Opinion

मुनीरशाहीचे प्रताप

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पीटीआय’ या पक्षाचे प्रमुख इमरान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात गेले महिनाभर तेथे जबरदस्त आंदोलन सुरु आहे. मोठ्या दबावानंतरच पंजाब प्रांत सरकारने इमरान यांच्या बहिणीला जेलमध्ये जाऊन इमरान यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनीच या निर्णयाची घोषणा केली. इमरान यांना फाशी कक्षात ठेवण्यात आले असून, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत समर्थकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाल्याची माहिती इमरान यांचे पुत्र कासिम यांनी दिली. इमरान यांच्या तुरुंगवासाला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. टीव्ही चॅनेल्सनाही त्यांचे नाव किंवा फोटो दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. इंटरनेटवर इमरान यांची अलीकडची कुठलीही झलक दिसलेली नाही. त्यांचे डिजिटल सार्वजनिक अस्तित्व पूर्णपणे गायब झाले आहे.

बरोबर तीन वर्षांपूर्वी इमरान यांच्यावर पोलिसांनी हल्लादेखील केला होता. वकिलांनाही इमरान यांची भेट घेता येत नाही. आपली राजवट अमेरिकेने संपुष्टात आणली, असा थेट आरोप इमरान यांनी केला होता. दूरचित्रवाणीवरून पाकिस्तानी जनतेस संबोधित करताना त्यांनी, अमेरिकेला माझी सत्ता नको आहे आणि म्हणून मला पायउतार व्हावे लागत आहे, असे म्हटले होते. २०२२ साली अमेरिकेने इमरान यांची गठडी वळवताच, असीम मुनीर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. ते आता पाकिस्तानचे हुकूमशहा बनले आहेत. मुनीर यांचे अमेरिकेशी लागेबांधे आहेत, हे लक्षात आल्यामुळेच इमरान यांनी आयएसआय प्रमुख पदावरून त्यांची हकालपट्टी केली होती. आता मुनीर यांचे अमेरिकेत पायघड्या घालून स्वागत केले जात असून, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे त्यांचे प्यादे बनलेले आहेत. सर्व सत्ता मुनीर यांच्या हाती केंद्रित झाली आहे. घटनेत दुरुस्ती करून, त्यांनी स्वतःला पाच वर्षांसाठी पाकितानचे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. पहलगामनंतर भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत चोप दिल्यानंतरही, मुनीर यांनी स्वतःला ‘फिल्ड मार्शल’ घोषित केले आहे.

 

पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत

 

पाकिस्तान हे अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे उद्गार अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले होते. ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आपल्या पुस्तकात ओबामा यांनी म्हटले होते की, पाकिस्तानी सैन्य, विशेषतः त्यांच्या आयएसआयमधील काहीजणांचे तालिबान व अल कायदासोबत संबंध असल्याचे उघड गुपित होते. थोडक्यात पाकिस्तान हे ‘दहशतवादी राष्ट्र’ असल्याचे त्यांनी सूचित केले होते.

पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार यांनादेखील अचानकपणे अदृश्य केले जाते. आता भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे पदच्युत माजी पंतप्रधान इमरान खान यांची हत्या झाल्याचा दावा अफगाणिस्तानातील काही माध्यमांनी केला होता. अर्थात त्यात तथ्य आढळले नाही. उच्च न्यायालयाने आठवड्यातून किमान एकदा इमरान यांची भेट घेण्याची परवानगी दिलेली असतानाही, जवळपास तीन आठवडे त्यांना भेटण्याची परवानगी नातेवाइकांना देण्यात आली नाही. लष्कराच्या आशीर्वादामुळे सत्तारूढ झालेले इमरान त्यानंतर लष्करालाच डोईजड झाले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले.

त्यानंतर पाकिस्तानात दोन वर्षे राजकीय अस्थिरता होती. मग इमरान यांना अटक करण्यात येऊन शिक्षाही ठोठावण्यात आली. पक्षांतर्गत निवडणुका न घेतल्याचा ठपका ठेवून, पीटीआय या पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेण्यात आले. अशा परिस्थितीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांतही पीटीआयला ९३ जागा मिळाल्या. तर नवाझ शरीफ यांच्या पीएमएल (एन)ला ९८ आणि बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पीपीपीला ६८ जागा मिळाल्या. मतदानाची टक्केवारी पाहिल्यास, पीटीआयला सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के, तर पीएमएल (एन)ला २४ टक्के आणि पीपीपीला १३ टक्के मते मिळाली. पंजाब आणि सिंध प्रांतांत अनुक्रमे शरीफ आणि भुत्तो यांच्या पक्षास नेहमीप्रमाणे यश मिळाले. तर पीटीआय हा खैबरपख्तुनख्वाँ आणि बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र पाकिस्तानी लष्कराने निवडणुका हायजॅक करून शर्यतीत शरीफ यांना पुढे ठेवले, असा आरोप करण्यात आला होता.

