Quick Reads

२०२० आणि बदललेला सिनेमा

स्पॉटलाईट सदर

Credit : ToI

कोविड पॅन्डेमिक दरम्यान सिनेमा हे माध्यम आणि त्याच्याच जवळच्या मालिका, ऑडिओ-व्हिज्युअल पॉडकास्ट्स यासारख्या कंटेंटचे प्रकार जगभरातील बहुतांशी लोकांच्या कामी आले. सर्व स्पोर्ट्स मॅचेस पुढे ढकलल्या गेल्या किंवा मग रद्द तरी झाल्या. याखेरीज चित्रपटगृहं देखील बंद होती. अशात मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून राहणं आलं. 

मधल्या काळात पाहण्याच्या वेळा, सवयी आणि जागा बदलल्यानंतर चित्रपटनिर्मिती आणि वितरणामध्ये बरेचसे बदल घडणं काहीसं साहजिक होतं. यातील काही बदल याआधीच समोर आले आहेत, तर काही बदल नव्याने समोर येत आहेत. उदाहरणार्थ, ‘नो टाइम टू डाय’ हा जेम्स बॉन्ड या पात्रावरील पंचविसावा चित्रपट घेऊ. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुरुवातीच्या काळात चित्रपट ऑनलाईन रिलीज करण्याबाबत नकार दिला आणि नंतर स्ट्रीमिंग सर्व्हिसला त्याच्या वितरणाचे हक्क देण्यासाठी साधारण सहाशे ते सातशे दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत सांगितली. साहजिकच बऱ्याचशा लोकप्रिय स्ट्रीमिंग सर्व्हिसेसनी इतके पैसे देऊ करण्यास नकार दिला. परिणामी हा चित्रपट भविष्यात कधीतरी प्रदर्शित करता येईल, असाच विचार स्टुडिओला करावा लागतोय. 

 

 

सांगायचा मुद्दा असा की, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणं आणि घरात बसून पारंपरिक टीव्ही चॅनल्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट आणि मालिका पाहणं यात बराचसा फरक आहे. अनोळखी लोकांनी एकत्र येऊन एका चित्रपटगृहात एकत्र येऊन तिथल्या अंधाराच्या एकच एक छताखाली चित्रपट पाहणं, या अशा पाहण्यातील सामूहिक ऊर्जा ओटीटी प्लॅटफॉर्मवर एखादी कलाकृती पाहण्यात नाही. त्यामुळे एकीकडे नेटफ्लिक्सची ‘मनी हाइस्ट’, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘मिर्झापूर सीजन २’ यांना यश मिळत असताना दुसरीकडे प्राईम व्हिडिओने हक्क विकत घेतलेले चित्रपट अपयशी ठरल्याचं दिसलेलं आहे. (अर्थात, ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या कलाकृतीचं यशापयश मोजायचं कसं हा मुद्दा असला तरी, इथे यश आर्थिक अर्थापेक्षा लोकप्रियता आणि सकारात्मक प्रतिसाद या अर्थाने गृहीत धरू.) 

‘लक्ष्मी बॉम्ब’ किंवा आताच प्रदर्शित झालेला ‘कुली नंबर १’ हे चित्रपट एरवी चित्रपटगृहात त्यांच्या निर्मात्यांना अपेक्षित होतं त्यानुसार सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यात यशस्वी झाले असते. कारण, यापूर्वी खुद्द अक्षय कुमार आणि धवन पिता-पुत्रांच्या चित्रपटांना आर्थिक यश आणि लोकप्रियता दोन्हीही मिळालं आहे. अशात ओटीटीवर या दोन्हींना मिळालेलं अपयश म्हणजे चित्रपटगृहात अस्तित्त्वात असलेली सामूहिक मानसिकता आणि ऊर्जेच्या परिणामाचं द्योतक मानता येईल. बहुतांशी व्यावसायिक भारतीय आणि अमेरिकन चित्रपट याच सामूहिक मानसिकतेवर अवलंबून असतात. त्यामुळे हे नवीन बदल व्यावसायिक चित्रपटांच्या अनुषंगाने नकारात्मक परिणामांकडे इशारा करणारे आहेत. डॅनिएल क्रेगचा ‘नो टाइम टू डाय’ असो किंवा मग तो अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, ओटीटीची गणितं ही स्टार अभिनेता या बिरुदावलीचा मक्तेदार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. 

