India

भारतीय नौसेनेसमोरचा पाणबुड्यांचा प्रश्न गंभीर

पाणबुड्यांची संख्या सावकाश 'बुडत' आहे, असं दिसतं.

Credit : Indie Journal

 

राकेश नेवसे । भारतीय नौसेनेनं चार महिने हिंद महासागरात ट्रोपेक्स २०२३ युद्ध सराव केला. या युद्ध सरावात भारतीय सुरक्षा दलांच्या ७० नौका, ७० विमानं आणि ६ पाणबुड्या सरावात उतरवल्या होत्या. या युद्ध सरावात भारतीय वायुसेना, भारतीय तटरक्षक दल आणि लष्करानंही भाग घेतला होता. भारतीय लष्कराच्या काही सैन्य तुकड्या, तटरक्षक दलाची जहाजं आणि वायू सेनेकडून काही विमानं या युद्ध सरावात सहभागी होते. 

भारतीय नौसेना युद्ध नौकांच्या बाबतीत सध्या चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळेच नौसेनेनं ७० जहाजं या सरावात उतरवली. शिवाय नौसेनेकडून अनेक नवनवीन जहाजांना त्यांच्या सेवेत दाखल केलं जातंय. यात अनेक विनाशिका, एक विमानवाहू युद्ध नौका आणि इतर प्रकारची युद्ध नौकांचा समावेश होतो. मात्र फक्त ६ पाणबुड्या या सरावात सहभागी झाल्यानं नौसेनेची पाणबुड्यांची संख्या सावकाश 'बुडत' आहे, असं दिसतं.

या सरावाच्या वेळी भारतीय सुरक्षा दलांनी तटीय संरक्षण, सागरातून जमिनीवर हल्ला आणि नौदलाच्या युद्धाचा सराव केला. भारतीय नौसेनेनं या युद्ध सरावातून स्वतःची युद्धाची तयारी तपासून पहिली. भारताला २.३७ दशलक्ष चौरस किमीचं विशेष आर्थिक समुद्र क्षेत्र लाभला असून ७५१६ किमी लांब समुद्र किनारा आहे. युद्ध काळात इतक्या मोठ्या क्षेत्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी नौसेनावर आहे. 

 

भारतीय नौदलातील सध्याच्या पाणबुड्या 

भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रात आव्हान देऊ शकण्याची धमक शेजारी पाकिस्तानमध्ये नाही. मात्र चीनची वाढती सागरी शक्ती अनेक तज्ज्ञांना चिंता व्यक्त करायला भाग पाडत आहे. तसं पाहता भारतीय नौसेना आधुनिकीकरणाच्या बाबतीत वायुसेना आणि लष्कराच्या तुलने खूप पुढं असल्याचं मानलं जातं. मात्र एका क्षेत्रात भारतीय नौसेना प्रचंड मागे पडली आहे. ते म्हणजे पाणबुडींची संख्या. 

भारतीय नौसेनेकडं सध्या एकूण १९ पाणबुड्या आहेत. त्यातील १२ पाणबुड्या १९८५ नंतर सेवेत दाखल केल्या होत्या आणि आता त्यांची सेवानिवृत्तीची वेळ जवळ आली आहे. असं असतानाही नव्या पाणबुड्या घेण्याची घाई भारत सरकार करताना दिसत नाही. 

भारतानं १९८० मध्ये जर्मनीकडून शिशुमार क्लासच्या ४ पाणबुड्या विकत घेतल्या. त्याच दरम्यान तत्कालीन सोविएत महासंघाकडून सिंधुघोष क्लासच्या १२ पाणबुड्या विकत घेतल्या. सिंधुघोषच्या १२ पाणबुड्यांपैकी एक पाणबुडी स्फोटामध्ये खराब झाली तर दुसरी पाणबुडी भारत सरकारनं म्यानमारच्या नौसेनेला भेट म्हणून दिली. 

भारत सरकारनं १९९९ च्या कारगिल युद्धानंतर गठीत केलेल्या समितीनं ३० वर्षात डिझेलवर चालणाऱ्या २४ पाणबुड्या भारतात बनवण्याचं ध्येय ठेवलं. त्यानुसार त्यांनी प्रोजेक्ट ७५ ची सुरुवात केली. या प्रोजेक्टनुसार २०३० पर्यंत २४ पाणबुड्या भारतीय नौसेनेला देण्याचा प्रयत्न केला जाणार होता. आता २०२३ सुरु असताना त्या २४ पैकी फक्त ६ पाणबुड्या सेवेत दाखल झाल्या. त्या म्हणजे भारत सरकारनं २००५ मध्ये फ्रांसकडून घेतलेल्या कलवरी क्लासच्या ६ पाणबुड्या. 

बाकी १८ पाणबुड्या घेण्यासाठी भारत सरकार कोणतीही विशेष घाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे या ६ पाणबुड्यांनंतर प्रोजेक्ट ७५ (आय) च्या नावानं सुरु करण्यात आलेल्या नव्या प्रकल्पात सहभागी देशांपैकी अनेक देशांनी भारत सरकारच्या अवास्तव मागण्यांमुळं त्यांचा सहभाग काढून घेतला आहे. 

