Opinion
डॉ. आंबेडकरांची घणाघाती पत्रकारिता
मीडिया लाईन सदर
भारतीय घटनेचे शिल्पकार आणि निष्णात अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिलला जन्मदिन. त्यांनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे या देशातील कामगारवर्गाचे दोन प्रमुख शत्रू आहेत, असे प्रतिपादन केले होते. ब्राह्मणशाही म्हणजे, ब्राह्मण समाजातच जन्माला आलेली व्यक्ती किंवा व्यवस्था असे नसून, विषमतेचा पुरस्कार करणारी एक प्रवृत्ती, असा त्याचा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. भांडवलशाहीत उत्पादनाची सर्व साधने ही थोड्याच धनिकांच्या ताब्यात असतात आणि बहुसंख्याक दलित-श्रमिक जनतेला या साधनांपासून वंचित व्हावे लागते. डॉ. बाबासाहेब व त्यांच्या पूर्वीच्या अनेक महान नेत्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणांचा आग्रह धरताना, त्यासाठी साहित्य व पत्रकारितेचा आधार घेतला. विशेष करून, पत्रकारिता हे त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाचे माध्यम मानले. प्रस्थापित वर्तमानपत्र छापत नसल्याने सत्यशोधकांची बाजू मांडण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी ‘सत्सार’ हे अनियतकालिक काढले होते. पुढे कृष्णराव भालेराव यांनी १८७७ साली ‘दीनबंधू’ हे वर्तमानपत्र सुरू केले आणि सत्यशोधकांची वैचारिक बाजू लोकांसमोर ठेवली. याच ‘दीनबंधू’मधून महात्मा फुले यांनी धार्मिक रूढी व परंपरांवर प्रहार केले. टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून २७ जुलै १८९७ रोजी अटक झाली. पण त्याआधीच २० जुलै रोजी त्यांनी ‘राजद्रोह कशाला म्हणतात´ हा अग्रलेख लिहिला होता. मुजोर नोकरशाही आणि प्रशासनावर टीका म्हणजे सरकारवर टीका नाही आणि प्रचलित कायद्याच्या आधारे तो राजद्रोह ठरत नाही, हे त्यांनी कायद्यातील कलमांचा ऊहापोह करून जनतेला समजावून सांगितले.
महात्मा गांधींनी १९०९ मध्ये ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक गुजरातीत लिहिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक बौद्धिक आराखडा, असे त्याचे स्वरूप होते. गांधीजींनी अनेक नियतकालिकांचे संपादन केले व ती अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होत. इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन अशी त्यांची नावे होती. महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण, अर्थशास्त्र, समाजकारण, धर्मचिकित्सा याविषयी अनेक अजोड ग्रंथ लिहिले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही! भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपासनेची पंरपरा तितक्याच तपश्चर्येने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो! महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र असा ब्राह्मण आहे! एवढेच नव्हे तर ‘ब्रह्मर्षी’ या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे. ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमेंड असेल, त्यांनी या कर्मजात ‘ब्राह्मणाच्या’ घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू! ’ - असे आचार्य अत्रे यांनी म्हटले होते.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्रकारितेतील असामान्य कामगिरीबद्दल दोन शब्द लिहितो. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात १९१९ साली झाली व पत्रकारिता १९२० साली सुरू झाली. ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी ‘मूकनायक’ पाक्षिक म्हणून सुरू केले. या पत्राच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी २५०० रुपयांची देणगी दिली होती. ‘मूकनायक’ सुरू झाले, तेव्हा टिळक हयात होते. परंतु त्यांच्या ‘केसरी’ने ‘मूकनायका’ची पोच तर दिली नाहीच, पण पैसे घेऊन जाहिरात देण्याचेसुद्धा नाकारले, हे खुद्द डॉ. बाबासाहेबांनीच नमूद केले आहे. ‘मूकनायका’त बाबासाहेबांनी विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ही संस्था सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू केले. ‘बहिष्कृत भारत’ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. त्यामध्ये महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी, महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी अशा विषयांवरचे त्यांचे मौलिक अग्रलेख आहेत. चवदार तळे सत्याग्रहासंदर्भात खास पुरवणीही काढण्यात आली होती. या पत्रातून सनातन्यांशी त्यांनी वाग्युद्धही केले. ‘बहिष्कृत भारता’त बाबासाहेब ‘आजकालचे प्रश्न’ व ‘प्रासंगिक विचार’ या दोन सदरांत स्फुट लेखन करत असत.
बाबासाहेबांचे महत्त्वाचे सर्व लेखन इंग्रजीतून झाले आहे. मराठी लेखनाचा त्यांना सराव नव्हता. पण मराठीतून सफाईने भारदस्त लेखन करता यावे, म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. संतांच्या व जुन्या नव्या लेखकांच्या वाङ्मयाचे परिशीलन केले. वाचकवर्ग लक्षात घेऊन आपले लेखन सोपे ठेवण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. महार आणि त्यांचे वतन, पर्वती सत्याग्रह, अस्पृश्योन्नतीचे विविध प्रश्न, नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्तानचे भवितव्य, गिरण्यांचे मालक व कामगार, खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी अशा विविध विषयांवर त्यांनी मर्मग्राही लेखन केले. आजकाल कोणालाही न दुखवता, गुळमुळीत व बुळबुळीत लेखन करणारे अनेक आहेत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध झुंज देण्यासाठी उभे राहत आणि घणाघाती प्रहार करत. तर्कशुद्ध लेखन करत.

