Opinion

‘एपस्टीन’चा संशयकल्लोळ

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

अमेरिकेतील बाल लैंगिक प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध असल्याच्या आरोपानंतर, सरकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. अँड्र्यू यांच्या ६६व्या वाढदिवशीच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अँड्र्यू हे सध्या पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांच्यावरील कारवाईमुळे राजघराण्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. अँड्र्यू हे दशकापूर्वी वाणिज्य राजदूत होते. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी बोलताना, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान कीएर स्टार्मर यांनी दिली आहे. महिला आणि मुलींविरोधात हिंसक घटनांबद्दल कुणालाही माहिती असेल, तर ती सांगण्यासाठी पुढे येणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, अशी सुस्पष्ट भूमिका स्टार्मर यांनी घेतली आहे. बऱ्याच देशांमध्ये बड्या व्यक्तींना एक कायदा असतो आणि सामान्य माणसाला दुसरा, असा अनुभव येतो. भारत आणि ब्रिटनमधील हाच फरक आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यानेही घृणास्पद कृत्ये केली होती आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूर येथील एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषण केल्याचा व जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चिन्मयानंद यांना बराच गहजब झाल्यानंतर अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०२४ मध्ये पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तातही केली. उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर यालाही अटक करण्याबबात अगोदर टाळाटाळ करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सेंगरची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगितही केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि तेथे उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली...

 

प्रिया यांच्यासह वीस स्त्रियांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यात अनेक नामवंत महिलांचाही समावेश होता.

 

‘मी टू’ मोहिमेतील आरोपांमुळे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्वा लागलेल्या एम. जे. अकबर यांच्या मानहानी प्रकरणात उच्च न्यायालयाने आपला निवाडा दिला होता. आपली बदनामी केल्याचा आरोप करत, अकबर यांनी, पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. परंतु प्रिया यांना निर्दोष ठरवत, न्यायालयाने अकबर यांना चांगलाच दणका दिला. प्रिया यांच्यासह वीस स्त्रियांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यात अनेक नामवंत महिलांचाही समावेश होता. परंतु चोराच्या उलट्या बोंबा, या थाटात अकबर यांनी या आरोपांमुळे आपली बदनामी झाल्याचा प्रत्यारोप केला होता. मात्र 'ज्या देशात स्त्रियांचा सन्मान कराला सांगणारे रामायण व महाभारत लिहिले गेले, तिथेच स्त्रियांविरुद्धच्या अत्याचाराच्या घटना घडत असून, हे लांच्छनास्पद आहे. समाजात प्रतिष्ठा असलेला माणूसही लैंगिक शोषण करू शकतो. मुख्य म्हणजे, केवळ तुमच्या कीर्ती वा प्रतिष्ठेसाठी एखाद्याच्या सन्मानाचा बळी दिला जाऊ शकत नाही. महिलांना अनेक दशकांनंतरही तक्रार करण्याचा अधिकार आहे', असे स्पष्ट प्रतिपादन न्यायालयाने केले होते. त्यामुळे प्रिया यांची मानहानीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. अहोरात्र जगाला बोधामृत पाजणाऱ्या एका संपादकाचा व माजी मंत्र्याचा बुरखा टरटरा फाडला गेला.

प्रिया रमाणी यांच्यावर अत्याचार झाला, परंतु त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले. त्यांनी अकबर यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांमागील हेतू तपासले गेले. २०१७ साली ‘मी टू’ चळवळ अत्युच्च बिंदूला पोहोचली असताना, प्रिया यांनी एक लेख लिहिला आणि अकबर यांनी नोकरीसाठीच्या मुलाखतीकरिता आपल्याला हॉटेलमध्ये बोलावून कशी लैंगिक सतावणूक केली याबदद्ल त्यात लिहिले. मात्र या निवाड्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की, आरोपीने ‘काही केले नसले, वा अयोग्य स्पर्शही केला नसला तरीदेखील’ लैंगिक शोषण होऊ शकते. मी तिला काही केले नाही, असा युक्तिवाद अकबर यांच्यातर्फे करण्यात आला. परंतु अनेक स्त्रियांनी अकबर कसे त्रास देत, हे जाहीरपणे सांगितले होते. एखाद्या व्यक्तीने बलात्कार केला नाही, परंतु स्त्रीला ‘अन्कम्फर्टेबल’ वाटेल असे वर्तन केले, तरी तो गुन्हा ठरतो, असे त्या निकालावरून स्पष्ट झाले.

 

 

तर पुष्पा गणेडीवाला या महिला न्यायाधीशाने अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक हल्ल्याच्या प्रकरणावर निकाल देताना, शारीरिक स्पर्श न होता जर एखादीला पकडले, तर तो लैंगिक हल्ला ठरत नाही, असे म्हटले होते. या न्यायाधीशाचे नाव सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीच्या यादीत होते, ते  काढून टाकण्याचा निर्णय यानंतर न्यायवृंदाने घेतला होता. न्यायमूर्ती रवींद्रकुमार पांडे यांनी प्रिया रमाणी प्रकरणी निकाल देताना, कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटले पहिजे असे वातावरण निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली होती.

दहा वर्षांपूर्वी क्रीडा जगतात सेक्स स्कँडल चर्चेत होते आणि त्यामध्ये शेन वार्न, शाहिद आफ्रिदी, केव्हन पीटरसन, माइक गेटिंग यांच्या सारख्यांची नावे आलेली होती. मॅच फिक्सिंग प्रकरणामुळेही भारतीय क्रिकेट जगतास हादरा बसला होता. बॉलिवूडमधील कास्टिंग काउचच्या प्रकरणात शक्ती कपूर, साजिद खान तर महिला शोषणाच्या प्रकरणात आलोकनाथ, नाना पाटेकर, विकास बहल, सुभाष घई, अन्नू मलिक, अशांची नावे आली होती. अर्थात हे कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि नटांनी स्त्रियांचे शोषण केल्याची प्रकरणे आजवर बाहेर आली आहेत.

