India

व्यवस्थेच्या अपयशाला वैयक्तिक उपक्रमांची ठिगळं

महिलांना पुरुषांच्या संरक्षणाची नाही, व्यवस्थात्मक बदलांची गरज आहे

Credit : Facebook

हैद्राबाद मध्ये झालेल्या बलात्कारानंतर सर्वत्र स्त्रियांची सुरक्षा व लैंगिक अत्याचाराबाबत चर्चेला पुन्हा पेव फुटलं. या घटनेमुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला. या रागाचं काही ठिकाणी कृतिशील कार्यक्रमात रूपांतर होतानाही दिसलं. 

काही तरुणांनी मिळून सोशल मीडियावर सेफ इंडिया, सेफ वुमन, साथ तुमची साथ आमची अशा प्रकारे मोहीमा राबवल्या. त्यातुन महिलांना एक श्वाश्वत विश्वास निर्माण होणार असला तरीही महिलांवरील अत्याचार आणि त्यावरच्या उपायांचा किचकटपणा अजूनतरी निस्तरता येत नाहीये याची गरज अधोरेखीत होत राहते.

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा मॅसेज तो असा

 

नाव: अनुप

शहर: पुणे पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र

संपर्क: +91**********

कोणतीही वडील किंवा धाकटी बहीण, महिला ज्याला रात्री वाहतुकीमध्ये अडचण येत असेल किंवा कोणतीही समस्या असेल किंवा तिला जवळच्या भागात सुरक्षित वाटत नसेल, मी मदत करू शकतो. आपण कधीही मला कॉल / मेसेज करू शकता .. जस्ट_कॉल करा आणि सांगा भाऊ मला तुमच्या मदतीची गरज आहे, मी तिथे येईन.

आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्र बदल घडवू शकतो आणि हा बदल करू.

#सेफइंडिया

 

असा आशय टाकून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या मोहिमेसंदर्भात काही तरुणांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता, या उपक्रमात सहभागी असणारे मिलिंद बडगुजर, यांनी सांगितले की, "आमच्या परिसरात विविध पातळीवर महिलांच्या सुरक्षिततेकरिता आम्ही तरुण मिळून काम करत आहोत. या मोहिमेत मी सहभागी होण्याचे कारण की, आज हैद्राबादला घडले ते उद्या माझ्या शेजारीही घडू शकते. निदान हा मेसेज पाहून माझ्या संपर्कातील माणसांनाही यातून प्रेरणा मिळेल आणि तेही यात सहभागी होऊन एक स्त्री सक्षमीकरणासाठी पाऊल उचलतील. यामुळे आपोआप अत्याचाऱ्याच्या घटनेत घट होईल."  

याविषयी वैचारिक तसेच चळवळी, सामाजिक संघटनेतील कार्यकर्त्यांनी आपले मत नोंदवताना यावर आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले. त्या भेदरलेल्या अवस्थेत ती मुलगी घरी अथवा पोलिसांचा १०० नंबर लावण्यापेक्षा तुमचा नंबर का लावेल? असे किती नंबर ती महिला, मुलगी सेव्ह करणार? बलात्कार अतिप्रसंग हे बऱ्याच वेळा शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवास करणाऱ्या मुलींसोबत होण्याचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्याच्या पर्यत हे नंबर पोहचतील का? ती ज्या भागात उभी आहे तेथील जवळच्या व्यक्तीचा नंबर तिला उपलब्ध होईल का? ह्या चांगल्या भावनेतून चालू झालेल्या उपक्रमाचा कोणी गैर फायदा घेईल का? फेक अकाउंटच्या जमान्यात फेसबुक वरील नंबर वर आणि व्यक्ती वर ती महिला विश्वास ठेवू शकते का? अशा प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

या मोहिमेविषयी बोलताना पुणे येथील भानुदास यादव म्हणतात की, "ही सोशल मीडिया मधून सुरु झालेली चळवळ स्वागतार्ह आहे की यातून स्वतः हून काही तरुण पुढे येऊन सकारात्मक बदल करू इच्छित आहेत. पण इथेही काही मर्यादा आहेत. त्याची भौगोलिक व्याप्ती काय? पोलिसापेक्षा तुम्हाला प्राध्यान्य देणं म्हणजे पोलिसांची अकार्यक्षमता मान्य करणे आहे का? आणि हा तात्पुरता आणि वरवरचा उपाय शोधणं आहे. बलात्कारी व्यक्ती ह्या समाजव्यवस्थेतून घडतात त्यामधील दोषांवर गंभीर काम करणे गरजेचे आहे, घर, शिक्षण, पोलीस, न्यायव्यवस्था ह्या संस्थांनी सकारात्मक व जलद कार्य करणे गरजेचे आहे."

सामाजिक कार्यकर्त्या व जनवादी महिला संघटनेच्या डॉ. किरण मोघे या मोहिमेविषयी बोलताना म्हणाल्या की, "नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर सुरक्षा करण्यासाठी उतरावं लागतंय हे नक्कीच न्यायव्यवस्था, कायदा आणि सरंक्षण व्यवस्था यांचे अपयश आहे. आज हैद्राबाद घटनेमुळे देशभरात जो असंतोष निर्माण होतोय त्याला काही अंशी पोलिसही कारणीभूत आहेत. ज्यावेळी महिला किंवा पुरुष अडचणीत असेल त्यावेळी त्यांना पोलिसांपेक्षा व्यक्तिगत मदत घेण्यावर भर आहे. आज सामाजिक कार्यकर्ती अथवा महिला काही तक्रार देण्यासाठी गेली तर तिला तासनतास थांबावे लागते हे कुठेतरी थांबले पाहिजे," बी पुढे म्हणाल्या, "कायद्याचे राज्य आपण म्हणतो पण वारंवार घडणाऱ्या घटना आणि त्याचे परिणाम यामुळे लोकांचा प्रशासकीय धोरणांवर विश्वास उडत चालला आहे. हेच यातून दिसून येते."

या मोहिमेबद्दल मानवाधिकार कार्यकर्त्या कायदेतज्ज्ञ रमा सरोदे म्हणाल्या की, "जेंव्हा एखादी अशी घटना घडते त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात राग  असतो आणि त्यावेळी फक्त व्यक्ती हा विचार करतो की, त्याच्या परीने काय करता येईल. त्यातून अशा बऱ्याच मोहीमा चालू होत राहतात आणि कालांतराने बंद पडतात. ही मोहीम चांगली आहे पण फक्त कुठल्या साईट वर वाचला म्हणून त्या व्यक्तीची मदत घेणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न प्रत्येकाला असतोच. त्यामुळे याचा कितीपत उपयोग होईल हे येणार काळच सांगेल."  

या संदर्भात स्थानिक पोलिसांची भूमिका काय असेल या संदर्भात आम्ही काही पोलिसांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले की, "या मोहिमेविषयी माहिती नाही. असे निदर्शनास आले तर ते स्वागतार्ह असेल पण या घटना घडू नयेत म्हणून आम्हाला निर्जन स्थळी जास्तीची गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोलिंगच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मार्शल, दामिनी पथक इ. जास्त सजग राहण्याचे आदेश दिले आहेत."