त्याकाळी गाजलेल्या खान-मालिनी विवाहाच्या निमित्ताने त्यावेळच्या वृत्तपत्रांबाबत डॉ. बाबासाहेब लिहितात, ‘महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे अज्ञ लोकांना मूर्ख बनवण्याचे कारखाने आहेत. ’लोकांना कोणत्या मुद्द्यावर मूर्ख बनवून आपल्या पत्राचा खप वाढवता येईल याचे या धूर्त पत्रकारांनी एक शास्त्रच बनवले आहे.’ त्यांचे हे म्हणणे सध्याच्या काळातही तंतोतंत लागू पडते!
‘बहिष्कृत भारत’चे संपादक म्हणून बाबासाहेबांची कारकीर्द गाजली. नंतरच्या काळातील ‘समता’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ ही पत्रे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असली, तरी लौकिकार्थाने ते या पत्रांचे संपादक नव्हते. ४ सप्टेंबर १९२७ रोजी दलितेतरांनी ‘समाज समता संघा’ची निर्मिती केली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेबांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. बाबासाहेबांच्या चळवळीत सुरुवातीपासून दलितेतर लोक होते. ग. नी. सहस्रबुद्धे यांनी महाडच्या मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेतला. कमलाकांत चित्रे, अनंत चित्रे व भा. र. कद्रेकर हे अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेबांच्या सोबत राहिले. समता संघाचे दे. वि. नाईक यांचा ‘समता’पत्र सुरू करण्यात पुढाकार होता. ‘जनता’ पत्र सुरू करण्यातही नाईक व कद्रेकर यांचा वाटा होता. बाबासाहेबांनी लोकहितवादींची ‘शतपत्रे’ ‘बहिष्कृत भारता’त छापली आणि ती पुस्तकरूपात छापण्यासाठी श्री. रा. टिकेकरांना प्रोत्साहन दिले. कर्मवीर वि. रा. शिंदे यांचे लेख त्यांनी आपल्या पत्रात आवर्जून प्रसिद्ध केले.

‘हिंदू महासभा का ठकांची बैठक’, ‘अस्पृश्यांचा प्रश्न घरचा का राष्ट्राचा?’, ‘लबाड कोण? काँग्रेस की मजुरांचे पुढारी?’, ‘राष्ट्रप्रेम का सवतीची पोटदुखी’, ‘इंग्रजांची धोकेबाजी’ असे बाबासाहेबांचे अनेक अग्रलेख गाजले. हिंदू महासभेवरच्या अग्रलेखात ते म्हणतात, ‘जातिभेद कायम ठेवून हिंदूंच्या संघटना करू म्हणणे म्हणजे आवळ्याची मोट बांधून त्यांचे एकीकरण केल्याचे समाधान मानण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. येवल्याच्या सभेत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले होते की हिंदू समाजाची घटना असमानतेच्या पायावर उभारली असल्याकारणाने अस्पृश्यांना त्या धर्मात राहणे शक्य नाही. या असमानतेचे मूळ जातिभेदात आहे आणि त्यावर कुठार घालण्याशिवाय अन्य मार्ग नाही.’ भाषावार प्रांतरचना करताना, ते राज्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांचे रास्त मत होते.
‘दंगा झाला, दंगा झाला, काही उपाय नाही त्याला’ या अग्रलेखात बाबासाहेबांनी मुंबईत १९४१ साली झालेल्या दंग्याबद्दल लिहिले आहे. हा दंगा धार्मिक नव्हे, तर राजकीय कसा होता, हे बाबासाहेबांनी नीट समजावून सांगितले. ‘ज्या ठिकाणी हिंदू-मुसलमानांची तेढ आहे, त्या ठिकाणी हिंदू महासभेचे ढग दिसतात’, असे रोखठोक प्रतिपादन त्यात त्यांनी केले आहे. ‘मुक्ती कोन पथे?’ मध्ये ते म्हणतात, ‘हिंदू तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल, तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे.’
आज मात्र प्रसारमाध्यमांची अधोगती झाली आहे. माध्यमांसाठी आर्थिक भांडवल लागतेच. पण बौद्धिक भांडवलही आवश्यक असते. व्यवसाय करतानाच, माध्यमांनी आपले मूलभूत कर्तव्य पाळलेच पाहिजे. सत्ताधाऱ्यांची पालखी उचलण्यातच बहुसंख्य माध्यमांना इतिकर्तव्य वाटत आहे. माध्यमे आपल्या मूळ रस्त्यापासून भरकटत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेतील योग्य मार्ग कोणता, याची वाट दाखवतात.
