस’ कोणते होते ? कोणत्या सामाजिक शक्ती होत्या ? आणि हा महापुरुष कोणत्या सामाजिक शक्तीचं प्रतिनिधित्व करीत होता ? असच स्वरूप तुम्हाला मांडावं लागेल. मग तुमचं ‘कन्फ्यूजन’ होणार नाही. 

आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो गांधीजींच्या संदर्भातला! की, गांधीजी हे प्रस्थापित समाज शक्तीचे प्रतिनिधी होते. पण ज्यावेळी गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जो प्रचंड मोठा संघर्ष झाला त्यावेळी गांधी बदलले आणि गांधींना आंबेडकर काय म्हणतात ते समजायला लागलं. म्हणजे जे गांधी चातुर्वर्ण्य जातिसंस्थेला मान्यता देत होते पण त्यांनी अस्पृश्यतेला कधीच मान्यता दिली नाही. आणि पुढे गांधींनी ‘अँटी कास्ट’ चळवळ सुरू केली. सहभोजन सुरू केले. इतकच नव्हे तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पाया असलेली जी ‘इंडोगामी’ आहे त्या संदर्भात भूमिका घेत आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली.

इतकेच नाही तर स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला. गांधी बदलले. अर्थात, गांधी जरी प्रस्थापित शक्तींचे प्रतिनिधी असले तरीही समाजामध्ये जी नवी शक्ती उदयास येत होती तिला ते पाठिंबा देत होते. पण गांधीजींच्या पुढे जो मुख्य पेच होता की, ‘दोन्हीही घागरींवर हात ठेवून काम करता येणे शक्य आहे काय? तसं करता येणार नाही हे सुद्धा त्यांच्या शेवटी लक्षात आलं. आणि म्हणूनच काँग्रेसने गांधींना १९३५ सालापासूनच नाकारायला सुरुवात केली. शेवटी-शेवटी तर गांधी पूर्ण एकाकी पडले आणि इतके एकाकी पडले की ते नव्या सामाजिक शक्तींवर स्वार होऊ इच्छित होते. त्यावेळी जी नवी समाजवादी शक्ती नेहरूं, जयप्रकाश किंवा नरेंद्र देवांनी उभी केली होती, तिच्यावर ते स्वार होऊ इच्छित होते पण त्यांचा खून झाला. 

त्यामुळे, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माणूस ‘स्टॅटिक’ राहत नाही. तो सतत बदलत असतो. गांधी अतिशय बदलले. म्हणजे जे आंबेडकर एकेकाळी काँग्रेसला जळते घर म्हणत असत त्यांना शेवटी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनच जावं लागलं. आणि गांधींनी जर त्यात ‘इनिशिएटिव्ह’ घेतला नसता, लेस्टर नावाची बाई बाबासाहेबांसाठी भारतात येऊन त्यांना ‘कॉन्स्टिट्यूशन’ असेंब्लीवर घेण्यासाठी भांडली नसती तर…त्यावेळी गांधींनी सरळ राजेंद्र प्रसादांना बोलावून सांगितलं की, ‘मला कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर ‘कॉन्स्टिट्यूएंट’ असेंब्लीवर पाहिजेत. तुम्ही त्यांना कुठूनही निवडून आणा पण मला ते पाहिजेत” हे जे आंबेडकरांवर गांधींचं एक आतून प्रेम आहे त्यातून आपल्याला दिसून येतं की या समाज शक्तीला गांधी काही आतून विरोध करत नव्हते. हे प्रेम आहे. पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतःच काँग्रेसच्या वतीने निवडून गेले. राज्यघटना सुद्धा आंबेडकरांनी ड्राफ्ट करावी हीच इच्छा गांधींनी व्यक्त केली. त्यानुसार ‘कॉन्स्टिट्यूएंट’ असेंबलीच्या ‘ड्राफ्टिंग कमिटी’चे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली. यातून माणसं ‘स्टॅटिक’ नसतात ती बदलत असतात आणि त्यांच्या मध्ये होणारा जो बदल आहे त्याला काही कारण असतात. त्या कारणांचा कसूर शोधला की हा तो आपल्या मनातला गोंधळ आहे हा गोंधळ जातो. आणि कारणांचा तपशील तुम्ही शोधला नाही तर मग तुम्हाला  विश्लेषण करता येणार नाही. 

