India

परभणी: अवैध वाळू उपश्याला आशीर्वाद कुणाचे ?

ग्रामीण भागातील नदी पात्रात राजरोस वाळू उपसा केला जात आहे.

Credit : Dnyaneshwar Bhandare

परभणी: वाळूची किंमत बाजारात १० हजार रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे. ग्रामीण भागातील नदी पात्रात राजरोस वाळू उपसा केला जात आहे. नदी पात्रातील मातीमिश्रीत वाळूचा ऊपसा झाल्याने पात्रात प्रचंड खड्डे पडले आहेत. महसुल प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करुनही कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट महसूली प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. 

जिल्ह्यात जवळपास ५० किमीचे गोदावरीचे पात्र आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची दररोज वाहतूक केली जाते. विशेषत: गोदावरी नदीपात्र पाण्याने भरून असते, त्यामुळे ठिकठिकाणी वाळू निर्माण झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून अपेक्षित वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व प्रतिब्रास १० हजार रुपयांप्रमाणे वाळू विकून अमाप पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून दररोज जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. अनेक वेळा गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोशाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व प्रतिब्रास १० हजार रुपयांप्रमाणे वाळू विकून अमाप पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे.

 

राज्यभरात मागील काही महिन्यांत वाळूमाफियांना चाप बसला असताना, गोदावरीच्या पट्ट्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. मागील दोन-तीन वर्षांत वाळूमाफियांना तेथे अक्षरश: हैदोस घातला आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या या काळ्या सोन्याची लूट केली जात आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहने घालण्यापासून ते तहसील कचेरीतून वाळूचे ट्रक पळविण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेलेली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी वाळूचा अवैध उपसा करून पर्यावरणाचाही ऱ्हास घडविणाऱ्या या मंडळींविरोधी पोलिस-प्रशासनाने विशेष मोहीम उघडायला हवी.

 

अवैध उपसा करणाराचे उखळ पांढरे

एकीकडे जिल्हाधिकारी अवैध वाळू उपस्याबाबत रणशिंग फुंकतात आणि दुसरीकडे मात्र त्यांच्याच अखत्यारीत असलेले तहसील प्रशासन मात्र राजरोसपणे अवैध वाळू उपस्याला मूक संमती देत असल्याचे चित्र स्पष्पटपणे दिसत आहे. गावालगतच्या नदी पात्रातून ट्रॅक्टर व बैल गाडीच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा होत आहे. या बाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारपर्यंत अर्थपूर्ण तडजोड होत आहे. परिणामी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे फावत असून प्रामुख्याने नदी पात्रात रात्रीच्यावेळी अशा प्रकारची अवैध वाळू उपसा होत असल्याचे ग्रामस्थांतून उघड बोलल्या जात आहे. अवैध वाळू उपस्यावर तहसील प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे अवैध ऊपसा करणारे मात्र आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.

 

पोलिस,महसूल वाळू तस्कर यांची साखळीच 

कान्हेगाव, ता. सोनपेठ येथील नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना वाळूचा उपसा होत आहे. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून रात्री वाळूचा उपसा केला जातो. तर दिवसा वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते

कामगारांच्या जीवास जबाबदार कोण ? 

कान्हेगाव परिसरात गोदावरीचे पात्र तुडुंब भरलेले असते. थर्मोकोलच्या होडग्या बनवून कामगार नदीपात्रात जाऊन वाळू काढतात. या मध्ये होडगी पलटली तर त्याखाली बुडून कामगारांचा जीव जाण्याचा धोका असतो.   काही ठराविक वाळू तस्कर यांच्या जीवावर वाळू उपसा करतात. तर दुर्दैवाने अशी घटना घडलीच तर त्यास जबाबदार कोण?

 

 

उपविभागीय अधिकाऱ्यांवरच हल्लावाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पाथरी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांच्या गाडीवर नरवाडी जवळ मंगळवारी  (दि. ११मे) दगडफेक करून हल्ला करण्यात आला.  यात सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांना न जुमाणारे वाळू माफिया सामान्य नागरिकांचं करणार काय ?असा प्रश्न उपस्थित होतो.