चीन आणि पाकिस्तानचं आव्हान 

भारत सरकार आणि नौदलानुसार भारत हिंद महासागरात सुरक्षा प्रदान करणारा मुख्य देश आहे. म्हणजे भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेच्या बंगालच्या उपसागरापर्यंत, तर दक्षिणेच्या संपूर्ण हिंद महासागरात दबदबा ठेवण्याचा दावा भारत सरकार आणि भारतीय नौदल करतं. या दाव्याला अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून पाठिंबा असला तरी आपले शेजारी चीन आणि पाकिस्तान यांना ही संकल्पना पटत नाही. 

भारत सरकार प्रोजेक्ट ७५ (आय) च्या अंतर्गत एअर इंडिपेंडेंट प्रॉपल्शन यंत्रणा असणाऱ्या पाणबुड्या घेऊ इच्छित आहे. अशा पाणबुड्या मिळवण्यासाठी पाकिस्ताननं २०१५ मध्येच चीनबरोबर करार केला. तर त्यांच्याकडे असलेल्या ३ पाणबुड्यांना फ्रान्सनं त्यांची ही प्रणाली नव्यानं जोडून दिली. या तंत्रज्ञानामुळे पाणबुडीचा पाण्यात राहण्याचा काळ ४ ते ५ पटीनं वाढतो. आपल्यापेक्षा लहान समुद्र क्षेत्र असणाऱ्या पाकिस्तानकडे सध्या १० पाणबुड्या आहेत. त्यातील ५ पाणबुड्या चीननं त्यांना दिल्या असून अजून ३ काही वर्षात त्या पाकिस्तानच्या सेवेत दाखल होतील. 

चीनचा पाकिस्तानच्या नौदलाला पाठिंबा मिळत असतो असं सामरिक तज्ञ सांगतात. पाठिंब्याचं कारण म्हणजे भारताला या क्षेत्रात आव्हान देऊ शकणारं नौदल निर्माण करण्याचा प्रयत्न. शिवाय चीनच्या अणू ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अँटी पायरसी गस्तीसाठी हिंद महासागराच्या क्षेत्रात येत राहतात. भारत सरकार चीनच्या या गस्तीकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहत. 

भारतीय नौसेनेकडे अणू ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या खूप कमी आहेत. नौका युद्धात वापरल्या जाणाऱ्या आण्विक पाणबुड्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार विकल्या किंवा विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत. सध्या भारत अरिहंत क्लासची एक पाणबुडी वापरत असून अजून तीन पाणबुड्या त्यांच्या निर्मितीच्या विविध टप्प्यात आहेत. या अरिहंत क्लासच्या पाणबुड्या या नौका युद्धात वापरण्यासाठी नसून एखाद्या देशानं अणुबॉम्बचा हल्ला केल्यानंतर त्या देशावर अणु हल्ला करण्यासाठी वापरल्या जातात. 

भारत सरकारनं युद्धात वापरण्याजोगी १ आण्विक पाणबुडी रशियाकडून २०१२ मध्ये दहा वर्षासाठी भाडे तत्त्वावर घेतली होती. मात्र भाड्यानं घेतलेली अकुला क्लासची चक्रा नावाची पाणबुडी २०२१ मध्येच माघारी दिली. भाड्यानं घेतलेली दुसरी पाणबुडी २०२५ मध्ये आपल्याला मिळेल. चीनकडे एकूण ७० पाणबुड्यांपैकी २१ पाणबुड्या अणू उर्जेवर चालतात.

 

भारतीय नौसेनेतील पाणबुड्यांचं भविष्य 

भारतात सध्या असलेल्या पाणबुड्यांपैकी ४ शिशुमार क्लासच्या पाणबुड्या येत्या काही काळात निवृत्त केल्या जातील. त्यानंतर सिंधुघोष क्लासच्या ८ पाणबुड्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे त्या अजून साधारण १० वर्ष चालतील.

मात्र इतर वेळी प्रचंड वेगानं आधुनिकीकरण आणि स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नातील भारतीय नौसेनेसमोरचा पाणबुड्यांचा तिढा सुटत नाहीये. ३० वर्षात डिझेलवर चालणाऱ्या २४ पाणबुड्या भारतात बनवण्याचं ध्येय आता शक्यप्राय दिसत नाही. त्यातील फक्त ६ पाणबुड्या सध्या सेवेत दाखल झाल्या आहेत आणि ६ पाणबुड्यांसाठीच्या करारात अजून पाणबुड्यांची निवड करण्यात आलेली नाही. बाकीच्या १२ पाणबुड्यांचा काहीचं विचार नाही.

 

 

अणू उर्जेवर चालणाऱ्या ४ पाणबुड्या अण्वस्त्रांच्या क्षेपणास्त्रांसाठी बनवल्या जातील. त्यातील एक सेवेत रुजू झाली असून दुसरी लवकरच सेवेत दाखल होईल. बाकीच्या दोन लवकर पूर्ण होतील. हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६ पाणबुड्या बनवण्यासाठी अभ्यास केला जात असून त्यांची निर्मिती सुरु व्हायला अजून ५ वर्ष जातील, असा अंदाज आहे. 

त्यामुळे जर भारताला हिंद महासागरात आपला दबदबा आणि हिंद महासागरातील सुरक्षा प्रदान करणारा मुख्य देशाचं पद टिकवून ठेवायचं असेल तर सरकारनं लवकरात लवकर नवीन पाणबुड्यांची खरेदी करणं आवश्यक आहे. मात्र सरकार याबद्दल गांभीर्यानं विचार करताना सध्या तरी दिसत नाही.