त्यावरून तुम्ही कुठल्याही संतांचं-महापुरुषांचं उदाहरण घेतलं तरी त्यांच्या वाङ्गमयामध्ये मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात परस्पर विसंगती तुम्हाला दिसतील. मुळात, तो जो विरोध आहे तो त्यांच्या व्यक्तिगत विकासातून आलेला आहे. 

बाबासाहेब आंबेडकर १९५० साला पूर्वी अतिशय ‘अँटी मार्क्सिस्ट’ होते. ते समाजवादी होते पण ‘मार्क्सिस्ट’ मात्र नव्हते. पण १९५० नंतर त्यांनी मार्क्स नीट अभ्यासायला सुरुवात केली. जेव्हा बाबासाहेब वारले त्यावेळी त्यांच्या उशाला ‘दास कॅपिटल’ होतं. बुद्धाची तुलना ते मार्क्स सोबत करत होते. मार्क्सबद्दल स्वतःच उपस्थित केलेले मुद्दे त्यांनी स्वतःच खोडून काढले होते. ‘बुद्ध काय हिंसा करू नका म्हणाला का?’ असं सुद्धा ते म्हणाले आहेत. बुद्धाने ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ हा काही विशेषांचा अधिकार आहे का?’ हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याबद्दलही बाबासाहेब बोलले आहेत. हा जो बदल आंबेडकरांमध्ये झालेला आहे त्यासाठी ‘बुद्धा अँड हिज धम्मा’ ग्रंथाच्या प्रस्तावनेत ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ते तुम्हाला बघावं लागेल. ‘बुद्धा अँड हिज धम्मा’ हा काही छोटा ग्रंथ नाही. हा तीन ग्रंथांचा एक भाग आहे. तुम्हाला बुद्ध नीट समजून घ्यायचा असेल तर ‘रेवल्युशन अँड काउंटर रेवल्युशन’ समजून घ्यावं लागेल. त्यानंतर ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ हे भाषण समजून घ्यावं लागेल. आता दुर्दैवाने ते ‘बुद्ध ऑर कार्ल मार्क्स’ असं केलेलं आहे. आणि तिथून घोटाळे झाले. ते मुळात ‘बुद्धा अँड कार्ल मार्क्स’ असं आहे. हे स्वतःच बाबासाहेबांनी ‘बुद्धा अँड हिज धम्मा’च्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. आता हा जो बदल झालेला आहे, या बदलांचा आढावा घेताना आणि तो त्यामागची कारणे शोधतांना आपल्याला ‘माणूस’ समजतो. त्यामुळे ‘कन्फ्युज’ होण्याचं काहीच कारण नाही. 

 

तुमच्या बोलण्यातून आणखी काही मुद्दे उपस्थित होतात. त्यापैकी एक म्हणजे आपण म्हणालात की, ‘क्रांती ही एक प्रक्रिया आहे. तत्त्वज्ञ किंवा क्रांतिकारक हा कालसापेक्ष असतो. क्रांती ही गतिमान आणि निरंतर सुरु राहणारी ही प्रक्रिया आहे.’ मग आजच्या काळात हे जे प्रचंड प्रमाणात शोषण प्रतिक्रांती वादी स्वर दृढ होत चाललेला आहे अशा वेळी जो ‘सर्वसामान्य’ आहे, त्यांच्याकडून क्रांतीची अपेक्षा आहे. त्याच्याकडून क्रांती घडवून येत असल्याची कोणतीही चिन्ह दिसून येत नाहीत. यातून महापुरुषांचा वारसा सांगणारे समकालीन पक्ष-संघटना-चळवळी आणि विचारवंत महापुरुषांची कालसापेक्षता लक्षात घेत नाहीत आणि त्यामधून व्यक्तिवादी दांभिकता निर्माण होते. त्याचा फटका चळवळींना बसतो असं आपल्याला वाटते का? 