आता कुविख्यात उद्योजक आणि दलाल जेफ्री एपस्टीन प्रकरणामुळे विविध देशांत सनसनाटी निर्माण झाली असून, त्यामुळे अनेक बड्या सेलेब्रिटीजना तसेच उद्योगपती आणि नेत्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. एपस्टीन याने अल्पवयीन मुलींची तस्करी करून अनेकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्या बेटावर बड्या बड्या व्यक्तींना बोलावून हे कुकर्म केले जात असे. एपस्टीनची मैत्रीण गिलेन मॅक्सवेल हिला पाच वर्षांपूर्वी मुलींच्या तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, म्हणजेच ‘एपस्टीन फाइल्स’ सार्वजनिक करण्याची मागणी सुरू झाली. अमेरिकेच्या न्यायविभागाने त्या खुल्या असून, त्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित ३० लाख कागदपत्रे आणि व्हिडिओंचा समावेश आहे. या फाइल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, संगीतकार मिक जॅगर व मायकेल जॅक्सन, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स त्याचप्रमाणे प्रिन्स अँड्र्यू यांचा समावेश आहे.

 

एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने मतदान करावे, अशी धक्कदायक भूमिका ट्रम्प यांनीदेखील घेतली होती.

 

किंग चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर यांना गुरुवारी ब्रिटिश पोलिंसानी अटक केली आहे. अमेरिकेची न्यायविभाग प्रत्येक पान काळजीपूर्वक तपासत असून, त्यामुळे पीडितेचे नाव, ओळख आणि प्रत्येकीची कहाणी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. अद्यापही लाखो पाने जाहीर झालेली नाहीत. कायद्यात नमूद केल्यानुसार, अमेरिकेच्या न्यायविभागाच्या अधिकाऱ्यांना पीडितांची ओळख लपवण्यासाठी किंवा सक्रिय गुन्हेगारी तपासाशी संबंधित माहिती ‘रिडॅक्ट’ करण्याची, म्हणजेच संपादित वा सेन्सॉर करण्याची परवानगी होती. परंतु कायद्यानुसार त्यांनी ते ‘रिडॅक्ट’ का केले, हे सांगणे आवश्यक होते. अशी काही पाने ‘रिडॅक्ट’ करण्यात आली असून, त्याची कारणे स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. याबाबत डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य रो खन्ना यांच्यासह काही नेत्यांनी, पाने उघड करण्यास विलंब झाल्यास महाभियोग चालवण्याचा इशारा दिला होता.

एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने मतदान करावे, अशी धक्कदायक भूमिका ट्रम्प यांनीदेखील घेतली होती. एपस्टीनने फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये १४ वर्षांच्या एका मुलीची ट्रम्प यांच्याशी ओळख करून दिली. १९९०च्या दशकातील त्या कथित भेटीत एपस्टीनने ट्रम्प यांना कोपराने धक्का मारत, ही मुलगी चांगली आहे ना? असा प्रश्नही विचारला. मात्र न्यायालयात तिने ट्रम्प यांच्यावर कोणताही आरोप केला नाही. परंतु एपस्टीने अनेक वर्षे माझी फसवणूक करून अत्याचार केले, असा आरोप मात्र तिने केला आहे.

 

एपस्टीन कोण आहे, हेच मला माहीत नव्हते असे पुरी यांनी म्हटले आहे.

 

एपस्टीनला अटक करण्यापूर्वी क्लिंटन यांचे त्यांच्यासोबतचे अनेक फोटो काढण्यात आले होते. मात्र एपस्टीनपीडितांनी क्लिंटन यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही आणि क्लिंटन यांनीही, एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांची आपल्याला माहितीच नव्हती, असा खुलासा करून कानावर हात ठेवले आहेत. एपस्टीनच्या शोषणाच्या जाळ्यात एक भारतीय तरुणी अडकल्याचे उघड झाले असून, अमेरिकन प्रशासन सध्या तिचा शोध घेत आहे. या तरुणीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी अमेरिकेबरोबरच भारत सरकारचीदेखील आहे. एपस्टीनने बिल गेट्स यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये भारताचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही उल्लेख आहे. लोकसभेतील विरेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही संबध एपस्टीन फाइल्सशी जोडला होता. मात्र आपण एपस्टीनला फक्त इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून भेटलो होतो, त्यापलीकडे आपला या गुन्ह्यांशी कसलाही संबंध नव्हता, असा खुलासा पुरी यांनी केला आहे.

एपस्टीन कोण आहे, हेच मला माहीत नव्हते असे पुरी यांनी म्हटले आहे. परंतु ते अनेकदा एपस्टीनला भेटले होते आणि म्हणूनच त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. उद्योगपती अनिल अंबानी यांनी, ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांच्या भेटीसाठी तसेच ट्रम्प व मोदी यांच्या भेटी घेण्यासाठी एपस्टीनची मदत मागितली होती. ट्रम्प यांना फायदा पोहोचवण्यासाठी इस्रायलमध्ये मोदी यांनी नाचगाणे केल्याचा आरोप एपस्टीन फाइल्समध्ये असल्याचीही माहिती उघड झाली आहे. अर्थात याचा तत्काळ इन्कारही झालेला आहे. परंतु अमेरिकेसमोर भारताने व्यापार करारात तरी लोटांगण घातले आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे एपस्टीन फाइल्सके पीछे क्या है, हा संशयकल्लोळ कायम राहील.