 

पाकिस्तानच्या ७८ वर्षांच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाला पाच वर्षांचा काळ पूर्ण करता आलेला नाही.

 

पाकिस्तानातील संसदीय निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी अमेरिका ब्रिटन व युरोपियन युनियनचे जे प्रतिनिधी आले होते, त्यांनीदेखील त्या निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल शंका व्यक्त केली होती. इमरान खान हे तुरुंगात असूनदेखील त्यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यामुळेच इमरान यांच्यापासून अन्य पक्षांना आणि लष्कराला धोका वाटत आहे. २०२४ मध्ये पीएमएलएन आणि पीपीपी यांनी एकत्र येऊन लष्कराच्या आशीर्वादाने सरकार स्थापन केले आणि शाहबाझ शरीफ हे पंतप्रधान बनले. परंतु पाकिस्तानच्या ७८ वर्षांच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाला पाच वर्षांचा काळ पूर्ण करता आलेला नाही. तीन ते चार वेळा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारची सत्ता उलथवून सैन्याने कब्जा घेतला. तर १२ पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप ठेवून सत्तेतून बेदखल करण्यात आले.

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनलेले लियाकत अली खान यांची रावळपिंडीतच हत्या करण्यात आली होती. १९५८ मध्ये लष्करप्रमुख जनरल अयूब खान यांनी सत्तापालट घडवून आणला आणि पंतप्रधानांना पदावून हटवले. राष्ट्रपतींना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले. यानंतर अयूब खान स्वतः राष्ट्रपती बनले आणि पंतप्रधानपद १३ वर्षांसाठी चक्क रद्द करण्यात आले! १९७९ मध्ये जनरल झिया उल हक यांनी झुल्फिकार अली भुत्तोंवर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप ठेवून त्यांना सुळावर चढवले. १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि नवाझ सरकारला पदच्युत केले. पुढे यथावकाश नवाझ शरीफ यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपद स्वीकारले, तेव्हा म्हणजे २०१७ साली पनामा पेपरगेटमध्ये नाव आल्यानंतर त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली.

आता इमरान त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचा तुरुंगात छळ करण्यात येत आहे. जेलमध्ये उंदीर आणि घुशींचा त्रास आहे. त्याचप्रमाणे अवमानास्पद वागणूक दिली जात आहे, असा आरोप आहे. इमरान सत्तेवर असताना बुशरा यांचा सरकारमध्ये खूप प्रभाव होता. त्या काळी जादू करत असत, असा उल्लेख ‘दि इकॉनॉमिस्ट’ या प्रख्यात नियतकालिकातील लेखात करण्यात आला होता. पाकिस्तानात प्रथमपासूनच पंजाब्यांचे सत्तेत वर्चस्व राहिलेले असून, जेव्हा पीपीपीची राजवट होती तेव्हाच सिंध प्रांताचा किंचित वरचष्मा राहिला. परंतु पीपीपीच्या नेत्या बेनझीर भुतो यांचीदेखील हत्या झाली.

 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील पश्तुन समाजात एकी आहे.

 

पाकिस्तानमधील लष्कर व सरकारचे देशातील मालमत्तांवर वर्चस्व आहे. इमरान खान हे पठाणी समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि आपली उपेक्षा होत असल्याचे खैबरपख्तुनख्वाँ आणि बलुचिस्तान या प्रांतातील लोकांची भावना आहे. आपल्या नेत्याला वाईट वागणूक दिली जात आहे व त्याच्या जीवाला धोका आहे ही भावना झाल्यामुळेच पीटीआय या पक्षाचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत तुरुंगाबाहेर जमले आणि याआधीदेखील ते रस्त्यावर उतरले होते. एवढेच कशाला, लष्कराच्या मुख्यालयावरही हे कार्यकर्ते चाल करून गेले होते. बुशरा बीबी यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय मुनीर यांनी घेतला होता आणि म्हणूनच त्यांना २०१९ मध्ये आयएसआयमधून इमरान यांनी हाकलले होते. त्याचाच बदला आता मुनीर घेत आहेत! शिवाय पाकिस्तानी लष्कराला इमरान खान यांच्या लोकप्रियतेची भीती वाटते. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या तिजोरीवर पंजाब्यांचे नियंत्रण असल्यामुळे खैबरपख्तुनख्वाँ भाग अविकसित राहिला.

१९८० सालच्या अफगाणिस्तानमधील सोव्हिएत रशियाच्या आक्रमणानंतर लाखो पश्तुन निर्वासित पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील पश्तुन समाजात एकी आहे. नुकताच पाकिस्तानने काबूल आणि अफगाणिस्तानमधील पूर्व भागावर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील खैबरपख्तुनख्वाँ, बलुचिस्तान, सिंध, पाकव्याप्त काश्मीर असा सर्वत्र जनतेत असंतोष आहे. कधीतरी या असंतोषाचा स्फोट होऊन पाकिस्तानचे आणखी तुकडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.