डॉ. कसबे: निश्चितच! क्रांती ही ‘प्रोसेस’ आहे. प्रक्रिया आहे. तुम्ही तर माझ्या ‘आंबेडकर आणि मार्क्स’ या ग्रंथाची दुसरी आवृत्ती पहिली तर त्यावर मी दोन ‘कोट’ दिले आहेत. एक लेनिनचा आणि दुसरा बाबासाहेबांचा. लेनिन म्हणतो, “रशियामध्ये क्रांती झाली असं काही तुम्ही समजायचं काही कारण नाही. ही क्रांतीची सुरुवात आहे आणि क्रांती ही अखंड प्रक्रिया आहे. क्रांती झाली असं म्हणून आपली सर्व शस्त्र खाली ठेवायची नाहीत. कारण क्रांतीनंतर प्रतिक्रांती चा काळ सुरू झालेला असतो.” बाबासाहेबांनी सुद्धा, “जगाचा इतिहास म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती चा इतिहास आहे” असं सांगितलं. कारण क्रांती आणि प्रतिक्रांती हे  हे दोन सोशल फॉर्सेस आहेत. यात कायम संघर्ष असतो. कधी हा विजयी होतो तर कधी तो विजयी होतो. तेव्हा आता आपण कोणाच्या बाजूने उभे राहायचं ? ते आपण आपल्या विवेकावर ठरवायचं असतं. 

 

जातीवर्ग आणि सर्व प्रकाराच्या शोषणाचा आणि त्या समर्थानातील मांडणीचा आपण प्रतिरोध करतो. मग अलीकडच्या काळात आपल्याकडे होणारी देशीवादाची मांडणी प्रतिक्रांतिवादी म्हणून आपल्याला घेता येईल का? 

डॉ. कसबे: म्हणजे ती घ्यावीच लागेल ना! तुम्ही माझं (देशीवाद: समाज आणि साहित्य) ते पुस्तक पाहिलं का? तुम्ही ते मुळासकट वाचायला पाहिजे. ते ‘लोकवाङमय गृहा’नं प्रकाशित केलं आहे. देशीवाद हा प्रतिक्रांतीचाच भाग आहे. ‘तुम्ही जाती जिवंत ठेवा’ असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो त्यावेळी ती प्रतिक्रांतीचीच सुरुवात असते. हा एक प्रतिक्रांतीचा ‘सोशल फोर्स’ असतो. कारण तो ज्यावेळी असं म्हणत असतो  त्यावेळी समोरचे लोक टाळ्या वाजवत असतात. त्याचं कारण तो प्रतिक्रांतिकारकांचा समूह असतो. आणि समजा, दुसरं एखादं भाषण माझ्यासारख्याने दिलं की ‘जाती मोडल्याच पाहिजेत’ तरीही भरपूर टाळ्या मिळतात. कारण क्रांतीचा ते उगम स्वरूप असतं. तो ‘रिव्हल्यूशनरी फोर्स’ असतो. हे संघर्ष सतत चालूच असतात. 

 

पण पुढच्या काळात तुम्हाला वाटतं का सर की, जाती अंत पूर्णपणे शक्य आहे ? याबद्दल तुम्ही आशावान आहात का ? आणि ते कसं शक्य होईल? 

डॉ. कसबे: जातींचं स्वरूप बाबासाहेबांच्या काळात जे होतं ते जागतिकीकरणाच्या काळानंतर बदललं. आज त्याचे स्वरूप फारच वेगळं आहे. त्यामुळे जातीसंस्था जसजसे नवे विचार, नवी समाजव्यवस्था उदयास येत जाईल तस-तशी ती मोडत जाईल. प्रस्थापित जातीसंस्था ही विवाह संस्थेवर उभी आहे. ती जस-जशी मोडत जाईल आणि आंतरजातीय विवाह होत जातील आणि आज तुम्ही बघा आंतरजातीय विवाह होणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही जर या दृष्टीनं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, त्यामध्ये प्रचंड मोठा बदल झालेला आहे. पुढे-पुढे आणखी बदल होत जातील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की माणूस म्हणजे एखादं निसर्गचित्र नाही. तो नेहमी प्रतिक्रिया देणारा प्राणी असतो. तो या बाजूनं असेल किंवा त्या बाजूनं असेल पण तो प्रतिक्रिया देत असतो. तो प्रतिक्रिया देत राहणार. समाज विकास होत राहणार. हा विकास सतत चालू आहे. कारण माणसाची प्रतिक्रिया याला कारणीभूत आहे.