याउलट आर्ट हाऊस आणि इंडी फिल्म्स करिता हे बदल सकारात्मक ठरू शकतात. भारतीय चित्रपटगृहांमध्ये मध्यंतराचे गणित विचारात घेऊन त्यानुषंगाने चित्रपटाची रचना करावी लागते. ही अशी सक्तीची रचना बहुतांशी वेळा व्यावसायिक चित्रपट सोडता आर्ट हाऊस आणि इंडी चित्रपटांचा विचार करता चुकीची असते. अशात थेट ओटीटीकरिता चित्रपट निर्माण करण्याच्या पर्यायामुळे पारंपरिक रचनेचा अवलंब न करता चित्रपट निर्माण करण्याचा पर्याय समोर येतो. 

 

चित्रपटगृहे आणि पॅन्डेमिक

एकीकडे ओटीटीमुळे अनायासे भारतीय आणि अभारतीय व्यावसायिक चित्रपट आणि चित्रपटगृहांमधील थेट संबंध अधोरेखित होत होता. तर, दुसरीकडे चित्रपटगृहे आणि मुख्यत्वे सिंगल स्क्रीन थिएटर्स आर्थिक संकटातून जाताना दिसत होती. ‘बिझनेस टुडे’च्या एका स्टोरीमधील अंदाजानुसार येत्या काळात साधारण दीड ते दोन हजार चित्रपटगृहे बंद होण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबरमधील वृत्तानुसार बहुतांशी सिंगल स्क्रीन थिएटर्स कोविड नंतरही लागलीच उघडण्याची शक्यता नाकारण्यात आली होती. अशात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सिंगल स्क्रीन थिएटर्सवर टाळे लागण्यास सुरुवातदेखील झाली. उदाहरणार्थ, डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्येच पुण्यातील ‘विजय सिनेमा’ची इमारत नेस्तनाबूत केली गेली. एकंदरीत सिनेमा आणि या माध्यमाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निगडीत असलेल्या व्यवसायांवर काय परिणाम झाले आहेत याची कल्पना करता येऊ शकते. मल्टिप्लेक्स उघडले जाणं काहीएक प्रमाणात शक्य झालं असलं तरी आधीच उतरती कळा लागलेल्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची परिस्थिती कोविड काळामध्ये अधिकच बिकट झाली आहे. 

 

 

सिंगल स्क्रीन थिएटर्सचं काहीसं पुस्तकांच्या दुकानासारखं आहे. जर लोक अॅमेझॉन किंवा तत्सम वेबसाईट्सवरून ऑनलाईन पुस्तक खरेदी करत असतील आणि महिनोन्महिने प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात जात नसतील, तर अशी दुकानं नफा न मिळाल्याने बंद पडली यात विशेष ते काय! मात्र, आपण स्मरणरंजनात रमणाऱ्या समाजव्यवस्थेचा भाग असल्याने तेही असेना. सांगायचा मुद्दा हा की, ऐंशी किंवा नव्वदीच्या दशकाचं स्मरणरंजन करणं ठीक असलं तरी बदलत्या आर्थिक, सामाजिक गणितांमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्सचं तग धरून राहणं अवघड बनलेलं आहे. करोना काळामुळे या संकटात अधिक भर पडून ही चित्रपट पाहण्याची व्यवस्था उद्ध्वस्त होण्यात हातभार लागला आहे. बाकी, शेकडो थिएटर्स बंद पडण्याबाबतचा अंदाज कितपत खरा ठरतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. त्यास आताच सुरुवात झालेली असल्याने त्याचं नंतर आश्चर्य वाटून घेऊ नये, इतकंच. 

त्यातल्या त्यात सकारात्मक बाब ही मानता येईल की, भारताबाहेर जसे क्वेंटिन टॅरेंटिनो, क्रिस्टोफर नोलन, मार्टिन स्कॉर्सेसी यांसारखे चित्रपटकर्ते प्रत्यक्ष सिनेमागृहातील अनुभवाबाबत आग्रही असतात, अगदी तेच रोहित शेट्टीसारख्या चित्रपटकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे ‘सूर्यवंशी’ फक्त आणि फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होईल, असा कौतुकास्पद अट्टाहास धरून बसलेल्या शेट्टीच्या सिनेमा या माध्यमावरील आस्था आणि प्रेमाला दाद द्यायला हवी. कोण जाणे, २०२१ या वर्षात रोहित शेट्टी ‘द गाय दॅट सेव्ह्ड सिनेमा’ म्हणून प्रसिद्ध होईल! तसंही २०२० या वर्षाने शिकवलं त्यानुसार अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगून असायला हरकत नाही. 

संदर्भ:

1. No Time To Die Not Going To Streaming, Studio Wanted $600 Million For Movie. (2020, October 24). Retrieved January 1, 2021, from ScreenRant website.

2. Coronavirus fallout: 1,500-2,000 movie screens may shut shop in India as content lines go dry. (n.d.). Retrieved January 1, 2021

3. Pune: Demolition of iconic Vijay Theatre underway | TOI Original—Times of India Videos. (n.d.). Retrieved January 1, 2021